Sunday, September 6, 2020

आनंदी जीवन जगण्यासाठी

आनंदी जीवन जगण्यासाठी – जेट जगदीश

आपण एकटे असताना विविध प्रकारचे विचार करत असतो. या विचारांची वर्गवारी केली तर आपल्या लक्षात येईल की, आपण सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त करत असतो. म्हणजे असे की, कोणी प्रेमात असेल... आनंदात असेल तर आपल्याला असे वाटते की, हे सगळे त्याचे वरवरचे आहे... तो खरा मनातून दु:खी असला पाहिजे. कारण आपण आयुष्यात नेहमी दुःखाला कुरवाळण्यास शिकलेलो असतो. आपल्या अनेक चित्रपटांमध्येसुद्धा नकारात्मकतेचे उदात्तीकरण केलेले असते, आणि सत्याचा फक्त शेवटी अचानक विजय झालेला दाखवलेला असतो.

प्रत्यक्ष जगत असतानाही आपल्याला अनेकांकडून वाईट अनुभव आलेले असतात. तेव्हा त्याच गोष्टी आपल्या डोक्यात जास्त ठळकपणे लक्षात राहतात; पण कोणीही आपल्यासाठी काही चांगले केले असेल तर ते मात्र अत्यंत क्वचित लक्षात राहते. त्यातही गंमत अशी आहे की, एखाद्या माणसाने आपल्याला खूपदा मदत केली असेल आणि एका वेळेला त्याच्या काही अडचणीमुळे जर त्याने मदत केली नाही तर मात्र तो माणूस आपल्या मनातून उतरतो. म्हणजे त्याने एवढ्यावेळा आपली मदत केली ते आपण लक्षात न घेता त्याने एखाद वेळेस आपल्याला मदत केली नाही म्हणून आपण त्याला लगेच अप्पलपोटा समजायला लागतो. यालाच नकारात्मक विचार करणे म्हणतात. अशा नकारात्मकतेतूनच आपण जगत राहिल्यामुळे आपल्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असतात. नकारात्मक विचार याचा अर्थ कोणावर टीका करणे... रीतीभातींची, प्रथा परंपरांची चिकित्सा करणे असा होत नाही होत किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर टीका करणे करणे म्हणजे नकारात्मक विचार असे नाही. एखाद्या धर्मातील अंधश्रद्धांवर कठोर शब्दात प्रहार करणे म्हणजे त्या देशाचा त्या धर्माचा द्वेष करणे असेही नाही; तर नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या घटनेविषयी चुकीच्या पद्धतीने विचार करणे... एखाद्या रीतिविषयी चुकीच्या पद्धतीने विचार करणे होय. 

खरे तर कोणत्याही गोष्टीतील वा घटनेतील दोषदिग्दर्शन करणे म्हणजे सकारात्मकतेकडे पाऊल टाकणे होय. कारण त्या दोषांचे जेव्हा आपल्याला ज्ञान होते तेव्हा आपण परखड आत्मपरीक्षण करायला लागतो आणि त्यातून आपल्याला ते दोष नेमके काय आहेत हे कळायला लागते. मगच आपण त्यांचे निराकरण करायला लागतो. असे करणे हे सकारात्मकच नाही काय? 

नकारात्मक विचार करणे हे एकवेळ सोपे आहे पण सकारात्मक विचार करण्यासाठी मात्र आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्याला स्वतःची एकटे असताना विचारांची काही दिशा ठरवावी लागते. असे सकारात्मक विचार नुसती पुस्तके वाचून येतील असे समाजणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण त्यासाठी आपल्यालाच काही प्रयत्न करावे लागतात. वाचनामुळे एक वेळ दिशा कळेल, पण प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. ते प्रयत्न कसे करावेत यासाठी अनेक विचारवंताने वेगवेगळे विचार मांडले आहेत पण त्याचबरोबर माझ्यासारख्या सामान्य माणसाने स्वअनुभवातून एक पद्धत तयार केली आहे. ही पद्धत मला माझ्या मुलाने शिकवली आहे. ती वरवर पाहता सोपी वाटली तरी आपण जेव्हा प्रत्यक्ष करायला लागू तेव्हा आपल्याला  तेवढे सोपे नाही हे कळू लागेल. 

आपण एवढेच करायचे की, दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीत किंवा फोन डायरीमध्ये दिवसभरातील पाच गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. मग त्या किती का साध्या असेनात. याचा अर्थ तुमच्या मनात येणारे सकारात्मक विचार लिहून काढायचे. जसे की मी आज दिवसभरात कोणाशीही तुच्छतेने बोललो नाही म्हणून मी स्वतःशीच कृतज्ञ आहे. अगदी तत्कालिक विचार करायचा झाला तर, मी अजूनही करोनामुक्त आहे म्हणून मी माझ्या प्रतिकारशक्तीशी कृतज्ञ आहे. इ. अशाप्रकारे दररोज पाच गोष्टी लिहून त्याच विचाराने झोपल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते आणि मेंदू सकारात्मक पद्धतीने विचार करू लागतो. Thought is thing या पद्धतीने आपण त्या विचाराने कृती करू लागतो. आपल्या विचारांचा परिणाम म्हणजे ही कृती असते. आपण सकारात्मक विचार केल्यावर आपली ऊर्जाही चांगल्या कामासाठी वापरली जाते. येथे आपण हे लक्षात ठेवायला हवे की, वैज्ञानिक दृष्ट्या ऊर्जा कधीही सकारात्मक आणि नकारात्मक नसते. कारण ती एक भौतिक गुणधर्मयुक्त राशी आहे. विचार भावनांशी निगडित असल्यामुळे ते मात्र सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. त्यामुळे आपण त्या दिशेने आपली ऊर्जा वापरत असतो. अशाप्रकारे सकारात्मक विचार करायची सवय लागल्यामुळे आपल्या लक्षात येते की, आपल्याला जीवनाने भरपूर दिले आहे, ते कसे जगायचे हे आपण विसरून गेलो होतो. हे लक्षात आल्यावर आपणच आपल्याला पुन्हा नव्याने गवसू लागतो.

पण पाच कृतज्ञतापूर्ण गोष्टी लिहिताना सुरुवातीलाच आपल्या लक्षात येते की, आपल्या डोक्यात नकारात्मक गोष्टीच जास्त येत आहेत. त्यामुळे सकारात्मक पाच गोष्टी मिळणे कठीण होत आहे. म्हणजे असे की, माझ्या डोक्यात लोकांबद्दल तक्रारीच जास्त येतात किंवा मला आयुष्यात माझ्या लायकीप्रमाणे मिळाले नाही असे वाटून मी अनेक लोकांना दोष देत असतो. खरे म्हणजे आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे आयुष्यात मिळालेलेच असते, पण ते मात्र आपण ते एवढे गृहीत धरलेले असते की, त्यापायी इतरांशी तुलना करून आपण दुःखी होत असतो. आणि आपल्या आवाक्याबाहेरचे आहे ते आपल्याला मिळाले नाही मिळाले नाही म्हणूनही आपण त्रास करून घेत असतो. यावर मात करण्यासाठी दररोज पाच कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या गोष्टी लिहिल्यामुळे ही नकारात्मकता नंतर हळूहळू कमी होत जाते आणि आपले मन सकारात्मक विचाराने भरत जाते. हळुहळु मग आपण आनंदाने जगायला शिकू लागतो. जीवन हे दुःखाचा सागर नसून आनंदाचा सागर आहे असे आपल्याला जाणवायला लागते. आपल्या वागण्या-बोलण्यात बदल होऊ लागतो. करून तर पहा...

No comments: