स्त्रीवादी चळवळ म्हणजे काय? - जगदीश काबरे.
स्त्रीवाद या शब्दाबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही स्त्रियाही आपण स्त्रीवादी नाही, असे सांगतात. स्त्रीवाद म्हणजे काय आहे आणि काय नाही, याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या तर स्त्रीवादी असल्याचे अभिमानाने सांगता येईल.
१) स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही. स्त्रियांना न्याय हवा आहे; पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करता येत नाही याची त्यांना जाणीव आहे. एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र नाही.
२) स्त्रीवाद पुरुषांना दोष देत नाही, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. पुरुषसत्ताकामुळे पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्त्री ही खालच्या स्तरावर आहे, आणि स्त्री हे
पुरुषाच्या भोगाचे स्थान आहे, अशी शिकवण पुरुषांच्या मनात बिंबवली जाते.
३) दोन वर्ग, दोन देश, दोन जाती, दोन धर्म या लढायांप्रमाणे स्त्री-पुरुष ही लढाई नाही. कारण अशा लढाईत एकाची हार व दुसऱ्याची जीत अपेक्षित नाही. इथे दोघांचे हितसंबंध एकच आहेत. कुटुंबातील सदस्यत्व व मुले यांच्या संबंधाने दोघांची कर्तव्ये सारखीच आहेत. म्हणून सत्तेचे हस्तांतर हा स्त्रीवादात मुद्दाच नाही. उलट, शांततापूर्ण सहअस्तित्व व सामंजस्य अधिक महत्त्वाचे आहे. परस्परांचा सन्मान राखून व समतेच्या पायावर आधारलेल्या नात्याने हे घडू शकते.
४) स्त्रियांना पुरुष व्हायचे नाही. स्त्रियांचे जे जे नैसर्गिक वैशिष्टय़ आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. स्त्रियांवर निसर्गाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्त्रिया नाकारत नाहीत. स्त्रिया व पुरुष यांच्यात शारीरिक भिन्नता असली तरी व्यक्ती म्हणून दोघांत समता नांदू शकते.
५) स्त्रीवाद हा आंदोलनातील वा लेखनातील काही स्त्रियांपुरता मर्यादित नाही. आणि केवळ 'स्त्रीवादी' या विशेषणापुरताही सीमित नाही. तळागाळातील स्त्रियांच्या स्तरापर्यंतचा त्याचा विस्तार आहे. स्त्रीवादाला अपेक्षित असलेला भगिनीभाव देश, काल, जाती, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे निर्देश करतो. स्त्रियांचे भावनिक, मानसिक, नैतिक, आर्थिक, भाषिक आणि अस्मितेसंबंधीचे प्रश्न जगात सगळीकडे सारखेच आहेत.
६) स्त्रीवादी म्हणजे कुटुंब मोडणाऱ्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मान्य असणाऱ्या, किंवा स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात नैराश्य आलेल्या स्त्रियांनी अंगीकारलेली विचारसरणी नव्हे. असे मानणे हा स्त्रीवादाचा अपप्रचार आहे. नवे कोणतेही विचार समजून घेण्यातील भीती यामागे आहे. कुटुंब व समाज यातील आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती पुरुषांना वाटते.
७) स्त्रीवाद हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करतो. त्यामुळे स्त्रीवाद ही जगातल्या प्रत्येक स्त्रीशी जोडली गेलेली कल्पना आहे असे गांधीजी म्हणत.
८) स्त्रीवादी विचारसरणी फक्त पाश्चात्य नव्हे. खरे तर आपली आजची जीवनशैलीच पाश्चात्त्य आहे. एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारणांचा एक प्रवाह स्त्रियांना ब्रिटिश महिलांप्रमाणे 'लेडी' बनवू इच्छिणाऱ्यांचा होता. आता तर जग इतके जवळ आले आहे, की प्रभावी विचारसरणीचे अनुकरण होणे सहज आहे. पण भारतीय संदर्भात हा पूर्णपणे पाश्चात्त्य विचार नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्राचार्य गोपाळ कृष्ण आगरकर, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, वि. का. राजवाडे आदींनी शतकापूर्वीपासून स्त्री-पुरुष समता व स्त्रीचे स्वातंत्र्य याबद्दल अतिशय उदारमतवादी विचारांची मांडणी केली आहे. ती आपण आचरणात आणली नाही, एवढेच.
९) स्त्रीवादाच्या कल्पना फक्त शहरी भागापुरत्या मर्यादित नाहीत. भारत हा आजही बहुसंख्य खेडय़ांचा देश आहे. ग्रामीण भागातील गरिबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, जातीची बंधने, परंपरा, चालीरीतींचे अंधानुकरण, अंधश्रद्धा यांच्या प्रभावामुळे स्त्रीवादी विचारसरणी सगळ्या स्त्रियांपर्यंत पोहोचायला अजून काही वर्षे जावी लागतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्यापासून स्त्री-हक्कांबद्दलची जाणीव वाढते आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपल्या आर्थिक सामर्थ्यांची जाण आली आहे. मुलींना शिकवण्याची धडपड दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण आणि लोकसाहित्यातून स्त्रियांनी पुरुषसत्ताकविरोधी मांडणी मोठय़ा प्रमाणावर केली आहे.
१०) एवंच स्त्रीवादी चळवळ हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा तो प्रयत्न आहे. म्हणजेच स्त्रीवाद हा पुरुष विरोधी नसून स्त्री-पुरुषात सामंजस्य निर्माण करणारी विचारधारा आहे.
No comments:
Post a Comment