विज्ञान आणि अध्यात्म. (^m^)(^j^)(मनोगते)
मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. कृत्रिम अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारतोच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा ह्या वृक्षावर फुटल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगूळ उगवले आहे. ते बांडगूळ आहे अध्यात्माचे. नवल म्हणजे अनेक लोकांचे लक्ष त्या बांडगुळाकडेच वेधले आहे.
ह्याचे कारण आपला समाज एकूणच स्थितिशील आहे. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसाबरोबरच एक प्रकारचा बौद्धिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल चिंतन करणे, तर्काचा आधार घेऊन चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, स्वबुद्धीने विचार करणे इत्यादी बौद्धिक व वैचारिक ' क्रियां' चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. आणि म्हणूनच तो विज्ञानाच्या खडतर पण योग्य गंतव्याकडे नेणार्या मार्गाऐवजी काल्पनिक आणि फसव्या पण सोप्या व मोहक अशा मार्गाकडे वळतो. येथे त्याला आकर्षक आणि रंगीबेरंगी शब्दफुलांचे ताटवे दिसतात. त्यांनाच तो भुलतो व त्याच मार्गावर रेंगाळत रहातो. सत्य समोर उभे करणार्या विज्ञानाकडे मात्र पाठ फिरवतो. ज्ञानापेक्षा अज्ञानातच सुख वाटणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, स्पष्टतेऐवजी धूसरतेचे, गूढतेचे आकर्षण असणे हे भक्तांच्या जगतातील फार मोठे मायाजाल आहे.
विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोत काही मूलभूत फरक आहेत. ते असे...
1) जाणीव, निरीक्षण, चिंतन, प्रायोगिक परीक्षण, गणितीय पडताळणी इत्यादी सोपस्कारांमधून पार पडल्यानंतरच एखाद्या विचाराला विज्ञानात मान्यता मिळते. अध्यात्मात मात्र कल्पनेचे वारू चौखूर उधळत असतात. त्यामुळे वेगवेगळे तत्त्ववेत्ते वेगवेगळे-कित्येकदा परस्परविरुद्धही- विचार मांडतात.
2) निखळ सत्य हेच विज्ञानाचे गन्तव्य असते तर अध्यात्म, कल्पनेलाच सत्य मानते.
3) विज्ञानाला शब्दप्रामाण्य मुळीच मान्य नाही. एखादा विचार कितीही मोठ्या व्यक्तीने मांडलेला असो वा कोणत्याही ग्रंथात दिलेला असो, ठरावीक प्रक्रियेतून पार पडल्याशिवाय वैज्ञानिक जगात त्याला मान्यता मिळत नाही. अध्यात्माचे गाडे मात्र व्यक्तिमाहात्म्य वा ग्रंथमाहात्म्य यांचे संदर्भ घेतल्यावाचून पुढे सरकतच नाही.
4) विज्ञान प्रत्येक बाबतीत पुरावा मागते. उलट, अध्यात्म आणि पुरावा यांचा छत्तीसाचा आकडा आहे.' बाबावाक्यम् प्रमाणम् 'हाच तेथे मूलमंत्र आहे.
5) विज्ञानात नेमके शब्द वापरले जातात. शब्दांचा फापटपसारा नसतो. कारण महत्त्व असते ते सिद्धांताला. शब्द हे माध्यम असते. उलट अध्यात्मात शब्दांचाच फुलोरा अफाट असतो. लोकांना ठोस असे देण्यासारखे काही नसल्यामुळे त्यांना शब्दांच्या भूलभुलैयातून फिरवून संभ्रमित केले जाते. शब्दावडंबराला अक्षरश: काडीचा आधार नसतो.
6) विज्ञानात शब्द हे केवळ साधन आहे तर अध्यात्मात शब्द हेच साध्य आहे. सबब ते काल्पनिक जगाची अनुभूती घेत शाब्दिक फुलोऱ्यानी फुलणारे शब्दप्रमाण्यवादी आहे, तर विज्ञान पुरावा तेवढा विश्वास मानणारे प्रमाणवादी आहे.
No comments:
Post a Comment