भारतीय मानसिकता आणि नास्तिक्य - जगदीश काबरे. (^j^)
ईश्वाराच्या अधाराशिवाय माणूस उभा राहू शकेल का ?
नीतीमूल्यांची संरचना धर्माच्या पायावर उभी केली आहे, ती ज्ञानाच्या पायावर
उभी करता येईल का ? उत्क्रान्तीवाद मान्य केला, तर सर्वशक्तीमान ईश्वर
दुबळा होतो. पण सामान्य जानात ईश्वर दुबळा झाला, तर कोणाला कसलाच धाक
रहाणार नाही,त्यामुळे नीतिमत्ता ढासळेल आणि नीतिमत्ता ढासळली, तर सर्व
समाजव्यवास्थाच रसातळाला जाईल.अशी जाणकारांना भीती वाटते.पण
नीतीमत्ता टिकवून ठेवण्यासाठी खरेच का ईश्वराची गरज आहे ? मग आज बव्हंशी
लोक ईश्वरभक्त असूनही एवढे अनाचार, एवढी अनागोंदी,एवढी अमानुषता का वाढली
आहे ? मग आपल्या सदसदविवेकबुध्दीचे काय करायचे ?
आपण सर्व अनिश्चिततेच्या भोवऱ्यात जगत आहोत हे स्वीकारणे
गरजेचे आहे. अनेक प्रश्नांना आपल्याकडे उत्तरे नाहीत, हे जाणून विज्ञानात
पुढचे पाऊल टाकले जाते. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थ्यांने अशी अनिश्चितता स्वीकारायची वृत्ती आधी अंगी बाणवली पाहिजे
तरच त्यांच्या हातून काहीतरी भरीव होऊ शकते. या अनिश्चिततेपासून सुटका
नाही. त्यामुळे एकदा का अशी चिकित्सक वृत्ती विकसित झाली की ती सर्वच न
पटणाऱ्या गोष्टींना प्रश्न विचारू लागते. म्हणजे ज्याच्या अस्तित्वाचा
कोणताही थेट पुरावा आजवर सापडलेला नाही तो देव खरेच अस्तित्वात आहे का ?
असा प्रश्न मग स्वाभाविक ठरतो. जे संशोधक देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या
अन् आस्तिक लोकांच्या देवावर विश्वास ठेवण्यात बराच फरक आहे... जसा ‘मला
देव असावा असे वाटते’ अन् ‘देव आहेच’ या दोन वाक्यांत फरक आहे.देवाच्या
अस्तित्वावर आस्तिक माणसाचा संपूर्ण अन् ठाम विश्वास असतो, तर संशोधकाचा
त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वास नसतो, समर्पण नसते तर त्याला एक
संशयाचा पदर असतो.
लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेला तरुण जेव्हा विज्ञान
शिकू लागतो तेव्हा त्याचा देवावरचा विश्वास पहिल्याइतका अभंग अन् संपूर्ण
राहूच शकत नाही असे मला वाटते. अर्थात ही प्रक्रिया एका दिवसात घडत नाही.
प्रथम त्याला मृत्यूनंतर आयुष्य आहे का ? देवाच्या अन् संतांच्या
चरित्रांमध्ये जे चमत्कार लिहिलेले आहेत ते खरेच घडलेत का ? असे प्रश्न
पडायला सुरुवात होते अन् मग त्याच्या मनात अविश्वासाचा शिरकाव होऊन त्याचे
प्रमाण वाढत जाते. तेव्हा त्याच्या वडिलांचा देव अन् त्याचा देव वेगळा
व्हायला लागतो. माझ्या बाबतीत हेच घडले अन् अनेक तरुणांना असेच अनुभव
येतात, हे मी त्या वयात जाणलेले आहे.
खरी गोष्ट अशी आहे की आपला समाज स्थितिशील आहेत. गती त्याला
मानवत नाही. शारीरिक आळसासोबतच वैचारिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल
विचार करणे, चिकित्सा करणे, शंका उपस्थित करणे, प्रश्न विचारणे अशा वैचारिक
“क्रियांचा” त्याला मनस्वी कंटाळा आहे. त्यामुळे पूर्वसूरींकडून आयत्या
मिळालेल्या विचारधनावर तो गुजराण करतो. शिवाय ह्या आळसाची सतत सोबत करीत
असते ते भय. पोथीत सांगितल्याप्रमाणे आचरण न केल्यास, नवस न फेडल्यास,
ग्रहशांती न केल्यास देवाचा वा ग्रहांचा कोप होईल ही भीती सतत पाठीशी असते.
त्याच बरोबर विचारांना विवेकाची बैठक देण्यासाठी जे धाडस लागते त्याचा
पूर्ण अभाव आस्तिकांमध्ये असतो.ही एक वैचारिक दुर्बलताच आहे.हे भय आणि
दुर्बलता लपविण्यासाठी आस्तिक लोक (विशेषत: शिकलेले) त्यांच्याभोवती
भारदस्त अशा मोठमोठ्या शब्दांचे जाल विणतात. रंगीबेरंगी शब्दतंतूंचे हे जाल
दिसायला सुंदर दिसते व त्या आड भय आणि विचारदौर्बल्य ही वैगुण्ये झाकली
जातात. मग मोहक शब्दांच्या कोंदणात बसविलेला मूल्यहीन असा श्रद्धेचा खडा
त्यांना भावतो. त्यामुळे ह्या शब्दांच्या भूलभुलैयाच्या आधाराने
नास्तिकांवरही ते आस्तिकतेचा शिक्का मारण्याची जादू करून दाखवितात.
आस्तिकता आणि नास्तिकता या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत.
आपल्या आजूबाजूच्या सगळ्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही
प्रमाणात नास्तिक असतात पण उघड उघडपणे आपण आस्तिक आहोत असे
सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या कमी आहे. ज्याची
धर्मग्रंथांवर, श्रुती-स्मृती, मंत्र-संहिता, उपनिषदांवर परमश्रद्धा आणि
वेदाच्या दिव्यतेवर आस्था आहे, अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर
विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांतावर तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची
निंदा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच नव्हे.
नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.
आधुनिक कालखंडात भारतातच नव्हे तर जगभरात विज्ञान आणि
तंत्रज्ञान याद्वारे माणूस प्रगती करीत आहे. आपण ज्या विश्वात राहतो त्या
विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यासाठी याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार
तो घेतो आहे. कारण धर्म आणि धार्मिक ग्रंथ यांमध्ये त्याला आपल्या
विश्वनिर्मितीची उत्तरे सापडली नाहीत, म्हणून त्यांची नव्याने चिकित्सा तो
करू पाहतो आहे. आपल्या तर्काला जे पटेल ते स्वीकारण्याकडे त्याचा कल वाढतो
आहे. त्यातूनच तो नास्तिक होवू पाहतो आहे. देव, धर्म यांची चिकित्सा करून
त्यांच्या आधारे निर्माण झालेले दांभिक कर्मकांड यांना नाकारत आहे. जात,
धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार करण्याचा
प्रयत्न आजचा माणूस करीत आहे. आजची तरुण पिढी यात आघाडीवर असल्याचे चित्र
दिसते आहे. धर्माने निर्माण केलेल्या चौकटी तोडून नास्तिक म्हणून जगण्यास
कोणताही धोका नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. अर्थात आजही अशा
नास्तिकांची संख्या कमी आहे पण ती दिवसेंदिवस वाढत जाईल यात शंका नाही.
नास्तिक परिषदेच्या माध्यमातून माणसामाणसातील नास्तिकता वाढविण्यावर,
नास्तिक या संकल्पनेविषयी असणारे गैरसमज दूर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न
होतांना दिसतो आहे. तो निश्चितच दखल घेण्याजोगा आहे.
भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला,
तरी या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. 'चार्वाक ऋषींची परंपरा' ही एक
वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या
विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं
आपल्याला म्हणता येईल.चार्वाकांचा विवेकवाद 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक
अनुमान' या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या
आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे
सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या
आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला
शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती.
आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून, तसेच 'हे केल्याने काही नुकसान तर होत नाही ना' असे म्हणून आपल्यापैकी अनेकजण या गोष्टी करीत असतात. त्यांना यात एक भीतीही वाटत असते... बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची.पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित् जास्तच भरेल. पण ही सारी 'सायलेन्ट मेजॉरिटी' आहे, म्हणून ती 'मायनॉरिटी' वाटते. बाबावाक्यम् प्रमाणम् ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असल्यामुळे भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.
आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून, तसेच 'हे केल्याने काही नुकसान तर होत नाही ना' असे म्हणून आपल्यापैकी अनेकजण या गोष्टी करीत असतात. त्यांना यात एक भीतीही वाटत असते... बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची.पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित् जास्तच भरेल. पण ही सारी 'सायलेन्ट मेजॉरिटी' आहे, म्हणून ती 'मायनॉरिटी' वाटते. बाबावाक्यम् प्रमाणम् ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असल्यामुळे भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.
आधुनिक भौतिक प्रगतीला आध्यात्मिकहीन ठरवून या देशात त्याच
भौतिक प्रगतीचा आधार घेत घेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे
चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून,
भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील
साध्यातले साधे अवजारही तयार होत नाही की आजारही बरे होत नाहीत. म्हणूनच
कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं, पण
तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपण आपला
बिस्तरा पसरवत नेला आहे. कारण तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या
आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना
चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होत नाही.
म्हणून आपण आळशी आहोत की भित्रे, असा प्रश्न कधी कधी मला
पडतो. या जगात अनेक देशांतून तसेच आपल्याच देशाच्या विज्ञान संस्थांतूनही
जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध
लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव
अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत? नुसतेच
छद्मी हसणार? की खाजगीत टर उडवणार? आणि मग आपण हे बदलू शकत नाही... अहो
शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या... कशा बदलणार... जाऊं द्या म्हणून गप्प
बसणार? यावर एक उपाय मला सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत
असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटना असतात,
पंथसंघटना असतात, देवळं-मशिदी-चर्च मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही
फुटकळ महाराज-बाबा-बापू- माँ- अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात.मग
आपल्यासारख्या नास्तिक लोकांची एकतरी संघटना असायला नको काय ? म्हणूनच
नास्तिकांचीही चळवळ उभी राहिली पाहिजे...आणि हे काम आजचे शिक्षित तरुण
निश्चितपणे करू शकतील असा माझा आशावाद आहे.विवेकनिष्ठेचा आंतराग्नि फुंकर
घालताच फुलू शकतो.कोणत्याही राजकीय तत्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता
हे करणे आवश्यक आहे.भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा
निर्मूलनाचाच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे.श्रध्दा म्हणजे
अंधश्रध्दाच असते, हे मत मान्य असलेल्या सर्वांचे हे व्यासपीठ व्हावे.केवळ
लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण
मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार
वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार
आपल्या भाषेतून आणि ज्यांना कोणतीही परकी भाषा येत असेल त्यांनी या
साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून लिहायचे... मांडायचे... पोहोचवायचे. कारण
आता कृती करायची वेळ आलेली आहे.
भारतीय मानसिकता ही अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी आहे.
सणवार-उत्सवातील कर्मकांड करणे हा त्याचा विरंगुळा आहे.कारण माणसे पोकळीत
राहू शकत नाहीत. तेव्हा त्यांना पर्याय दिला पाहिजे. माझ्यामते ते सुरवात
अगदी लहानपणापासून केली पाहिजे.मूल वाढवतांना त्याला मोठ्या माणसांना जे
धार्मिक संस्कार वाटतात ते न करता त्याला खुल्या वातावरणात वाढवणे, वाचनाची
गोडी लावणे, विचार करायला शिकवणे, प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, निर्णय
प्रक्रियेत सहभागी करणे,अभ्यास म्हणजे निव्वळ चांगले मार्क असे न शिकवता
अभ्यास हा प्रश्न समजून (to develop analytical mind) घेण्यासाठी करायला
लावणे, आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट
म्हणजे प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधून काढणारा वैज्ञानिक दृष्टीकोन
रुजवणे, अशा प्रकारे पालकत्वाची भूमिका जर प्रत्येक सुशिक्षित पालकाने पार
पाडली तर पुढच्या पिढीत बऱ्याच अंधश्रद्धा कमी झालेल्या दिसतील. आणि माणूस
निसर्गाच्या परिवर्तनशीलतेला अनुसरून स्वतः ही काळानुसार परिवर्तनशील
बनेल. आणि ही एक दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे, हे त्याला कळू लागेल.
No comments:
Post a Comment