Friday, April 17, 2020

'स्व'ची नव्याने ओळख

'स्व'ची नव्याने ओळख : -जेट जगदीश.

परवा बरेच दिवसांनी माझा डॉक्टर मित्र घरी आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतांना मी त्याला सहज विचारले, "सध्या नवीन काय वाचतो आहेस ?"
त्यावर तो चेहऱ्यावर भक्तीपूर्ण भाव आणून म्हणाला,"धार्मिक पुस्तकांचे वाचन."
मी: वेद वाचले असतीलच ना ?
तो: सगळे नाही, पण आयुर्वेद नक्की वाचलाय. कारण त्यामुळेच तर मी आयुर्वेदिक डॉक्टर झालो.
त्याचे हे उत्तर ऐकल्यावर मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला, आणि उघडपणे विचारले,"आपले वेद किती आणि कोणते, हे सांगशील का ?
त्यावर तो म्हणाला," अगदीच बाळबोध प्रश्न विचारालास... वेद चार आहेत... ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि आयुर्वेद!"
मी: धान्य आहे तुझी! अरे बाबा, आयुर्वेद ह्या शब्दात जरी 'वेद' असला तरी तो चार वेदातला नाही. चौथा वेद आहे सामवेद. बरे, ते जाऊ दे. लिंग पुराण आणि इतर पुराणे तर वाचली असशीलच.
तो: नाही. फक्त काही गोष्टी ऐकून आहे.
मी: म्हणजे वेद, पुराण या धार्मिक ग्रंथातील तुला फक्त सांगोवांगीची वा फेसबुक-व्हाट्सअँपवर जी अर्धवट ज्ञान पाजळणारी माहिती असते तेवढेच माहिती आहे तर... मग कोणत्या धार्मिक पुस्तकांचे वाचन करतोस ?
तो: संत साहित्य वाचतोय.
मी: वा,वा, मग संत तुकारामांचे अंधश्रध्देवर प्रहार करणारे अभंग वाचले असशीलच. तुकडोजी महाराजांची 'ग्रामगीता' आणि विनोबांची 'गीताई' सुद्धा वाचालीस की नाही ?  झालंच तर गाडगेबाबा तरी ???
तो: नाही रे...
मी: म्हणजे तू धार्मिक पुस्तके म्हणून फक्त पोथ्या वाचतो आहेस की काय ? ह्या सगळ्या पोथ्यात भारताड काल्पनिक गोष्टी, चमत्कार आणि कर्मकांडावर भर असतो. ब्राह्मणाला दान-दक्षिणा दिल्याने... त्यांना जेऊखाऊ घातल्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील असे अंधश्रद्धा पसरवणारे विचार या पोथ्यातून पसरवले जातात.मेंदू गहाण टाकणारी मानासिक गुलामगिरी निर्माण करतात या पोथ्या! 

बघ ना, नवनाथ कथासारच्या बाराव्या अध्यायात लिहिले आहे की, सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी वयाने बारा वर्षाची झाली तेव्हा तिचे रुप व शरीराचे देखणेपण बघून ब्रह्मदेव स्वत: कामाने व्याकूळ झाला व विचारांध होऊन तो सरस्वतीमागे पळू लागला. पळता पळता वीर्यपात झाला व ते वीर्य हिमाचलाचे जंगलातील एका हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबृद्ध नारायणाने प्रवेश केला.

गुरुचरित्रात लिहिले आहे की, जी स्त्री नवऱ्याच्या आधी जेवेल ती पुढच्या जन्मी घुबड होईल.(उलूक योनी जन्मती असे शब्द आहेत.) जी स्त्री नवऱ्याला उलटून बोलेल ती पुढच्या जन्मी कुत्री होईल. (श्वान योनी जन्मती.) याप्रमाणे स्त्रियांना उपभोग्य वस्तू व नवऱ्याच्या आधीन राहणारी गुलाम दाखवल्यामुळे स्त्रियांनी ही पोथी वाचू नये असा स्पष्ट आदेश दिला आहे. स्त्रिया जर शिकल्या तर पुरोहितांची ही मखलाशी उघड व्हायची भीती होती,त्यासाठी त्यांनी देवाधर्माच्या नावाखाली स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नाकारला. 

तसेच सत्यनारायणाच्या पोथीत तर कहर केला आहे. प्रसाद भक्षण केला नाही म्हणून संपत्तीने भरलेली नौका बुडाली आणि कलावतीचा पतीही मेला. नंतर आकाशवाणीनुसार साग्रसंगीत पूजा करून प्रसाद भक्षण केल्यावर बुडालेली नौका वर आली आणि पतीही जिवंत झाला. सध्या असल्या भाकड कथेवर शालेय पोरंही विश्वास ठेवत नाहीत, परंतू आपण मोठी माणसे मात्र पाण्यात बुडून मेलेला जिवंत होतो, यावर मनोभावे विश्वास ठेवतो.

नवनाथ कथासार, गुरुचरित्र, सत्यनारायणाची पोथी यासारख्या पोथ्या वाचल्यावर लक्षात येतं की, ही सगळी पोथ्या-पुराणे भटाबामणांनी (पुरोहितांनी) आणि किर्तनकारांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी देवाधर्माच्या नावाने भीती घालून... सामान्य माणसाला मानसिक गुलाम बनवून शोषण करण्यासाठी निर्माण केलेली आहेत.
तो: तू म्हणतोयस ते पटतंय, पण लहानपणापासून आमच्यावर ठाकूनठोकून असे संस्कार केल्यामुळे आमची गत 'कळतंय पण वळत नाही' अशी झाली आहे.

मित्रांनो, अशी गत आहे आजच्या उच्चशिक्षित इंजिनियर, डॉक्टरांची! ह्यांना सुशिक्षित तरी कसे म्हणावे ? हे तर फक्त पुस्तकी साक्षर! म्हणूनच असल्या भाकड कथांची डोळे मिटून आणि डोके गहाण ठेवून पारायणे करत बसतात. अशा तथाकथित धार्मिक वाचनामुळे त्यांना मग 'OMG' सिनेमाचा उथळ शेवट आवडतो, पण 'पिके' सिनेमावर मात्र टीका करावीशी वाटते. 

शेवटी मी त्या मित्राला म्हटले की, 'तू डॉक्टर आहेस तुला सजीवांचा जन्म कसा होतो याचे ज्ञान आहे. उतक्रान्तीवाद समजून घेण्यासाठी चार्ल्स डार्विनचा 'origin of 'species' हा ग्रंथ वाच. आगरकर,लोकहितवादी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, पां. वा. काणे, प्रबोधनकार ठाकरे अशा समाजसुधारकांची पुस्तके वाच.  तुझ्यासारखी माणसे परलोकातील अध्यात्माच्या विचारात गढून इहलोकात आनंदाने जगायचे विसरूनच जातात. आणि मग 'हे जग दु:खाचा सागर आहे' असे म्हणत उसासे टाकत बसतात. बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करायला लाग, आणि बदलायला लाग. 

सृष्टीचा नियमच जर 'सतत बदल होणे' हा असेल तर आपणच जुन्या टाकाऊ गोष्टींना का चिकटून राहायचे ? झऱ्याचं वहात पाणी जसं शुद्ध असतं तसंच नवविचारांनी भारलेलं मन ही शुद्धच असतं. मग आपल्या शरीरातून एक उत्साहाचा झरा वाहू लागतो. बदलाची सुरुवात नेहमीच कठिण असते, पण एकदा का बदल झाला की सगळंच सोपं होऊन जातं. स्वतःशीच झगडल्याशिवाय बदल होणार नाही... आणि स्वतःशी झगडण्यासाठी विचारच बळ पुरवतील. अज्ञातात विचारपूर्वक उडी मारली तरच अज्ञात हे अज्ञात न राहाता ज्ञात होते, मग नवीन विश्व दिसू लागते. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या विचारसारणीमुळेच आजवरचे अज्ञात विश्व शास्त्रज्ञानी ज्ञात केले आहे, आणि आपल्यालाही कोणत्या मार्गाने जायचे हे दाखवले आहे. तू पाहिलं पाऊल तर टाक... 'तुझ्यातला नवा तू' तुला बोलावतो आहे...

No comments: