Monday, February 10, 2020

फाळणीचे खरे गुन्हेगार

फाळणीचे खरे गुन्हेगार - जगदीश काबरे.

अखंड भारताचे तुणतुणे वाजवणाऱ्या धर्मांध हिंदुत्ववाद्यांनो, खरा इतिहास जाणून घ्या.

अनेक हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की, गांधीजी हे भारताच्या  फाळणीला जबाबदार होते. हे त्यांना जर खरोखरच खरे वाटत असेल तर हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे अनेकदा आभारच मानले पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्यांना तेहतीस कोटी एकवा देव मानून त्यांची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! 
कसे ते पहा...

आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १४ टक्के आहे. तरीही हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा भारताची फाळणी झाली नसती तर, भारत-पाकिस्तान-बांगलादेश हे एकत्र असते. म्हणजे 'अखंड' भारत असता तर तेथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के झाली असती. आज १४ टक्के लोकांचा बाऊ करणाऱ्यांची त्यावेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.

अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टीत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रशासन, सरकारी व खाजगी नोकर्‍या, उद्योगधंदे, मिडीया आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा मिळतो आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणाऱ्या जातींकडे जातो. याउलट अखंड भारतात त्यांना देवळातील घंटाच मिळाली असती. शिवाय अखंड भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार फार जोरात झाला असता.

अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते.

तेंव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. हे त्यांच्या मठ्ठ मेंदूत शिरेल काय?म्हणून फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत की नाही? पण तसे करण्याऐवजी हे नतद्रष्ट संघोटे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय?

लखनौ करार मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना व राष्ट्रीय काँग्रेसचे लोकमान्य टिळक यांच्यात झाला. हा करार डिसेंबर १९१६ मध्ये झाला. या करारानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ व ज्या भागात अल्पसंख्य असतील तिथे संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी मान्यता देण्यात आली. हा करारच धर्माधारित फाळणीसाठी आधारभूत झाला असे समजले जाते. मग लोकमान्य टिळक यांनाही हिंदुत्ववादी संघटना फाळणीसाठी जबाबदार का धरत नाहीत?

खरेतर फाळणीसाठी बॅरीस्टर जीनांची मुस्लिम लीग आणि सावरकरांची हिंदुमहासभा यांनी आपल्या द्वेषी वक्तव्याने आणि तेढ माजवणाऱ्या कृत्यांनी देशाला दुंभगण्याचे रणशिंग फुंकले होते. त्याचाच  एक मोठा भाग म्हणजे जीनांनी अखंड भारतसाठी खुप जाचक अटी-शर्तीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात प्रामुख्याने...
१) अखंड भारताचा पहीला पंतप्रधान मुस्लिम असावा असे म्हटले होते. (अंखड भारतसाठी अंशत: मान्य ) 

२) शिक्षणात आणि नोकरीत मुस्लिमाँना ५०% आरक्षण पाहिजे. (अमान्य) 

३) मुस्लिमांसाठी ५०% राखीव मतदारसंघ पाहिजे. (अमान्य) 

अखंड भारतसाठी अट नं १ मान्य ही झाली असती, पण अट नं २ आणि ३ क्रमांकाच्या अटी गांधींना किंवा कॉंग्रेसला आजिबात मान्य नव्हत्या. कारण याच दोन्ही अटींमुळे भारतावर कायम मुस्लिम पंतप्रधान राहीला असता; जेणेकरून भारताला मुस्लिम देश बनविण्याचा बॅरिस्टर जीनांचा डाव सफल झाला असता. आणि इथल्या बहुसंख्य समाजावर प्रचंड अन्याय-अत्याचार झाला असता. ह्याचा दूरगामी विचार करून गांधींनी आणि कॉंग्रेसने बॅरिस्टर जीनांचा हा प्रस्ताव सपशेल धुडकावून फाळणीला मान्यता देवून भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचा विडा उचलला.

दुसरी गोष्ट मुस्लिमांसहित भारताच्या सर्वच धर्मातील रहिवाशांना सोबत घेऊनच भारत बनतो हे समजून घेतले पाहिजे. फाळणीसाठी जेवढी इस्लामी कट्टरता जबाबदार आहे तेवढीच हिंदुत्ववादी कट्टरतादेखील जबाबदार आहे. पुढेही भारताच्या अखंडतेला याच दोन्ही बाजूंच्या कट्टरतेकडून धोका संभवतो.

हे वाचल्यावर मुस्लिम लीगचे जिना आणि द्विराष्ट्र कल्पनेचे जनक सावरकर हेच कट्टर खरे फाळणीचे गुन्हेगार असूनही अजूनही तुम्ही गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार समजत असाल तर तुमच्यासारखे नतद्रष्ट तुम्हीच.

No comments: