Thursday, December 19, 2024

बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती

*बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती*

आजही ज्याची तपासणी करता येईल असा खालील मुद्दा निवडून त्यासंबंधी शोध घेतला असता मूळ माहितीत अथवा दाव्यात तफावत, विसंगती, असत्य आणि विपर्यास आढळून आला.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx
*१०*🌹 . गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे  दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड  येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx

सोमनाथ मंदिराजवळ कोणताही स्तूप नाहीये. परंतु वरील मुद्द्यात दिलेले वर्णन हे तिथल्या एका गोष्टीला लागू पडते जी *बाणस्तंभ* (Arrow Pillar) नावाने ओळखली जाते.

हा एक चौकोनी दगडी खांब असून त्याच्या चारही बाजूंवर निरनिराळ्या मुर्त्या दाखवल्या असून त्यावर काही कोरीव काम केलेले दिसते. त्या खांबावर एक पृथ्वीचा गोल दाखवला असून त्या पृथ्वीच्या गोलातून आरपार गेलेला दक्षिण दिशा दाखवणारा बाण दिसतो. त्या खांबाच्या तळाकडे खालील मजकूर कोरलेला आहे.
"आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग"
ह्याचा अर्थ इथपासून ते थेट दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणतीही जमिन येत नाही असा सांगितला जातो.

हा स्तंभ कोणी, नेमका कधी बांधला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. कार्बन डेटिंग पद्धतीने केवळ जैविक (organic) वस्तुंच्या काळाचे अनुमान काढता येते परंतु हा स्तंभ दगडी असल्यामुळे ह्या पध्दतीने त्याचा काळ, आयुष्य ठरवता येणार नाही.

Wikimapia नुसार त्या बाणस्तंभाचे अक्षांश-रेखांश 20°53'15"N   70°24'3"E आहेत [1]. बाणस्तंभावरील मजकूरानुसार त्या स्तंभापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत 70°24'3"E ह्या रेखांशावर कोठेही जमिन नाही. फार zoom न करता जर Google Maps, Wikimapia अथवा Google Earth मधे बघितले तर ते खरेही वाटते. तशा काही images internet वरच्या काही संकेतस्थळांवर दाखवलेल्यादेखील आहेत.

परंतु *बरेच zoom in करून Google Maps मध्ये 70°24'3"E रेखांशाची रेषा पकडून दक्षिण ध्रुवाकडे खालच्या दिशेने निघालो तर 49° अक्षांशाच्या आसपास फ्रान्सच्या अधिपत्याखालील Kerguelen Islands हे बेट लागतं. ह्याचे दुसरे नाव Desolation Islands आहे [2]. 70°24'3"E रेखांशाची रेषा ही ह्या बेटाच्या Courbet Peninsula ह्या प्रदेशातून जाते. आणि बेटाला केवळ किंचित स्पर्श करून गेली आहे वगैरे असे काही नाही तर ती चक्क, धडधडीत समुद्रापासून कित्येक किलोमीटर लांबून, आतून जमिनीवरून जाते.*

*त्यामुळे बाणस्तंभावर लिहिलेल्या मजकुरातील दावा चूक आहे.*

कॉंस्टंटिनोपलच्या, म्हणजे आत्ताच्या इस्तंबूलच्या, पाडावा नंतर रेशीम मार्ग हा युरोप आणि चीन यांना जोडणारा खुष्कीचा रस्ता बंद पडला. त्यामुळे युरोपातील देशांना पौर्वात्य देशांशी व्यापार करण्यासाठी दुसर्‍या मार्गाची निकड भासू लागली. त्यात आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपातून भारतापर्यंत पोचणारा पहिला युरोपियन म्हणजे वास्को द गामा. म्हणून *वास्को द गामाने भारताचा नव्हे तर युरोप पासून भारतापर्यंत पोचायचा सागरी मार्ग शोधून काढला* असे म्हंटले जाते.

संदर्भ:
1. http://wikimapia.org/4265523/Baan-stambh-Arrow-Pillar
2. https://en.m.wikipedia.org/wiki/Kerguelen_Islands

© कौस्तुभ शेज्वलकर
02jul2019

No comments: