Thursday, March 5, 2020

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

सुशिक्षित आहेत तरी कोठे? 🤔 - जेट जगदीश.

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण! उच्चपदवीधर चांगले शिक्षित असूनही ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळून येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्वतावादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. 

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनून जाते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो व म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकुणातच अंधारयुगातच जगत आहे असे म्हनावे लागते. कारण आम्ही सोईचा इतिहास बनवायला लागलो आणि धर्माच्या चिकित्सा थांबवत नेल्या आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज तेसावरकर वा बाबासाहेब आंबेडकर यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे झाले आहे. चिकित्सा म्हणजे द्वेष असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणाऱ्या आणि टीकाकारांवर झुंडीने सरळ हल्ले चढवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यात घट्ट अडकलेले आहेत, आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्त्या मात्र त्याच आहेत.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला "पाखंडी" ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडून गेले आहे... पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्म आणि राजकारण वेगळे करून धर्मलंडांना (साक्षर अंधभक्तांसाठी टीप : शब्दकोशात या शब्दाचा अर्थ धर्ममार्तंड असा दिला आहे) प्रसंगी छळ सोसूनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले... विकसित झाले, आणि आपण मात्र अजूनही आपली जीवनातून राजकारणावर धर्माचा अंकुश ठेवल्यामुळे मागासच राहिलो आहोत. विचार तर कराल?

No comments: