सुजाण पालकत्व म्हणजे काय? –जगदीश काबरे (jetjagdish@gmail.com)
सुजाण पालक नेहमीच आपल्या पाल्याच्या मनात 'तू सर्वार्थाने समर्थ व्यक्तीमत्व घेऊन जन्माला आला आहेस . तुझं भलंबुरं तुला नक्कीच कळतं. तुझ्या भवितव्याबद्दल साधकबाधक निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात आहे. त्यावेळी तू चुकण्याची शक्यता आहे. आणि चुका करण्याचे स्वातंत्र्य आम्ही पालक म्हणून तुला देतो; पण चुकांपासून शिकण्याचे मात्र टाळू नकोस. एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस. नविन चुका कलेल्या चालतील. कारण चुकामधून शिकणे हेच प्रगतीचे लक्षण आहे. अगदी दारूण परिस्थिती आलीच तर आम्ही तुझ्यापाठीशी आहोत. तेव्हा सर्वभौम हो. निर्णयक्षमता अंगी असू दे.' अशा भावना रुजवायचा प्रयत्न करतात.
पाल्याशी बोलताना त्याच्या चुकांची खिल्ली उडवू नका. अन्यथा पाल्य स्वत:ला कोशात बंदीस्त करून घेईल. आणि त्याच्याशी संवादच खुंटेल वा तो चुकांचे समर्थन करायला लागेल. कारण जर एखाद्याने आपली खिल्ली उडवायचा प्रयत्न केला तर आपण जसे त्याचा प्राणपणाने विरोध करतो; तसेच हे वागणे असते. जेव्हा आपण चुकतो तेव्हा स्वत:शी ते कबूल करतो. आणि समोरचा जर आपल्याशी आपुलकीने व प्रेमाने वागला तर आपण त्याच्यापाशीही आपली चुक कबूल करतो. म्हणून पाल्याशी तुसडेपणाने न वागता, त्याला तुच्छ न लेखता सहनुभूतीने मदतक्षम चर्चा करणे आवश्यक ठरते. त्यासाठी पालकांचा मुलांना स्वयंपूर्ण करण्याकडे भर असावा.
त्याच्या अभ्यसासाठी पालकांनी जागणे, त्याचा दिनक्रम ठरवणे, परीक्षा वगैरे आली की रजा घेऊन खूप काळजी घेणे या गोष्टी खूप गोड वाटतात. पण नकळत त्यातून तो मुलगा/मुलगी मानसिकदृष्ट्या परावलंबी होण्याची शक्यता असते. नकळत तो/ती आपले काम आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम नाहीत असा संदेशही जातो. त्यामुळे जेव्हा कणखर भूमिका घेण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ही मुले कच खातांना दिसतात. कारण त्यांना निर्णय घ्यायची सवयच नसते. परिणामी ते कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकत नाहीत. त्याची अवस्था गांगरल्यासारखी होते. शारीरिक अपंगत्व एकवेळ समर्थ मानसिकतेने भरून काढता येतं, पण मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याची शक्यता शून्य असते.
कधी-कधी वाटतं मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ देणं किवा देता न येणं याची उणीव पालक भरून कढण्यासाठी मुलांचा शब्दही खाली पडू देत नाहीत. त्यांचा उत्तमपालन पोषण करणे म्हणजे त्यांना हवं ते आणि सांगतील ते आणून देणं. यालाच ते प्रेम समजतात. यातून मुलांचं तात्कालिक समाधान होत असलं तरी दीर्घकालीन मात्र नुकसानच होतं. मुलांचे प्रकल्प, त्यांचा अभ्यास अशा गोष्टी पालकांनी स्वत: करून देणं, मुलांना चूक करण्याची संधी न देणं, सतत त्यांच्या पुढेपुढे करणं, यातून मुलांमध्ये एकारलेपणाची वृत्ती तयार होते. सगळ्या गोष्टी ‘रेडीमेड’ मिळवण्याची सवय लागते. एखादी गोष्ट कष्टसाध्य असते, ती मिळवायला धडपड करावी लागते हेच मुलं विसरून जातात. खरं म्हटलं तर आई-बाबा घरी नसतांना स्वत:ची सगळी कामं नीट करता येणार्या मुलांवर आई-बाबांचं खरं प्रेम आहे असं म्हणता येईल. खरं प्रेम जीवन सन्मानाने जगण्याचं बाळकडू देतं; परावलंबीत होण्याचं नाही. मुलांचं व्यक्तिमत्व नाकारणारी, त्यांची गरजेपेक्षा जास्त काळजी घेऊन त्यांना खुजं करणारी घरं ही ‘प्रेमळ घरं’ नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं.* सगळी मुलं स्वभावत: चांगली असतात; परंतु हा चांगुलपणा वयस्कांच्या व आसपासच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो. अशा वेळेस त्याने केलेल्या चुकांच्या जबाबदाऱ्या त्याला घ्यायला लावणं हे आपल्याला कितीही त्रास झाला तरी पालकांनी त्याला समजावून सांगितले पाहिजे. म्हणून मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाढू देणं, त्यांच्या स्वप्नांना खतपाणी घालणं, योग्य दिशा दाखवणं, पण त्या दिशेने त्यांचं त्यांनाच चालायला लावणं हेच खरं सजग पालकत्व होय. संस्कार... संस्कार ते आणखीन वेगळे काय असतात.
आपल्या मुलांना आपणच 'ओळखतो' प्रत्येक मूल वेगळं, त्याची अभ्यासाची शैली वेगळी आणि त्याला त्याच्या पालकांशिवाय कोणीही तितकंसं चांगलं ओळखत नसतं. म्हणूनच त्यावर उत्तरही पालकच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शोधू शकतात. आपण कोणीही आदर्श पालक नसतो. हळूहळू चुकांमधून शिकतच पुढे गेले पाहिजे. पालकत्व हे काही आव्हान नाही, तर एक निखळ, निर्मळ आनंद देणारी प्रक्रिया आहे. तेव्हा त्यातील कोणत्याही प्रश्नाला महाभयंकर रूप देणं टाळावं, तसेच फार क्षुल्लकदेखील समजू नये. एकदा का भावनिक साक्षरता आली की, संवाद साधणं सोपं होतं. पालक-पाल्य यांच्यामध्येच सुसंवाद असला की समस्या सहज सोडवता येतात. पण अर्थात सुसंवाद म्हणजे आपण बोलणं व मुलांनी ऐकणं नाही, तर पाल्यांचंही ऐकून घेणं, समजून घेणं व त्याप्रमाणे वागणंदेखील! मूल शाळेतून आलं की त्याच्या दप्तर फेकण्याच्या पद्धतीवरूनच आज त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे लक्षात यायला हवं आणि मग अशा वेळी पालकांनी याआधी दप्तर जागेवर ठेव, फेकलंस कशाला? हा हट्टीपणा सोडून आधी त्याला काय म्हणायचंय हे समजून घेतलं पाहिजे. त्याची त्या-त्या वेळेची गरज ओळखली की मग त्याच्याशी संवाद छान साधता येऊ शकेल.
आम्हाला बालवाडीपासून सुरस चमत्कारांनी ठासून भरलेले रामायण, महाभारत, कुराण आणि बायबल शिकवले जाते. जपानमध्ये मात्र बालवाडीच्या मुलांना 'का?' नावाचे पुस्तक शिकवीले जाते. त्यामुळे जपानमध्ये तंत्रज्ञान प्रगत झाले आणि भारतात धार्मिक कर्मकांड! अंधश्रध्दांमुळे आमच्या मेंदूला कुलूप घातले गेलेलं आहे. म्हणूनच 100 किलो वजन असणारा, 6 फुट उंच असणारा, एका बुक्कीत नारळ फोडू शकणारा, हळद-कुंकू लावालेलं छोटसं लिंबू रस्त्यात दिसलं की घाबरतो.
आम्हाला 'का?' हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही किंवा ती चौकस बुध्दी पद्धतशीरपणे खुरटवण्यात आली आहे. आम्ही गप्प बसा, प्रश्न विचारू नका, या संस्कृतीत वाढलो आहोत आणि आमच्या मुलाबाळांनाही तसेच वाढवत आहोत. हे बदलायला हवे. मुलांनी 'का?' म्हणायला शिकायाला हवे. त्यांचे आपल्याला त्रासदायक वाटणारे प्रश्न विचारणे म्हणजे उद्धटपणा नाही हे आधी पालकांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून आम्हाला पालकांच्या, धर्मांधता वाढवणे म्हणजे संस्कार करणे, या समजावर टिका करावी लागते. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या वाटेत परंपरेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि वर्चस्ववादी वृत्तीच्या घातक मानसिकतेचे काटे अंथरण्याचे काम युगानुयुगांपासून कोण करीत आहे हे दाखवून देण्याचे प्रामाणिक काम (लोकांच्या दृष्टीने अप्रिय काम) करावे लागते. त्यासाठी समविचारी लोकांना जोडून घेणारी आणि या अंधश्रध्दांतून बाहेर काढून दिलासा देण्याचे काम करणारी अंनिस चळवळ उभारावी लागते; जी काट्याने भरलेला रस्ता सोडून नव्या उजेडाच्या वाटेवरून चालण्याचा आग्रह धरते... त्यासाठी प्रोत्साहित करते. अंधाराच्या सनातनी अग्रदूतांना हेच कदाचित पटत नसावे म्हणून पराकोटीचा तिरस्कार या व्यक्ती करत असतात आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जावून ते संस्कारहीन पातळी गाठतात. असो.
लहानपणापासून आपल्या समाजात संस्काराच्या नावाखाली परंपरेचे अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनवला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत. कारण त्यांना ह्या गोष्टीची बाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, 'इकडे आड तिकडे विहीर', 'धरलं तर चावते सोडलं तर पळते', अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्याआमच्यासारखा एखादाच विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून बाहेर पडू शकतो. पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brainwashing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून *मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा. आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते. ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते.*
*देण्यातला आनंद म्हणजे संस्कार 'मर्यादित मी' कडून 'विशाल मी' बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संस्कार. इतरांचा विचार करायला शिकणं, स्वार्थी दृष्टिकोन बाजूला ठेवणं म्हणजे 'विशाल मी' बनवणं होय. नम्रता, कृतज्ञता, क्षमा, करुणा, आनंद, तन्मयता या भावनांचा अनुभव पालकांनी स्वत: घेणं व तो घेत असताना मुलांना त्यात सहभागी करून घेणं म्हणजे संस्कार. इतरांना देण्यातला, आनंदी करण्याचा अनुभव मुलांना दिला की, त्याला खरा संस्कार म्हणता येईल.*
संस्काराच्या व्याख्या काळानुसार बदलत आहेत. फक्ता 'शुभं करोति म्हणणं' म्हणजे संस्कार नव्हे. असे संस्कार केले नाही तर धर्म बुडेल असा बागुलबुवा करू नये. *पालकच मुलांचे पहिले रोल मॉडेल असल्यानं पालकांच्या योग्य वर्तनातून संस्कार आपोआपच घडत जातात. त्यामुळे आपलं वागणं योग्य असेल तर चांगले संस्कार आपोआपच घडत जातील.* मुलं हट्टीपणा करतात, आपल्या म्हणण्यानुसारच सर्व गोष्टी व्हाव्यात, असा आग्रह धरतात. अशावेळी पालकांनी 'आमच्या लहानपणी असं नव्हतं' हा विचार अगोदर बाजूला ठेवावा. कारण आता आजूबाजूची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. मुलांवर माध्यमाद्वारे होणार्या संवेदनांच्या भडिमारामुळे त्यांचा 'अहं' फारच लवकर जागृत होतो. माध्यमाद्वारे त्यांना हव्या-नको त्या सर्व माहितीचा भडिमार त्यांच्यावर सतत होत असतो. अशा वेळी पालकांकडून मुलांना माहितीपेक्षा शहाणपण, संवेदना, सद्सद्विवेक बुद्धी वाढावी यासाठी ज्या गोष्टी त्यांना संगणक, मोबाइल, फेसबुक यासारखी माध्यमं देऊ शकत नाहीत त्यापासून मुलांना लांब ठेवण्यापेक्षा आपणही त्यांचा विधायक वापर संवादाचं माध्यम म्हणून करून घेतला तर नक्कीच उपयुक्त ठरेल.
मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्वगुण कसे विकसित करावेत यावर पालक फारच हातघाईला येतात. खरं म्हणजे प्रत्येक मूल चांगला वक्ता झालाच पाहिजे ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. प्रत्येक क्षेत्रात अंतर्मुख (इंट्रोव्हर्ट) व बहिर्मुख (एक्स्ट्रोव्हर्ट) असे दोन्ही प्रकारचे लोक आवश्यक असतात व ते दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांना जे आवडतं ते करू द्यावं, सतत त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत. प्रत्येकाला शिवाजी जन्माला यावा असे वाटते; पण ते आपल्याकडे नाही... दुसरीकडे. कारण शिवाजी होण्यासाठी ज्या खस्ता काढाव्या लागतात त्या काढण्याची पालकांची तयारी नसते. तेव्हा तेच उच्चारवाने तथाकथित मळलेल्या वाटेवरच्या संस्काराचे शाब्दिक बुडबुडे फोडत असतात.
किशोरवयीन मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत. मोठय़ांशी अनादरानं का वागतात, असा प्रश्न बरेचदा पालकांना पडतो. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये 'दिवास्वप्ना'चं (डे ड्रिमिंग) प्रमाण वाढल्यासारखं दिसतं. ही अनेक पालकांची अडचण असते, पण यात नैसर्गिक भागही आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी थोडी उशिरा येते. त्यामुळे बर्याचदा या वयात मुली अभ्यास जास्त गांभीर्यानं घेताना दिसतात. तसेच मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासमोर काही रोल मॉडेल्स ठेवली, तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. त्याच्याशी संवाद साधत त्यांची आवड लक्षात घेतली, त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या व्यक्तीशी परिचय करून दिल्यास ध्येयाकडे जाण्याची त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. पण पालकांमध्ये आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी संयम आणि सामंजस्याचा अभाव असतो असे दिसून आलेले आहे.
पालकांविषयी मुलांना आदर नाही, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण बदलत्या काळानुसार आदराची व्याख्याही तपासून पाहायला शिकलं पाहिजे. 'भीतीयुक्त आदर' वा 'आदरयुक्त भीती' या कल्पना मागे पडल्या आहेत. धाकापेक्षा मैत्रीची भावना असावी. आदर फक्त आदरार्थी बोलण्यातून दिसून येतो, असं नाही. तर तो त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतो. पालकांनी स्वत:च्या चुका लपवून न ठेवता प्रांजळपणे कबूल केल्यास मुलांना आदर वाटतो. पण मुलांना खोटे बोलू नये सांगत असणारे पालकच जर खोटे बोलताना मुल पहात असेल तर त्याचा पालकांविषयी आदर वाढेल की कमी होईल? म्हणून मुलांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्याला मुलांचं जे वागणं आवडत नसेल ते नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपलेही वागणे ठेवले पाहिजे. त्यांच्यावर मूर्ख, बावळट, बेशिस्त असे शिक्के न मारता 'मला तुझं अमुक वर्तन आवडलं नाही,' असं सांगणं जास्त परिणामकारक ठरते.
एवंच आजच्या पालकांपुढे अनेक दबाव असतात, असे म्हणून पळवाट काढून चालणार नाही. उलट मी तसे म्हणेन की, जर आजच्या काळानुसार मुलांना वाढवण्याची क्षमता आपल्यात नसेल तर आपण मुळात मूल जन्माला घालावेच का? प्रश्न कठोर आहे; पण विचार करण्यालायक आहे. आपण समाज एका रात्रीत बदलू शकत नाही हे पूर्णपणे मान्य. पण समाज बदलांची प्रक्रिया आपल्यापासूनच सुरु होऊ शकते, याचा केव्हा तरी आपण विचार करणार आहोत काय?
No comments:
Post a Comment