Thursday, October 5, 2017

पालकनीती

पालकनीती : - जगदीश काबरे. (^j^)

अभ्यासासाठी मुलांच्या मागे पुर्वीही पालक लागायचे, पण हल्लीचे पालक मात्र नुसतेच मागे लागत नाहीत तर,त्यांच्या अभ्यासात इतकं लक्ष घालतात की, मुलांना अभ्यासापेक्षा त्यांचाच ताण येतो. चांगले गुण मिळाले तर चांगली नोकरी मिळेल हे लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे अभ्यास हा नोकरी मिळवण्यासाठीच करायचा असतो,असा संकुचित दृष्टीकोन मुलांच्या मनात तयार होतो. पण नोकरी लागल्यावर ते गुण किती उपयोगी पडतात?
सुरूवातीला काही चूक झाली तर मुलं आई-वडीलांना सांगतात. तेव्हा ते मुलांशी कसे वागतात? मुलांना समजून घेण्याऐवजी त्यांना रागावतात, फ़टकारतात. मग आई-वडीलांच्या या अवसानाला पाहून मुलंच त्याच्यापासून सत्य लपवायला लागतात. कारण खरेपणाची किंमत त्यानी ओरडा खाऊन मोजलेली असते. त्या अनुभवावरून मुलं खोटं बोलायला लागतात.
खरं तर त्यांना सत्य बोलायला प्रोत्साहीत केलं गेलं पाहीजे. पण त्यासाठी आई-वडीलांकडे मुलांनी खरं बोललेलं पचवायची शक्ती असली पाहीजे. त्यासाठी पालकांनी हे लक्षात घेतले पाहीजे की, त्यांच्या स्वत:च्या नजरेतून ते जरी योग्य वागत असले तरी मुलंही त्यांच्या नजरेतून योग्यच असतात. म्हणून पालकांनी मुलांना ती जशी आहेत तसा त्यांचा स्वीकार केला पाहीजे. नाहीतर इतरांशी तुलना केल्यामुळे एकतर ती चुकाच करत बसतील वा त्यांच्यात न्युनगंड निर्माण होईल.
      
असंख्य विद्यार्थ्यांच्या घरी  वाचनास, लेखनास प्रोत्साहन नसते.घरी वर्तमानपत्र येत नाही तशीच ग्रंथालयाशीही ही मुलं जोडली गेलेली नसतात. हे विद्यार्थी नाटके पहात नाहीत. सिनेमेही फक्त टीव्ही वाहीन्यांवरून दाखवले जातात तेच पाहतात. प्रवास फारसा करत नाहीत. उपनगरातल्या नातेवाईकाकडे किवा मे महिन्याच्या सुट्टीत वा एखादे कार्य असल्यास गावी जातात. पालक आणि मुले यांच्यात संवाद जवळजवळ शून्य असतो.घरून परवडत नसले तरी मुलांना क्लासेसमध्ये टाकले जाते.त्यामुळे मुलांना मोकळा वेळ मिळतच नाही.नववीपर्यंत एखादी मुलगी भरतनाट्यम शिकते;आणि मुलगा कराटे. दहावीला तर तेही संपते. आणि अभ्यास एके अभ्यास मागे लागतो. सध्या दहावीची परीक्षा म्हणजे पालकांनी जन्म-मरणाचा प्रश्न बनवला आहे. चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी 90 टक्के हवेतच. ही अपेक्षा ठेवल्यामुळे आपण मुलांवर त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे तर लादत नाही ना ? ह्याचा विचार स्वत:ला सुशिक्षीत म्हणवणारे पालक का करत नाहीत?
आपण अभ्यास मन लावून केला तर कॉलेज चांगले की वाईट हा मुद्दा गौण ठरतो.लोकांना दोषी ठरवण्याची सवय आपल्या समाजात असल्यामुळे स्वत:वरील जबाबदारी झटकणे सोपे जाते. म्हणून कॉलेजला चांगले आणि वाईट ठरवून सहज मोकळे होता येते. खरं तर तुमचे मार्क आणि तुमचे ज्ञान याचा काहीएक सबंध नाही. ज्ञान वाढवा, मार्कांकडे लक्ष देऊ नका. ज्ञानाच्या मागे आपोआपच मार्क येतात. अशानेच अभ्यासाशी मैत्री होते. जर तो तुमचा मित्र झला तर तुम्हाला तुमच्या मित्र- मैत्रीणींसारखा हवाहवासा वाटायला लागेल.
म्हणून मूल घडवतांना त्याने परीक्षेमध्ये, खेळामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये  किती बक्षिसे  मिळवली याहीपेक्षा जर त्याला कधी अपयश आलं तर ते पचवू शकतं का ? शारिरीक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर 'फिट' आहे ना ? ते मूल जे काही करतयं ते त्याच्या स्वत:च्या आवडीने आणि ते करतांना त्याला मजा येतेय ना ? ते बोलण्या-चालण्यामध्ये 'एटिकेटस ' आणि 'मँनर्स ' दाखवतयं ना ? लक्ष केंद्रीत करण्याची आणि एकाग्र होण्याची क्षमता मुलामध्ये आहे ना ? हा विचार पालकांनी महत्वाचा मानला पाहीजे.त्याला इतरांशी स्पर्धा करायला लावण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करायला शिकवा. म्हणजे तो आपल्यातील कमतरता ओळखायला लागेल. त्याला जगायचं कसं हे शिकवलं की, तो जगण्याचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला शिकेल. तरच त्याचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होईल.
कुठल्याही प्राण्याला भिती वाटली... अस्तित्वाच्या लढाईची वेळ आली तर तो तीन प्रकारांनी प्रत्युत्तर देतो. प्रतिस्पर्धी बरोबरीचा किंवा लहान असेल तर ‘आक्रमण’ करतो, शक्तीमान असेल तर ‘पलायन’ करतो;आणि दोन्ही जमण्यासारखं नसेल तर ‘निपचित’ पडतो. तसेच अविश्वास किंवा विरोध झाला की मुलांमधला ‘विचार’ संपतो;आणि ती भावनीक प्रेरणांनी व्यक्त होतात. मुलं एकतर अंगावर येतात,भांडतात, तिथून निघून जातात किंवा काहीच प्रतिसाद देत नाहीत... दुर्लक्ष करतात. मुल आपलं ऐकत नाही असं वाटलं की, आपल्या मनातली भिती जागी होते. आपल्याला ती स्वतःच्या अस्तित्वाची भिती वाटते. अपमान, संताप, दुःख अशा बर्‍याच छटा तिला असतात. ‘मुल आपलं ऐकत नाही म्हणजे काय... त्याच्या भल्यासाठी आणि प्रेमापोटीच आम्ही सांगतोय ना ?’ असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे; पण आपल्या देहबोलीतून ते दिसत नाही. आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बळजबरीने मुलांना वाकवू पहातो. आणि मुलं मात्र असमर्थ असल्यामुळे त्याच्या पद्धतीनं प्रतिकार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातात.   
मुलांना आपण लहानपणापासून मराठी, हिन्दी, इंग्लीश अशा विविध भाषा शिकवत आसतो. परंतू भावनांची भाषा आपण त्यांना कधी शिकवतो का ? ज्याप्रकारे भाषा शिकवतांना मुळाक्षरं, उच्चार,अभिव्यक्ती व शब्दांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा,हे आपण शिकवतो. त्याचप्रमाणे भावनांची भाषा शिकवतांनाही मुलांना भावनांची अक्षर ओळख करून देणं,त्या भावनांचं योग्यप्रकारे प्रकटीकरण करायला शिकवणं आवश्यक आहे.
सतत इलेकट्रॉनिक सवंगड्याच्या विश्वात वावरल्यामुळे मुलामुलींमध्ये दुसऱ्याबद्दलच्या जाणिवा व आस्था कमी होतांना दिसत आहेत. संगणकावरील हिंसक खेळ आणि टीव्ही वरील हिंसक दृश्ये बघून त्यांच्या जाणिवा बोथट होत आहेत. त्यांच्यामध्ये दुसऱ्याबद्दल कमालीची अनास्था निर्माण होते आहे.
सध्याच्या पालकांना मुलांशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्यांच्यात एक अपराधी  भावना निर्माण झाली आहे. म्हणून बरेचदा घरी आल्यावर मुलांना दुखावू नये वा अपराधीपणाची बोच कमी व्हावी त्याची भरपाई म्हणून मुलांच्या सर्व मागण्यांना 'हो' उत्तर देणे सोयीस्कर वाटू लागले आहे. मनातील दोषभावना शमवण्यासाठी काही घरात पालक मुलामुलींना मनमानी करण्यास परवानगी देत आहेत. आशा परिस्थितीत मुलांना स्वयंशिस्त कशी लागणार?
एखादी व्यक्ती अशी का वागते याचा शोध घेणे म्हणजे त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करणे असते. कोणत्याही व्यक्तीचे वर्तन हे त्याच्यामध्ये उतरलेले अनुवंशिक घटक आणि तिच्यावर झालेले संस्कार तसेच त्याचा भोवातालाचा परिसर यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. याशिवाय त्याची स्वतंत्र बुध्दी त्या वेळी वागण्याचा कोणता पर्याय निवडते हा भागही महत्वाचा असतो. त्याची निर्णय घेण्याची कृती जरी स्वतंत्र असली तरी त्या कृतीमागे त्याच्या मेंदूच्या हार्ड डिस्कवर जे अनुभव असतात त्या अनुभवातून बनलेले पूर्वग्रह त्याच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असतात.
म्हणून मुलांवर जोपर्यंत घराघरातून होणारे संस्कार त्याला भावना योग्य मार्गाने व्यक्त करण्याचे शिकवत नाही तोपर्यंत मुलांचा होणारा भावनिक कोंडमारा पालकांच्या लक्षात न आल्यामुळे मुलांना निराशेच्या गर्तेत लोटत असतो. आपल्या भारतीय समाजात पुरुषांनी विशेषत: नकारात्मक भावना [उदा. रडणे, नाजूकपणे वागणे इ.] व्यक्त करायच्या नाहीत असे संस्कार झालेले असतात. आशा दमन केलेल्या भावनांच्या उद्रेकामुळे मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढीला लागते.
सध्या पुरुषांमध्ये किशोरावस्थेपासून ते वृध्द होईपर्यंत व्यक्त होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्याला आता भावना शब्दात मांडण्याचे शिक्षण घ्यावे लागणार आहे. आणि हे जर केले नाही तर भावनांचे दमन करणारे पुरुष चुकीच्या मार्गावर जातील. म्हणून त्यांना आता आपली विचार भावना व् वर्तनपध्दती कालानुसार बदलावी लागणार आहे. अन्यथा स्त्रीयांवारील अत्याचार वाढत जातील. तेव्हा पालकांनो  आपल्या मुलांना योग्य भावना व्यक्त करण्यास वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच शिकवायला सुरुवात करा. म्हणजे मोठेपणी त्यांना विरोधी भावना पचवणे जड जाणार नाही.
पण आपलं मुल अपयशी झालं तर लोक आपल्याला बोल लावतील...म्हणजेच ‘लोक काय म्हणतील?’ हीच चिंता प्रत्येक भारतीय पालकांच्या मनात सर्वात जास्त असते. मुलांच्या यश-अपयशात आपण आपली तथाकथित प्रतिष्ठा पणाला लावतो. बरे,लोक म्हणजे तरी कोण?... तर या अवाढव्य जगात आपल्याला ओळखणारी पाचपंचवीस माणसं! त्यासाठी आपण कोण आटापिटा करतो! आपल्या मुलांना आपल्या सुप्त महत्वाकांक्षेपायी त्यांची कुवत न जोखता किती दडपण आणतो! इतरांशी तुलना करून आपल्या मुलांना किती घुसमटून टाकतो! याचा आपण पालक म्हणून कधीतरी विचार करणार आहोत काय? मुलांचं कोवळेपण, मुलांची निरागसता, मुलांची विचार करण्याची आणि प्रयोगशील अनुभवातून शिकण्याची पद्धत आपल्या महत्वाकांक्षेमुळे मुलांना एकांगी व एकसाची काम करायला लावून पुर्णपणे चिरडून टाकतो. जणू काही आपलं मुल हे आपल्या हातातील एक यांत्रिक खेळणं आहे असं आपलं वागणं असतं. यातूनच आपल्यात आणि मुलात विसंवाद व्हायला लागतो. मुलं अपल्याला टाळू लागतात.आईवडील आपल्याला समजून घेत नाहीत असे त्यांना वाटायला लागते.आणि त्यांना समजून घेणारे मित्र जवळचे वाटतात.ते घराबाहेर जास्त वेळ राहू लागतात.
  
आपण मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ग्रस्त असतो, पण जगत मात्र असतो स्वतःच्या भूतकाळात. मुलं मात्र स्वतःच्या वर्तमानात जगत असतात. एकीकडे ‘आमच्या लहानपणी...’ हे स्वगत आपल्या मनात सतत मोठ्यांदा चालू असतं. तर दुसरीकडे ‘वर्तमानात कसं जगायचं ?’ यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेस आणि पुस्तके वाचणंही चालूच असतं. मनातला भूतकाळ, कल्पनेतला भविष्यकाळ आणि आजचा दोघांचाही वर्तमानकाळ यात अशी विलक्षण रस्सीखेच चालू असते. आपण अनुभवलेले तणाव, पैशाची ओढाग्रस्त, नोकरीसाठी केलेली वणवण, जगतांना झालेली अवहेलना आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून आपण मुलांना सुखाच्या कोषात वाढवतो. त्यांना काही कमी पडू देत नाही. मुलांना हवं ते हवं तेव्हा मिळाल्यामुळे आपण त्यांना खरं तर पंगु बनवतो. त्यांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागतं याचं आकलन होत नाही. मग ती अस्वस्थ होतात,निराश होतात, आक्रस्ताळेपणा करू लागतात. म्हणून त्यांच्यात लहाणपणापासूनच जबाबदारीची जाणिव निर्माण करणं महत्वाचं असतं.त्यासाठी आपण मुलांना वेळ दिला पाहीजे. मुलांना आपल्या घरगुती चर्चांमध्ये सहभागी करून घेतलं पाहीजे. त्यांनाही एक व्यक्ति म्हणून आदराने वागवलं पाहीजे. त्यांच्या चुका त्यांना सकारात्मक पद्धतीने दाखवून द्यायला हव्यात. वेगवेगळे पर्याय त्यांच्या समोर ठेवून योग्य तो पर्याय निवडायला वाव दिला पाहीजे. हे वागणं आपल्या सहनशक्तीची कसोटी पहाणारं जरी असलं तरी आपल्या मुलांमधील विसंवाद कमी होण्यास मदत करणारं आहे; हे मुलांच्या वर्तणुक बदलातून आपल्याला नक्कीच जाणवेल.पहा प्रयत्न करून. जीवन हे दुःखाचा डोंगर नसून आनंदाचा सागर आहे; हे कळेल.     
     
प्रत्येक माणसाच्या आत एक  विश्व सामावलेलं असतं. म्हणूनच आपण म्हणतो, ‘पिंडी ते ब्रम्हांडी’. म्हणजे या जगात जर अव्यवस्था, अनाचार, अत्याचार, हिंसा असेल तर त्याचं कारण आपल्या प्रत्येकाच्या आतच त्याची बीजं आहेत असं नाही कां होत? अपल्याच अंतरंगाचं दृश्य स्वरूप या जगात आपल्याला बघायला मिळतं.आपलं मुल जर लहानपणापासून छोट्या पडद्यावर खून मारामाऱ्या पहातच मोठं होत असेल; आणि युद्धाचे व्हिडीओ गेम्स खेळून वाढत असेल, तर या गोष्टींविषयी त्याचं मन संवेदनाहीन होतं. त्यामुळेच शाळेतील मुलं पटकन हमरीतुमरीवर येतात...मारामारी करतात. साध्यासाध्या कारणांवरून एकमेकांचे जीव घ्यायला मागेपुढे पहात नाहीत.
म्हणूनच आपल्या पालकत्वात जिथे कुठे द्वेष, अशांतीची बीजं असतील तर त्यांना शोधून काढून नाहीशी करायला हवीत. मुलांपर्यंत आपण काय पोहोचवतोय याचा विचार करायला हवा. वंश, वर्ण, देश, धर्म, जात, आर्थिक स्तर, शिक्षण यात भेदाभेद करून माणसांमधल्या मैत्रीचे पूल तोडून विद्वेशाच्या भिंती तर बांधत नाही ना ? हे बघायला लागेल. जगात असलेल्या वैचारीक कुरूपतेला आपण खतपाणी तर घालत नाही ना, याचाही विचार करावा लागेल.भयाचा प्रसंग असो वा आनंदाचा या प्रत्येकवेळी जो विचाराने वागतो, संयमाने वागतो, कुठलीही गोष्ट उताविळपणे करत नाही, त्याच्यावर कधीही पश्चातापाची वेळ येत नाही. म्हणूनच आपल्या मुलांमध्ये मानवजातीचा आणि चराचर सृष्टीचा मैत्रीपूर्ण स्वीकार करण्यासाठी ससद्भावनेची बीजं रुजवावी लागतील.
So, accept them, respect them but do not reject them.

No comments: