वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा. – जेट जगदीश
निरीक्षण, तर्क, कारणमीमांसा, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!
डॉ. जयंत नारळीकरांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’ ची सविस्तर व्याख्या केलेली आहे, ती अशी... ‘वैज्ञानिक दृष्टिकोन ही शारीरिक व मानसिक अवस्था होय की, ज्याद्वारे योग्य कृतीला दिशा मिळून जीवन जगण्याच्या पध्दती सुलभ होतील. मानवी प्रगतीच्या मार्गातील लहानमोठे अडथळे दूर करण्याचा तो एक शास्त्रशुध्द विचार आहे. सजीव, घटना, पध्दती या सर्वांबद्दल केलेली विधाने सत्य की असत्य योग्य वा अयोग्य हे निरीक्षण करून अनुभवाद्वारे चिकित्सक बुध्दिने त्याची कारणमिमांसा करूनच मान्य अगर ग्राह्य धरायची, अन्यथा नाही आणि या विशिष्ट दिशेने प्रेरित होऊनच कार्यरत राहण्याची कष्टसाध्य साधना यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात.’
एवंच वैज्ञानिक दृष्टीकोन माणसाला विवेकी बनवते. असा माणूस कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. लोकांशी सौहार्दाने वागायला देवाधर्माची गरज त्याला लागत नाही. कारण विवेकामुळे ऋजुता हा त्याचा स्थायीभाव बनतो. तसेच तो प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करून मगच निर्णय घेतो, त्याचबरोबर त्याचे होणारे परिणाम स्वीकारायलाही तयार असतो. अपयश आले तर परखड आत्मपरीक्षण करून स्वतःच्या चुका दुरुस्त करतो. थोडक्यात चुका स्वीकारायला घाबरत नाही. परिणामी तो स्वतःची प्रगती तर साधतोच पण त्याच वेळेस समाजालाही आपल्या विचारांनी प्रगतीपथावर नेतो. एकदा का वैज्ञानिक दृष्टीकोनाने माणूस जगायला लागला की, एवढे बदल त्याच्यात घडतात.
म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली माणसे विवेकवादी असतात, त्यामुळे ती सदाचारी असतातच. पण एक लक्षात घ्यायला हवे की, नैतिकता, सदाचार ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत. कारण भारतात जी नैतिकता समजली जाते असेल ती अमेरिकेत असेलच असे नाही. एवढेच कशाला चोरांच्या दोन टोळ्या एकमेकांशी प्रामाणिक असतात म्हणजे त्या आपसात नैतिकता पाळतात. पण तुमच्यामाझ्या दृष्टीकोनातून चोर मुळातच अनैतिक असतात. म्हणजे त्यांची नैतिकता ही आपल्यासाठी अनैतिकता झाली. ह्याचा अर्थ नैतिकता ही सापेक्ष संज्ञा झाली. विज्ञान मात्र नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण निसर्गात एकाच नियमाने जाणारे असते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली माणसे काळाबरोबर पावले टाकत काळाचा शोध घेणारी प्रगतीशील माणसे असतात.
तर्कशुद्ध विचार व विश्लेषण करण्याची रीत हा विज्ञानाचा गाभा आहे. कोणी व्यक्ती, ग्रंथ, विचारप्रणाली सांगते म्हणून मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तर जी बाब प्रयोगाने सिद्ध करता येते, जी तर्काच्या आधारावर टिकते, तीच मी स्वीकारेन हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांमध्ये रुजविणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे, असे भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१क आपल्याला सांगतो. एकविसाव्या शतकातही आपल्या देशात देवदासीसारख्या परंपरा टिकून आहेत. जात्याभिमानाच्या किंवा चेटूक केल्याच्या विकृत कल्पनांमधून येथे हत्या, नरबळीच्या घटना घडतात. ग्रहण, मासिक पाळी यांसारख्या नैसर्गिक घटनांबद्दल सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात आजही जुनाट कल्पना ठाण मांडून आहेत. या सर्व बाबी आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नसल्याच्याच द्योतक नव्हेत काय?
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. संशोधन, नवी ज्ञाननिर्मिती यांचा वेग आधी मंदावला, नंतर थंडावला. हे वास्तव आपण मान्य केले तर आपण वृथाभिमानाच्या सापळ्यात सापडणार नाही. त्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला मदत करील.
वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते, पण वैज्ञानिक हा हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो, त्याला प्रलोभने भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. विज्ञानाचा विकास हा वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो. त्याचा गाभा मानवकेंद्रित व सर्वजनहित हा आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल अंधश्रध्देकडून विज्ञानाकडे होऊ शकेल.
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी आवश्यक काय? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायला हवा असे वाटत असेल तर –
1. विज्ञान ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ हे निषिद्ध मानते.
2. विज्ञानात अंतिम सत्य नसते, पण त्याचाच शोध सतत चालू असतो.
3. प्रत्येक शोध लागेपर्यंत विज्ञान त्याचा उलगडा करते, तेवढेच ते सत्य, तेवढ्यापुरतेच सत्य. त्या पुढचा शोध लागला की सत्य बदलते. शोधाचे महत्त्व कमी होत नाही पण विज्ञान उलगडण्याचा एक टप्पा पुढे जातो.
4. एखादी घटना वैयक्तिक असली तरी तिचा सार्वत्रिक पडताळा घेता येत असेल तरच विज्ञान ते सत्य मानते.
5. चिकित्सक डोळस प्रमाणित rational दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.
6. कुटुंब व्यवस्था – जिथे घरातल्या सर्वांचा विचार करीत नाहीत, कोणातरी वडीलधार्याच्या हुकुमाप्रमाणे कौटुंबिक व्यवस्था चालते, तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक रचना नाही.
7. समाज रचना – समाजरचना खुली हवी – एकमेकांच्या मतांचा आदर करणारी हवी.
8. आर्थिक स्थिती – समाजाची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर, जीवनावश्यक सर्व गरजा भागत असतील तरच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक वातावरणाची निर्मिती समाजात होते.
थोडक्यात काय तर...
1. वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो.
2. असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो.
3. वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
4. वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
5. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.