Thursday, December 24, 2020

सांताक्लाँज आणि 31 डिसेंबर विषयी अंनिसची भूमिका

*सांताक्लाँज आणि 31 डिसेंबर विषयी  अंनिसची भूमिका* ( *"चला उत्तर देऊया" टीम* )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
1) प्रश्न : सांताक्लाँजने आज पर्यंत कोणाला गिफ्ट दिलय? तुम्ही सांताक्लाँजला प्रत्यक्षात बघितलय? अंधश्रध्दा र्निमूलनवाले ख्रिसमस वेळी प्रदर्शन करणार का ? का फक्त हिंदु धर्मातच लुडबुड करता येते ? का फक्त हिंदु धर्मातच अंधश्रद्धा दिसतात ?

उत्तर : सांताक्लाँज हा कोणी दैवी पुरुष नसून घरातील कोणीतरी एक व्यक्ति सांताक्लाँज बनून भेटवस्तू देतो, हे जगातील समस्त ख्रिस्ती बांधव (भारतातील 2 टक्के ख्रिस्ती व अन्य धर्मीय सुद्धा) जाणतात. पण असा प्रश्न विचारणाऱ्या विद्वानाला एवढे सुद्धा माहित असू नये ? कदाचित या अज्ञानातूनच  हा प्रश्न विचारला गेला असावा. सांताक्लाँज हा हिंदू (80 टक्के) मधील भोंदू लोकांसारखी भोंदुगिरी, करणी, कालसर्प योग, राशिभविष्य  वगैरे करून लोकांना लुटत नाही, शुभ-अशुभाची भीती घालून बायकांचे लैंगिक शोषण करीत नाही. अशी सांताक्लाँजची केस असल्यास माहिती द्या. अंनिस त्यावर लक्ष केन्द्रित करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करेल.

*हिंदुंमधील पुरोहित, भगत, बाबा-बुवा ह्या वर्गानीही दक्षिणा, कोंबडं-बकरे न घेता अशा भेटवस्तू घरोघरी दिल्या पाहिजेत. त्याने त्यांची प्रतिमा उजळ होईल व लहान मुलांतही ही मंडळी सांताक्लॉजप्रमाणेच लोकप्रिय होतील.*

2) प्रश्न : रात्री १० नंतर फटाके वाजवायचे नाही असा आदेश (?) असूनही ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता फटाके वाजवून देणारे पर्यावरणपुळके कुठेयत? शाळेतील लहान मुलांना फटाके विरहित दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे शपथवीर कुठेयत? शाळेतील लहान मुलांना आवाजमुक्त दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे शपथसुंभ कुठेयत? इत्यादी, इत्यादी..

उत्तर : अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना खरं तर ध्वनीप्रदुषणाशी वगैरे काही देणंघेणं नाही. दुसरा बेवडा नाच करतोय, त्याला काही न बोलता मलाच का दारुडा बोलताय, अशी निव्वळ पोटदुखी आहे. दुसरी गोष्ट, आपल्या आनंदासाठी फटाके फोडणे याचा अर्थ सरळसरळ पैसे जाळणे असा आहे. मग कोणीही ते जाळो... चुकीचेच आहे. पण तुलनाच करायची झाली तर दिवाळी खेड्यापाड्यापर्यत फटाके फोडूनच साजरी होते, तसा ३१ डिसेंबर किती ठिकाणी साजरा होतो ? आणि फटाकेमुक्त दिवाळीसाठी आवाहन करणारे, ३१ डिसेंबरला फटाके वाजवताना किंवा फटाक्यांना प्रोत्साहन देतांना दिसतात का ? दिसले तर नक्की सांगा. उगाच शब्दाचे अटाँमबाँम्ब फोडून आपले हसे करून घेऊ नका.

3) प्रश्न : 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीखाली दिवा लावणाऱ्या हिंदुंना अंधविश्वासी म्हणणारे  25 तारखेला प्लास्टिकच्या झाडावर बल्ब लावून स्वतःची आधुनिकता दाखवतील. असा दुटप्पीपणा का ?

उत्तर : तुळस या रोपात काही औषधी गुण असले तरी ती 24 तास ऑक्सीजन देते हे शास्त्रीय दृष्ट्‍या सिद्ध झालेले नाही. असल्यास पुरावे द्यावेत. समजा वादासाठी ते खरे मानले तर तिथे दिवा लावून तुळशीने निर्माण केलेला तथाकथित ऑक्सीजन दिव्याद्वारा नष्ट करणे हा केवळ अंधविश्वासच नाही तर मूर्खपणा आहे. आपल्याकडे दिवाळीला जसे आकाशदिवे, आकाशकंदिल लावून रोषणाई करतात (त्यास कोणी अंधश्रद्धा म्हणत नाही) तशीच रोषणाई 25 तारखेला प्लॅस्टिक च्या झाडावर बल्ब लावून करतात. गुणात्मक दृष्ट्‍या दोघात काही फरक नाही. पण तथाकथित संस्कृतिरक्षक 'आमच्या तुळशीपुजनाला नावं ठेवता तर प्लास्टिक झाडांच्या रोषणाईला नावं ठेवा असं सुचवुन आपला दांभिकापणाच उघड करत असतात. त्यांचे हे म्हणणे म्हणजे, शेजारचा फाटलेल्या जिन्सची फँशन करतोय, तर मी नागडं राहिलं तर बिघडलं कुठे ?

हिंदुत्ववादी अंधभक्तांच्या माहितीसाठी : *अंनिस तर्फे ख्रिसमस निमित्त फटाकेमुक्त तसेच दारूबंदी अभियान 'व्यसनाला बदनाम करूया' या नावाने चालू आहे. नुसता द्वेष आणि आरोप हे तर फक्त कमअस्सल माणसेच करू शकतात. तेव्हा या अभियानात सहभागी होऊन हिंदुत्ववाद्यांनी लोकांना सजग केले तर अंनिस त्यांचे स्वागतच करील. आणि हो, या ‘ख्रिस्ती’ उत्सवात दुर्दैवाने कोट्यावधी हिंदूच दारू ढोसत असतात हे कटू वास्तव अंनिसवर बेछूट आरोप करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनीही लक्षात घ्यावे, आणि अंनिसच्या या अभियानाला हातभार लावावा. कारण अंनिस कुणालाही अस्पृश्य समजत नाही. * 
*विचार तर कराल...*

Tuesday, December 22, 2020

झाडाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठेवणारे धर्मांध विकृत

झाडाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठेवणारे धर्मांध विकृत – जेट जगदीश

"मी तुळशीच्या झाडाचे 50 फायदे सांगतो, तुम्ही ख्रिसमसच्या झाडाचे फक्त 2 फायदे सांगा. अंधश्रद्धा निर्मुलन सप्ताह स्पेशल..."
काही विकृत धर्मांधांकडून अशी आव्हान देणारी पोस्ट गेल्या दोन-चार दिवसापासून अनेक ग्रुपवर फिरत आहे. त्यांच्या या खोडसाळ पोस्टला उत्तर...

मुळात ख्रिसमस ट्री हा नाताळाच्या दिवशी केवळ सुशोभिकरणासाठी ख्रिस्ती बांधव उपयोगात आणतात. त्यापासून समाजाला काहीही धोका नाही. ख्रिसमस झाडाचे धार्मिक महत्व श्यून्य असते. ही फक्त सजावटीची प्रथा आहे. ख्रिसमस झाड सजवले नाही तर ख्रिसमस होत नाही, असे काही नाही. इथे अंधश्रध्देचा संबंध येतोच कुठे? म्हणून तुळशीच्या झाडाशी तुलना करणे सर्वथा चूक आहे. 

ख्रिसमसचा दिवस हा येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस असतो. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जर परशुराम, कृष्ण, राम, गणेश या काल्पनिक देवांच्या जन्मतारखा माहित नसूनही त्यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे ही हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा नाही. पण ज्यांच्या जन्मतारखा माहित आहेत असे प्रत्यक्षात होऊन गेलेले बुद्ध, येशूख्रिस्त, पैगंबर यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून कशाच्या आधारावर अंधश्रद्धा ठरतात?

प्रत्येक झाडाचा या ना त्या प्रकारे औषधी उपयोग असतोच तसेच ख्रिसमसट्रीचेही औषधी उपयोग आहेत. हे झाड बर्फाळ प्रदेशात उगवणारे झाड आहे. बर्फाळ प्रदेशांतील झाड असल्याने मुख्य फायदा प्राणवायूच्या निर्मितिचा... विरळ वातावरणात फार उपयोगी. भरपूर उंचीची त्याची वने बर्फाळ वादळ रोखते व सपाट पातळीवर पोचू देत नाही. रेनडियर, अस्वले, लामा सारख्या शाकाहारी प्राण्यांना या झाडाचा खुराक मिळतो. त्याचे लाकूड घरे उभारण्याच्या कामात उपयोगी येते. अखेर बर्फाळ प्रदेशांत केवळ प्राणीच नव्हे तर माणसेही रहातात,... त्यांना हे झाड आसरा देते. तरीही तुम्हाला क्रिसमसच्या झाडाचे आणखी औषधी फायदे हे माहीत करून घ्यायचे असतील तर खालील लिंकवर जा आणि माहिती वाचा...
https://frugallysustainable.com/how-to-capture-the-medicinal-benefits-of-your-christmas-tree/

तुळशीच्या पानांचा उपयोग आयुर्वेदात नमुद केलेला आहेच. परंतु सनातनी लोकांनी त्यांस धर्माचे अधिष्ठान देत विज्ञानाऐवजी त्यांत अंधश्रद्धा घुसवल्यामुळे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेला आहे. म्हणून रोज तुळशीची पुजा आणि दरवर्षी तुळशीचे विष्णूशी लग्न लावले जाते. 

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', असा संतांचा दाखला देणाऱ्यांनो, झाडांची तरी धार्मिक वाटणी करणे सोडा आता... हे झाड चांगलं का ते चांगलं अशी विभागणी करणे हा तर तुमच्या मनाचा संकुचितपणा झाला. याच संकुचितपणामुळे मासिक पाळीतील स्रीयांनी तुळशीला पाणी घातलेले चालत नाही. आणि हो, झाडाचे फायदे बघून त्या झाडाविषयी आस्था निर्माण करणं स्वार्थीवृत्तीचे लक्षण आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाचे गोडवे गाणारी हीच मंडळी 25 डिसेंबरच्या क्रिसमसला शिव्या देत 31 डिसेंबरला मात्र कुठे बसायचं, याचा विचार करित असतात. दांभिक कुठले!

यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की, एखादे झाड जास्त महत्त्वाचे आणि दुसरे कमी महत्त्वाचे असे काही नसते. असा श्रेष्ठ आणि कनिष्ठपणा असतो तो फक्त विकृत धर्मांधांच्या मनातच. त्या ऐवजी त्यांनी इतर धर्मियांच्या चालीरीतींची समीक्षा करण्याऐवजी आपल्याच धर्मातील अस्पृश्यता, स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणे, इत्यादी बाबींवर जरा लक्ष दिले तर आपल्याच समाजाच्या उद्धारासाठी ते जास्त उपयोगी ठरेल. अंधश्रद्धाना विरोध म्हणजे आमच्या सणांना तुम्ही विरोध करता म्हणून तुमच्या सणांना आम्ही विरोध करतो; हे कुठलं तर्कशास्त्र आहे? कारण अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, मग ती कोणत्याही धर्माची का असेना? पण तुळशीच्या झाडावर असलेली आमची ती श्रद्धा आणि क्रिसमस ट्रीवर असलेली तुमची ती अंधश्रद्धा! असा उफराटा न्याय आहे तुम्हा विकृत धर्मांधांचा!

Monday, September 28, 2020

देव आणि स्टिफन हॉकिंग

देव आणि स्टिफन हॉकिंग : – जेट जगदीश.

स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्यात अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळिसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली. 

हॉकिंग हा स्वत: एक विश्वरचनाशास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे- विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितकं खोलवर, दूरवर पाहावं तितके जुने तारे दिसतात. असं का होतं? याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे दूरचे म्हणजे जुने. १९२९ मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं, की सर्वच तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत. एखाद्या फुग्यावर ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात, तसे. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसं मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते. याचा अर्थ आपलं विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झालं! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या १३.८ अब्ज वर्षांत इतकं महाकाय, प्रचंड झालं. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकतं. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.

विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात- हे कोणी केलं? याआधी तिथे काय होतं? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असंच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची हॉकिंगने उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय, देवाने हे विश्व निर्माण केलं का, देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का... वगैरे वगैरे. या प्रश्नाचं उत्तर देताना हॉकिंग म्हणतो, ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचं नाही. देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं, याबद्दल एक संदर्भचौकट मांडायची आहे.’ यापुढे देवाबाबत हॉकिंगचं म्हणणं आहे की, ‘हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं. हे नियम अचल आहेत. ते कुठच्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नाहीत. त्यामुळे या अचल आणि सर्वासाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणायचे असेल तर म्हणता येईल.’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्याआधी काही नव्हतंच. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही.’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसतं. तसंच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असं काही नसतंच.’

यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण झालं? हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे आणि ग्रह बनवण्यासाठी; दुसरं म्हणजे ऊर्जा- सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश- हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध  E = mc२ समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसं निर्माण होतं? उत्तर सोपं आहे- नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात धन आणि ऋण प्रकारच्या ऊर्जा असतात. (लक्षात ठेवा, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा नसतात.) त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर नुसता ढीग तयार करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.

हे समजण्यासाठी ब्लॅकहोलच्या बाबतीतील माहिती आपण पाहूयात. समजा एक घड्याळ हे ब्लॅकहोलच्या जवळ जवळ नेत गेलो तर काय होईल? जसे जसे हे घड्याळ ब्लॅकहोलच्या जवळ जाईल तसे तसे त्याच्या वेग हा कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल कि ज्या वेळी ते घड्याळ ब्लॅकहोल मध्ये पूर्ण आत गेलेले असेल आणि ते पूर्ण पणे थांबलेले असेल.

ब्लॅकहोलमध्ये अससं का घडतं याचा ज्या वेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळी शास्त्रज्ञाच्या लक्षांत आले की, ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती हि अनंत (Infinite) असते आणि त्यामुळे ती त्या घड्याळाला थांबवते म्हणजेच वेळेळा पण नष्ट करते. त्या ब्लॅकहोल मधून प्रकाशकिरणेही बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण आत गेलेले प्रकाशकिरण हे ब्लॅकहोलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत. म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅकहोलमध्ये गेल्यावर नष्ट होतात. कारण ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती अनंत असते.
      
अगदी असेच  Big Bang च्या वेळेस घडले. त्यामुळे जे लोक मला अश्या प्रकारच्या प्रश्न विचारतात की, खरंच का हे विश्व देवाने बनविले आहे? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना मी त्यांना सांगतो की, ह्या प्रश्नामध्येच काहीही अर्थ नाही. हे विश्व देवाने बनविलेले नाही. कारण वेळ, काळ, वस्तुमान ह्या सगळ्या ज्यावेळी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उप्पती झाली. म्हणूनच आपण म्हणतो कि “We Got Everything from Nothing.”

‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. म्हणूनच तो म्हणतो, विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग’ने झाली. त्याचा निर्माता देव नक्कीच नाही... आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. महास्फोट हा केवळ भौतिक विज्ञानाच्या नियमांचा परिणाम आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते. 

डार्विनच्या सिध्दांतामुळे ईश्वराला जीवशास्त्राच्या परिघाबाहेर करण्यात आले. ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकले नाही तरी विज्ञानामुळे ईश्वराची ही संकल्पना आनावश्यक बनते हेही तितकेच खरे. म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी त्या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचे परिपूर्ण ज्ञान मिळू शकेल, असे स्टीफन हॉकिंग यांना ठामपणे वाटत होते.

Sunday, September 6, 2020

आनंदी जीवन जगण्यासाठी

आनंदी जीवन जगण्यासाठी – जेट जगदीश

आपण एकटे असताना विविध प्रकारचे विचार करत असतो. या विचारांची वर्गवारी केली तर आपल्या लक्षात येईल की, आपण सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त करत असतो. म्हणजे असे की, कोणी प्रेमात असेल... आनंदात असेल तर आपल्याला असे वाटते की, हे सगळे त्याचे वरवरचे आहे... तो खरा मनातून दु:खी असला पाहिजे. कारण आपण आयुष्यात नेहमी दुःखाला कुरवाळण्यास शिकलेलो असतो. आपल्या अनेक चित्रपटांमध्येसुद्धा नकारात्मकतेचे उदात्तीकरण केलेले असते, आणि सत्याचा फक्त शेवटी अचानक विजय झालेला दाखवलेला असतो.

प्रत्यक्ष जगत असतानाही आपल्याला अनेकांकडून वाईट अनुभव आलेले असतात. तेव्हा त्याच गोष्टी आपल्या डोक्यात जास्त ठळकपणे लक्षात राहतात; पण कोणीही आपल्यासाठी काही चांगले केले असेल तर ते मात्र अत्यंत क्वचित लक्षात राहते. त्यातही गंमत अशी आहे की, एखाद्या माणसाने आपल्याला खूपदा मदत केली असेल आणि एका वेळेला त्याच्या काही अडचणीमुळे जर त्याने मदत केली नाही तर मात्र तो माणूस आपल्या मनातून उतरतो. म्हणजे त्याने एवढ्यावेळा आपली मदत केली ते आपण लक्षात न घेता त्याने एखाद वेळेस आपल्याला मदत केली नाही म्हणून आपण त्याला लगेच अप्पलपोटा समजायला लागतो. यालाच नकारात्मक विचार करणे म्हणतात. अशा नकारात्मकतेतूनच आपण जगत राहिल्यामुळे आपल्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असतात. नकारात्मक विचार याचा अर्थ कोणावर टीका करणे... रीतीभातींची, प्रथा परंपरांची चिकित्सा करणे असा होत नाही होत किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर टीका करणे करणे म्हणजे नकारात्मक विचार असे नाही. एखाद्या धर्मातील अंधश्रद्धांवर कठोर शब्दात प्रहार करणे म्हणजे त्या देशाचा त्या धर्माचा द्वेष करणे असेही नाही; तर नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या घटनेविषयी चुकीच्या पद्धतीने विचार करणे... एखाद्या रीतिविषयी चुकीच्या पद्धतीने विचार करणे होय. 

खरे तर कोणत्याही गोष्टीतील वा घटनेतील दोषदिग्दर्शन करणे म्हणजे सकारात्मकतेकडे पाऊल टाकणे होय. कारण त्या दोषांचे जेव्हा आपल्याला ज्ञान होते तेव्हा आपण परखड आत्मपरीक्षण करायला लागतो आणि त्यातून आपल्याला ते दोष नेमके काय आहेत हे कळायला लागते. मगच आपण त्यांचे निराकरण करायला लागतो. असे करणे हे सकारात्मकच नाही काय? 

नकारात्मक विचार करणे हे एकवेळ सोपे आहे पण सकारात्मक विचार करण्यासाठी मात्र आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्याला स्वतःची एकटे असताना विचारांची काही दिशा ठरवावी लागते. असे सकारात्मक विचार नुसती पुस्तके वाचून येतील असे समाजणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण त्यासाठी आपल्यालाच काही प्रयत्न करावे लागतात. वाचनामुळे एक वेळ दिशा कळेल, पण प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. ते प्रयत्न कसे करावेत यासाठी अनेक विचारवंताने वेगवेगळे विचार मांडले आहेत पण त्याचबरोबर माझ्यासारख्या सामान्य माणसाने स्वअनुभवातून एक पद्धत तयार केली आहे. ही पद्धत मला माझ्या मुलाने शिकवली आहे. ती वरवर पाहता सोपी वाटली तरी आपण जेव्हा प्रत्यक्ष करायला लागू तेव्हा आपल्याला  तेवढे सोपे नाही हे कळू लागेल. 

आपण एवढेच करायचे की, दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीत किंवा फोन डायरीमध्ये दिवसभरातील पाच गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. मग त्या किती का साध्या असेनात. याचा अर्थ तुमच्या मनात येणारे सकारात्मक विचार लिहून काढायचे. जसे की मी आज दिवसभरात कोणाशीही तुच्छतेने बोललो नाही म्हणून मी स्वतःशीच कृतज्ञ आहे. अगदी तत्कालिक विचार करायचा झाला तर, मी अजूनही करोनामुक्त आहे म्हणून मी माझ्या प्रतिकारशक्तीशी कृतज्ञ आहे. इ. अशाप्रकारे दररोज पाच गोष्टी लिहून त्याच विचाराने झोपल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते आणि मेंदू सकारात्मक पद्धतीने विचार करू लागतो. Thought is thing या पद्धतीने आपण त्या विचाराने कृती करू लागतो. आपल्या विचारांचा परिणाम म्हणजे ही कृती असते. आपण सकारात्मक विचार केल्यावर आपली ऊर्जाही चांगल्या कामासाठी वापरली जाते. येथे आपण हे लक्षात ठेवायला हवे की, वैज्ञानिक दृष्ट्या ऊर्जा कधीही सकारात्मक आणि नकारात्मक नसते. कारण ती एक भौतिक गुणधर्मयुक्त राशी आहे. विचार भावनांशी निगडित असल्यामुळे ते मात्र सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. त्यामुळे आपण त्या दिशेने आपली ऊर्जा वापरत असतो. अशाप्रकारे सकारात्मक विचार करायची सवय लागल्यामुळे आपल्या लक्षात येते की, आपल्याला जीवनाने भरपूर दिले आहे, ते कसे जगायचे हे आपण विसरून गेलो होतो. हे लक्षात आल्यावर आपणच आपल्याला पुन्हा नव्याने गवसू लागतो.

पण पाच कृतज्ञतापूर्ण गोष्टी लिहिताना सुरुवातीलाच आपल्या लक्षात येते की, आपल्या डोक्यात नकारात्मक गोष्टीच जास्त येत आहेत. त्यामुळे सकारात्मक पाच गोष्टी मिळणे कठीण होत आहे. म्हणजे असे की, माझ्या डोक्यात लोकांबद्दल तक्रारीच जास्त येतात किंवा मला आयुष्यात माझ्या लायकीप्रमाणे मिळाले नाही असे वाटून मी अनेक लोकांना दोष देत असतो. खरे म्हणजे आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे आयुष्यात मिळालेलेच असते, पण ते मात्र आपण ते एवढे गृहीत धरलेले असते की, त्यापायी इतरांशी तुलना करून आपण दुःखी होत असतो. आणि आपल्या आवाक्याबाहेरचे आहे ते आपल्याला मिळाले नाही मिळाले नाही म्हणूनही आपण त्रास करून घेत असतो. यावर मात करण्यासाठी दररोज पाच कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या गोष्टी लिहिल्यामुळे ही नकारात्मकता नंतर हळूहळू कमी होत जाते आणि आपले मन सकारात्मक विचाराने भरत जाते. हळुहळु मग आपण आनंदाने जगायला शिकू लागतो. जीवन हे दुःखाचा सागर नसून आनंदाचा सागर आहे असे आपल्याला जाणवायला लागते. आपल्या वागण्या-बोलण्यात बदल होऊ लागतो. करून तर पहा...

Wednesday, August 12, 2020

पूर्वजांचा पोकळ बडेजाव माजवणे अंधभक्तीचे लक्षण आहे

What's app विद्यापीठात अज्ञानमूलक फॉरवर्डेड पोस्टची वानवा नाही.आज अशीच एक वरकरणी छान वाटणारी पोस्ट (पण प्रत्यक्षात बिनडोक, विद्वेष- विखार ठासून भरलेली) पाहण्यात आली. मी वेळ असल्याने त्याचा प्रतिवाद खालीलप्रमाणे केला. आपण यात भर सुचवू शकता किंवा मुद्देसूद प्रतिवाद केल्यास स्वागत आहे. मूळ पोस्ट लांबलचक असल्याने ‌फक्त सुरुवात आणि मनोरंजक भाग तेवढाच येथे दिला आहे.
मूळ पोस्ट: 
Do you know?
हे केमिकल कंपोजीशन👈 मुलांना रेग्युलर द्या.
गूळ+खोबरे = बुद्धीवर्धक (म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
गूळ+शेंगदाणे = शक्तिवर्धक (म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
तिळ+गूळ = केल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न + झिंक + सेलेनियम (हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,
यातले सेलेनियम - केन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत )
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातात,
कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिल?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा 50 शत्रूंशी एकटा लढायचा,
कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वीचे पंडित एवढे हुशार होते, एक से एक होऊन गेले महान पंडित, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?
मुळात आपल्याला इतिहासच अश्या पद्धतीने शिकवला जातो की इंग्रज आले म्हणून आपण तारले गेलो, आपण खूप गरीब होतो, अंधश्रद्धा होती वगैरे, पण इंग्रज तेव्हा आले जेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येकाच्या घरात सोने भरलेले पाहिले, जे आपण व्यापार करून कमवत होतो,
 जर भारत श्रीमंत नसता तर ही आक्रमणे झालीच नसती ना.. गरिबांच्या देशावर कशाला कोण वर्षानुवर्षे राज्य करेल... सोने भरभरून जहाजे गेली ब्रिटिशांकडे, जेव्हा आपल्याकडे हे सर्व होते तेव्हा ब्रिटन मध्ये भूकमारी होती... हे कधीच आपल्याला सांगितले जात नाही, हे जर सांगितले तर जातीवाद आपोआप संपेल ना...मग तोडा आणि राज्य करा हे होऊच शकणार नाही... 
तर, आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या 18-19 वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी... कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा....
आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर...
आपण हजारो वर्षांपासूनच सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही...
देशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा, आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूपच हुशार आणि ऍडव्हान्स होते...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️◾
प्रतिवाद... (^m^)(^j^)(मनोगते)
या लेखात सत्य आणि असत्य यांची सरमिसळ बेमालूम केल्याने काही वैचारिक गोंधळ आढळतात. 
गूळ -खोबरे -शेंगदाणे यांचे औषधी गुणधर्म वादातीत असले तरी त्याचा संबंध ब्रिटिश राजवटीची यथाशक्य निर्भत्सना करून भारतीय संस्कृतीची अवाजवी भलावण करण्याशी जोडलाय, तो बादरायण संबंध आहे.
भारतीय संस्कृतीची थोरवी निश्चित आहे. 
एकदा अमेरिकन राजदूत ताजमहाल पाहायला आले जेव्हा त्यांना गाईडने माहिती दिली की ताजमहाल सतराव्या शतकात बांधला गेला, तेव्हा ते थक्क झाले कारण ते म्हणाले की आमचे अमेरिकन पूर्वज तेव्हा लाकडी ओंडक्याच्या घरात राहत होते. आज अमेरिका कुठे आहे पहा! आजच्या पुन्हा नव्याने लिहिल्या जाणाऱ्या इतिहासानुसार ताजमहाल हा मुघल बादशहा शहाजहानने बांधला पण मुघल हे परकीय आक्रमक होते त्यामुळे आपण 'भारतीयांनी बांधला आहे' असं श्रेय घेऊ शकणार नाही कदाचित! असो. येत्या 15 ऑगस्टला खाल्ली जाणारी जिलबी हीदेखील इराणमधून आलीयं बर का! आज उपवासात म्हणून वापरत असलेले साबुदाणा, बटाटा आणि मिरचीही हे पदार्थ तर पोर्तुगीज आहेत.
          
रामायण महाभारतात विमाने आणि क्षेपणास्त्रे यांचे उल्लेख आढळतात. तर मग पुढे बाराव्या शतकात  दिवाळीचे साधे रॉकेट तरी तयार का होत नाही? याचं साधं कारण म्हणजे त्या निव्वळ कवी कल्पना होत्या.
साधं आहे की आधी चाकाचा शोध... मग विमानाचा शोध... आधी बिनतारी यंत्रणा, मग मोबाईल....विमानाचा शोध लागायला किती अत्याधुनिक यंत्रणा लागत असणार....   एकदम शून्यातून विमान अस्तित्वात येऊ शकणार नाही. त्याच्या आधी कितीतरी आवश्यक शोध मालिका अस्तित्वात असावी लागते.
*गणितातील शून्याचा शोध असेल, रसायनशास्त्रातील विलेपन प्रक्रिया असेल आयुर्वेदाची संपूर्ण परंपरा ,धातुकाम स्थापत्यशास्त्र, जहाजबांधणी,  कापड निर्मिती, खाद्यसंस्कृती अशा विविध क्षेत्रात आपले पूर्वज अग्रेसर होते, परंतु त्याचबरोबर मध्ययुगात या तेव्हाच्या प्रगत ज्ञानाचा लोप झाला, जातीव्यवस्था- अस्पृश्यता, चाकोरीबद्ध- साचेबद्ध विचारसरणी, नवीन ज्ञानाचा परिपोष न होणे परंपरा-रूढी यांना अवास्तव महत्त्व, भाऊबंदकी, स्त्रियांना दुय्यम लेखणे वगैरे अनिष्ट प्रथा रुजल्या. भारतीय संस्कृतीतील ज्ञानपिपासा मागे पडली.*

आयुर्वेद विशिष्ट मर्यादेत यशस्वी असला तरी भारत स्वतंत्र होतानाही पुरुषांचे सरासरी आयुष्य फक्त सत्तेचाळीस वर्षे होते, जे आता सुमारे 70 आहे. शिवाजी महाराज गुडघेदुखीने पन्नाशीत गेले, लोकमान्य टिळक मधुमेहाने सत्तरीच्या आतच गेले... अशी अनेक उदाहरणे सांगता येतील... प्लेग वगैरे रोगांच्या साथीत तेव्हा लोकसंख्या कमी असतानाही आजच्या कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होत होते. बालमृत्यू, बाळंतपणातील स्त्रियांचे मृत्यू याचे प्रमाण प्रचंड होते जे आधुनिक विज्ञानाने कमी केले आहे. भारतीयांना ग्रहतारे माहित होते परंतु ग्रहण आणि धूमकेतू विषयी अंधश्रद्धा तेव्हा होत्या, आजही आहेत. शिक्षण व्यवस्था तर फारच बुरसटलेली होती. बारा बलुतेदार किंवा व्यावसायिक शिक्षण या नावाखाली उरलेले शिक्षण हे प्रामुख्याने धार्मिक अंगाने होते आणि ती तथाकथित उच्चवर्णीयांची मिरासदारी होती.

ब्रिटिशांनी लूट केली हे सत्यच आहे. भारतावर उपकार करण्यासाठी ते आलेच नव्हते तरीही सुरुवात काळात येथील अनेक स्थानिक संस्थानिकांना (तेव्हा भारत असा देशच नव्हता हे आपल्याला माहिती आहे - शेकडो छोटी छोटी संस्थाने होती, त्यांच्यात  सतत लढाया होत असत) ब्रिटिश म्हणजे परमेश्वराने पाठवलेले प्रेषित आहेत, असे वाटायचे आणि त्याबद्दल त्यांची कृतज्ञ भावना होती.

ब्रिटिशांनी (लॉर्ड मेकॉले) भले त्यांना कारकून हवेत म्हणून शिक्षण व्यवस्था सुरू केली परंतु त्यामुळे राजा राम मोहन रॉय, दादासाहेब नवरोजी, महात्मा फुले (अगदी गांधीजीही )यांना नवे पाश्चात्य विचार-फ्रेंच राज्यक्रांती (त्यातील समता,बंधुता, स्वातंत्र्य) ही विश्व मानवतेची तत्त्वे समजली. लोकशाही मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला चालना मिळाली.

जहाज बांधणी माहीत असली तरी परदेश गमनाला बंदी होती. समुद्र संचार केल्याबद्दल टिळकांना प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. टिळकांना तर ब्रिटिशांकडे चहा बिस्किटे खाल्ली म्हणूनही प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. इतिहासात हे पंचहौद प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे.

अगदी आजही आपले (अगदी सर्वसामान्य माणसाचेही) भौतिक जीवन सुखकर करणारे मोटर-मोबाईल-इलेक्ट्रीक दिवा-संगणक वगैरे बहुतांश शोध पाश्चात्यांनी लावले आहेत. इंग्रजी राजवट नसलेल्या जपान-चीन यांनीही चांगली प्रगती केली. त्यामुळे ब्रिटिशांचे आभार मानायचे नसले तरी आपल्या कपाळकरंटेपणाचा दोष त्यांना देता कामा नये. आपल्या इतिहासाचा अभिमान हवाच; पण आपण अंधभक्तही असता कामा नये. इतिहासाची कठोर चिकित्सा झाली तरच भविष्यकाल उज्ज्वल राहील. अभिमान हवा पण अभिनिवेश नको.

Monday, August 10, 2020

विरोधातूनच विकास होतो

विरोधातूनच विकास होतो - जेट जगदीश.

जेव्हा प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजात काही करायचं असतं तेव्हा समाजाकडून विरोध हा होतोच, आणि अंधभक्त प्रवाहपतीत मेंढरांच्या भावना दुखावल्या जातातच. त्यामुळे समाज माध्यमातून नकारात्मक टीका-टिप्पणी होणे... राग व्यक्त होणे स्वाभाविक असते. पण भावना दुखावल्याशिवाय केव्हाही समाज वा धर्म सुधारणा होऊ शकत नाहीत, हेही तितकेच खरे. 

काहीतरी वेगळं करू पाहणारी माणसं ही नेहमी मुठभरच असतात. ते आपल्या विचारांशी प्रामाणिक असल्यामुळे इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. म्हणून ते अंधभक्तांच्या भावना दुखावल्याच्या कांगावखोरपणाला भीक न घालता ठामपणे आपला विचार मांडत रहातात. परिणामी जी परिघावरील विचारी माणसे असतात ती नक्कीच विचार समजून घेत बदलत असतात, तर विचारांना घाबरून पाळणारे... परंपरेच्या अस्मितेला कुरवळणारे जे अंधभक्त असतात ते भावना दुखावल्याची कोल्हेकुई सुरू करतात. तेव्हा ज्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांनी ह्या न बदलण्याचा वसा घेतलेल्या सांभावितांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करून जे बदलण्याच्या प्रक्रियेत आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून सक्षमपणे विवेकी विचारांची बीजे पेरत राहिले पाहिजे. चुकीच्या प्रथा-परंपरांवर बोलून त्या बंद होण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेत त्यांना आणले पाहिजे. 

वैचारिक बीजे पेरतांना दहातील एक माणूस जरी बदलला तरी समाजात मोठी सुधारणा होत असते, हे लक्षात ठेवले म्हणजे हे काम पिढ्यांच्या परिमाणातच मोजता येते याचे भान येते. त्यामुळे स्थितीशील अंधभक्तांच्या विरोधाला सामोरे जायचे बळ प्राप्त होते. म्हणून  कोणत्याही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी आजची सामाजिक बजबजपुरी पाहून निराश न होता खंबीरपणे काम करत राहणे आवश्यक आहे. कारण विरोधातूनच विकास होतो हे गेल्या 150 वर्षातील सुधारकांनी दाखवून दिल्याचा इतिहास आहे.

Sunday, August 9, 2020

राम मंदिराची श्रध्देपेक्षा राजकीय गरज आहे

1 लोकांच्या श्रद्धेची भूक भागवण्यासाठी देशात मंदिरांची, बुवा - बाबांची वानवा होती काय? 
     
2 लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा वैयक्तिक पातळीवरचा आहे सार्वजनिक नाही. 
   
3 लोकांच्या धार्मिक श्रध्दास्थानांची निर्मिती करणे हे राज्य संस्थेचे काम नाही. संविधानामध्ये प्रार्थनास्थळांच्या रक्षणाची, नियमनाची जबाबदारी राज्य संस्थेकडे आहे निर्मितीची नाही. 
   
4. मंदिरं जशी काही प्रमाणात सेवा कार्य करतात तशीच काळा पैसाही रिचवतात. देणगी कोणाकडून आली हे सांगण्याचं बंधन नसतं. देणगी देणारालाही पैसा कुठून आला कसा आला हे कोणी विचारत नसतात. 
   
5 मंदिरे त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग सेवा कार्यासाठी जरी खर्च करत असले तरी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा सजावट, सोने, रत्ने यात अनुत्पादक भांडवल म्हणून पडून राहतो. उदा पद्मनाभन मंदिर, शिर्डी. 
    
6 मंदिरे श्रद्धास्थाने आणि हॉस्पिटल्स यांचं प्रमाण जर समतोल असेल तर एकवेळ मान्य करता येईल की आस्तिकांच्या श्रद्धेसाठी काहीतरी असावं, पण मुळातच हे प्रमाण आपल्या देशात खूप व्यस्त आहे. शिवाय काळ कोणता आहे, आपली गरज काय आहे, आपला प्राधान्यक्रम काय असावा याचा सारासार विवेकी विचार करावा लागतो. म्हणून मंदिर नको हॉस्पिटल हवं. *पण मुख्य मुद्दा आणि स्पष्ट मुद्दा असा की, अयोध्येचे राम मंदिर हे काही भारतातील श्रद्धावान लोकांची गरज नव्हती. मंदिर नव्हतं (आणि अजूनही निर्माण झालेलं नाही) म्हणून भारतातील श्रद्धावान लोकांच्या भक्तीभावात भक्तीच्या आनंदात काही कसर राहिली नव्हती किंवा त्यांची श्रद्धा पातळ झालेली नव्हती. रामाचं मंदिर नव्हतं म्हणून लोकांनी राम राम म्हणायचं सोडलेलं नव्हतं की, रामायणाची पारायणे बंद केलेली नव्हती. 

7 रामाचे मंदिर ही भारतातील श्रद्धावान लोकांची कमी आणि आरएसएस प्रणित मोदी सरकारची जास्त गरज आहे. तो त्यांच्या धार्मिक राजकारणाचा भाग आहे हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. लोकांच्या भक्तीच्या पडद्याआड लपून चाललेलं हे राजकारण आहे हे संघालाही ठाऊक आहे, आणि विरोधकांनाही ठाऊक आहे. उगीच ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
   
8 अशा धार्मिक राजकारणामुळे भारताची भौतिक प्रगती जरी झाली तरी भारत मध्यपूर्वेतील सौदी अरब सारखा भौतिक दृष्ट्या चकचकीत देश होईल(तशी शक्यता कमी) मात्र मुल्यांच्या पातळीवर मधूयुगीन मागास समाज म्हणूनच ओळखला जाईल.

Monday, August 3, 2020

तेजोमय तेजोवलाय(ऑरा): एक भंपक अंधश्रद्धा

 तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे औक्षण - ओवाळणे

Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ”
पण – ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे , I don’t believe this ” 

अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते! सत् - चित्आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही! 
परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ” 
“ माझा देवावर विश्वास नाही  ” हे आताशा चालतं. पण " माझा उर्जेवर विश्वास नाही " असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा.हकालपट्टीच होईल खास ! असो.
मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या  कणांनी बनलेला उर्जेचा गोळामात्र आहे. त्याचे अस्तित्वही उर्जा आणि त्याच्या भोवतालीही एक उर्जाच विद्यमान आहे.ज्या उर्जेला नाव आहे “ऑरा” हा ऑरा जर संतुलीत असेल , तर आपले अस्तित्व संतुलीत! हे कसे जमेल? यावर विचार करत असताना (कदाचित्) आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले – जसे स्तोत्र-मंत्र पठण, रुद्राक्ष व मंत्र धारण, अलंकार धारण, औषधी वनस्पती धारण, गंध व भस्म लेपन इ.इ.इ.
त्यातीलच एक महत्वाचा ’ऑरारक्षक ’ उपाय म्हणजे ’ओवाळणे’ अर्थात् ’औक्षण करणे’

कुणाचा वाढदिवस असेल, कुणी परीक्षेला चाललं असेल, कुणी महत्वाच्या कामावर चाललं असेल, कुणी काही विशेष पराक्रम करून परतलं असेल तर ’ओवाळणे’ हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी होता. आताही आहे, पण त्याचे अस्तित्व आता अंध:श्रद्धेपुरते राहीले आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू-बाधा-अरिष्ट यांपासून मानवाचे संरक्षण करणे हे औक्षण विधीचे काम आहे.

प्रतिकारक क्षमता अल्प असलेली लहान मुलं,सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली कर्तीमंडळी यांना  So called Exposure पुष्कळ आहे. परीणामी त्यांच्या भोवतालचे उर्जावलय क्षीण होते.त्यामुळेच महाप्रचंड उर्जेचे लघु-रूप असलेल्या निरांजनाने – अक्षता-सुवर्ण-सुपारी इ.उर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेने आणि विशेष प्रेमादराने ज्यांचे हृदय ओथंबून आले आहे अशाच व्यक्तीने जर त्यांना ओवाळले तर आभावलय पुन्हा मजबूत होते आणि शरीरातील उर्जाकेंद्रे आणि सप्तचक्रे पुन्हा Activate होतात आणि व्यक्ती बरी होते, दुरूस्त होते आणि बाधामुक्त होते.
वारंवार आजारी पडणार्‍या आणि प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या मुलांना अथवा मोठ्यांनासुद्धा या उपायाने आराम पडताना दिसतो. जरूर अनुभव घ्यावा.

श्रावणातलं पावसाळी वातावरण, आभाळी हवा आणि जीवजंतू व रोगराई यांचे वाढलेले प्रमाण, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी-शुक्रवारी मुलांना ओवाळणे तसेच काही ना काही निमित्ताने पुन्हा-पुन्हा ओवाळणे हे विशेष संयुक्तीक आहे.
आयुष्यवान – आयुष्यमान – आयुष्यवंत अशा शब्दातून कदाचित्  औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झाले असावेत.
त्यामुळे घरातल्या सर्वांचे जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा आपण पाळाव्यातच ! असे माझे स्वच्छ मत आहे. त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजेपर्यंत कदाचित् उशीर होतो. म्हणून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ’औक्षण’ या विषयी लिहावेसे वाटले.

जिज्ञासू  आणि आक्षेप कर्त्यांचे स्वागत! पण ‘ Electro-somatographic scaning ’ या Test मधून प्राप्त निष्कर्षांचा अभ्यास असेल तर !!!

बाकीच्यांनी आवर्जून ओवाळून घ्या! ओवाळा! मोठं उर्जादायी काम आहे ते! उर्जा अमूल्य आहे  आणि हो ओवाळणीही घाला मोबदल्यात! धन्यवाद !

डॉ. सुनील थिगळे, ऑरा तज्ञ 
सार्थक होलिस्टीक हेल्थकेअर सेन्टर
५,तारांगण सोसायटी पौडरोड
पुणे 411038
मो. 9595553007

सदर लेख लिहिणारी व्यक्ती कदाचित एकतर काल्पनिक ईश्र्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुर्खतेचा कळस करतेय कींवा अवैज्ञानिक विचारधारा न्युटनच्या नावाखाली खपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. ती व्यक्ती असा लेख लिहुन स्वत: अतिविद्वान आहे असे दर्शवून, बाकीचे बावळट किवा मुर्ख आहेत असेच समजतेय. यात लेखकाने दोन मुद्दे लिहिलेत. पहिल्या मुद्द्यात त्याने उर्जेलाच काल्पनिक ईश्र्वराचे स्वरुप म्हटले व दुसऱ्या मुद्द्यात त्याने औक्षण हे वैज्ञानिक पातळीवर तर्कसंगत ठरवण्याचा फोल प्रयत्न केलाय. आणि या दोन्ही विज्ञान साठी त्यांनी छद्म विज्ञानाचा आधार घेतला आहे. आपण या दोन्ही मुद्द्यांवर जरा समिक्षा करुया...

पहिला मुद्दा, काल्पनिक ईश्वराची उर्जेशी तुलना करुन, त्याला ऊर्जे समान मानणे. स्वतःला तज्ञ म्हणवणार्‍या या महाविद्वान महाशयाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे *उर्जा निर्माण करता येत नाही किवा नाशही पावत नाही, तर ती एका रुपातून दुसऱ्या रुपात परीवर्तीत करता येते, हा सिद्धांत सर्वप्रथम न्युटनने नव्हे तर Emilie du Chatelet (1706 - 1749) याने प्रयोगानीशी मांडला व सिद्ध केला.* त्याच्या आधी काही तत्ववेत्त्यांनी त्यावर संशोधनाचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अगदी इ.स. पुर्व पाचव्या शतकापासुन म्हणजेच बुद्धांच्या काळापासून सुरु होता. पण त्यास ठोस स्वरुप दिले ते Albert Einstein ने १९०७ ला. उर्जा एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरुपात परावर्तीत होताना, काही अंशी वाया जाते, हे त्याला आकाळले म्हणून आलबर्ट आईन्स्टाईनने सखोल अध्ययन करुन व सिद्धांत मांडून या संशोधनाला पुर्णविराम दिला. त्याने त्यासाठी एक सुत्र दिले, जे जगभरात विज्ञानात शिकवले जाते, E = mc^2.

आता आपण काल्पनिक ईश्र्वराची या ऊर्जेशी केलेली तुलना बघू. खरंच हास्यास्पद आहे, ही तुलना किवा समानता. गेली ५००० वर्षे, या देशात ब्राम्हणांनी सनातन वैदिक परंपरा निर्माण केली होती. या परंपरेनुसार गेल्या ५००० वर्षांत या देशात, याच वैदिक परंपरेच्या नावाखाली अब्जावधी ब्राम्हणेतर स्त्रियांना सतीच्या प्रथेखाली जिवंत जाळण्यात आले, पण एकाही स्त्रिचे रक्षण एकाही काल्पनिक देवाने केले नाही. तसेच गेल्या ५००० वर्षांत कोट्यावधी ब्राम्हण स्त्रियांचे पती निधनानंतर केशवपन केले गेले, एकाही स्त्रिला या विद्रुपतेपासून वाचवायला, एकही काल्पनिक देव पुढे आला नाही. या पुढची गोष्ट म्हणजे, गेली ५००० वर्षे याच सनातन धर्माने जाती व्यवस्था निर्माण करून ब्राम्हणेतरांचा शिक्षणाचा अधिकार व मनाप्रमाणे व्यवसाय आणि नोकरीचा अधिकार काढून घेतला. तसेच ब्राम्हणेतरांना संपत्ती संचयनाचा अधिकारही नाकारला. तसेच जो ज्या जातीत जन्माला, त्याने त्याच जातीप्रमाणे कार्य करायचे, अन्य कोणतेही उद्योग करायचे नाहीत, असे धर्मशास्त्रात लिहून कट्टर जातीव्यवस्था लादली. हे नष्ट करुन अधिकार द्यायला एकही काल्पनिक देव का पुढे आला नाही. 

प्रबोधनकारांनी 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकात लिहील्या प्रमाणे काही जातींवर आद्य शंकराचार्याने सातव्या शतकात अस्पृश्यता लादली, जे आजचे SC, ST, NT, DT, VJ आहेत, परंतु एकही काल्पनिक देव ही चुकीची व्यवस्था नष्ट करण्यासाठी ना पुढे आला, ना अवतरला. अगदी राजे शिवछत्रपतींसारख्या महान राजाची विषप्रयोगाने होणारी हत्याही, काल्पनिक देव वाचवू शकला नाही. या देशात इंग्रजांचे राज्य आले व  इ.स. १८२७ ला लाॅर्ड विलीयम बेंटीकने सतिप्रथेस कायद्याने बंदी घातली. न्हाव्यांचा संप घडवून केशवपन प्रथेस ज्योतिबांनी विरोध केला. तर बाबासाहेबांनी समाज सुधारणेचा कळस गाठला. त्यांनी ५००० वर्षांची सनातन जाती व्यवस्थाच मोडकळीस आणली व ब्राम्हणेतरांना शिक्षणाचे अधिकार, मनाप्रमाणे नोकरी व व्यवसायाचे अधिकार, तसेच संपत्ती संचयनाचे अधिकार दिले. स्त्रियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, माहेर व सासरच्या संपत्तीत हिस्सेदारी, घटस्फोटाचे व पुनर्विवाहाचे अधिकार दिले. 

दुर्दैव हेच की एकही काल्पनिक देव भारतीय समाजाला या जातीव्यवस्थेच्या दलदलीतून बाहेर काढू शकला नाही तसेच वरील अधिकार देण्यासाठी अवतरला नाही. या देशात दुर्दैवाने कृतघ्न लोकांची संख्या जास्त असल्यामुळे बाबासाहेबांच्या उपकाराची जाण त्यांना नाही, उलटपक्षी द्वेशच आहे. असो. हा ज्यांच्या त्यांच्या कुसंस्कारांचाच व अल्पबुद्धीचा भाग आहे. जवळजवळ सगळ्याच वैज्ञानिकांनी ईश्र्वराचे अस्तित्व नाकारले. कुणीही काल्पनिक ईश्वराला ऊर्जेचे प्रतिस्वरूप म्हणुन मांडण्याचा मुर्खपणाचा प्रयत्न केला नाही.

दुसरा अवैज्ञानिक मुद्दा, औक्षणाने सारे सभोवतालचे जिवजंतू मरतात. हे जर सत्य असेल तर ज्यांना हा आत्मघातकी सिद्धांत पटतो, त्यांनी आजच्या Corona च्या काळात मास्क न लावताच, घरातून स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही अन्य सुरक्षा न घेता रुग्णांची सेवा करावी. त्यांनी  मास्क वापरू नये, सॅनिटायझर वापरू नये, कोरोनाचा PPT पोशाख घालू नये, केवळ स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट रुग्णसेवा करावी आणि स्वत:च्या या मुर्ख सिद्धांताचा प्रत्यय घ्यावा. नंतरच आपला अनुभव येथे मांडावा. उगाच छद्म विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवू नये.

सारेच ईश्वरवादी अंधभक्त बोलतात की, देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही. तर मग सध्याच्या कोरोनाला व त्यामुळे पसरलेल्या भयाला तसेच होणाऱ्या मृत्युंना तो काल्पनिक देवच जबाबदार असला पाहिजे- त्यांच्याच या सिद्धांतानुसार. राजे शिवछत्रपती व शंभुराजांची हत्या देखिल त्या काल्पनिक ईश्र्वराच्या मर्जीनेच झाली असली पाहिजे. 

वरील मुद्द्यांवर केवळ ज्यांची सद् विवेक बुद्धी जागृत आहे, तेच विचार करतील व त्यांनाच ते पटेल... निर्बुद्धांना नाही.

Thursday, July 23, 2020

नास्तिक कोण?

नास्तिक कोण? JK
1) नास्तिक म्हणजे फक्त देव न मानणारा किंवा जातीधर्मावर टीका करणारा असे नसून प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून पाहणारा आणि स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करून योग्य अयोग्य ठरवणारा असा असतो...
2) नास्तिक म्हणजे अरसिक असा अर्थ नसून नास्तिक सुद्धा निसर्गावर, माणसावर तितकेच प्रेम करतात, जितके एखादा सर्वसामान्य किंवा आस्तिक करतो...
3) कुठल्याही जाती धर्मातील अनिष्ट किंवा चुकीच्या प्रथांवर टीका करणे म्हणजे त्या जातीधर्माच्या माणसांवर टीका नाही हा मतितार्थ समजून घेणे आवश्यक आहे...
4) कुठलाही समाज हा माणसांनी बनतो, त्याचाच समूह होऊन पुढे देश... राष्ट्र बनते. म्हणून व्यक्तिगत स्वतःमध्ये बदल करताना  तो बदल स्वतःपुरता न राहता आपल्या कुटुंब आणि समाजातही तो परावर्तित झाला पाहीजे तरच आदर्श आणि समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्माण होईल...

एक राष्ट्र धर्मनिरपेक्षतेची कास सोडून धर्मांधतेकडे झुकले तर त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर समाज, आणि देशही धार्मिक कट्टरतेकडे झुकून एकंदरच जागतिक समाजाच नुकसान होऊ शकतं. म्हणून विचारी आणि तटस्थ लोकांनी जगातच एकंदर धर्म, वंश, रंगावर आधारित होणाऱ्या ध्रुवीकरणाला विरोध करायला हवा.

तात्पर्य: स्वतः तील बदल हे स्वतः पुरते न राहता ते समाजात परावर्तित करणे महत्वाचे आहे... आणि जातीधर्मावरील टीका कितीही प्रखर वाटली तरी ती वैयक्तिक न घेता त्या धर्मातील अनिष्ट गोष्टीवर असल्याचे मानले पाहिजे....

एखाद्या चांगल्या कापडावर पडलेली डाग धुताना त्या कापडावर पण आघात होणे स्वाभाविक आहे, ते घासले जाणे स्वाभाविक आहे, पण म्हणून त्या कपड्यावर आघात का करताय असा आक्षेप आपण घेऊ शकतो का? नाही ना? कारण त्यावरील घाण साफ करताना त्या कपड्यावर आघात करण्याचा आपला उद्देश नसतो, तो डाग निघून जाणे हा असतो. त्याच पद्धतीने समाजात सुधारणा व्हावे आणि त्याने मानवतेकडे वाटचाल सुरू करावी कुठलाही भेदभाव न करता माणसाशी माणसासारखे वागावे असे विचार रुजवण्यासाठी नास्तिक माणसे समाजातील कुप्रथा, रूढी, परंपरा आणि कर्मकांडावर टीका करत असतात.

Wednesday, May 6, 2020

स्त्रीवादी चळवळ म्हणजे काय?

स्त्रीवादी चळवळ म्हणजे काय? - जगदीश काबरे.

स्त्रीवाद या शब्दाबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही स्त्रियाही आपण स्त्रीवादी नाही, असे सांगतात. स्त्रीवाद म्हणजे काय आहे आणि काय नाही, याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या तर स्त्रीवादी असल्याचे अभिमानाने सांगता येईल.

१) स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही. स्त्रियांना न्याय हवा आहे; पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करता येत नाही याची त्यांना जाणीव आहे. एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र नाही.
२) स्त्रीवाद पुरुषांना दोष देत नाही, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. पुरुषसत्ताकामुळे पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्त्री ही खालच्या स्तरावर आहे, आणि स्त्री हे
पुरुषाच्या भोगाचे स्थान आहे, अशी शिकवण पुरुषांच्या मनात बिंबवली जाते.
३) दोन वर्ग, दोन देश, दोन जाती, दोन धर्म या लढायांप्रमाणे स्त्री-पुरुष ही लढाई नाही. कारण अशा लढाईत एकाची हार व दुसऱ्याची जीत अपेक्षित नाही. इथे दोघांचे हितसंबंध एकच आहेत. कुटुंबातील सदस्यत्व व मुले यांच्या संबंधाने दोघांची कर्तव्ये सारखीच आहेत. म्हणून सत्तेचे हस्तांतर हा स्त्रीवादात मुद्दाच नाही. उलट, शांततापूर्ण सहअस्तित्व व सामंजस्य अधिक महत्त्वाचे आहे. परस्परांचा सन्मान राखून व समतेच्या पायावर आधारलेल्या नात्याने हे घडू शकते.
४) स्त्रियांना पुरुष व्हायचे नाही. स्त्रियांचे जे जे नैसर्गिक वैशिष्टय़ आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. स्त्रियांवर निसर्गाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्त्रिया नाकारत नाहीत. स्त्रिया व पुरुष यांच्यात शारीरिक भिन्नता असली तरी व्यक्ती म्हणून दोघांत समता नांदू शकते. 
५) स्त्रीवाद हा आंदोलनातील वा लेखनातील काही स्त्रियांपुरता मर्यादित नाही. आणि केवळ 'स्त्रीवादी' या विशेषणापुरताही सीमित नाही. तळागाळातील स्त्रियांच्या स्तरापर्यंतचा त्याचा विस्तार आहे. स्त्रीवादाला अपेक्षित असलेला भगिनीभाव देश, काल, जाती, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे निर्देश करतो. स्त्रियांचे भावनिक, मानसिक, नैतिक, आर्थिक, भाषिक आणि अस्मितेसंबंधीचे प्रश्न जगात सगळीकडे सारखेच आहेत.
६) स्त्रीवादी म्हणजे कुटुंब मोडणाऱ्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मान्य असणाऱ्या, किंवा स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात नैराश्य आलेल्या स्त्रियांनी अंगीकारलेली विचारसरणी नव्हे. असे मानणे हा स्त्रीवादाचा अपप्रचार आहे. नवे कोणतेही विचार समजून घेण्यातील भीती यामागे आहे. कुटुंब व समाज यातील आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती पुरुषांना वाटते. 
७) स्त्रीवाद हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करतो. त्यामुळे स्त्रीवाद ही जगातल्या प्रत्येक स्त्रीशी जोडली गेलेली कल्पना आहे असे गांधीजी म्हणत. 
८) स्त्रीवादी विचारसरणी फक्त पाश्चात्य नव्हे. खरे तर आपली आजची जीवनशैलीच पाश्चात्त्य आहे. एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारणांचा एक प्रवाह स्त्रियांना ब्रिटिश महिलांप्रमाणे 'लेडी' बनवू इच्छिणाऱ्यांचा होता. आता तर जग इतके जवळ आले आहे, की प्रभावी विचारसरणीचे अनुकरण होणे सहज आहे. पण भारतीय संदर्भात हा पूर्णपणे पाश्चात्त्य विचार नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्राचार्य गोपाळ कृष्ण आगरकर, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, वि. का. राजवाडे आदींनी शतकापूर्वीपासून स्त्री-पुरुष समता व स्त्रीचे स्वातंत्र्य याबद्दल अतिशय उदारमतवादी विचारांची मांडणी केली आहे. ती आपण आचरणात आणली नाही, एवढेच.
९) स्त्रीवादाच्या कल्पना फक्त शहरी भागापुरत्या मर्यादित नाहीत. भारत हा आजही बहुसंख्य खेडय़ांचा देश आहे. ग्रामीण भागातील गरिबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, जातीची बंधने, परंपरा, चालीरीतींचे अंधानुकरण, अंधश्रद्धा यांच्या प्रभावामुळे स्त्रीवादी विचारसरणी सगळ्या स्त्रियांपर्यंत पोहोचायला अजून काही वर्षे जावी लागतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्यापासून स्त्री-हक्कांबद्दलची जाणीव वाढते आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपल्या आर्थिक सामर्थ्यांची जाण आली आहे. मुलींना शिकवण्याची धडपड दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण आणि लोकसाहित्यातून स्त्रियांनी पुरुषसत्ताकविरोधी मांडणी मोठय़ा प्रमाणावर केली आहे.
१०) एवंच स्त्रीवादी चळवळ हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा तो प्रयत्न आहे. म्हणजेच स्त्रीवाद हा पुरुष विरोधी नसून स्त्री-पुरुषात सामंजस्य निर्माण करणारी विचारधारा आहे.

Friday, April 17, 2020

'स्व'ची नव्याने ओळख

'स्व'ची नव्याने ओळख : -जेट जगदीश.

परवा बरेच दिवसांनी माझा डॉक्टर मित्र घरी आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतांना मी त्याला सहज विचारले, "सध्या नवीन काय वाचतो आहेस ?"
त्यावर तो चेहऱ्यावर भक्तीपूर्ण भाव आणून म्हणाला,"धार्मिक पुस्तकांचे वाचन."
मी: वेद वाचले असतीलच ना ?
तो: सगळे नाही, पण आयुर्वेद नक्की वाचलाय. कारण त्यामुळेच तर मी आयुर्वेदिक डॉक्टर झालो.
त्याचे हे उत्तर ऐकल्यावर मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला, आणि उघडपणे विचारले,"आपले वेद किती आणि कोणते, हे सांगशील का ?
त्यावर तो म्हणाला," अगदीच बाळबोध प्रश्न विचारालास... वेद चार आहेत... ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि आयुर्वेद!"
मी: धान्य आहे तुझी! अरे बाबा, आयुर्वेद ह्या शब्दात जरी 'वेद' असला तरी तो चार वेदातला नाही. चौथा वेद आहे सामवेद. बरे, ते जाऊ दे. लिंग पुराण आणि इतर पुराणे तर वाचली असशीलच.
तो: नाही. फक्त काही गोष्टी ऐकून आहे.
मी: म्हणजे वेद, पुराण या धार्मिक ग्रंथातील तुला फक्त सांगोवांगीची वा फेसबुक-व्हाट्सअँपवर जी अर्धवट ज्ञान पाजळणारी माहिती असते तेवढेच माहिती आहे तर... मग कोणत्या धार्मिक पुस्तकांचे वाचन करतोस ?
तो: संत साहित्य वाचतोय.
मी: वा,वा, मग संत तुकारामांचे अंधश्रध्देवर प्रहार करणारे अभंग वाचले असशीलच. तुकडोजी महाराजांची 'ग्रामगीता' आणि विनोबांची 'गीताई' सुद्धा वाचालीस की नाही ?  झालंच तर गाडगेबाबा तरी ???
तो: नाही रे...
मी: म्हणजे तू धार्मिक पुस्तके म्हणून फक्त पोथ्या वाचतो आहेस की काय ? ह्या सगळ्या पोथ्यात भारताड काल्पनिक गोष्टी, चमत्कार आणि कर्मकांडावर भर असतो. ब्राह्मणाला दान-दक्षिणा दिल्याने... त्यांना जेऊखाऊ घातल्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील असे अंधश्रद्धा पसरवणारे विचार या पोथ्यातून पसरवले जातात.मेंदू गहाण टाकणारी मानासिक गुलामगिरी निर्माण करतात या पोथ्या! 

बघ ना, नवनाथ कथासारच्या बाराव्या अध्यायात लिहिले आहे की, सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी वयाने बारा वर्षाची झाली तेव्हा तिचे रुप व शरीराचे देखणेपण बघून ब्रह्मदेव स्वत: कामाने व्याकूळ झाला व विचारांध होऊन तो सरस्वतीमागे पळू लागला. पळता पळता वीर्यपात झाला व ते वीर्य हिमाचलाचे जंगलातील एका हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबृद्ध नारायणाने प्रवेश केला.

गुरुचरित्रात लिहिले आहे की, जी स्त्री नवऱ्याच्या आधी जेवेल ती पुढच्या जन्मी घुबड होईल.(उलूक योनी जन्मती असे शब्द आहेत.) जी स्त्री नवऱ्याला उलटून बोलेल ती पुढच्या जन्मी कुत्री होईल. (श्वान योनी जन्मती.) याप्रमाणे स्त्रियांना उपभोग्य वस्तू व नवऱ्याच्या आधीन राहणारी गुलाम दाखवल्यामुळे स्त्रियांनी ही पोथी वाचू नये असा स्पष्ट आदेश दिला आहे. स्त्रिया जर शिकल्या तर पुरोहितांची ही मखलाशी उघड व्हायची भीती होती,त्यासाठी त्यांनी देवाधर्माच्या नावाखाली स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नाकारला. 

तसेच सत्यनारायणाच्या पोथीत तर कहर केला आहे. प्रसाद भक्षण केला नाही म्हणून संपत्तीने भरलेली नौका बुडाली आणि कलावतीचा पतीही मेला. नंतर आकाशवाणीनुसार साग्रसंगीत पूजा करून प्रसाद भक्षण केल्यावर बुडालेली नौका वर आली आणि पतीही जिवंत झाला. सध्या असल्या भाकड कथेवर शालेय पोरंही विश्वास ठेवत नाहीत, परंतू आपण मोठी माणसे मात्र पाण्यात बुडून मेलेला जिवंत होतो, यावर मनोभावे विश्वास ठेवतो.

नवनाथ कथासार, गुरुचरित्र, सत्यनारायणाची पोथी यासारख्या पोथ्या वाचल्यावर लक्षात येतं की, ही सगळी पोथ्या-पुराणे भटाबामणांनी (पुरोहितांनी) आणि किर्तनकारांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी देवाधर्माच्या नावाने भीती घालून... सामान्य माणसाला मानसिक गुलाम बनवून शोषण करण्यासाठी निर्माण केलेली आहेत.
तो: तू म्हणतोयस ते पटतंय, पण लहानपणापासून आमच्यावर ठाकूनठोकून असे संस्कार केल्यामुळे आमची गत 'कळतंय पण वळत नाही' अशी झाली आहे.

मित्रांनो, अशी गत आहे आजच्या उच्चशिक्षित इंजिनियर, डॉक्टरांची! ह्यांना सुशिक्षित तरी कसे म्हणावे ? हे तर फक्त पुस्तकी साक्षर! म्हणूनच असल्या भाकड कथांची डोळे मिटून आणि डोके गहाण ठेवून पारायणे करत बसतात. अशा तथाकथित धार्मिक वाचनामुळे त्यांना मग 'OMG' सिनेमाचा उथळ शेवट आवडतो, पण 'पिके' सिनेमावर मात्र टीका करावीशी वाटते. 

शेवटी मी त्या मित्राला म्हटले की, 'तू डॉक्टर आहेस तुला सजीवांचा जन्म कसा होतो याचे ज्ञान आहे. उतक्रान्तीवाद समजून घेण्यासाठी चार्ल्स डार्विनचा 'origin of 'species' हा ग्रंथ वाच. आगरकर,लोकहितवादी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, पां. वा. काणे, प्रबोधनकार ठाकरे अशा समाजसुधारकांची पुस्तके वाच.  तुझ्यासारखी माणसे परलोकातील अध्यात्माच्या विचारात गढून इहलोकात आनंदाने जगायचे विसरूनच जातात. आणि मग 'हे जग दु:खाचा सागर आहे' असे म्हणत उसासे टाकत बसतात. बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करायला लाग, आणि बदलायला लाग. 

सृष्टीचा नियमच जर 'सतत बदल होणे' हा असेल तर आपणच जुन्या टाकाऊ गोष्टींना का चिकटून राहायचे ? झऱ्याचं वहात पाणी जसं शुद्ध असतं तसंच नवविचारांनी भारलेलं मन ही शुद्धच असतं. मग आपल्या शरीरातून एक उत्साहाचा झरा वाहू लागतो. बदलाची सुरुवात नेहमीच कठिण असते, पण एकदा का बदल झाला की सगळंच सोपं होऊन जातं. स्वतःशीच झगडल्याशिवाय बदल होणार नाही... आणि स्वतःशी झगडण्यासाठी विचारच बळ पुरवतील. अज्ञातात विचारपूर्वक उडी मारली तरच अज्ञात हे अज्ञात न राहाता ज्ञात होते, मग नवीन विश्व दिसू लागते. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या विचारसारणीमुळेच आजवरचे अज्ञात विश्व शास्त्रज्ञानी ज्ञात केले आहे, आणि आपल्यालाही कोणत्या मार्गाने जायचे हे दाखवले आहे. तू पाहिलं पाऊल तर टाक... 'तुझ्यातला नवा तू' तुला बोलावतो आहे...

Wednesday, April 8, 2020

वैज्ञानिक सिध्दांत स्वीकारण्याची पद्धत

वैज्ञानिक सिध्दांत स्वीकारण्याची पद्धत : जेट जगदीश.

प्राचीन भारत वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असण्याला कोणाची काहीही हरकत असण्याचे काहीही कारण नाही. अशी वस्तुस्थिती असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक भारतीय माणसासाठी तर अभिमानास्पद! पण प्रश्न आहे तो खणखणीत पुराव्याचा. नाकारता येणार नाही असा पुरावा... जगातली कोणतीही वैज्ञानिक संस्था आणि वैज्ञानिक नाकारूच शकणार नाही असा पुरावा! असा पुरावा म्हणजे संघ परिवाराशी संलग्न असलेल्या वैज्ञानिकांची भाषणे नव्हेत, की दावे नव्हेत. तेथे हवेत प्रयोगसिद्ध निष्कर्ष. म्हणूनच रामदासांच्या वैज्ञानिकतेचे तुम्ही जे दावे करत आहात ते प्रात्यक्षिकाने सिद्ध करण्यासाठी गरज आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे विज्ञान हे वैयक्तिक अनुभवांना महत्व देत नाही, तर ते सार्वत्रिक प्रयोगाला महत्व देते. म्हणजे त्याचे सिध्दांत जगातील कोणत्याही अभ्यासू माणसाला पडताळून पाहता येतात, आणि ते सगळीकडे सारखेच असतात. ते व्यक्तीनुसार बदलत नसतात.

जगात अनेक लोक वैयक्तिक पातळीवर आपापल्या कल्पनाविलासाच्या पातळीवर अनेक संशोधने करत असतात, पण जोपर्यंत ते संशोधन तज्ञाच्या देखरेखीखाली तावून सुलाखून बाहेर पडत नाही, तोपर्यंत ते वैज्ञानिक जगतात स्वीकारले जात नाही. त्याचीही एक जागतिक पद्धत आहे. ती ज्ञानेश्वर आणि रामदासांच्याब वैज्ञानिक(?) संशोधनाचा दावा करणाऱ्यांनाही लागू पडते.

कारण विज्ञानातील सिध्दांत nature वा medical science सारख्या वैज्ञानिक मासिकात आधी प्रसिद्ध व्हावे लागतात. मग ते Royal Society of Sciences या जागतिक संस्थेत जगन्मान्य नोबेल पात्र वैज्ञानिकांच्या सभेत सिद्ध करावे लागतात. नंतर जागात इतरत्र अनेक वैज्ञानिक त्यावर प्रयोग करतात. त्यात जर तो सिध्दांत खरा ठरला तरच त्या संशोधनावर स्वीकृतीची मोहोर उठते, आणि मगच तो सिध्दांत वैज्ञानिक जगात स्वीकारला जातो. जर ते संशोधन व्यापारी तत्वावर वापरायचे असेल तर अर्ज केला असल्यास पेटंट दिले जाते.

जसे की, आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत त्याने जरी वैचारिक गणिती पद्धतीने 1905 सालीच लावलेला असला तरीही त्याचे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून 1915 सालच्या सूर्यग्रहणाच्या काळात तो सिद्धांत खरा ठरल्याचे सिद्ध झाले त्यानंतरच तो शास्त्रीय जगात स्वीकारले गेला. तो विश्वाच्या उत्पात्तीसंबंधातील मूलभूत सिद्धांत असल्यामुळे त्याला 1921 साली नोबेल पारितोषिक दिले गेले.

म्हणून गुगलवरील ब्लॉग, हिंदुत्ववाद्यांच्या IT सेल मधून व्हायरल झालेले लेख, युट्युबवरील अनेक वैयक्तिक मतांना मर्यादा पडतात. याचा अर्थ ते चुकीचे आहेत असा नाही, पण ते जोपर्यंत वरील प्रकारे वैज्ञानिक कसोटीला खरे उतरत नाही तोपर्यंत ते सार्वत्रिक मत होऊ शकत नाही.

तेव्हा सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या हिंदुत्ववादी अंधभक्तांनो, रामदास आणि ज्ञानदेवांना शास्त्रज्ञ बनवण्याच्या नादात त्यांची शब्दरचना म्हणजे बुडत्याला काडीचा आधार अशी केविलवाणी गत करून घेतली आहे तुम्ही! तेव्हा आता आमचा धर्म कसा वैज्ञानिक आहे अशी नुसती अस्मिता कुरवाळण्यापेक्षा गरज आहे ती तुमचा दावा प्रयोग सिद्ध करण्याची!!

Friday, March 27, 2020

नास्तिकांना_चपराक ❓❓❓

*नास्तिकांना_चपराक ❓❓❓*
*अश्या प्रकारे दिशाभूल करणारा मेसेज फिरत आहे.*

या साठी काही मुद्दे मांडले आहेत त्यांची उत्तरे खालील प्रमाणे...

⭕ मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही.

*✅उत्तर: आज तरी मेडिकल सायन्सकडे कोरोनावर उपाय नाहीत, पण भविष्यात मात्र त्याच्यावरील उपाय फक्त आणि फक्त आधुनिक विज्ञानच शोधू शकते. होम हवन करून कोणताच शोध लागला नाही.*

⭕ आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

*✅उत्तर: स्वच्छतेच्या सवयी हा शिस्त आणि नितीशास्त्राचा भाग आहे. त्याचा धर्माशी काय संबंध? उठसुठ प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून आपण काय साध्य करू इच्छित आहात? फारतर त्याने धार्मिक अस्मिता जागरूक होईल. जर स्वच्छतेचे धार्मिक अंगाने एवढे महत्व होते तर गेल्या शतकापर्यंत पटकी, प्लेग आणि नारूच्या साथीने गावेच्या गावे रिकामी का झाली? विज्ञान प्रगत नव्हते तेव्हा हजारो लोकं विविध आजारांनी, साथींनी मृत्युमुखी का पडली, तेव्हा धर्म का उपयोगी पडला नाही. कारण धर्म वेगळा आणि स्वच्छतेचे शास्त्र वेगळे, हे लक्षात घ्या.*

⭕ कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

*✅उत्तर: कोरोना हा विज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे झाला या विधानाला कोणताही सबळ पुरावा नाही, सोशल मिडीया वर पसरणाऱ्या अफवांमुळे हा समज पसरला आहे.*

⭕ कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही ! विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ?

*✅उत्तर: कोरोना वर उपाययोजना म्हणून लोकं एकत्र भेटल्याने या विषाणू पसरू शकतो हे सिद्ध झाल्याने विज्ञानाने एकत्र येण्यावर निर्बंध लादले  आणि कोरोनाच्या भीतीने भक्त लोकांनी सुद्धा मंदिरात जाणे टाळले, तेंव्हा आमचा धर्म, आमचे मंदिर सामर्थ्यवान आहे, कोरोना आमचे काही वाकडे करू शकत नाही असे का कुणी बोलले नाही !  त्यामुळे कुठलीही दैवीशक्ती कुठलाही शोध लावू शकत नाही हे सत्य आहे.*

⭕ आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली जीवन शैली सोडून निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नःचिन्ह निर्माण झाले आहे.

*✅उत्तर: नमस्ते करणे हि फक्त हिंदूंची संस्कृती नव्हे तर बौद्ध, जैन, शीख सुद्धा नमस्कार करतात, हिंदू घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवत असत असे सांगितले जाते पण नुसते हातपाय धुवून नव्हे तर साबण लावून धुतल्यावरच रोगाला अटकाव होऊ शकतो हे विज्ञानाने सांगितले.*

*त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी विज्ञानाचे सर्व फायदे घ्यायचे मात्र सर्व क्रेडिट मात्र धर्माला द्यायचे हा दुटप्पीपणा धर्मान्धानी सोडावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा...*

*चला उत्तर देऊया - टीम*

माणसांमुळे निसर्गाचा तोल बिघडला आणि दोष मात्र विज्ञानाला?

स्वत:ला तथाकथित अतिव विज्ञानवादी नास्तिक म्हणवून घेणारे तर सगळ्यात मोठे स्वार्थी लोकं असतात. विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचं नाही आणि दोष देवाला द्यायचा ज्याला ही लोकं मानत नाहीत. 

*"दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी मंदिराचे दरवाजे लावून घेतले, पोलीस, हॉस्पिटल, डॉक्टर हेच खरे देव आहेत" ह्या आशयाचा मेसेज फिरतोय.*

*कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत!मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?* 

देवाने सांगितलं नव्हत डुक्कर खा, कुत्री, मांजर, किडे मकोडे, वटवाघूळ खा, देवाने सांगितलं नव्हत मांसाहार करा, देवाने सांगितलं नव्हत प्रदुषण करा, देवाने सांगितलं नव्हत निसर्गाचा नाश करा आणि स्वतःचा विकास करा.

1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे? तर काही नाही.👎 औषधच उपलब्ध नाही म्हणून 10000 हूनन अधिक बळी गेले, त्याला विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना !

2. आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

3. कोरोनाचा उद्भव कोणी केला? 
धर्माने तर निश्चित नाहीच.  तुमच्या त्याच तथाकथित विज्ञानाच्या अतिरेकी वापराचा जेनेटिकल मॉडिफाईड आणि अधर्मी अपवित्र आहार विहारांतून, विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

4. कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का? तर नाही ! बंद तर.. विमानतळे, बस-रेल्वे स्थानके, मॉल, शॉपिंग सेंटर्स, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, थिएटर्स, आदि विज्ञानाने शोध लावलेली ठिकाणेही सर्व बंद आहेत। मग त्याचा दोष कोणाला - देवाला?

4. तशीही मंदिरे सुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते का? तर नाही !

👉 *कोरोना मुळे मंदिरे बंद... असं म्हणणाऱ्यांसाठी*

☑️ *ह्या रोगाचा उगम कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर लक्षात येईल की मानवाने केलेल्या अनैसर्गिक चंगळवादी, अशुद्ध कृतींचा परिणाम म्हणजे असे आजार.*

☑️ *आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली पवित्र आचार विचारांची जीवनशैली सोडून अहंकाराने निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.* 

☑️ *दवाखाने झालेले आजार बरा करतात, परंतु असे आजारच होऊ नये याचे शिक्षण हिंदू जीवनशैली देते आणि ही जी मंदिरे बांधली जातात ती असे पवित्र ज्ञान प्राप्त करण्याची ठिकाणे असतात. आपला आहार, विहार कसा शुद्ध व पवित्र असावा? योग, ध्यानसाधना, सूर्यनमस्कार का करावेत? यासाठी, आरोग्यपूर्ण जीवनासाठी हिंदू जीवनशैलीने दिलेली ही देण आहे.*

☑️ *हिंदू संस्कृतीने शिकवलेले प्रत्येक मूल्य, प्रत्येक कृतीत खूप मोठा अर्थ लपलेला आहे.

हस्तांदोलनापेक्षा पेक्षा हात जोडून नमस्कार कधीही चांगला, हे आता जगाने मान्य केलंय. म्हणून आपली संस्कृती विसरू नका नाहीतर फक्त दवाखानेच उरतील.*

☑️ *शाळा, दवाखाने, संशोधन केंद्रे जरूर उभारावीत ती काळाची गरज आहेच. पण याचा अर्थ असा नाही की मंदिर नको. मंदिरे शुद्ध जीवन, आचार विचार शिकण्याची केंद्रे आहेत.*

☑️ *चुकीचे मेसेज पसरविण्यापेक्षा निसर्गाचे संवर्धन करा, सुंदर हिंदू जीवनशैलीचे आचरण करा आणि त्यात आपले योगदान द्या.*

राहिला प्रश्न मंदिरांचा तर नित्य पुजा, आरती, हवन सगळ काही सुरळीत सुरू आहे फक्त मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये आणि रोगाचा प्रसार होऊ नये त्यासाठी खबरदारी म्हणून ह्या उपाययोजना केल्या जातात एव्हढी साधी अक्कल नसेल तर कसले intellectual तुम्ही!

आणि पोलिस, हॉस्पिटल यांच्यातच काय तर मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवा मधे ईश्वर आहे अस आमचा हिंदु धर्म शिकवतो त्यामुळे आम्हाला ज्ञान कोणी शिकवूच नका!

आपलेच काही येडे हिंदु व्हॉटसअप वर कुठलाही मेसेज त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी न घेता फॉरवर्ड करत असतात आणि आपण जगापेक्षा वेगळे आहोत अस भासवतात. 

*या मेसेजला उत्तम जोगदंडांनी दिलेले उत्तर...*

१)'विज्ञानवादी आणि नास्तिक लोक सगळ्यात मोठे स्वार्थी असतात' असे एक सरधोपट वाक्य या वरील पोस्टमध्ये आहे. ते जाणीवपूर्वक बुद्धीभेद घडविण्यासाठी फेकलेले असते. त्यांच्या मते विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचे नाही हा तो स्वार्थ. मुळात विज्ञान हे निसर्गाची रहस्य शोधून काढते आणि त्याचा उपयोग सजग माणसे मानवी कल्याणासाठी करतात. त्यामुळे विज्ञानवादी व्यक्ती या मानवतावादी देखील असतात. मात्र या शोधांचा वापर कसा करावयाचा हे त्या वापरणाऱ्यावर अवलंबून असते. त्यात विज्ञानाचा काय दोष? अणूच्या शक्तीचा शोध लावणारा आईनस्टाईन (विज्ञानवादी) हा अणूबाँबचा वापर केला जावू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत होता.आणि पोखरणमध्ये अणूचाचणी यशस्वी झाली तेव्हा 'आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवता येईल' म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटणारी युद्धखोर मानसिकता असणारेच विज्ञानाला शिव्या देण्यातही पुढे असतात. विज्ञानाने लावलेल्या शोधांचा पुरेपुर वापर करत विज्ञानालाच दोष देणे ही या दुटप्पी भोंदूंची खासियत असते. संस्कार, सत्संग चँनल बघितले की याचा प्रत्यय येतो.

२)'दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी दरवाजे लावून घेतले' या आशयाची पोस्ट विज्ञानवादी किंवा नास्तिक व्यक्तीची नाही. तर तो अग्रलेख आहे "सामना" या वर्तमानपत्राचा.आणि सामना हे प्रखर हिंदूत्ववादी पक्षाचे मुखपत्र आहे.

३)कोरोना विषाणू हा जैविक युद्धासाठी बनविलेला होता असा आरोप निराधार आणि गैरसमज पसरविणारा आहे. युद्धाची मानसिकता ही मानवतेविरोधीच आहे. पण दररोज ऊठसूट पाकिस्तान विरोधी भडक वक्तव्ये करणाऱ्यांचे समर्थन हीच मंडळी करतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे पाखंडीपणाचे आहे.

४)यात मांसाहाराबाबत देखील अवैज्ञानिक नोंदी आहेत. खरेतर चीनमधल्या मासळी बाजारातून या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. पण या प्राणी, किटकांच्या यादीतून मासे सोयिस्कररित्या वगळले आहेत. कारण भारतातील कोकणासह द.भारत, प.बंगाल येथील बहुसंख्य लोकांचा मासे हा प्रमुख आहार आहे. अगदी धर्माच्या ठेकेदारांचा सुद्धा.(by the way माझे कुटुंब पूर्णतः शाकाहारी आहे.) महत्त्वाचे ज्या हिंदू संस्कृतीच्या पवित्र आहार-विहाराबद्दल येथे फार गौरवोद्गार काढले आहेत ती *वैदिक संस्कृती शाकाहारी नव्हतीच. यज्ञामध्ये विविध प्राण्याचे अगदी घोडा, गायी यांचे बळी दिले जात व त्याचा भोजनात वापर होई. याचे कितीतरी पुरावे वेद, पुराणात मिळतात.* जे बाबासाहेबांनी रिडल्स ऑफ हिंदूइझममध्ये दाखविले आहेत. खरेतर यज्ञांमधील हिंसेचा विट येऊनच या देशात बुद्ध आणि जैन हे अहिंसावादी तत्वज्ञान विकसित झाले हा इतिहास आहे. पण खोटा इतिहास सांगण्यातच आमची कर्तबगारी आहे. 

५)मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे काय उत्तर आहे? असा एक शाहजोग प्रश्न यात आहे. सध्या जी काळजी आपण घेतोय आणि मास्क(जे देवाच्या मूर्तींना देखील लावले) सेनेटायझर, वैद्यकीय उपचार वापरतोयत ती सारी विज्ञानाची देन आहे. आणि जगभर जे संशोधन सुरू आहे ते सुद्धा वैज्ञानिकच करीत आहेत. तथाकथित प्रवचनकार, पाद्री, मुल्ला- मौलवी किंवा गायींचे धर्मरक्षक नाहीत.

६)आज जी काळजी घेण्यास सांगितले जाते, ते धर्म आधीच सांगत होता हे आपल्यालाच कुरवाळण्यात धन्यता मानण्यासारखे आहे. धर्मातील चांगल्या गोष्टींचे स्वागतच आहे. पण आम्हीच खरे आणि श्रेष्ठ असे म्हणण्यात इतरांना हिणविण्याचा अभिनिवेश असतो. आपले सर्वच खरे तर त्या काळात, देवीच्या रोगाला देवीचा कोप म्हणणाऱ्यांनी लसीकरण करायलाच नको होते. आणि सर्वधर्मिय धर्मगुरुंनी प्लेग सारख्या रोगांवर अंगारे-धुपारे करीत बसायला हवे होते.
आख्ख्या जगाला योग शिकवणारे रामदेव बाबा परदेशात जाऊन स्वतःवर उपचार करुन आलेच ना? मंदिरातील नित्य पूजेला विरोध असण्याचे कारण नाही. उपासनेचे स्वातंत्र्य संविधानानेच दिलेले आहे. पण कोणताही धर्म सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था याच्या आड येत असेल तर त्या धर्माचा संकोच करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिला आहे. तूर्तास एवढेच.

Sunday, March 15, 2020

वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच

_वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच_
(^m^) (^j^) (मनोगते)

अंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्व म्हणजे आपल्या ३३ कोटी देवांच्या राहण्याची जागा, एवढीच अंतराळ या विषयातील आपली समज भाबडी आणि मूर्खपणाची असल्याने या क्षेत्रात घडणाऱ्या कुठल्याही घडामोडींशी बहुतांश भारतीयांना काही देणंघेणं नसतं. त्यामुळेच भारताने जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल) अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं काय महत्त्व आहे, हेसुद्धा अनेकांना माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. राजकारण्यांच्या भानगडी, सिनेस्टारची लफडी आणि क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चर्चा हा या देशाचा कायमस्वरूपी उद्योग असल्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन माहिती घेण्याची तसदी तशीही येथे कोणी घेत नाही. वैज्ञानिक प्रगतीचा लौकिक आयुष्य सुखकर करण्यासाठी पुरेपूर फायदा घ्यायचा. मात्र आपल्या विचारपद्धतीत विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टिकोनाला चुकूनही स्थान मिळू द्यायचं नाही, हे आपलं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य.

अशा वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय ‘निरुत्साही’ असलेल्या या देशातील वैज्ञानिक मात्र एका निष्ठेने व सातत्याने आपलं काम करत असतात. पण तेही भारतीय मानसिकतेत वाढल्यामुळे स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेतानाही इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन सारखे इस्रोच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेअगोदर प्रक्षेपण यानाची प्रतिकृती तिरूपती बालाजीच्या चरणी वाहतात आणि प्रार्थना करतात. बालाजीमुळे इस्रोच्या मोहिमा यशस्वी होतात, असं त्यांना मनोभावे वाटतं. आता तिरूपतीचा बालाजीच जर इस्रोची मोहीम यशस्वी करणार असेल, तर इस्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची काय गरज? मोहीम यशस्वी झाली, तर बालाजींनी केली मग गेल्या दोनवेळा अपयश आलं, ते कोणामुळं आलं? अर्थात असे प्रश्न आपल्याकडे कोणालाही पडणार नाही. हे असं वागणं हे त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, असं सर्मथन केलं जाईल. यात काहीही चुकीचं नाही, त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, असं ठासून सांगितलं जाईल.

इतर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने हे केलं असतं, तर समजून घेता आलं असतं, पण अंतराळ संशोधन संस्थेचा प्रमुख हे असं करतो, याचं मोठं आश्चर्य वाटतं. अर्थात, यातही नवल काही नाही. असं करणारे आणि असा विश्वास बाळगणारे राधाकृष्णन हे काही पहिले शास्त्रज्ञ नाहीत. ज्यांचा आपण सारेच आदर करतो ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रपर पुस्तकात अनेकदा अज्ञात शक्तीचे आभार मानले आहेत. ही अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, विज्ञानविरोधी असली तरी तो आपल्या संस्काराचाच भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा अविभाज्य घटक आहे, हे येथे समजून घ्यावे लागते. 

सर्वसामान्य भारतीय माणूस असो वा शास्त्रज्ञ, त्याने आपल्या मेंदूचे दोन टप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्याने तो विज्ञान शिकतो. प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो. त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो. वैज्ञानिक म्हणून मान्यता प्राप्त करतो. इस्रोचा प्रमुख होतो. अंतराळ संशोधन संस्थेत मानाचं पद प्राप्त करतो. त्यावर पोट भरतो. मानसन्मान मिळवितो. राष्ट्रपतीही होतो. मात्र ज्यामुळे तो हे सारं मिळवितो त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो मेंदूच्या दुसऱ्या कप्प्यात मात्र अजिबात शिरकाव करू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनाचं भाग बनविणे त्याला आवश्यक वाटत नाही. याचं कारण म्हणजे लहान असतानापासून त्याच्यावर झालेले संस्कार! 
‘विज्ञान जेथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. त्या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाही.’ वगैरे...वगैरे...!

राधाकृष्णन, डॉ. कलामांसारखे इतरही शास्त्रज्ञ असे का वागतात, याचं उत्तर लहणपणापासून पालकांनी मनावर बिंबवलेल्या कर्मकांडी संस्कारात आहे. उत्तर जरी मिळत असले तरी यातून लोकांमध्ये मेसेज मात्र अतिशय चुकीचा जातो. म्हणूनच निरक्षर सोडाच पण शिक्षित लोकही बरेचदा 'एवढे मोठे शास्त्रज्ञ, तेसुद्धा पाहा, सारं श्रेय देवाला देतात.' असे म्हणत आणि अशी उदाहरणं नवीन पिढीसमोर देत असतात. आपल्या वागणुकीतून वैज्ञानिक विचारांचा, तत्त्वज्ञानाचा अपमान होतोय, हे मात्र ना शास्त्रज्ञांच्या गावी असतं ना सामान्य लोकांच्याही. 

देव, दैव, नशीब, नियती, कर्मकांडाला प्राधान्य देणाऱ्या देशात हे असंच व्हायचं. आपण मात्र वैज्ञानिक जगतातील एकच म्हण लक्षात ठेवायची. ती म्हणजे, *‘न्यूटन जे सिद्ध करतो, तेवढंच महत्त्वाचं. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं.’*

विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान आणि अध्यात्म. (^m^)(^j^)(मनोगते)

मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. कृत्रिम अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे  बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारतोच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा ह्या वृक्षावर फुटल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगूळ उगवले आहे. ते बांडगूळ आहे अध्यात्माचे. नवल म्हणजे अनेक लोकांचे लक्ष त्या बांडगुळाकडेच वेधले आहे.

ह्याचे कारण आपला समाज एकूणच स्थितिशील आहे. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसाबरोबरच एक प्रकारचा बौद्धिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल चिंतन करणे, तर्काचा आधार घेऊन चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, स्वबुद्धीने विचार करणे इत्यादी बौद्धिक व वैचारिक ' क्रियां' चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. आणि म्हणूनच तो विज्ञानाच्या खडतर पण योग्य गंतव्याकडे नेणार्‍या मार्गाऐवजी काल्पनिक आणि फसव्या पण सोप्या व मोहक अशा मार्गाकडे वळतो. येथे त्याला आकर्षक आणि रंगीबेरंगी शब्दफुलांचे ताटवे दिसतात. त्यांनाच तो भुलतो व त्याच मार्गावर रेंगाळत रहातो. सत्य समोर उभे करणार्‍या विज्ञानाकडे मात्र पाठ फिरवतो. ज्ञानापेक्षा अज्ञानातच सुख वाटणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, स्पष्टतेऐवजी धूसरतेचे, गूढतेचे आकर्षण असणे हे भक्तांच्या जगतातील फार मोठे मायाजाल आहे.

विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोत काही मूलभूत फरक आहेत. ते असे...

1) जाणीव, निरीक्षण, चिंतन, प्रायोगिक परीक्षण, गणितीय पडताळणी इत्यादी सोपस्कारांमधून पार पडल्यानंतरच एखाद्या विचाराला विज्ञानात मान्यता मिळते. अध्यात्मात मात्र कल्पनेचे वारू चौखूर उधळत असतात. त्यामुळे वेगवेगळे तत्त्ववेत्ते वेगवेगळे-कित्येकदा परस्परविरुद्धही- विचार मांडतात. 
2) निखळ सत्य हेच विज्ञानाचे गन्तव्य असते तर अध्यात्म, कल्पनेलाच सत्य मानते. 
3) विज्ञानाला शब्दप्रामाण्य मुळीच मान्य नाही. एखादा विचार कितीही मोठ्या व्यक्तीने मांडलेला असो वा कोणत्याही ग्रंथात दिलेला असो, ठरावीक प्रक्रियेतून पार पडल्याशिवाय वैज्ञानिक जगात त्याला मान्यता मिळत नाही. अध्यात्माचे गाडे मात्र व्यक्तिमाहात्म्य वा ग्रंथमाहात्म्य यांचे संदर्भ घेतल्यावाचून पुढे सरकतच नाही. 
4) विज्ञान प्रत्येक बाबतीत पुरावा मागते. उलट, अध्यात्म आणि पुरावा यांचा छत्तीसाचा आकडा आहे.' बाबावाक्यम् प्रमाणम् 'हाच तेथे मूलमंत्र आहे.
5) विज्ञानात नेमके शब्द वापरले जातात. शब्दांचा फापटपसारा नसतो. कारण महत्त्व असते ते सिद्धांताला. शब्द हे माध्यम असते. उलट अध्यात्मात शब्दांचाच फुलोरा अफाट असतो. लोकांना ठोस असे देण्यासारखे काही नसल्यामुळे त्यांना शब्दांच्या भूलभुलैयातून फिरवून संभ्रमित केले जाते. शब्दावडंबराला अक्षरश: काडीचा आधार नसतो.
6) विज्ञानात शब्द हे केवळ साधन आहे तर अध्यात्मात शब्द हेच साध्य आहे. सबब ते काल्पनिक जगाची अनुभूती घेत शाब्दिक फुलोऱ्यानी फुलणारे शब्दप्रमाण्यवादी आहे, तर विज्ञान पुरावा तेवढा विश्वास मानणारे प्रमाणवादी आहे.

Saturday, March 14, 2020

देवाच्या अस्तित्वासाठी छद्म विज्ञानाचा आधार...




एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.' 

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर...

प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत? 

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना? 

वि. : हो सर...

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'

(विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर ...

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे? 

वि. : नाही सर... असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का? 

प्रो. : अवश्य ...

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच ...

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'

(वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु. 

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल .. 
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही....

(सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी
'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...

आज कलाम साहेबांसाठी मानाचा मुजरा...."" 

शिक्षकाला निर्बुद्ध समजणाऱ्या भंपक विद्यार्थ्याचा हुच्चपणा! नास्तिक शिक्षकाची ही तर्कहीन ओढूनताणून तयार केलेली कहाणी... 
त्याची कारणे पुढील प्रमाणे... 

1) ही कहाणी या आधी बर्‍याच कालावधी पासून अल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाच्या नावाने (आधी इंग्रजीत व नंतर त्याचे जसेच्या तसे मराठी, हिन्दी भाषांतर) प्रसारित करण्यात आली होती. ती अर्थातच खोटी होती हे आढळून आले. या कहाणीचा उल्लेख आइनस्टाइन च्या चरित्रात कुठेच आढळत नाही.  अधिक माहिती साठी पुढील लिंक वाचावी:  (http://www.snopes.com/religion/einstein.asp) आता तीच कहाणी आइनस्टाइन च्या जागी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव टाकून पुन्हा जशीच्या तशी प्रसारित करण्यात येत आहे. या वरून ही खोटी कहाणी नाव बदलून पुढे रेटून (खोटे बोल, पण रेटून बोल) प्रसारित करणार्‍यांचा ‘हेतु’ लक्षात येतो. आपल्या खोट्या कहाणी साठी अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान वैज्ञानिकास वेठीस धरायला खरे तर या कहाणीच्या लेखकास लाज वाटली पाहिजे. असो, तरीही या खोट्या कहाणीच्या पुढील भागाचा व त्यातील मुद्द्यांचा समाचार घेऊ या. 
2) या कहाणीतील नास्तिक शिक्षक (पुढे त्यास प्रोफेसर असे ही म्हटले आहे. कॉपी सुद्धा नीट केली नाही तर अशा चुका होणारच) हे पत्र स्वतःच्या सोयीसाठी लेखकाने ओढून ताणून तयार केलेले दिसते आहे. विद्यार्थ्याच्या काही बिनडोक प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही असे दाखवले आहे, ते केवळ लेखकाने तसे लादल्यामुळेच! तसेच आधी शिक्षकाने उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित ठेऊन, त्याच्या पुढे नवीनच प्रश्न (ते ही बिनडोक/अतार्किक) उपस्थित करून मूळ प्रश्नांस सोयीस्करपणे बगल दिली आहे.  
3) ईश्वराचे अस्तित्व आहेच हे पट‍वून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पंचेंद्रियांना (यात सूक्ष्मदर्शक, दुर्बिण व अन्य वैज्ञानिक उपकरणे सुद्धा येतात कारण अंतिमतः ही उपकरणे आपल्या ज्ञानेंद्रियांना सूक्ष्म/दूरस्थ/अन्य प्रकारांची जाणीव करून देतात)   ईश्वराची अनुभूति येत नाही म्हणून, तसेच ईश्वर ज्या कारणांसाठी मानला जातो तसे काही होत नाही म्हणून ईश्वर नाकारणार्‍या नास्तिक शिक्षकास उत्तर देतांना, आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी लेखकाने ‘हुशार’ विद्यार्थ्याच्या तोंडी उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची मकडापासून उत्क्रांती, व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी घालून, ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा आधार घेतला आहे. परंतु या गोष्टी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत कारण त्या इथे गैरलागू आहेत. कसे ते पाहू या. 
4) उष्णता-शीतलता : इथे उष्णता व शीतलता यांच्या व्याखेचा घोळ घातला आहे. शीतलता म्हणजे कमी उष्णता हे सांगून तापमानाची सापेक्षता सांगितली आहे. शीतलतेला दुसरे नाव देऊन ईश्वराचे अस्तित्व किंवा शीतलता अस्तित्वात नसणे हे कसे काय सिद्ध होते?
5) अंधार-प्रकाश : एक तर शिक्षकाच्या तोंडी जाणून बुजून चुकीची वाक्ये घातली आहेत. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे हुशार विद्यार्थ्याच्या तोंडी घातलेले योग्य असे वाक्य (जे मुद्दाम पेरलेले वाटते) त्याच्या नंतरच्या वाक्यांच्या अगदी विरोधी वाटते. ईश्वर ही मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी वस्तु नाही असे हा विद्यार्थी मानतो. पण वरील त्याच्याच उदाहरणाप्रमाणे (उष्णता-शीतलता, अंधार प्रकाश) जाणवणारा तरी हवा ना? तो कुठेतरी जाणवतो किंवा सिद्ध होतो असे एक ही उदाहरण किंवा पुरावा लेखकाने दिलेला नाही. 
6) मानवाची माकडापासून उत्क्रांती: यात उत्क्रांती कुणी पाहीली नाही हे सांगतांना विद्यार्थ्याचे घोर अज्ञान दिसून येते. उत्क्रांती ही अत्यंत धीम्या गतीने, हजारो/लाखो वर्षांत होत असते. म्हणूनच याला उत्क्रांती म्हणतात. एका जंगलातील माकडे दहा-पंधरा वर्षात लगेच माणसे होत नाहीत. हल्ली हायब्रिड पीक किंवा क्रॉस ब्रीड पशू ही याची उत्तम उदाहरणे आहेत. निसर्गात मात्र असे बदलाचे चक्र धीमेपणाने चालू असते. 
7) मेंदू: शेवटी हा विद्यार्थी क्लासला विचारतो की सरांचा मेंदू पाहीलाय काय?  त्याला स्पर्श केलाय काय, त्याची चव बघितली आहे काय? त्या वरून  विद्यार्थी निष्कर्ष काढतो की सरांना मेंदू आहे हे कसे मानायचे! हा तर त्या विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा कडेलोटच झाला! CT scan किंवा एक्स रे वगैरे उपकरणातून मेंदू पाहता येतो. अगदी त्या विद्यार्थ्याची कवटी फोडून सुद्धा मेंदू विद्यार्थ्यांना दाखवता आला असता. 

मनातील विचार, चुंबकीय शक्ति, विद्युत शक्ति इत्यादि बाबतीत केलेली विधाने सुद्धा लेखकाचे विज्ञानाच्या बाबतीत अज्ञान दर्शवितात. विज्ञानाविषयी उगीचच नन्नाचा पाढा वाचून देवाचे अस्तित्व कसे सिद्ध होऊ शकते याचा साधा विचार सुद्धा लेखकाने केलेला दिसत नाही.  

तर, उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची माकडापासून उत्क्रांती व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी पाहील्या किंवा अनुभवल्या जाऊ शकतात. तसे ईश्वराच्या बाबतीत अजून तरी शक्य झालेले  नाही. श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जशी पटते तशी श्रद्धा त्याने जरूर ठेवावी. परंतु ती दुसर्‍यावर थोपवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी बिनबुडाचे, अतार्किक व खोटे युक्तिवाद करू नयेत.

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - - जेट जगदीश.

विज्ञान ही संकल्पना नसून निसर्गातील गुढे उकलण्याची आजपर्यंत मानवाला सापडलेली सर्वात उत्तम शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे विज्ञान हे निसर्गनियम शोधण्याचे मानवाला विचारांती मिळालेले एक साधन आहे... संकल्पना नव्हे.

एखाद्या वस्तूचे अस्तित्व निसर्गनियमाच्या पुराव्याच्या आणि तर्काच्या आधारे स्वीकारणे ही श्रद्घा नसून ते प्रमाणित ज्ञान असते, म्हणून वैज्ञानिक सत्याचा स्वीकार हे प्रमाणित ज्ञान आहे; श्रद्घा नव्हे. विज्ञान सतत बदलते असल्यामुळे वैज्ञानिक गृहितकेही बदलू शकतात. म्हणजेच विज्ञान हे नित्यनूतन असते, तर श्रद्धा आणि परंपरा ह्या धार्मिक बेड्या असतात, ज्या लोकांना विचार करण्यापासून परावृत्त करतात, आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', या गतानुगतिक मानसिकतेत जखडून ठेवतात. 

श्रद्घा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतील भेद पुढीलप्रमाणे सांगता येईल... 

(१) वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. 
(२) असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. 
(३) वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
(४) वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
(५) म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.

याउलट..........

(१) जेव्हा असत्याचा किंवा नसलेल्या अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो बौद्घिक स्वीकार नसतो, तर भावनिक इच्छाशक्तीचा भाग असतो. ती प्रश्न न विचारणारी निष्ठा असते. 
(२) श्रद्घेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. 
(३) श्रद्घेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात.
(४) श्रध्देय माणूस धार्मिक, नैतिक जीवनव्यवहारासाठी धर्माने आखून दिलेली आदरणीय तत्त्वे वा अस्तित्वे निष्ठेने स्वीकारतो.
(५) म्हणूनच श्रध्देय माणूस नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत आपल्या दोषांवर इतरांना दोषी धरत पांघरूण घालत असतो.

इंद्रियगम्य पुरावा आणि त्यावर आधारित तर्क यांनी प्रमाणित झालेली धारणा स्वीकारणे म्हणजे विवेक, असा विवेकवादी किंवा बुद्घिवादी सिद्घांत आहे. त्यानुसार केवळ वैज्ञानिक उपपत्तीच स्वीकारार्ह ठरतात आणि धार्मिक श्रद्घा स्वीकारणे हे तत्त्वत: अविवेकाचे, बुद्घिहीनतेचे लक्षण मानावे लागते. या दृष्टीने *सर्व धार्मिक श्रद्घा अंधश्रद्घा आहेत* म्हणून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी श्रद्धा आणि परंपरा यांंना टोकरत रहाणे हा बुद्धिवाद्यांचा कार्यकम ठरतो.

श्रद्घा ही संकल्पना लौकिक व्यवहारात आदर, निष्ठा, पूज्यभाव, बांधीलकी, इमानीपणा, भरवसा, विश्वास इ. व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरली जाते. श्रद्घेचा हा दुसरा अर्थ  म्हणजेच ‘ ईश्वर, प्रेषित, धर्मसंस्थापक, साक्षात्कारी व्यक्ती, शास्त्रग्रंथ, गुरु इत्यादींच्या वचनांवर दृढ विश्वास म्हणजेच आप्तवचनाचा, शब्दप्रामाण्याचा स्वीकार होय. धार्मिक समाजाची बांधणी याच श्रद्घेतून होत असते. हिंदू , बौद्घ, जैन, शीख, ज्यू , पारशी, क्रिस्ती, इस्लाम इ. सर्व धार्मिक समाज आणि पंथोपपंथ अशाच समान श्रद्घेने बांधलेले आहेत. 

बालपणापासून होणाऱ्या धार्मिक संस्कारांतून या श्रद्घा व्यक्तिच्या जीवनात मूळ धरतात आणि त्या तिच्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. या अर्थाने सर्व व्यक्ती श्रद्घामय असतात. आणि त्याचमुळे श्रद्धेय माणूस सतत चुकीच्या परंपरांचे समर्थन करत असतो. पण जसजशी व्यक्तीची वैचारिक क्षमता वाढत जाते तसतसे त्याला धार्मिक कर्मकांडातील फोलपणा डाचू लागतो. धर्माचे पोकळ तत्वज्ञान हे  मुठभरांच्या फायद्यासाठी सामान्यांचे शोषण करण्याचे हत्यार बनले आहे, हे त्याला कळू लागते. मग तो त्याविरोधात निडरपणे आवाज उठवून बुद्धिमांद्य झालेल्या समाजाला जागे करण्याच्या  प्रयत्नास लागतो. म्हणूनच हे ज्यांना जाणवले अशा आगरकर, हिंदुधर्मातील कर्मकांडांवर घणाघाती प्रहार करणारे समाजवादी विचारांचे  विवेकानंद, विज्ञाननिष्ठ सावरकर, र. धो. कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत श्रद्धा आणि परंपरांना टोकरत राहून समाजसुधारणा करण्याचे व्रत अंगिकारले होते. 

तेव्हा श्रद्धा आणि परंपरांना टोकरत बसणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे काय या प्रश्नाचे उत्तर *होय* असेच आहे. अर्थात हे अस्मिता गोंजारणाऱ्या धर्मांध आणि अंधभक्तांना पचणे कठीण असते म्हणून ते असे वरवर संयुक्तिक वाटणारे असंयुक्तिक  प्रश्न विचारत असतात.

Thursday, March 5, 2020

एका सुशिक्षिताची कैफियत

एका सुशिक्षिताची कैफियत : (^m^) (^j^) (मनोगते)

लहान मुलांचे वय वर्षे दोन/तीन पासून शिक्षणाचे माध्यम इंग्लिश केल्याने जाणवणारे दुष्परिणाम, ज्यांची व्याप्ती खूपच मोठी व गंभीर आहे ............
१) मुलांमध्ये मातृभाषे विषयी गोडी राहत नाही. त्यांना मातृभाषेतील लहानसहान शब्दही नीट येत नाहीत. त्याची नैसर्गिक मजा मुलांना अनुभवता येत नाही.
२) पालकांचा "घरी मराठी करून घेऊ, मातृभाषा तर आहे." हा विश्वास सार्थ ठरत नाही. मग काही वर्षांनी असे जाणवते की, लहान मुलांना विषय समजण्यात खूप अवघड जात आहेत. अतिरिक्त शिकविण्या लावूनही फारसा उपयोग होत नाही. मुलांना इंग्लिश मधून विषय समजत नाहीत. परिणामी मूल घोकंपट्टीवर जोर देते. आणि अभ्यास फक्त मार्कांसाठीच करायचा असतो हा संस्कार त्यांच्यात रुजतो. मुलांचे बालपण संपुष्टात येते. पालक आणि मुलांमध्ये तणाव निर्माण होतो.
३) मातृभाषेतील वर्तमानपत्रे, पुस्तके, कथा, कादंबऱ्या, बालनाट्ये, नाटके, बालसाहित्य, चित्रपट इत्यादी अनेक गोष्टी मुलांना कांटाळवाण्या वाटू लागतात. त्यात त्यांना रस वाटत नाही. पर्यायाने बाल रंगभूमीलाही नाटके मिळत नाहीत... त्यात काम करणारी मुले मिळत नाहीत.
४) 'ना घर का ना घाट का' अशी बऱ्याच मुलांची अवस्था होतांना दिसून येते. ना धड इंग्लिश येत ना मातृभाषा! येते ती 'मिग्लिश'!!
५) पैशाचा अपव्यय तर प्रचंड होतो. खास करून माध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, गरीब वर्ग तर पूर्णपणे भरडला जातो. CBSE /ICSE च्या नावाखाली तर वारेमाप फी आणि देणग्या घेतल्या जातात. त्या पैशाचा विनियोग शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यापेक्षा दिखावेगीरीवर अधिक केला जातो. संस्था चालकांच्या तुंबड्या भरल्या जातात. म्हणजे शाळा काढणे हा फक्त व्यवसाय झाला आहे. पालक मात्र पोटाला चिमटे घेऊन आयुष्यातील मौजमजा कमी करून मुलांना या शाळांमध्ये पाठवण्याची धडपड करतात. पण पदरात काहीच पडत नाही याची जाणीव काही वर्षांनी होऊ लागते.

अशा अनेक बाबी आहेत. सर्व मराठी ,गुजराती, हिंदी शाळांमध्ये शिशुवर्गापासून इंग्लिश हा एक विषय शिकविला जातो. हल्ली बऱ्याच घरांमध्ये संगणक / मोबाईल फोन /केबल असते. अनेक इंग्लिश वाहिन्या असतात. त्यामुळे इंग्लिशचा बाऊ करण्याची गरज उरलेली नाही. तसेच मातृभाषा जर पक्की असेल तर मूल कालांतराने कोणतीही परकीभाषा थोड्याशा प्रयत्नाने सहज शिकू शकतो.

वरील मुद्द्यांचा विचार करता काही तुरळक अपवाद सोडले तर बाकी सर्व घरांमध्ये इंग्लिश माध्यमाचा हा संघर्ष सुरु असतो. खरेतर लहान मुलांना काय सोपे जाते याचा विचार झाला पाहिजे.ही काही आपल्या अस्मितेची लढाई नव्हे वा आपल्या हारजीतीचाही प्रश्न नव्हे. प्रश्न आहे तो कोवळ्या वयात मुलांवर इंग्लिश माध्यमाचे ओझे लादायचे का ? यावर आपण गंभीरपणे विचार करणार आहोत का नाही ?

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

सुशिक्षित आहेत तरी कोठे? 🤔 - जेट जगदीश.

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण! उच्चपदवीधर चांगले शिक्षित असूनही ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळून येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्वतावादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. 

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनून जाते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो व म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकुणातच अंधारयुगातच जगत आहे असे म्हनावे लागते. कारण आम्ही सोईचा इतिहास बनवायला लागलो आणि धर्माच्या चिकित्सा थांबवत नेल्या आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज तेसावरकर वा बाबासाहेब आंबेडकर यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे झाले आहे. चिकित्सा म्हणजे द्वेष असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणाऱ्या आणि टीकाकारांवर झुंडीने सरळ हल्ले चढवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यात घट्ट अडकलेले आहेत, आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्त्या मात्र त्याच आहेत.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला "पाखंडी" ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडून गेले आहे... पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्म आणि राजकारण वेगळे करून धर्मलंडांना (साक्षर अंधभक्तांसाठी टीप : शब्दकोशात या शब्दाचा अर्थ धर्ममार्तंड असा दिला आहे) प्रसंगी छळ सोसूनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले... विकसित झाले, आणि आपण मात्र अजूनही आपली जीवनातून राजकारणावर धर्माचा अंकुश ठेवल्यामुळे मागासच राहिलो आहोत. विचार तर कराल?

Monday, February 10, 2020

फाळणीचे खरे गुन्हेगार

फाळणीचे खरे गुन्हेगार - जगदीश काबरे.

अखंड भारताचे तुणतुणे वाजवणाऱ्या धर्मांध हिंदुत्ववाद्यांनो, खरा इतिहास जाणून घ्या.

अनेक हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की, गांधीजी हे भारताच्या  फाळणीला जबाबदार होते. हे त्यांना जर खरोखरच खरे वाटत असेल तर हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे अनेकदा आभारच मानले पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्यांना तेहतीस कोटी एकवा देव मानून त्यांची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! 
कसे ते पहा...

आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १४ टक्के आहे. तरीही हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा भारताची फाळणी झाली नसती तर, भारत-पाकिस्तान-बांगलादेश हे एकत्र असते. म्हणजे 'अखंड' भारत असता तर तेथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के झाली असती. आज १४ टक्के लोकांचा बाऊ करणाऱ्यांची त्यावेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.

अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टीत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रशासन, सरकारी व खाजगी नोकर्‍या, उद्योगधंदे, मिडीया आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा मिळतो आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणाऱ्या जातींकडे जातो. याउलट अखंड भारतात त्यांना देवळातील घंटाच मिळाली असती. शिवाय अखंड भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार फार जोरात झाला असता.

अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते.

तेंव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. हे त्यांच्या मठ्ठ मेंदूत शिरेल काय?म्हणून फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत की नाही? पण तसे करण्याऐवजी हे नतद्रष्ट संघोटे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय?

लखनौ करार मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना व राष्ट्रीय काँग्रेसचे लोकमान्य टिळक यांच्यात झाला. हा करार डिसेंबर १९१६ मध्ये झाला. या करारानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ व ज्या भागात अल्पसंख्य असतील तिथे संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी मान्यता देण्यात आली. हा करारच धर्माधारित फाळणीसाठी आधारभूत झाला असे समजले जाते. मग लोकमान्य टिळक यांनाही हिंदुत्ववादी संघटना फाळणीसाठी जबाबदार का धरत नाहीत?

खरेतर फाळणीसाठी बॅरीस्टर जीनांची मुस्लिम लीग आणि सावरकरांची हिंदुमहासभा यांनी आपल्या द्वेषी वक्तव्याने आणि तेढ माजवणाऱ्या कृत्यांनी देशाला दुंभगण्याचे रणशिंग फुंकले होते. त्याचाच  एक मोठा भाग म्हणजे जीनांनी अखंड भारतसाठी खुप जाचक अटी-शर्तीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात प्रामुख्याने...
१) अखंड भारताचा पहीला पंतप्रधान मुस्लिम असावा असे म्हटले होते. (अंखड भारतसाठी अंशत: मान्य ) 

२) शिक्षणात आणि नोकरीत मुस्लिमाँना ५०% आरक्षण पाहिजे. (अमान्य) 

३) मुस्लिमांसाठी ५०% राखीव मतदारसंघ पाहिजे. (अमान्य) 

अखंड भारतसाठी अट नं १ मान्य ही झाली असती, पण अट नं २ आणि ३ क्रमांकाच्या अटी गांधींना किंवा कॉंग्रेसला आजिबात मान्य नव्हत्या. कारण याच दोन्ही अटींमुळे भारतावर कायम मुस्लिम पंतप्रधान राहीला असता; जेणेकरून भारताला मुस्लिम देश बनविण्याचा बॅरिस्टर जीनांचा डाव सफल झाला असता. आणि इथल्या बहुसंख्य समाजावर प्रचंड अन्याय-अत्याचार झाला असता. ह्याचा दूरगामी विचार करून गांधींनी आणि कॉंग्रेसने बॅरिस्टर जीनांचा हा प्रस्ताव सपशेल धुडकावून फाळणीला मान्यता देवून भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचा विडा उचलला.

दुसरी गोष्ट मुस्लिमांसहित भारताच्या सर्वच धर्मातील रहिवाशांना सोबत घेऊनच भारत बनतो हे समजून घेतले पाहिजे. फाळणीसाठी जेवढी इस्लामी कट्टरता जबाबदार आहे तेवढीच हिंदुत्ववादी कट्टरतादेखील जबाबदार आहे. पुढेही भारताच्या अखंडतेला याच दोन्ही बाजूंच्या कट्टरतेकडून धोका संभवतो.

हे वाचल्यावर मुस्लिम लीगचे जिना आणि द्विराष्ट्र कल्पनेचे जनक सावरकर हेच कट्टर खरे फाळणीचे गुन्हेगार असूनही अजूनही तुम्ही गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार समजत असाल तर तुमच्यासारखे नतद्रष्ट तुम्हीच.