Thursday, December 19, 2024

भारतीय दर्शने

आस्तिक षड्दर्शने-
(१) सांख्यदर्शन :- हे दर्शन ‘विश्वनिर्मिती व विश्वविकासाचा’ निव्वळ ‘भौतिक दृष्टिकोनातून’ विचार करणारे व त्यासाठी ‘कुणा ईश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही’ असे मानणारे व त्याअर्थी ‘नास्तिक दर्शन’ आहे. पण ईश्वर मानीत नसले तरी हे दर्शन वेदांना विरोध करीत नसल्यामुळे त्याची ‘आस्तिक’ अशी वर्गवारी केली गेली. मूळ निरीश्वरवादी सांख्यदर्शन आज उपलब्ध नाही. या विचारधारेची दर्शन स्वरूपात मांडणी कपिलमुनीने केलेली असून, नंतरच्या काळातील गीतेनेही (सांख्यमतात काही बदल करून पण) कपिलमुनींना फार मान दिलेला आहे. 
(२) योगदर्शन :- ‘सांख्य आणि योग’ या दोन सर्वात जुन्या विचारधारा असाव्यात आणि त्या वेदपूर्व सिंधू संस्कृतींतूनसुद्धा आल्या असण्याची शक्यता आहे. योगात असे मानतात की मन स्थिर करून व ठेवून ध्यानधारणा केल्यास अनेक मनोशारीरिक उपलब्धी प्राप्त होतात. योगाची दर्शन-स्वरूप आणि सूत्रमय रचना इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या पतंजलीमुनीने केलेली आहे. पतंजलीच्या ‘योगश्चित् वृत्तीनिरोध:’ म्हणजे ‘योग हे चित्तवृत्तीचे नियमन होय’ या योगाच्या व्याख्येत ‘ईश्वर’ नाही. पण पतंजलीने मन केंद्रित करण्यासाठी एक ‘पर्याय’ म्हणून तरी ईश्वर सांगितलेला आहे. कुठल्याही कारणाने का असेना, पण ‘योगदर्शन ईश्वर मानते’ असे साधारणपणे मानले जाते. पुढील काळातील गीतेने तर योग हा ध्यानयोग या नावाने मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला व त्याला ईश्वराबरोबर जोडून टाकले. जैन व बौद्ध हे ईश्वर न मानणारे याअर्थी नास्तिक धर्म असूनसुद्धा ते त्यांचे स्वत:चे योगशास्त्र मानतात.
(३) वैशेषिक दर्शन :- कणादमुनीने असे सांगितले की जगाची निर्मिती परमाणूंपासून होते व त्यासाठी कुणा ईश्वराची आवश्यकता नाही. कणादमुनी हा चक्क एक वैज्ञानिक वाटतो आणि त्याचे हे दर्शन खरे तर नास्तिक दर्शन आहे. परंतु वेदांना न नाकारल्यामुळे त्याचीही गणना आस्तिक दर्शन अशी झाली. 
(४) न्यायदर्शन :- गौतममुनी या प्रणेत्याचे हे दर्शन वादविवादांसाठी वापरले जात असे म्हणून याला वादविद्या असेही म्हणतात. ‘न्याय’ म्हणजे ‘प्रमाण’ ठरवून तत्त्वाची परीक्षा करणे होय. हे दर्शन स्पष्टपणे सर्वज्ञ, सर्वव्यापक व सर्वशक्तिमान ‘ईश्वराचे’ अस्तित्व मानणारे दर्शन आहे. पण हे दर्शन ईश्वराला सृष्टीचे ‘घटकद्रव्यकारण’ असे मानीत नसून, ते त्याला ‘निमित्तकारण’ असे मानते. 
(५) मीमांसा किंवा पूर्वमीमांसा :- जैमिनी ऋषीच्या या दर्शनाला ‘जैमिनीसूत्रे’ असेही म्हणतात. हे दर्शन यज्ञ, आत्मा, वेदप्रामाण्य वगैरे सर्व मानते व हे मुख्यत्वे वैदिक यज्ञांच्या कर्मकांडाशीच संबंधित दर्शन आहे. पण यांच्या मते यज्ञाच्या कर्मफळाचा दाता स्वत: यज्ञ आहे, ईश्वर नव्हे. याअर्थी खरे तर हे दर्शन ‘नास्तिक’ आहे. पण वेद व यज्ञ यांना मानणारे म्हणून हे दर्शन आस्तिक, प्रतिष्ठित गणले गेले.
(६) उपनिषदे, वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत, असे संपूर्ण अद्वैत मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म आहे. 
पारसी, ज्यू, ख्रिस्ती व मुसलमान हे सर्व एकेश्वरवादी धर्म आहेत. पण ते त्यांचा तो एकमेव ईश्वर आणि त्याने निर्मिलेली (असे मानलेली) ही सृष्टी यांना वेगवेगळे मानतात व त्याअर्थी ते सगळे द्वैतवादी धर्म आहेत. प्रमुख उपनिषदांनंतर काही शतकांनी असेल, ‘ब्रह्मसूत्रे’ हा त्यांच्यावरील प्रमाण ग्रंथ बादरायणाचार्यानी रचला. त्यांनी नास्तिक मताला विरोध करून ईश्वरवादाचे म्हणजे ब्रह्मवादाचे समर्थन केले. पुढे हे औपनिषदिक तत्त्वज्ञानच हिंदू धर्माचे मुख्य तत्त्वज्ञान बनले.

याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन या ३ नास्तिक दर्शनांनाही तितक्याच आदराने स्वीकारले आहे.

(७) व (८) जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन: आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इ.स.पूर्वच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या महावीर यांना जैन धर्माचा व गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानण्यात येते. हे दोघेही क्षत्रिय वर्णाचे व मगध प्रांतीय म्हणजे आजच्या बिहार राज्यातील वेगवेगळ्या राजघराण्यांत जन्मलेले होते. त्यातील गौतम बुद्ध तर ब्राह्मणांहून क्षत्रिय श्रेष्ठ आहेत असे मानणारा होता. पण कुठलेही जातिभेद, वर्णभेद पाळू नका असे त्याने सांगितले. हे दोन्ही धर्म हिंदू धर्मातील ‘ईश्वर’ किंवा ‘ब्रह्म’ ही संकल्पना मानीत नाहीत; आणि ते कुणा देवांच्या मूर्तीही बनवीत नाहीत. मात्र जैन धर्मीय त्यांच्या र्तीथकरांना ‘मार्गदर्शक’ मानून त्यांच्या मूर्ती बनवितात. काही बौद्ध देशांमध्ये बुद्धाच्या (आदिबुद्धाच्या) मूर्ती बनवून त्याला ईश्वर म्हणून पूजतात. शिवाय हे दोन्ही धर्म अहिंसक आहेत. महावीराने तर अहिंसा हाच परमधर्म असे सांगितले. जैन धर्मात, वैदिक धर्मातील पशुहिंसेमुळे वेदांना चक्क ‘हिंसक श्रुती’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे जैन व बौद्ध या दोन्ही धर्माना वर्णभेद व जातिभेद मान्य नाहीत.जैन व बौद्ध हे दोन्ही वेगवेगळे धर्म मानले जात असूनही ते हिंदू धर्माच्याच यज्ञविरोधी, वेदविरोधी, वर्णभेदविरोधी अशा फुटीर शाखा आहेत असेही म्हणता येते. 
याची कारणे अशी- 
(१) जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म मूलत: उपनिषदांप्रमाणे निवृत्तीवादी (संन्यासमार्गी) धर्म आहेत. 
(२) या दोन्ही धर्मानी आचारविचारांचा मोठा वारसा, वैदिक धर्माकडून घेतलेला आहे. उदाहरणार्थ योगविद्या- पण स्वत:ची वेगळी परिभाषा निर्माण करून. त्याचप्रमाणे पुढील काळात हिंदूंच्या पौराणिक कथा, त्यात त्यांच्या धर्माला अनुकूल असे बदल करून त्यांनी उचलल्या. 
(३) जैन धर्मीयांनी तर हिंदूंचे अनेक संस्कार व मूर्तिपूजा स्वीकारून आजही भारतात (आपले वेगळेपण काहीसे टिकवून) ते हिंदू धर्मीयांशी समरसतेने व सुखाने राहात आहेत. जैन धर्मात असे मानतात की, ऋषभदेव या त्यांच्या पहिल्या र्तीथकरापासून सुरू होऊन, पाश्र्वनाथ हा त्यांचा तेविसावा र्तीथकर व महावीर हा त्यांचा चोविसावा र्तीथकर आहे. त्यांच्यापैकी पाश्र्वनाथापूर्वीचे बावीस जण ऐतिहासिक नसून काल्पनिक असावेत असे त्यांच्या वयांच्या (लाखो वर्षे) व शारीरिक उंचीच्या पौराणिक वर्णनांवरून वाटते. पाश्र्वनाथ हा तेविसावा र्तीथकर मात्र इ.स.पू. ८००च्या सुमारास नक्की होऊन गेला असावा. सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे) व अपरिग्रह (साठा न करणे) अशा चार यामांचा (म्हणजे नियमांचा) ‘चातुर्याम धर्म’ पाश्र्वनाथाने श्रमणांसाठी म्हणजे मुमुक्षूंसाठी सांगितला होता. या धर्मातच ‘ब्रह्मचर्य’ या पाचव्या यामाची भर घालून तो महावीराचा पंचमहाव्रतांचा जैन धर्म बनला.बुद्धाने वैदिकांचे शब्दप्रामाण्य, कर्मकांड व ईश्वरप्रामाण्य साफ नाकारले. त्याला दु:खी व पीडित लोकांना दु:खमुक्त होण्याचा नवीन मार्ग दाखवायचा होता. 
बुद्धाची चार थोर सत्ये अशी :- 
(१) जग दु:खमय आहे. 
(२) दु:खाचे कारण तृष्णा हे आहे. 
(३) तृष्णेच्या त्यागाने दु:खनाश होईल. 
(४) निर्वाणप्राप्तीसाठी अष्टांगिका मार्ग अवलंबावा. मूलत: जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत. मात्र जैन धर्मात जीवात्मा या अर्थी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्मही मानतात. स्वत: गौतम बुद्ध मात्र अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा न मानणारा होता. ‘सतत बदलणाऱ्या या जगात स्वत:ला प्रश्न विचारून, चौकशी करून, बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारा,’ असे बुद्धिप्रामाण्यवादी मार्गदर्शन करणारा गौतम हा जगातील एकमेव धर्मसंस्थापक होय. वैदिक कर्मकांडाला व हिंसक यज्ञांना लोक आधीच कंटाळलेले असताना व उपनिषदांनीसुद्धा यज्ञविरोधी आवाज उठविलेला असताना, अनेक राजे व त्यांची सैन्ये एकमेकांशी भिडून महाभारत युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे, हिंसेबद्दल एक प्रकारचा उबग लोकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच, जैन व बौद्ध हे सत्य, अहिंसा, शांती अशा थोर मूल्यांवर आधारित धर्म लोकांसमोर आल्यामुळे एक वैचारिक मन्वंतर घडून आले. ‘न दिसणाऱ्या ईश्वरामागे धावण्यापेक्षा सदाचार व सद्भावनांनी सर्वानी सुखी व्हा’ असे आवाहन त्यांनी केले. लोकाश्रय व राजाश्रय मिळवून या दोन्ही धर्माचा तत्कालीन भारतात वेगाने प्रसार झाला.

(९) चार्वाक दर्शन: चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते.

चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. चार्वाक ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. परंपरा शंकर... पुरंदर... बृहस्पती... अशी धरली जाते.

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्माईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणाे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्त्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्त्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.

चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्‌!‘ हा त्याचा मुख्य सिद्धान्त आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते. या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ म्हणले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.

पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वीआपतेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्त्वात नाही.

आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे. असे हे लोकायतिक म्हणजेच ईहवादी तत्त्वज्ञान आहे.

No comments: