Thursday, October 5, 2017

नावात काय आहे ?

"नावात काय आहे ?" असे शेक्सपियर सांगून गेला, पण त्याला जातीयतेत बरबटलेले आणि अंधश्रध्देत गुरफटलेले भारतीय माहीत नव्हते म्हणून त्याने असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. भारतीयांची मानसिकता समोरच्याचे नाव आणि आडनावावरून जात वा धर्म जोखण्याची असते. त्यामुळे समोरच्याचे विचार कितपत स्वीकारायचे वा नाकारायचे तसेच त्यावर कसा प्रतिवाद करायचा हे ठरवले जाते. म्हणजे भारतात बव्हंशी विचारापेक्षा जात आणि धर्म महत्वाचा समाजला जातो.परिणामी 21व्या शतकात विज्ञानाची घोडदौड सुरू असतांना आजही भारतात विचारांना दुय्यम स्थान मिळून जातीधर्माच्या प्रथा आणि परंपराच वरचढ ठरतांना दिसत आहेत.हे जर शेक्सपियरला माहीत असते, तर त्याने "नावात काय आहे ?" असा प्रश्न निदान या जन्मात तरी विचारला नसता!
मी नास्तिक असल्यामुळे बरेचदा लोक मला विचारतात की,तुमचे नाव मग "जगदीश" कसे ? कारण भाषाशास्राप्रमाणे ह्या शब्दाची संधी जगत + ईश अशी होते, म्हणजे जगाचे पालन करणारा ईश्वर. आणि जर तुम्ही देवच मानत नाही तर मग नाव का बदलत नाही ? किती बालिश प्रश्न आहेत हे! कारण ह्या लोकांना जगाचे पालन करणारा म्हणजे जगाला विवेकवादाची कास धरून वैज्ञानिक दृष्टीकोन देऊन त्यांच्या मनाची मशागत करणारा हा अर्थ माहीतच नसतो. मग नाव बदलण्याचा प्रश्नच येतो कुठे ?  बहुसंख्य माणसे फक्त शब्दकोशातील अर्थ जाणतात, पण त्यांना त्याचा गर्भित अर्थ कळत नाही, वा कळून घेण्याची त्यांची इच्छा नसते.
दुसरे असे की, नामकरणविधी मोठी माणसे करतात, आणि ज्याचे नाव ठेवायचे आहे त्याला त्याचा पत्ताच नसतो. एवढा तो लहान असतो तो. अशावेळी काही धार्मिक संस्कार झाले असले तर त्याला ते कसे कळतील ? म्हणून माझ्या नावापेक्षा माझे विचार किती विवेकशील आहेत याला महत्व आहे.एवढे मात्र मी नक्की सांगू शकेन की, मी जन्माला आलो तेव्हा कुठल्याच धर्माचा नव्हतो... आणि माणूस सोडून कुठल्याच जातीचाही नव्हतो... होतो फक्त माणूस! हिंदूधर्म नकळत्या वयात मोठ्या माणसांनी माझ्यावर लादला,जे आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते. पण कळायला लागल्यापासून आणि विविध ग्रंथांनी मला विचार करायला प्रवृत्त केल्यामुळे मी धर्माशी फारकत घेतली.तेव्हापासून मी फक्त "माणुसकी" हा धर्म पाळू लागलो. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे माझ्याकडे जेव्हा जनगणनेचा सरकारी माणूस आला होता, तेव्हा त्याला मी जातीच्या रकान्यात "माणूस" आणि धर्माच्या रकान्यात "माणुसकी" असे लिहिण्यास भाग पाडले होते.  त्या अर्थाने आजच्या ग्लोबल जगात माझी जात 'भारतीय' असे म्हणणे सुद्धा संकुचित ठरते.त्यामुळे सर्व धर्म ग्रंथातील जो नितीशास्त्राचा भाग आहे तेव्हढाच मला प्रिय आहे. त्याचबरोबर धर्म ग्रंथातील वाक्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा अर्थ लावणाऱ्या धर्ममार्तंडांचा मी निषेध करतो.तसेच अंधानुकरणीय परंपरा त्याज्य समजतो.
जगात सगळेच अंधभक्त नसतात... प्रवाहपतित नसतात, तर बरीच माणसे माझ्यासारखी विचारीही असतात. त्यांना कुठल्याही जातीधर्माची कुबडी स्वाभिमानाने जगण्यासाठी घ्यावी लागत नाही. म्हणूनच मी प्रत्येक माणसाशी माणसासारखाच व्यवहार करतो.त्यामुळे इतर धर्मीय कसेही वागले तरी त्याचा द्वेष न करता त्यांच्यातील चांगुलपणाला साद घालतो. आज न उद्या हा मानव समाज परस्परांशी सौहार्दाने वागायला लागेल हा माझा (कदाचित तुम्हाला भाबडा वाटेल) आशावाद आहे. - जगदीश काबरे.(^j^)

No comments: