विरोधातूनच विकास होतो - जेट जगदीश.
जेव्हा प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजात काही करायचं असतं तेव्हा समाजाकडून विरोध हा होतोच, आणि अंधभक्त प्रवाहपतीत मेंढरांच्या भावना दुखावल्या जातातच. त्यामुळे समाज माध्यमातून नकारात्मक टीका-टिप्पणी होणे... राग व्यक्त होणे स्वाभाविक असते. पण भावना दुखावल्याशिवाय केव्हाही समाज वा धर्म सुधारणा होऊ शकत नाहीत, हेही तितकेच खरे.
काहीतरी वेगळं करू पाहणारी माणसं ही नेहमी मुठभरच असतात. ते आपल्या विचारांशी प्रामाणिक असल्यामुळे इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. म्हणून ते अंधभक्तांच्या भावना दुखावल्याच्या कांगावखोरपणाला भीक न घालता ठामपणे आपला विचार मांडत रहातात. परिणामी जी परिघावरील विचारी माणसे असतात ती नक्कीच विचार समजून घेत बदलत असतात, तर विचारांना घाबरून पाळणारे... परंपरेच्या अस्मितेला कुरवळणारे जे अंधभक्त असतात ते भावना दुखावल्याची कोल्हेकुई सुरू करतात. तेव्हा ज्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांनी ह्या न बदलण्याचा वसा घेतलेल्या सांभावितांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करून जे बदलण्याच्या प्रक्रियेत आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून सक्षमपणे विवेकी विचारांची बीजे पेरत राहिले पाहिजे. चुकीच्या प्रथा-परंपरांवर बोलून त्या बंद होण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेत त्यांना आणले पाहिजे.
वैचारिक बीजे पेरतांना दहातील एक माणूस जरी बदलला तरी समाजात मोठी सुधारणा होत असते, हे लक्षात ठेवले म्हणजे हे काम पिढ्यांच्या परिमाणातच मोजता येते याचे भान येते. त्यामुळे स्थितीशील अंधभक्तांच्या विरोधाला सामोरे जायचे बळ प्राप्त होते. म्हणून कोणत्याही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी आजची सामाजिक बजबजपुरी पाहून निराश न होता खंबीरपणे काम करत राहणे आवश्यक आहे. कारण विरोधातूनच विकास होतो हे गेल्या 150 वर्षातील सुधारकांनी दाखवून दिल्याचा इतिहास आहे.
No comments:
Post a Comment