_वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच_
(^m^) (^j^) (मनोगते)
अंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्व म्हणजे आपल्या ३३ कोटी देवांच्या राहण्याची जागा, एवढीच अंतराळ या विषयातील आपली समज भाबडी आणि मूर्खपणाची असल्याने या क्षेत्रात घडणाऱ्या कुठल्याही घडामोडींशी बहुतांश भारतीयांना काही देणंघेणं नसतं. त्यामुळेच भारताने जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल) अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं काय महत्त्व आहे, हेसुद्धा अनेकांना माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. राजकारण्यांच्या भानगडी, सिनेस्टारची लफडी आणि क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चर्चा हा या देशाचा कायमस्वरूपी उद्योग असल्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन माहिती घेण्याची तसदी तशीही येथे कोणी घेत नाही. वैज्ञानिक प्रगतीचा लौकिक आयुष्य सुखकर करण्यासाठी पुरेपूर फायदा घ्यायचा. मात्र आपल्या विचारपद्धतीत विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टिकोनाला चुकूनही स्थान मिळू द्यायचं नाही, हे आपलं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य.
अशा वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय ‘निरुत्साही’ असलेल्या या देशातील वैज्ञानिक मात्र एका निष्ठेने व सातत्याने आपलं काम करत असतात. पण तेही भारतीय मानसिकतेत वाढल्यामुळे स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेतानाही इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन सारखे इस्रोच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेअगोदर प्रक्षेपण यानाची प्रतिकृती तिरूपती बालाजीच्या चरणी वाहतात आणि प्रार्थना करतात. बालाजीमुळे इस्रोच्या मोहिमा यशस्वी होतात, असं त्यांना मनोभावे वाटतं. आता तिरूपतीचा बालाजीच जर इस्रोची मोहीम यशस्वी करणार असेल, तर इस्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची काय गरज? मोहीम यशस्वी झाली, तर बालाजींनी केली मग गेल्या दोनवेळा अपयश आलं, ते कोणामुळं आलं? अर्थात असे प्रश्न आपल्याकडे कोणालाही पडणार नाही. हे असं वागणं हे त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, असं सर्मथन केलं जाईल. यात काहीही चुकीचं नाही, त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, असं ठासून सांगितलं जाईल.
इतर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने हे केलं असतं, तर समजून घेता आलं असतं, पण अंतराळ संशोधन संस्थेचा प्रमुख हे असं करतो, याचं मोठं आश्चर्य वाटतं. अर्थात, यातही नवल काही नाही. असं करणारे आणि असा विश्वास बाळगणारे राधाकृष्णन हे काही पहिले शास्त्रज्ञ नाहीत. ज्यांचा आपण सारेच आदर करतो ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रपर पुस्तकात अनेकदा अज्ञात शक्तीचे आभार मानले आहेत. ही अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, विज्ञानविरोधी असली तरी तो आपल्या संस्काराचाच भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा अविभाज्य घटक आहे, हे येथे समजून घ्यावे लागते.
सर्वसामान्य भारतीय माणूस असो वा शास्त्रज्ञ, त्याने आपल्या मेंदूचे दोन टप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्याने तो विज्ञान शिकतो. प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो. त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो. वैज्ञानिक म्हणून मान्यता प्राप्त करतो. इस्रोचा प्रमुख होतो. अंतराळ संशोधन संस्थेत मानाचं पद प्राप्त करतो. त्यावर पोट भरतो. मानसन्मान मिळवितो. राष्ट्रपतीही होतो. मात्र ज्यामुळे तो हे सारं मिळवितो त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो मेंदूच्या दुसऱ्या कप्प्यात मात्र अजिबात शिरकाव करू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनाचं भाग बनविणे त्याला आवश्यक वाटत नाही. याचं कारण म्हणजे लहान असतानापासून त्याच्यावर झालेले संस्कार!
‘विज्ञान जेथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. त्या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाही.’ वगैरे...वगैरे...!
राधाकृष्णन, डॉ. कलामांसारखे इतरही शास्त्रज्ञ असे का वागतात, याचं उत्तर लहणपणापासून पालकांनी मनावर बिंबवलेल्या कर्मकांडी संस्कारात आहे. उत्तर जरी मिळत असले तरी यातून लोकांमध्ये मेसेज मात्र अतिशय चुकीचा जातो. म्हणूनच निरक्षर सोडाच पण शिक्षित लोकही बरेचदा 'एवढे मोठे शास्त्रज्ञ, तेसुद्धा पाहा, सारं श्रेय देवाला देतात.' असे म्हणत आणि अशी उदाहरणं नवीन पिढीसमोर देत असतात. आपल्या वागणुकीतून वैज्ञानिक विचारांचा, तत्त्वज्ञानाचा अपमान होतोय, हे मात्र ना शास्त्रज्ञांच्या गावी असतं ना सामान्य लोकांच्याही.
देव, दैव, नशीब, नियती, कर्मकांडाला प्राधान्य देणाऱ्या देशात हे असंच व्हायचं. आपण मात्र वैज्ञानिक जगतातील एकच म्हण लक्षात ठेवायची. ती म्हणजे, *‘न्यूटन जे सिद्ध करतो, तेवढंच महत्त्वाचं. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं.’*
No comments:
Post a Comment