Saturday, March 14, 2020

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - - जेट जगदीश.

विज्ञान ही संकल्पना नसून निसर्गातील गुढे उकलण्याची आजपर्यंत मानवाला सापडलेली सर्वात उत्तम शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे विज्ञान हे निसर्गनियम शोधण्याचे मानवाला विचारांती मिळालेले एक साधन आहे... संकल्पना नव्हे.

एखाद्या वस्तूचे अस्तित्व निसर्गनियमाच्या पुराव्याच्या आणि तर्काच्या आधारे स्वीकारणे ही श्रद्घा नसून ते प्रमाणित ज्ञान असते, म्हणून वैज्ञानिक सत्याचा स्वीकार हे प्रमाणित ज्ञान आहे; श्रद्घा नव्हे. विज्ञान सतत बदलते असल्यामुळे वैज्ञानिक गृहितकेही बदलू शकतात. म्हणजेच विज्ञान हे नित्यनूतन असते, तर श्रद्धा आणि परंपरा ह्या धार्मिक बेड्या असतात, ज्या लोकांना विचार करण्यापासून परावृत्त करतात, आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', या गतानुगतिक मानसिकतेत जखडून ठेवतात. 

श्रद्घा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतील भेद पुढीलप्रमाणे सांगता येईल... 

(१) वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. 
(२) असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. 
(३) वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
(४) वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
(५) म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.

याउलट..........

(१) जेव्हा असत्याचा किंवा नसलेल्या अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो बौद्घिक स्वीकार नसतो, तर भावनिक इच्छाशक्तीचा भाग असतो. ती प्रश्न न विचारणारी निष्ठा असते. 
(२) श्रद्घेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. 
(३) श्रद्घेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात.
(४) श्रध्देय माणूस धार्मिक, नैतिक जीवनव्यवहारासाठी धर्माने आखून दिलेली आदरणीय तत्त्वे वा अस्तित्वे निष्ठेने स्वीकारतो.
(५) म्हणूनच श्रध्देय माणूस नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत आपल्या दोषांवर इतरांना दोषी धरत पांघरूण घालत असतो.

इंद्रियगम्य पुरावा आणि त्यावर आधारित तर्क यांनी प्रमाणित झालेली धारणा स्वीकारणे म्हणजे विवेक, असा विवेकवादी किंवा बुद्घिवादी सिद्घांत आहे. त्यानुसार केवळ वैज्ञानिक उपपत्तीच स्वीकारार्ह ठरतात आणि धार्मिक श्रद्घा स्वीकारणे हे तत्त्वत: अविवेकाचे, बुद्घिहीनतेचे लक्षण मानावे लागते. या दृष्टीने *सर्व धार्मिक श्रद्घा अंधश्रद्घा आहेत* म्हणून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी श्रद्धा आणि परंपरा यांंना टोकरत रहाणे हा बुद्धिवाद्यांचा कार्यकम ठरतो.

श्रद्घा ही संकल्पना लौकिक व्यवहारात आदर, निष्ठा, पूज्यभाव, बांधीलकी, इमानीपणा, भरवसा, विश्वास इ. व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरली जाते. श्रद्घेचा हा दुसरा अर्थ  म्हणजेच ‘ ईश्वर, प्रेषित, धर्मसंस्थापक, साक्षात्कारी व्यक्ती, शास्त्रग्रंथ, गुरु इत्यादींच्या वचनांवर दृढ विश्वास म्हणजेच आप्तवचनाचा, शब्दप्रामाण्याचा स्वीकार होय. धार्मिक समाजाची बांधणी याच श्रद्घेतून होत असते. हिंदू , बौद्घ, जैन, शीख, ज्यू , पारशी, क्रिस्ती, इस्लाम इ. सर्व धार्मिक समाज आणि पंथोपपंथ अशाच समान श्रद्घेने बांधलेले आहेत. 

बालपणापासून होणाऱ्या धार्मिक संस्कारांतून या श्रद्घा व्यक्तिच्या जीवनात मूळ धरतात आणि त्या तिच्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. या अर्थाने सर्व व्यक्ती श्रद्घामय असतात. आणि त्याचमुळे श्रद्धेय माणूस सतत चुकीच्या परंपरांचे समर्थन करत असतो. पण जसजशी व्यक्तीची वैचारिक क्षमता वाढत जाते तसतसे त्याला धार्मिक कर्मकांडातील फोलपणा डाचू लागतो. धर्माचे पोकळ तत्वज्ञान हे  मुठभरांच्या फायद्यासाठी सामान्यांचे शोषण करण्याचे हत्यार बनले आहे, हे त्याला कळू लागते. मग तो त्याविरोधात निडरपणे आवाज उठवून बुद्धिमांद्य झालेल्या समाजाला जागे करण्याच्या  प्रयत्नास लागतो. म्हणूनच हे ज्यांना जाणवले अशा आगरकर, हिंदुधर्मातील कर्मकांडांवर घणाघाती प्रहार करणारे समाजवादी विचारांचे  विवेकानंद, विज्ञाननिष्ठ सावरकर, र. धो. कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत श्रद्धा आणि परंपरांना टोकरत राहून समाजसुधारणा करण्याचे व्रत अंगिकारले होते. 

तेव्हा श्रद्धा आणि परंपरांना टोकरत बसणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे काय या प्रश्नाचे उत्तर *होय* असेच आहे. अर्थात हे अस्मिता गोंजारणाऱ्या धर्मांध आणि अंधभक्तांना पचणे कठीण असते म्हणून ते असे वरवर संयुक्तिक वाटणारे असंयुक्तिक  प्रश्न विचारत असतात.

No comments: