Thursday, October 5, 2017

(अ)सत्यनारायणाचा लेखाजोखा

(अ)सत्यनारायणाचा लेखाजोखा : - जेट जगदीश. (^j^)

गेल्या काही वर्षांत झेंडा वंदन आणि सत्यनारायणाची पूजा असा विजोड कार्यक्रम दर प्रजासत्ताक दिनाला मोठ्याप्रमाणात होतांना दिसतोय. आणि शिक्षित म्हणवणारी माणसे संविधानाची देवभक्तीच्या नावाखाली बेधडक पायमल्ली करत असतांना दिसतात. कारण संविधानातील कलम 25 अनुसार सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहून सद्विवेक स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा अधिकार जरी प्रत्येक नागरिकास असला तरी याचा खरा अर्थ वैयक्तिकरित्या घरात धर्मपालनाला आडकाठी नाही, पण सार्वजनिकरित्या रस्त्यावर धर्माची उपासना करता येणार नाही, असा होतो हे त्यांच्या ध्यानी येतच नाही; किंवा आले तरी सवडशास्त्रानुसार सोईप्रमाणे ते धर्माचा तसेच संविधानाचा अर्थ आपल्याला हवा तसा लावतात.
खरेतर सत्यनारायणाचा हिंदू धर्मशास्त्राशी काहीही संबंध नाही. *इतिहासात डोकावले तर असे दिसते की, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत हा देव अस्तित्वात नव्हताच. म्हणून त्यांनी कधीही सत्यनारायणाची पूजा घातल्याचा इतिहासात दाखला नाही. ज्ञानदेव-तुकारामांनीही ह्या देवाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. एवढेच काय दिवसरात्र देवदेव, जपजाप्य करणाऱ्या आणि कर्मठ कर्मकांडांबद्दल कुप्रसिध्द असणाऱ्या पेशवाईतही सत्यनारायणाचे नामोनिशाण नव्हते.* तसेच मराठी माणसाला ज्या वारकरी परंपरेचा वारसा लाभला त्यातही ही पूजा कुठेच नाही. म्हणजे वरील सगळे महापुरुष धार्मिक असूनही त्यांना हा देव माहीत नसावा याचे आश्चर्य वाटते. पण आश्चर्याचा भर ओसरल्यावर नीट विचार केला तर असे दिसते की, *ह्या देवाला भटाबामणांनी पेशवाई खालसा झाल्यावर त्यांना मिळणारा रमणा इंग्रजी अमदानीत बंद झाल्यानंतरच आपली पोटाची खळगी भरण्यासाठी जन्माला घातले.* थोडक्यात काय तर सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे... सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची!
याला ना पुराणात स्थान, ना वेदात स्थान . कोणत्याही पुराणातील कथेमध्ये या   सत्यनारायणाचा उल्लेख आढळत नाही . मी भक्तांच्या अडचणीला , संकटाला धावून जाणारे देव वाचले आहेत व ऐकले देखील आहेत . भक्ताने दिलेल्या विटेवर उभा राहणारा आमचा पांडुरंग मी रोज पाहतो . सावता माळीला वेळ नाही म्हणून विठू माऊली स्वतः त्याला भेटायला जायची. मात्र भक्ताने प्रसाद खाल्ला नाही म्हणून कथेतील कलावतीचा नवरा मारणारा, भक्ताने पूजा केली नाही म्हणून त्याची नौका बुडविणारा, त्याला तुरुंगात टाकणारा, त्याच्या बायकोला व मुलीला भिक मागायला लावणारा, आणि यथासांग पूजा करून प्रसाद खाल्यावर बुडालेली नौका वर काढून कालावतीच्या नवऱ्याला जिवंत करणारा हा सत्यनारायण देव कसा ? (इथे एकाही भक्ताला प्रश्न पडत नाही की, एकदा मेलेला माणूस परत जिवंत कसा होऊ शकेल ? किंवा लहान मुलांप्रमाणे ते अद्भुत गोष्टींवर विश्वास ठेवतात. अर्थात म्हणूनच त्यांना अंधभक्त म्हणायचे.) दानव देखील अश्या पद्धतीने वागल्याचा दाखला नाही, मात्र हा देव भक्ताशी दानावापेक्षाही वाईट पद्धतीने वागतो. वाsss रे देव!
त्याची जन्मकथा थोडक्यात अशी आहे... *सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत.नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य-नारायण’ अस्तित्त्वात आला.* (संदर्भ : पंडित महादेव शास्त्री कृत भारतीय संस्कृती कोष) विरोधाभास पहा... *हिंदुत्ववादी एका बाजूने मुसलमानांचा द्वेष करतात आणि दुसरीकडे त्यांच्या पिराची पूजा मनोभावे करतात!* असो, पुरोहित वर्गाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या. स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला. थोडक्यात काय तर पेशवाईतील रमणा बंद झाल्यानंतरच सत्यनारायण चौखूर उधळला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सत्यनारायणाचा थोरामोठयांनी घेतलेला समाचार : - जेट जगदीश. (^j^)
1) *पंडित महादेवशास्त्री जोशी*  यांनी संपादन केलेल्या भारतीय संस्कृती कोषात स्पष्टपणे नोंदविले आहे कि, शंभर वर्षापूर्वी हे व्रत कोणालाही माहित नव्हते. पेशवाईतल्या कागदपत्रातदेखील सत्यनारायण पूजेचा उल्लेख आढळत नाही. विष्णूसहस्त्रनामात हि ते नाही. म.म.हरप्रसाद्शास्त्री यांच्या मते सत्यनारायण पूजेचा उगम प्रारंभीचे नाव सत्यपिरेरपूजा असे आहे. सत्यापिराला शिर्णी अर्पण करण्याची मुसलमानांची चाल बंगाली हिंदूंनी सत्यनारायणाच्या पूजेत स्वीकारली. सत्यपीर हा वृद्ध ब्राम्हणाच्या रूपाने लोकांना दर्शन देतो. अशा प्रकारच्या कथा ओरिसात प्रचलित आहे.
2) हे व्रत स्त्रियांना विहित नाही. पण सत्यनारायणाच्या कथेत मात्र लीलावती व कलावती या मायलेकींनी ते केल्याचा उल्लेख येतो. तशीच हि कथा सव्वाशे वर्षापूर्वी देशभर एखाद्या झंझावाताप्रमाणे पसरली. १८८६ साली प्रसिद्ध सनातनी पुढारी विश्वनाथ *नारायण मंडलिकां* ना पहिल्यांदा अशी पूजा एका ठिकाणी पहावयास मिळाली तेव्हा ते चक्रावून गेले. त्यांनी आपल्या कारकुनाला तातडीने पत्र लिहिले कि, माझ्या माहितीत गेल्या ४५ वर्षात अशी पूजा कधी पहिली नाही. ती या महिन्यात कोणी आणि कोणत्या आधारावर चालू केली ते कळवावे. बिचारा कारकून काय कळविणार होता. त्याच्या बुद्धीच्या व शक्तीच्या आवाक्याबाहेरची हि गोष्ट होती.
3) *भीमराव कुलकर्णी* यांनी या पूजेचा उगम सांगून या पोथीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हि कथा स्कंद पुराणातील रेवा खंडात असल्याचे सांगितले आहे. पण ती एक शुद्ध थाप आहे. स्कंद पुराणात हि कथा नाही. देवाची पूजा केल्याने मनात इच्छिलेले सारे मिळते. पण तिच्याकडे दुर्लक्ष केले तर देवाचा कोप होतो. अशा प्रकारच्या कथा या पोथीत आहेत. पण तीमध्ये सत्यनारायणाची कथा नाही. दिवंगत ह.रा.दिवेकर यांना कोकणात या पोथीचे एक हस्तलिखित मिळाले. त्या पोथीत त्यांना 'स्कंद पुराणे' ऐवजी 'स्कन्न पुराणे' असा उल्लेख आढळला. स्कन्न वाचणाऱ्या भटजीने स्कंद केला. 'पुर्वखंडचा' रेवा खंडे केला. म्हणजे सत्याच्या नावाने एक असत्य दडपून दिले यावर प्रा.रा. कुलकर्णी म्हणतात सत्यनारायण पोथी संस्कृत मधून लिहिणाऱ्या आणि हि पोथी स्कंद पुराणात आहे म्हणून सांगून तिला धार्मिक प्रतिष्ठा देणाऱ्या कोण अज्ञान ब्राम्हणाच्या शहाणपणाचे कौतुक जितके करावे तितके थोडेच आहे.
4) नारायण या देवतेचा उदय द्राविडी संस्कृती आणि बौद्धधर्म यांच्या संसर्गातुन झाला. तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्याही पेक्षा अव्वल म्हणून सत्यनारायण हा शब्द तयार करण्यात आला. त्याचा पुराणात काहीच आधार नाही. तसेच सत्यपिराचा सत्यनारायण झाला आहे. असे पुराणकथा व वास्तवता या ग्रंथात पृ.४१ म्हंटले आहे. बंगालमधील *रामेश्वर भट्टाचार्य* लिखित 'सत्यपिरेरकथा' (१९३०) या ग्रंथाच्या आधारे हे विधान केले आहे. हि सारी ऐतिहासिक साधने पाहता हे स्पष्ट होते कि, मुसलमानांच्या कथेला हिंदूंनी स्वीकारले.व आता तर ही पूजा त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग झाली आहे.
================================
सत्यनारायण : देव की दानव ? - सत्यानंद.
जो देव प्रसाद खाल्ला नाही म्हणून नौका बुडवतो आणि प्रसाद खाल्ल्यावर ती वर आणतो, त्याला देव तरी कसा म्हणावा ? असा जादूचे प्रयोग करणारा पोरकट देव कसा असू शकतो ? सत्यनारायण पोथीतील सर्व कथा अद्भुत आणि असत्य आहे हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. वंगध्वज राजा, साधुवाणी, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे... भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? आणि महत्वाचे म्हणजे जेव्हा लीलावतीने सर्वात प्रथम ही पूजा केली असेल तर तिने कोणती पोथी वाचली असेल आणि त्यात कोणती भाकडकथा असेल याचा मागोवा आजपर्यंत धार्मिकांना घ्यावासा वाटत नाही यातच त्याच्या हितसंबंधाचे इंगित आहे.
८ नोव्हेंबर १९५६ रोजी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक कार्यक्रम आहे, त्याला या, असे निमंत्रण *गाडगेमहाराजांना* मिळाले. ते गेले तर तिथे सत्यनारायणाची पूजा होती. संत गाडगेमहाराज जाम भडकले. ‘तुमचा हा सत्यनारायण बुडालेल्या नौका वर काढतो ना, मग मुंबई बंदराजवळ भारताची एक नौका आपल्या देशाचं सोनंनाणं घेऊन बुडालेली आहे ती बाहेर काढण्यास त्याला का सांगत नाही ? *निघाले सारे हापमॅड सत्यनारायण करायला*,’ असा जळजळीत टोला त्यांनी उपस्थितांना लगावला.
*प्रबोधनकार ठाकरेंनाही कुणीतरी सत्यनारायणाला बोलावले तेव्हा ते सत्यनारायणाचे हे थोतांड ताबडतोब बंद
करा असे गरजले.*  ‘संकटाचे निवारण करेल किंवा केले म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची तर आधी संकट आणलेच कसे यासाठी त्याची झाडाझडती घ्यायला हवी,सत्यनारायणाचे हे लफडे घराच्या बाहेर फेकून द्या,’इतक्या संतापाने त्यांनी सत्यनारायणावर हल्ला केला आहे. एकदाच नव्हे तर आयुष्यभर!
एवढे विचारमंथन होऊनही आपण अजूनही (अ)सत्यनारायणाच्या पूजा घालतो आहोत. याला शहाणपणा म्हणावा की मुर्खपणा ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सत्यनारायणाच्या पूजेचा ताळेबंद - लेखक : सत्यानंद.
ज्याने कोणी महाभागाने ही सत्यनारायणाची पूजा व पोथी तयार केली , त्या व्यक्तीला अर्थशास्त्र व मानसोपचार शास्त्र यामधील नोबेल दिले पाहिजे, इतका त्याने सुंदर अभ्यास या अडाणी व अंधश्रद्धाळू बहुजनांच्या मानसिकतेचा करून भट नामक गुरुजींच्या प्रपंचाची अंत्यंत योग्य व्यवस्था करून ठेवली.
ह्या सत्यनारायणाचा ताळेबंद खालील प्रमाणे :-सत्यनारायणाच्या पूजेला ५ फळे , खारीक, खोबरे , बदाम , हळकुंड , सुपाऱ्या, नारळ इ.  साहित्य लागते . आता गंमत पहा... पोथीत सांगितल्याप्रमाणे चौरंगावर एक  वस्त्र अंथरायचे (हल्ली ब्लाऊज पीस , किंमत किमान २० रुपये) त्यावर अर्धा किलो गहू किवा तांदूळ मांडायचे. त्यासमोर विड्याच्या पानात ५ रसाळ फळे व इतर फळे मांडायची. गव्हावर कलश व नारळ ठेवायचा. पोथीत सांगितल्याप्रमाणे सव्वा पावशेरच्या हिशोबात रवा , साखर , साजूक तूप , दूध , केळे घालून प्रसाद करायचा वगैरे . या प्रमाणे पूजेची मांडणी सुरु होते, आणि सत्यनारायणाच्या पोथीतीळ अद्भुत कथेच्या वाचनानंतर संपते.
आता सुरु होतो अर्थशास्त्राचा अभ्यास. पूजा झाल्यानंतर यजमान गुरुजीला ५०० रुपये किंवा ऐपतीप्रमाणे कमीजास्त दक्षिणा देतो व त्याच्या पायावर डोके ठेवतो . घरातील गृहिणी एक वाटी शिरा व शिधा (पीठ , मीठ , तेल , डाळ , गुळ इ.) देते.  गुरुजी हे घेऊन घरी जातो , दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून पूजेत मांडलेले वरील सर्व साहित्य घेऊन घर गाठतो.
आता विचार करा, गुरुजींनी रोज एक पूजा केली तरी त्याचा मुलगा रोज किमान अर्धी वाटी साजूक तुपातला शिरा, रसाळ फळे, १ बदाम, गूळ , खोबरे खातो , गुरुजीच्या बायकोला रोज शिधा , १/२ किलो गहू किवा तांदूळ व १ ब्लाऊज पीस मिळते. इकडे बहुजनांचं पोरगं रोज सकाळी भाकरी चघळतं . कारण ती भाकरी शिळी असते व कडक झालेली असते . आमच्या गरीब शेतकऱ्याच्या वयात आलेल्या मुलीला अंगभर कपडे नसतात . मात्र गुरुजीची बायको महिन्याला मिळणारे ३० ब्लाऊजपीस (दररोज एक याप्रमाणे) विकून मुलीला दर महिन्याला नवीन कपडे घेऊ शकते.  गुरुजीला रोज दक्षिणेपोटी मिळणारे 100 ते 1000/2000 पर्यंत मिळणारे रूपये व पूजेत टाकलेले किमान ५० रुपये मिळतात... तेही आरामात, कष्ट न करता... किंवा कुणालाही न काळणाऱ्या तथाकथित धर्मशास्त्राच्या बडबड करण्याचे... पोपटपंची करण्याचे! मात्र आमचा आडाणी बहुजन शेतकरी २०० रुपयांच्या मजुरीपोटी सतत उन्हातान्हात राबत असतो.
*बहुजनहो , मला सांगा की तुम्ही कधी हडकुळा , पोट आत गेलेला भटजी कधी पाहिला आहे काय हो ? आणि ढेरपोट्या शेतकरी कधी पाहिलाय काय ?*
आता काही जण म्हणतील आम्ही रोज सत्यनारायणाची पूजा घालत नाही . बरोबर आहे, पण बाबा तू वर्षातून एकदा त्या सत्यनारायणाकरिता  २००० रुपये खर्च करतोच ना ? आणि असे खर्च करणारे शेकडो तथाकथित धार्मिक असतातच ना ?. त्यापेक्षा त्या पैश्यातून आपल्या मुलाला चांगली पुस्तके, सकस आहार देता येणार नाही का ? किंवा एखादा विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला किमान शालेय शिक्षण नाही का देता येणार ?
आम्हाला कोणत्याही जातीवर टीका करायची नाही . मात्र अडाणी व अंधश्रद्धाळू बहुजनांना या मानव निर्मित आणि अंधश्रद्धा पासारवणाऱ्या सत्यनारायणाचा खरा अर्थ समजावा यासाठी हा खटाटोप.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌞आधुनिक कथा ही सत्य नारायणाची🌞
     लेखक - सत्यानंद.
  
ऐका सत्य नारायणाची कथा...
दूर होतील आता तुमच्या व्यथा,
21व्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा।।
हा! हा!! हा!!! 😜😜😜😝😝😝😇😇😇
पुण्यात एक प्रतिष्ठीत ब्राम्हण पंडित होते, त्यांची एक विधवा मुलगी होती.नाव तिचं सत्या. ती विधवा असल्यामुळं फारशी चारचौघात मिसळत नसे. तिचे ब्राह्मणाने मुंडण केलेले होते.
तरीही ती खूप सुंदर दिसत  होती ,आणि मुख्य म्हणजे तरुण होती .सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी होता , बागकाम करायला. फावल्या वेळेत इतर कामात मदत करायचा. त्याच नाव होतं नारायण. त्याची ये जा घरात चांगलीच होती. या कामाच्या येण्याजाण्यात त्याची अपघातानं या कन्येशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. आगीजवळ लोणी आलं अन ते वितळलं. तिला दिवस गेले ,पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता. कारण विधवेकडे लक्ष कोण देतो ? हे दुर्लक्ष महाग पडलं . ब्राम्हणाचा नाईलाज झाला . त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं, आणि नारायणाला मारुन टाकलं .
इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले,एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला . ब्राम्हणानं ते बाळ उचललं आणि परसदारी नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुंध्याशी ठेवलं . ते रक्तानं माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्तानं माखली . ब्राम्हणाला वाटल, कुणी श्वापद येऊन ते बाळ खाऊन टाकील आणि आणखी पाप
होण्यापासून आपली सुटका होईल . पण झालं उलटच! ते बाळ थंडीमुळं आणि चिलटं चावल्यामुळं  व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं . त्या चिमण्या आवाजानं आसमंत जागं झालं . काही लोकांना आवाज आला . कुणाचं बाळ इतक रडतयं हे पाहाण्यासाठी लोक जमू लागले . पहाट झाली . सगळा गाव गोळा झाला . इकडे ब्राम्हणाला कुणकुण लागली. काहीच घडलं नाही अशा अविर्भावात ब्राम्हण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला केळ व्यायली, केळ व्यायली!केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला!! चमत्कार झाला!!! भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला. कारण केळीवर रक्ताचे डाग होतेच. लोकांनी बाळाला उचललं.कपड्यात गुंडाळलं . पण बाळ रडायचं काही थांबेना . कारण बाळ भुकेजलेल होतं .
आता बाळाला दुध कोण पाजणार  ? मग ब्राम्हणानेच युक्ती सुचवली . म्हणे गावात दवंडी पिटवा , जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बालक दिलं जाईल. दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली . पण असा कसा कुठल्याही बाईला पान्हा फुटेल ? गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या . बाळ काही रडायचं थांबत नव्हतं . शेवटी शोध सुरु झाला कुणी बाई राहिली आहे का ? कुणीतरी सुचवलं की ब्राम्हण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे. तिला तरी आणून बघा . मग तिला बोलावण्यात आलं. तिनं बाळाला जवळ घेताच बाळ गप्प झालं. झाsssलं!उध्दार झाला ब्राम्हणाच्या पोरीचा! मग त्या अनौरस दिव्य बालकाचं नाव ठेवले गेलं, *सत्या + नारायण =सत्यनारायण!* केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून सत्यनारायण चार केळीच्या खांबामध्ये ठेऊन पुजला जातो . अशी हि साठाउत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
××××××××
मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराणकथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची कल्पना यावी. हा पगडा एवढा जबरदस्त आहे की, अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात.कारण पुरूषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे. अशा कथांतून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटूंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते.
......आणि लोकांना get togather करण्यासाठी अशा भंपक आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कारणांची गरज का वाटावी ? सगळ्यांच्या सोईचा दिवस बघून निरालसपणे एकत्रित भेटीगाठी घ्यायाला काय हरकत आहे ? त्यासाठी (अ)सत्यानाराणाचे निमित्त कशाला हवे ? सु(?)शिक्षितांनीच अशा फालतू सबबी सांगायला सुरुवात केल्यामुळेच त्यांच्या मागे बहुजन गतानुगतीक होऊन तेच करत आले आहेत. परिणाम अंधश्रद्धा वाढतच राहातात. तेव्हा स्वतःला शिक्षित म्हणवणाऱ्यांना आता सुशिक्षित व्हायची आवश्यकता आहे.
म्हणून मित्रांनो, आतातरी डोळे उघडा.आख्खा हिंदू धर्म भटांच्या थोतांडांनी ,खोट्या भंपक कथांनी विकृत झालाय, हे समजून घ्या. आणि कर्मकांड टाळा. नशीबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. वैज्ञानिक सृष्टी जशी आपलीशी केलीत तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल. - जगदीश काबरे. (^j^)
###########################
एका महापुरुषाचे कीर्तन
डोळे उघडा....आणि नक्की वाचा…
महाराज - तुमी धार्मिक लोकं,पुजापाठ करता की नाई ?
भक्त मंडळी - हो..
महाराज - मंग लगन झालं की,घराच्या वास्तूशांतीले सत्यनारायण करता की नाई?
भक्त मंडळी - हो..
महाराज - सत्यानारायणाची कथा वाचता की नाई ?
भक्त मंडळी - हो..
महाराज - काय हाये त्या पोथीत ?
भक्त मंडळी -........ (शांत)
महाराज - अरे सांगाना.....
बरं जाऊ द्या, मीच सांगतो...
साधूवाण्याची बायको लिलावती अन् तिची लेक कलावती याईचे नवरे म्हणजे सासरे जावाई दोघई व्यापार कराले जातात.त्याईची वाट पायता पायता ते लवकर वापस याव म्हणून दोघीजणी सत्यनारायण करतात.ते वापस आल्याचं समजताच कलावती प्रसाद घ्याचा इसरते व धावत नवऱ्याच्या जहाजाकडे जाते.पण देवाले प्रसाद घेतला नाई म्हणून राग येते व तो जहाजच बुडुन टाकते,तेच्यातल्या माल व माणसाई सकट..
मंग आकाशवाणी प्रमाणं ते प्रसाद घेते तं नवऱ्या सकट जहाज वर येते..
अशीच हाये ना कथा ?
भक्त मंडळी - व्हयं महाराज..
महाराज - आता मले सांगा की, सत्यानारायणाची पुजा म्हणून तुमी लिलावती अन् कलावतीची कथा वाचता,त्याले पोथी म्हणता तं मंग कलावती अन् लिलावतीनं सत्यानारायण केल्ला तवा कोणती पोथी वाचली असन ?
भक्त मंडळी -......(शांत)
महाराज - आता काहुन दातखई बसली ?
बरं ते जाऊ द्या..संतवचन हाये, "दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती."आता या संतवचनापरमाणं सत्यनारायण देव हाये का?
लय मयन्यानं त्या तरणीचा नवरा वापस आल्यावर ते नवतरणी लय खुस झाली.त्या खुसीत भक्तीभावानं पुजा केल्यावर परसाद घ्याले विसरली तं तीची पुजा विसरुन प्रसादासाठी तिचा नवरा जहाजासकट बुडवणाऱ्यासत्यनारायणाजवळ दया,क्षमा,शांती दिसते काय?
भक्त मंडळी - ......(शांत)
अरे पोथीत लिवलय ना , सत्यनारायण केला की नाव वर येते ? मंग आता करा सात्यनारायण आणि सोनं घेऊन येनारी बुडालेली नाव वर काढा! आपल्या देशाला लई सोनं भेटन ! देशाच भलं होऊन जाईल ! प्रसाद खाल्यानं जर जहाज वर येत असतीन तं समुंदराच्या काठावर मोठ्ठा सत्यनारायण करा अन् लढाईत डुबलेले जहाजं वर काढुन दाखवा...
पण एकाई भटजीले हे जमलं नाई अजुन.. …
ह्यावर लोक गप्प बसायचे. मग ह्या गप्प बसलेल्या लोकांना गाडगे महाराज डिवचून म्हणायचे -
'काउन रे एका सत्यनारायणान होत नाही काय ? मंग दहा दहा सत्यनारायण घाला ! धा सत्यानारायनान होत नसन तर दहा हजार सत्यनारायण घाला ! इथून सत्यनारायण पावत नसन तर ममैय (मुंबई) च्या समुद्राजवळ जा … पैसे मी देतो … तिथ सत्यनारायण करा पण बुडालेली नाव वर काढा !' अस म्हटल्यावर लोक गप्प बसायचे … मग चिडल्याचा आविर्भाव आणून म्हणायचे, - ' दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी ! तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता ? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता ? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता ?' …  'चालले बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले ! मंग ज्याच्याजवळ देवाचे गुणच दिसत नाई तो देव कसा असन?
बापहो हे सारं थोतांड हाये.
तुमच्या कष्टाच्या पैशानं लेकराईले काजू बदामा नाई खाऊ घालत,अन् सत्यनारायणाच्या नावानं दान करता.अरे हा तं लुटाचा धंदा हाये..
तुकोबा म्हणतात, "कथा करोनिया द्रव्य देती-घेती,तया अधोगती नरकाती"
कथा वाचुन जर दक्षिणेच्या नावानं धनधान्याची देवघेव केली तर नरकात जासान..
लक्षात घ्यारे मायबापहो तुकोबाचं सांगणं...
इति गाडगेबाबा

No comments: