Thursday, July 23, 2020

नास्तिक कोण?

नास्तिक कोण? JK
1) नास्तिक म्हणजे फक्त देव न मानणारा किंवा जातीधर्मावर टीका करणारा असे नसून प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून पाहणारा आणि स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करून योग्य अयोग्य ठरवणारा असा असतो...
2) नास्तिक म्हणजे अरसिक असा अर्थ नसून नास्तिक सुद्धा निसर्गावर, माणसावर तितकेच प्रेम करतात, जितके एखादा सर्वसामान्य किंवा आस्तिक करतो...
3) कुठल्याही जाती धर्मातील अनिष्ट किंवा चुकीच्या प्रथांवर टीका करणे म्हणजे त्या जातीधर्माच्या माणसांवर टीका नाही हा मतितार्थ समजून घेणे आवश्यक आहे...
4) कुठलाही समाज हा माणसांनी बनतो, त्याचाच समूह होऊन पुढे देश... राष्ट्र बनते. म्हणून व्यक्तिगत स्वतःमध्ये बदल करताना  तो बदल स्वतःपुरता न राहता आपल्या कुटुंब आणि समाजातही तो परावर्तित झाला पाहीजे तरच आदर्श आणि समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्माण होईल...

एक राष्ट्र धर्मनिरपेक्षतेची कास सोडून धर्मांधतेकडे झुकले तर त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर समाज, आणि देशही धार्मिक कट्टरतेकडे झुकून एकंदरच जागतिक समाजाच नुकसान होऊ शकतं. म्हणून विचारी आणि तटस्थ लोकांनी जगातच एकंदर धर्म, वंश, रंगावर आधारित होणाऱ्या ध्रुवीकरणाला विरोध करायला हवा.

तात्पर्य: स्वतः तील बदल हे स्वतः पुरते न राहता ते समाजात परावर्तित करणे महत्वाचे आहे... आणि जातीधर्मावरील टीका कितीही प्रखर वाटली तरी ती वैयक्तिक न घेता त्या धर्मातील अनिष्ट गोष्टीवर असल्याचे मानले पाहिजे....

एखाद्या चांगल्या कापडावर पडलेली डाग धुताना त्या कापडावर पण आघात होणे स्वाभाविक आहे, ते घासले जाणे स्वाभाविक आहे, पण म्हणून त्या कपड्यावर आघात का करताय असा आक्षेप आपण घेऊ शकतो का? नाही ना? कारण त्यावरील घाण साफ करताना त्या कपड्यावर आघात करण्याचा आपला उद्देश नसतो, तो डाग निघून जाणे हा असतो. त्याच पद्धतीने समाजात सुधारणा व्हावे आणि त्याने मानवतेकडे वाटचाल सुरू करावी कुठलाही भेदभाव न करता माणसाशी माणसासारखे वागावे असे विचार रुजवण्यासाठी नास्तिक माणसे समाजातील कुप्रथा, रूढी, परंपरा आणि कर्मकांडावर टीका करत असतात.

No comments: