Friday, March 27, 2020

नास्तिकांना_चपराक ❓❓❓

*नास्तिकांना_चपराक ❓❓❓*
*अश्या प्रकारे दिशाभूल करणारा मेसेज फिरत आहे.*

या साठी काही मुद्दे मांडले आहेत त्यांची उत्तरे खालील प्रमाणे...

⭕ मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही.

*✅उत्तर: आज तरी मेडिकल सायन्सकडे कोरोनावर उपाय नाहीत, पण भविष्यात मात्र त्याच्यावरील उपाय फक्त आणि फक्त आधुनिक विज्ञानच शोधू शकते. होम हवन करून कोणताच शोध लागला नाही.*

⭕ आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

*✅उत्तर: स्वच्छतेच्या सवयी हा शिस्त आणि नितीशास्त्राचा भाग आहे. त्याचा धर्माशी काय संबंध? उठसुठ प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून आपण काय साध्य करू इच्छित आहात? फारतर त्याने धार्मिक अस्मिता जागरूक होईल. जर स्वच्छतेचे धार्मिक अंगाने एवढे महत्व होते तर गेल्या शतकापर्यंत पटकी, प्लेग आणि नारूच्या साथीने गावेच्या गावे रिकामी का झाली? विज्ञान प्रगत नव्हते तेव्हा हजारो लोकं विविध आजारांनी, साथींनी मृत्युमुखी का पडली, तेव्हा धर्म का उपयोगी पडला नाही. कारण धर्म वेगळा आणि स्वच्छतेचे शास्त्र वेगळे, हे लक्षात घ्या.*

⭕ कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

*✅उत्तर: कोरोना हा विज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे झाला या विधानाला कोणताही सबळ पुरावा नाही, सोशल मिडीया वर पसरणाऱ्या अफवांमुळे हा समज पसरला आहे.*

⭕ कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही ! विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ?

*✅उत्तर: कोरोना वर उपाययोजना म्हणून लोकं एकत्र भेटल्याने या विषाणू पसरू शकतो हे सिद्ध झाल्याने विज्ञानाने एकत्र येण्यावर निर्बंध लादले  आणि कोरोनाच्या भीतीने भक्त लोकांनी सुद्धा मंदिरात जाणे टाळले, तेंव्हा आमचा धर्म, आमचे मंदिर सामर्थ्यवान आहे, कोरोना आमचे काही वाकडे करू शकत नाही असे का कुणी बोलले नाही !  त्यामुळे कुठलीही दैवीशक्ती कुठलाही शोध लावू शकत नाही हे सत्य आहे.*

⭕ आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली जीवन शैली सोडून निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नःचिन्ह निर्माण झाले आहे.

*✅उत्तर: नमस्ते करणे हि फक्त हिंदूंची संस्कृती नव्हे तर बौद्ध, जैन, शीख सुद्धा नमस्कार करतात, हिंदू घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवत असत असे सांगितले जाते पण नुसते हातपाय धुवून नव्हे तर साबण लावून धुतल्यावरच रोगाला अटकाव होऊ शकतो हे विज्ञानाने सांगितले.*

*त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी विज्ञानाचे सर्व फायदे घ्यायचे मात्र सर्व क्रेडिट मात्र धर्माला द्यायचे हा दुटप्पीपणा धर्मान्धानी सोडावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा...*

*चला उत्तर देऊया - टीम*

माणसांमुळे निसर्गाचा तोल बिघडला आणि दोष मात्र विज्ञानाला?

स्वत:ला तथाकथित अतिव विज्ञानवादी नास्तिक म्हणवून घेणारे तर सगळ्यात मोठे स्वार्थी लोकं असतात. विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचं नाही आणि दोष देवाला द्यायचा ज्याला ही लोकं मानत नाहीत. 

*"दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी मंदिराचे दरवाजे लावून घेतले, पोलीस, हॉस्पिटल, डॉक्टर हेच खरे देव आहेत" ह्या आशयाचा मेसेज फिरतोय.*

*कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत!मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?* 

देवाने सांगितलं नव्हत डुक्कर खा, कुत्री, मांजर, किडे मकोडे, वटवाघूळ खा, देवाने सांगितलं नव्हत मांसाहार करा, देवाने सांगितलं नव्हत प्रदुषण करा, देवाने सांगितलं नव्हत निसर्गाचा नाश करा आणि स्वतःचा विकास करा.

1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे? तर काही नाही.👎 औषधच उपलब्ध नाही म्हणून 10000 हूनन अधिक बळी गेले, त्याला विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना !

2. आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

3. कोरोनाचा उद्भव कोणी केला? 
धर्माने तर निश्चित नाहीच.  तुमच्या त्याच तथाकथित विज्ञानाच्या अतिरेकी वापराचा जेनेटिकल मॉडिफाईड आणि अधर्मी अपवित्र आहार विहारांतून, विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

4. कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का? तर नाही ! बंद तर.. विमानतळे, बस-रेल्वे स्थानके, मॉल, शॉपिंग सेंटर्स, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, थिएटर्स, आदि विज्ञानाने शोध लावलेली ठिकाणेही सर्व बंद आहेत। मग त्याचा दोष कोणाला - देवाला?

4. तशीही मंदिरे सुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते का? तर नाही !

👉 *कोरोना मुळे मंदिरे बंद... असं म्हणणाऱ्यांसाठी*

☑️ *ह्या रोगाचा उगम कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर लक्षात येईल की मानवाने केलेल्या अनैसर्गिक चंगळवादी, अशुद्ध कृतींचा परिणाम म्हणजे असे आजार.*

☑️ *आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली पवित्र आचार विचारांची जीवनशैली सोडून अहंकाराने निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.* 

☑️ *दवाखाने झालेले आजार बरा करतात, परंतु असे आजारच होऊ नये याचे शिक्षण हिंदू जीवनशैली देते आणि ही जी मंदिरे बांधली जातात ती असे पवित्र ज्ञान प्राप्त करण्याची ठिकाणे असतात. आपला आहार, विहार कसा शुद्ध व पवित्र असावा? योग, ध्यानसाधना, सूर्यनमस्कार का करावेत? यासाठी, आरोग्यपूर्ण जीवनासाठी हिंदू जीवनशैलीने दिलेली ही देण आहे.*

☑️ *हिंदू संस्कृतीने शिकवलेले प्रत्येक मूल्य, प्रत्येक कृतीत खूप मोठा अर्थ लपलेला आहे.

हस्तांदोलनापेक्षा पेक्षा हात जोडून नमस्कार कधीही चांगला, हे आता जगाने मान्य केलंय. म्हणून आपली संस्कृती विसरू नका नाहीतर फक्त दवाखानेच उरतील.*

☑️ *शाळा, दवाखाने, संशोधन केंद्रे जरूर उभारावीत ती काळाची गरज आहेच. पण याचा अर्थ असा नाही की मंदिर नको. मंदिरे शुद्ध जीवन, आचार विचार शिकण्याची केंद्रे आहेत.*

☑️ *चुकीचे मेसेज पसरविण्यापेक्षा निसर्गाचे संवर्धन करा, सुंदर हिंदू जीवनशैलीचे आचरण करा आणि त्यात आपले योगदान द्या.*

राहिला प्रश्न मंदिरांचा तर नित्य पुजा, आरती, हवन सगळ काही सुरळीत सुरू आहे फक्त मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये आणि रोगाचा प्रसार होऊ नये त्यासाठी खबरदारी म्हणून ह्या उपाययोजना केल्या जातात एव्हढी साधी अक्कल नसेल तर कसले intellectual तुम्ही!

आणि पोलिस, हॉस्पिटल यांच्यातच काय तर मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवा मधे ईश्वर आहे अस आमचा हिंदु धर्म शिकवतो त्यामुळे आम्हाला ज्ञान कोणी शिकवूच नका!

आपलेच काही येडे हिंदु व्हॉटसअप वर कुठलाही मेसेज त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी न घेता फॉरवर्ड करत असतात आणि आपण जगापेक्षा वेगळे आहोत अस भासवतात. 

*या मेसेजला उत्तम जोगदंडांनी दिलेले उत्तर...*

१)'विज्ञानवादी आणि नास्तिक लोक सगळ्यात मोठे स्वार्थी असतात' असे एक सरधोपट वाक्य या वरील पोस्टमध्ये आहे. ते जाणीवपूर्वक बुद्धीभेद घडविण्यासाठी फेकलेले असते. त्यांच्या मते विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचे नाही हा तो स्वार्थ. मुळात विज्ञान हे निसर्गाची रहस्य शोधून काढते आणि त्याचा उपयोग सजग माणसे मानवी कल्याणासाठी करतात. त्यामुळे विज्ञानवादी व्यक्ती या मानवतावादी देखील असतात. मात्र या शोधांचा वापर कसा करावयाचा हे त्या वापरणाऱ्यावर अवलंबून असते. त्यात विज्ञानाचा काय दोष? अणूच्या शक्तीचा शोध लावणारा आईनस्टाईन (विज्ञानवादी) हा अणूबाँबचा वापर केला जावू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत होता.आणि पोखरणमध्ये अणूचाचणी यशस्वी झाली तेव्हा 'आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवता येईल' म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटणारी युद्धखोर मानसिकता असणारेच विज्ञानाला शिव्या देण्यातही पुढे असतात. विज्ञानाने लावलेल्या शोधांचा पुरेपुर वापर करत विज्ञानालाच दोष देणे ही या दुटप्पी भोंदूंची खासियत असते. संस्कार, सत्संग चँनल बघितले की याचा प्रत्यय येतो.

२)'दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी दरवाजे लावून घेतले' या आशयाची पोस्ट विज्ञानवादी किंवा नास्तिक व्यक्तीची नाही. तर तो अग्रलेख आहे "सामना" या वर्तमानपत्राचा.आणि सामना हे प्रखर हिंदूत्ववादी पक्षाचे मुखपत्र आहे.

३)कोरोना विषाणू हा जैविक युद्धासाठी बनविलेला होता असा आरोप निराधार आणि गैरसमज पसरविणारा आहे. युद्धाची मानसिकता ही मानवतेविरोधीच आहे. पण दररोज ऊठसूट पाकिस्तान विरोधी भडक वक्तव्ये करणाऱ्यांचे समर्थन हीच मंडळी करतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे पाखंडीपणाचे आहे.

४)यात मांसाहाराबाबत देखील अवैज्ञानिक नोंदी आहेत. खरेतर चीनमधल्या मासळी बाजारातून या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. पण या प्राणी, किटकांच्या यादीतून मासे सोयिस्कररित्या वगळले आहेत. कारण भारतातील कोकणासह द.भारत, प.बंगाल येथील बहुसंख्य लोकांचा मासे हा प्रमुख आहार आहे. अगदी धर्माच्या ठेकेदारांचा सुद्धा.(by the way माझे कुटुंब पूर्णतः शाकाहारी आहे.) महत्त्वाचे ज्या हिंदू संस्कृतीच्या पवित्र आहार-विहाराबद्दल येथे फार गौरवोद्गार काढले आहेत ती *वैदिक संस्कृती शाकाहारी नव्हतीच. यज्ञामध्ये विविध प्राण्याचे अगदी घोडा, गायी यांचे बळी दिले जात व त्याचा भोजनात वापर होई. याचे कितीतरी पुरावे वेद, पुराणात मिळतात.* जे बाबासाहेबांनी रिडल्स ऑफ हिंदूइझममध्ये दाखविले आहेत. खरेतर यज्ञांमधील हिंसेचा विट येऊनच या देशात बुद्ध आणि जैन हे अहिंसावादी तत्वज्ञान विकसित झाले हा इतिहास आहे. पण खोटा इतिहास सांगण्यातच आमची कर्तबगारी आहे. 

५)मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे काय उत्तर आहे? असा एक शाहजोग प्रश्न यात आहे. सध्या जी काळजी आपण घेतोय आणि मास्क(जे देवाच्या मूर्तींना देखील लावले) सेनेटायझर, वैद्यकीय उपचार वापरतोयत ती सारी विज्ञानाची देन आहे. आणि जगभर जे संशोधन सुरू आहे ते सुद्धा वैज्ञानिकच करीत आहेत. तथाकथित प्रवचनकार, पाद्री, मुल्ला- मौलवी किंवा गायींचे धर्मरक्षक नाहीत.

६)आज जी काळजी घेण्यास सांगितले जाते, ते धर्म आधीच सांगत होता हे आपल्यालाच कुरवाळण्यात धन्यता मानण्यासारखे आहे. धर्मातील चांगल्या गोष्टींचे स्वागतच आहे. पण आम्हीच खरे आणि श्रेष्ठ असे म्हणण्यात इतरांना हिणविण्याचा अभिनिवेश असतो. आपले सर्वच खरे तर त्या काळात, देवीच्या रोगाला देवीचा कोप म्हणणाऱ्यांनी लसीकरण करायलाच नको होते. आणि सर्वधर्मिय धर्मगुरुंनी प्लेग सारख्या रोगांवर अंगारे-धुपारे करीत बसायला हवे होते.
आख्ख्या जगाला योग शिकवणारे रामदेव बाबा परदेशात जाऊन स्वतःवर उपचार करुन आलेच ना? मंदिरातील नित्य पूजेला विरोध असण्याचे कारण नाही. उपासनेचे स्वातंत्र्य संविधानानेच दिलेले आहे. पण कोणताही धर्म सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था याच्या आड येत असेल तर त्या धर्माचा संकोच करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिला आहे. तूर्तास एवढेच.

Sunday, March 15, 2020

वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच

_वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच_
(^m^) (^j^) (मनोगते)

अंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्व म्हणजे आपल्या ३३ कोटी देवांच्या राहण्याची जागा, एवढीच अंतराळ या विषयातील आपली समज भाबडी आणि मूर्खपणाची असल्याने या क्षेत्रात घडणाऱ्या कुठल्याही घडामोडींशी बहुतांश भारतीयांना काही देणंघेणं नसतं. त्यामुळेच भारताने जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल) अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं काय महत्त्व आहे, हेसुद्धा अनेकांना माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. राजकारण्यांच्या भानगडी, सिनेस्टारची लफडी आणि क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चर्चा हा या देशाचा कायमस्वरूपी उद्योग असल्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन माहिती घेण्याची तसदी तशीही येथे कोणी घेत नाही. वैज्ञानिक प्रगतीचा लौकिक आयुष्य सुखकर करण्यासाठी पुरेपूर फायदा घ्यायचा. मात्र आपल्या विचारपद्धतीत विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टिकोनाला चुकूनही स्थान मिळू द्यायचं नाही, हे आपलं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य.

अशा वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय ‘निरुत्साही’ असलेल्या या देशातील वैज्ञानिक मात्र एका निष्ठेने व सातत्याने आपलं काम करत असतात. पण तेही भारतीय मानसिकतेत वाढल्यामुळे स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेतानाही इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन सारखे इस्रोच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेअगोदर प्रक्षेपण यानाची प्रतिकृती तिरूपती बालाजीच्या चरणी वाहतात आणि प्रार्थना करतात. बालाजीमुळे इस्रोच्या मोहिमा यशस्वी होतात, असं त्यांना मनोभावे वाटतं. आता तिरूपतीचा बालाजीच जर इस्रोची मोहीम यशस्वी करणार असेल, तर इस्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची काय गरज? मोहीम यशस्वी झाली, तर बालाजींनी केली मग गेल्या दोनवेळा अपयश आलं, ते कोणामुळं आलं? अर्थात असे प्रश्न आपल्याकडे कोणालाही पडणार नाही. हे असं वागणं हे त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, असं सर्मथन केलं जाईल. यात काहीही चुकीचं नाही, त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, असं ठासून सांगितलं जाईल.

इतर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने हे केलं असतं, तर समजून घेता आलं असतं, पण अंतराळ संशोधन संस्थेचा प्रमुख हे असं करतो, याचं मोठं आश्चर्य वाटतं. अर्थात, यातही नवल काही नाही. असं करणारे आणि असा विश्वास बाळगणारे राधाकृष्णन हे काही पहिले शास्त्रज्ञ नाहीत. ज्यांचा आपण सारेच आदर करतो ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रपर पुस्तकात अनेकदा अज्ञात शक्तीचे आभार मानले आहेत. ही अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, विज्ञानविरोधी असली तरी तो आपल्या संस्काराचाच भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा अविभाज्य घटक आहे, हे येथे समजून घ्यावे लागते. 

सर्वसामान्य भारतीय माणूस असो वा शास्त्रज्ञ, त्याने आपल्या मेंदूचे दोन टप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्याने तो विज्ञान शिकतो. प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो. त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो. वैज्ञानिक म्हणून मान्यता प्राप्त करतो. इस्रोचा प्रमुख होतो. अंतराळ संशोधन संस्थेत मानाचं पद प्राप्त करतो. त्यावर पोट भरतो. मानसन्मान मिळवितो. राष्ट्रपतीही होतो. मात्र ज्यामुळे तो हे सारं मिळवितो त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो मेंदूच्या दुसऱ्या कप्प्यात मात्र अजिबात शिरकाव करू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनाचं भाग बनविणे त्याला आवश्यक वाटत नाही. याचं कारण म्हणजे लहान असतानापासून त्याच्यावर झालेले संस्कार! 
‘विज्ञान जेथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. त्या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाही.’ वगैरे...वगैरे...!

राधाकृष्णन, डॉ. कलामांसारखे इतरही शास्त्रज्ञ असे का वागतात, याचं उत्तर लहणपणापासून पालकांनी मनावर बिंबवलेल्या कर्मकांडी संस्कारात आहे. उत्तर जरी मिळत असले तरी यातून लोकांमध्ये मेसेज मात्र अतिशय चुकीचा जातो. म्हणूनच निरक्षर सोडाच पण शिक्षित लोकही बरेचदा 'एवढे मोठे शास्त्रज्ञ, तेसुद्धा पाहा, सारं श्रेय देवाला देतात.' असे म्हणत आणि अशी उदाहरणं नवीन पिढीसमोर देत असतात. आपल्या वागणुकीतून वैज्ञानिक विचारांचा, तत्त्वज्ञानाचा अपमान होतोय, हे मात्र ना शास्त्रज्ञांच्या गावी असतं ना सामान्य लोकांच्याही. 

देव, दैव, नशीब, नियती, कर्मकांडाला प्राधान्य देणाऱ्या देशात हे असंच व्हायचं. आपण मात्र वैज्ञानिक जगतातील एकच म्हण लक्षात ठेवायची. ती म्हणजे, *‘न्यूटन जे सिद्ध करतो, तेवढंच महत्त्वाचं. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं.’*

विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान आणि अध्यात्म. (^m^)(^j^)(मनोगते)

मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. कृत्रिम अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे  बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारतोच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा ह्या वृक्षावर फुटल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगूळ उगवले आहे. ते बांडगूळ आहे अध्यात्माचे. नवल म्हणजे अनेक लोकांचे लक्ष त्या बांडगुळाकडेच वेधले आहे.

ह्याचे कारण आपला समाज एकूणच स्थितिशील आहे. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसाबरोबरच एक प्रकारचा बौद्धिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल चिंतन करणे, तर्काचा आधार घेऊन चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, स्वबुद्धीने विचार करणे इत्यादी बौद्धिक व वैचारिक ' क्रियां' चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. आणि म्हणूनच तो विज्ञानाच्या खडतर पण योग्य गंतव्याकडे नेणार्‍या मार्गाऐवजी काल्पनिक आणि फसव्या पण सोप्या व मोहक अशा मार्गाकडे वळतो. येथे त्याला आकर्षक आणि रंगीबेरंगी शब्दफुलांचे ताटवे दिसतात. त्यांनाच तो भुलतो व त्याच मार्गावर रेंगाळत रहातो. सत्य समोर उभे करणार्‍या विज्ञानाकडे मात्र पाठ फिरवतो. ज्ञानापेक्षा अज्ञानातच सुख वाटणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, स्पष्टतेऐवजी धूसरतेचे, गूढतेचे आकर्षण असणे हे भक्तांच्या जगतातील फार मोठे मायाजाल आहे.

विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोत काही मूलभूत फरक आहेत. ते असे...

1) जाणीव, निरीक्षण, चिंतन, प्रायोगिक परीक्षण, गणितीय पडताळणी इत्यादी सोपस्कारांमधून पार पडल्यानंतरच एखाद्या विचाराला विज्ञानात मान्यता मिळते. अध्यात्मात मात्र कल्पनेचे वारू चौखूर उधळत असतात. त्यामुळे वेगवेगळे तत्त्ववेत्ते वेगवेगळे-कित्येकदा परस्परविरुद्धही- विचार मांडतात. 
2) निखळ सत्य हेच विज्ञानाचे गन्तव्य असते तर अध्यात्म, कल्पनेलाच सत्य मानते. 
3) विज्ञानाला शब्दप्रामाण्य मुळीच मान्य नाही. एखादा विचार कितीही मोठ्या व्यक्तीने मांडलेला असो वा कोणत्याही ग्रंथात दिलेला असो, ठरावीक प्रक्रियेतून पार पडल्याशिवाय वैज्ञानिक जगात त्याला मान्यता मिळत नाही. अध्यात्माचे गाडे मात्र व्यक्तिमाहात्म्य वा ग्रंथमाहात्म्य यांचे संदर्भ घेतल्यावाचून पुढे सरकतच नाही. 
4) विज्ञान प्रत्येक बाबतीत पुरावा मागते. उलट, अध्यात्म आणि पुरावा यांचा छत्तीसाचा आकडा आहे.' बाबावाक्यम् प्रमाणम् 'हाच तेथे मूलमंत्र आहे.
5) विज्ञानात नेमके शब्द वापरले जातात. शब्दांचा फापटपसारा नसतो. कारण महत्त्व असते ते सिद्धांताला. शब्द हे माध्यम असते. उलट अध्यात्मात शब्दांचाच फुलोरा अफाट असतो. लोकांना ठोस असे देण्यासारखे काही नसल्यामुळे त्यांना शब्दांच्या भूलभुलैयातून फिरवून संभ्रमित केले जाते. शब्दावडंबराला अक्षरश: काडीचा आधार नसतो.
6) विज्ञानात शब्द हे केवळ साधन आहे तर अध्यात्मात शब्द हेच साध्य आहे. सबब ते काल्पनिक जगाची अनुभूती घेत शाब्दिक फुलोऱ्यानी फुलणारे शब्दप्रमाण्यवादी आहे, तर विज्ञान पुरावा तेवढा विश्वास मानणारे प्रमाणवादी आहे.

Saturday, March 14, 2020

देवाच्या अस्तित्वासाठी छद्म विज्ञानाचा आधार...




एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.' 

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर...

प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत? 

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना? 

वि. : हो सर...

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'

(विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर ...

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे? 

वि. : नाही सर... असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का? 

प्रो. : अवश्य ...

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच ...

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'

(वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु. 

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल .. 
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही....

(सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी
'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...

आज कलाम साहेबांसाठी मानाचा मुजरा...."" 

शिक्षकाला निर्बुद्ध समजणाऱ्या भंपक विद्यार्थ्याचा हुच्चपणा! नास्तिक शिक्षकाची ही तर्कहीन ओढूनताणून तयार केलेली कहाणी... 
त्याची कारणे पुढील प्रमाणे... 

1) ही कहाणी या आधी बर्‍याच कालावधी पासून अल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाच्या नावाने (आधी इंग्रजीत व नंतर त्याचे जसेच्या तसे मराठी, हिन्दी भाषांतर) प्रसारित करण्यात आली होती. ती अर्थातच खोटी होती हे आढळून आले. या कहाणीचा उल्लेख आइनस्टाइन च्या चरित्रात कुठेच आढळत नाही.  अधिक माहिती साठी पुढील लिंक वाचावी:  (http://www.snopes.com/religion/einstein.asp) आता तीच कहाणी आइनस्टाइन च्या जागी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव टाकून पुन्हा जशीच्या तशी प्रसारित करण्यात येत आहे. या वरून ही खोटी कहाणी नाव बदलून पुढे रेटून (खोटे बोल, पण रेटून बोल) प्रसारित करणार्‍यांचा ‘हेतु’ लक्षात येतो. आपल्या खोट्या कहाणी साठी अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान वैज्ञानिकास वेठीस धरायला खरे तर या कहाणीच्या लेखकास लाज वाटली पाहिजे. असो, तरीही या खोट्या कहाणीच्या पुढील भागाचा व त्यातील मुद्द्यांचा समाचार घेऊ या. 
2) या कहाणीतील नास्तिक शिक्षक (पुढे त्यास प्रोफेसर असे ही म्हटले आहे. कॉपी सुद्धा नीट केली नाही तर अशा चुका होणारच) हे पत्र स्वतःच्या सोयीसाठी लेखकाने ओढून ताणून तयार केलेले दिसते आहे. विद्यार्थ्याच्या काही बिनडोक प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही असे दाखवले आहे, ते केवळ लेखकाने तसे लादल्यामुळेच! तसेच आधी शिक्षकाने उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित ठेऊन, त्याच्या पुढे नवीनच प्रश्न (ते ही बिनडोक/अतार्किक) उपस्थित करून मूळ प्रश्नांस सोयीस्करपणे बगल दिली आहे.  
3) ईश्वराचे अस्तित्व आहेच हे पट‍वून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पंचेंद्रियांना (यात सूक्ष्मदर्शक, दुर्बिण व अन्य वैज्ञानिक उपकरणे सुद्धा येतात कारण अंतिमतः ही उपकरणे आपल्या ज्ञानेंद्रियांना सूक्ष्म/दूरस्थ/अन्य प्रकारांची जाणीव करून देतात)   ईश्वराची अनुभूति येत नाही म्हणून, तसेच ईश्वर ज्या कारणांसाठी मानला जातो तसे काही होत नाही म्हणून ईश्वर नाकारणार्‍या नास्तिक शिक्षकास उत्तर देतांना, आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी लेखकाने ‘हुशार’ विद्यार्थ्याच्या तोंडी उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची मकडापासून उत्क्रांती, व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी घालून, ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा आधार घेतला आहे. परंतु या गोष्टी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत कारण त्या इथे गैरलागू आहेत. कसे ते पाहू या. 
4) उष्णता-शीतलता : इथे उष्णता व शीतलता यांच्या व्याखेचा घोळ घातला आहे. शीतलता म्हणजे कमी उष्णता हे सांगून तापमानाची सापेक्षता सांगितली आहे. शीतलतेला दुसरे नाव देऊन ईश्वराचे अस्तित्व किंवा शीतलता अस्तित्वात नसणे हे कसे काय सिद्ध होते?
5) अंधार-प्रकाश : एक तर शिक्षकाच्या तोंडी जाणून बुजून चुकीची वाक्ये घातली आहेत. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे हुशार विद्यार्थ्याच्या तोंडी घातलेले योग्य असे वाक्य (जे मुद्दाम पेरलेले वाटते) त्याच्या नंतरच्या वाक्यांच्या अगदी विरोधी वाटते. ईश्वर ही मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी वस्तु नाही असे हा विद्यार्थी मानतो. पण वरील त्याच्याच उदाहरणाप्रमाणे (उष्णता-शीतलता, अंधार प्रकाश) जाणवणारा तरी हवा ना? तो कुठेतरी जाणवतो किंवा सिद्ध होतो असे एक ही उदाहरण किंवा पुरावा लेखकाने दिलेला नाही. 
6) मानवाची माकडापासून उत्क्रांती: यात उत्क्रांती कुणी पाहीली नाही हे सांगतांना विद्यार्थ्याचे घोर अज्ञान दिसून येते. उत्क्रांती ही अत्यंत धीम्या गतीने, हजारो/लाखो वर्षांत होत असते. म्हणूनच याला उत्क्रांती म्हणतात. एका जंगलातील माकडे दहा-पंधरा वर्षात लगेच माणसे होत नाहीत. हल्ली हायब्रिड पीक किंवा क्रॉस ब्रीड पशू ही याची उत्तम उदाहरणे आहेत. निसर्गात मात्र असे बदलाचे चक्र धीमेपणाने चालू असते. 
7) मेंदू: शेवटी हा विद्यार्थी क्लासला विचारतो की सरांचा मेंदू पाहीलाय काय?  त्याला स्पर्श केलाय काय, त्याची चव बघितली आहे काय? त्या वरून  विद्यार्थी निष्कर्ष काढतो की सरांना मेंदू आहे हे कसे मानायचे! हा तर त्या विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा कडेलोटच झाला! CT scan किंवा एक्स रे वगैरे उपकरणातून मेंदू पाहता येतो. अगदी त्या विद्यार्थ्याची कवटी फोडून सुद्धा मेंदू विद्यार्थ्यांना दाखवता आला असता. 

मनातील विचार, चुंबकीय शक्ति, विद्युत शक्ति इत्यादि बाबतीत केलेली विधाने सुद्धा लेखकाचे विज्ञानाच्या बाबतीत अज्ञान दर्शवितात. विज्ञानाविषयी उगीचच नन्नाचा पाढा वाचून देवाचे अस्तित्व कसे सिद्ध होऊ शकते याचा साधा विचार सुद्धा लेखकाने केलेला दिसत नाही.  

तर, उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची माकडापासून उत्क्रांती व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी पाहील्या किंवा अनुभवल्या जाऊ शकतात. तसे ईश्वराच्या बाबतीत अजून तरी शक्य झालेले  नाही. श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जशी पटते तशी श्रद्धा त्याने जरूर ठेवावी. परंतु ती दुसर्‍यावर थोपवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी बिनबुडाचे, अतार्किक व खोटे युक्तिवाद करू नयेत.

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन

श्रध्दा, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - - जेट जगदीश.

विज्ञान ही संकल्पना नसून निसर्गातील गुढे उकलण्याची आजपर्यंत मानवाला सापडलेली सर्वात उत्तम शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे विज्ञान हे निसर्गनियम शोधण्याचे मानवाला विचारांती मिळालेले एक साधन आहे... संकल्पना नव्हे.

एखाद्या वस्तूचे अस्तित्व निसर्गनियमाच्या पुराव्याच्या आणि तर्काच्या आधारे स्वीकारणे ही श्रद्घा नसून ते प्रमाणित ज्ञान असते, म्हणून वैज्ञानिक सत्याचा स्वीकार हे प्रमाणित ज्ञान आहे; श्रद्घा नव्हे. विज्ञान सतत बदलते असल्यामुळे वैज्ञानिक गृहितकेही बदलू शकतात. म्हणजेच विज्ञान हे नित्यनूतन असते, तर श्रद्धा आणि परंपरा ह्या धार्मिक बेड्या असतात, ज्या लोकांना विचार करण्यापासून परावृत्त करतात, आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', या गतानुगतिक मानसिकतेत जखडून ठेवतात. 

श्रद्घा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतील भेद पुढीलप्रमाणे सांगता येईल... 

(१) वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. 
(२) असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. 
(३) वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
(४) वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
(५) म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.

याउलट..........

(१) जेव्हा असत्याचा किंवा नसलेल्या अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो बौद्घिक स्वीकार नसतो, तर भावनिक इच्छाशक्तीचा भाग असतो. ती प्रश्न न विचारणारी निष्ठा असते. 
(२) श्रद्घेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. 
(३) श्रद्घेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात.
(४) श्रध्देय माणूस धार्मिक, नैतिक जीवनव्यवहारासाठी धर्माने आखून दिलेली आदरणीय तत्त्वे वा अस्तित्वे निष्ठेने स्वीकारतो.
(५) म्हणूनच श्रध्देय माणूस नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत आपल्या दोषांवर इतरांना दोषी धरत पांघरूण घालत असतो.

इंद्रियगम्य पुरावा आणि त्यावर आधारित तर्क यांनी प्रमाणित झालेली धारणा स्वीकारणे म्हणजे विवेक, असा विवेकवादी किंवा बुद्घिवादी सिद्घांत आहे. त्यानुसार केवळ वैज्ञानिक उपपत्तीच स्वीकारार्ह ठरतात आणि धार्मिक श्रद्घा स्वीकारणे हे तत्त्वत: अविवेकाचे, बुद्घिहीनतेचे लक्षण मानावे लागते. या दृष्टीने *सर्व धार्मिक श्रद्घा अंधश्रद्घा आहेत* म्हणून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी श्रद्धा आणि परंपरा यांंना टोकरत रहाणे हा बुद्धिवाद्यांचा कार्यकम ठरतो.

श्रद्घा ही संकल्पना लौकिक व्यवहारात आदर, निष्ठा, पूज्यभाव, बांधीलकी, इमानीपणा, भरवसा, विश्वास इ. व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरली जाते. श्रद्घेचा हा दुसरा अर्थ  म्हणजेच ‘ ईश्वर, प्रेषित, धर्मसंस्थापक, साक्षात्कारी व्यक्ती, शास्त्रग्रंथ, गुरु इत्यादींच्या वचनांवर दृढ विश्वास म्हणजेच आप्तवचनाचा, शब्दप्रामाण्याचा स्वीकार होय. धार्मिक समाजाची बांधणी याच श्रद्घेतून होत असते. हिंदू , बौद्घ, जैन, शीख, ज्यू , पारशी, क्रिस्ती, इस्लाम इ. सर्व धार्मिक समाज आणि पंथोपपंथ अशाच समान श्रद्घेने बांधलेले आहेत. 

बालपणापासून होणाऱ्या धार्मिक संस्कारांतून या श्रद्घा व्यक्तिच्या जीवनात मूळ धरतात आणि त्या तिच्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. या अर्थाने सर्व व्यक्ती श्रद्घामय असतात. आणि त्याचमुळे श्रद्धेय माणूस सतत चुकीच्या परंपरांचे समर्थन करत असतो. पण जसजशी व्यक्तीची वैचारिक क्षमता वाढत जाते तसतसे त्याला धार्मिक कर्मकांडातील फोलपणा डाचू लागतो. धर्माचे पोकळ तत्वज्ञान हे  मुठभरांच्या फायद्यासाठी सामान्यांचे शोषण करण्याचे हत्यार बनले आहे, हे त्याला कळू लागते. मग तो त्याविरोधात निडरपणे आवाज उठवून बुद्धिमांद्य झालेल्या समाजाला जागे करण्याच्या  प्रयत्नास लागतो. म्हणूनच हे ज्यांना जाणवले अशा आगरकर, हिंदुधर्मातील कर्मकांडांवर घणाघाती प्रहार करणारे समाजवादी विचारांचे  विवेकानंद, विज्ञाननिष्ठ सावरकर, र. धो. कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत श्रद्धा आणि परंपरांना टोकरत राहून समाजसुधारणा करण्याचे व्रत अंगिकारले होते. 

तेव्हा श्रद्धा आणि परंपरांना टोकरत बसणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे काय या प्रश्नाचे उत्तर *होय* असेच आहे. अर्थात हे अस्मिता गोंजारणाऱ्या धर्मांध आणि अंधभक्तांना पचणे कठीण असते म्हणून ते असे वरवर संयुक्तिक वाटणारे असंयुक्तिक  प्रश्न विचारत असतात.

Thursday, March 5, 2020

एका सुशिक्षिताची कैफियत

एका सुशिक्षिताची कैफियत : (^m^) (^j^) (मनोगते)

लहान मुलांचे वय वर्षे दोन/तीन पासून शिक्षणाचे माध्यम इंग्लिश केल्याने जाणवणारे दुष्परिणाम, ज्यांची व्याप्ती खूपच मोठी व गंभीर आहे ............
१) मुलांमध्ये मातृभाषे विषयी गोडी राहत नाही. त्यांना मातृभाषेतील लहानसहान शब्दही नीट येत नाहीत. त्याची नैसर्गिक मजा मुलांना अनुभवता येत नाही.
२) पालकांचा "घरी मराठी करून घेऊ, मातृभाषा तर आहे." हा विश्वास सार्थ ठरत नाही. मग काही वर्षांनी असे जाणवते की, लहान मुलांना विषय समजण्यात खूप अवघड जात आहेत. अतिरिक्त शिकविण्या लावूनही फारसा उपयोग होत नाही. मुलांना इंग्लिश मधून विषय समजत नाहीत. परिणामी मूल घोकंपट्टीवर जोर देते. आणि अभ्यास फक्त मार्कांसाठीच करायचा असतो हा संस्कार त्यांच्यात रुजतो. मुलांचे बालपण संपुष्टात येते. पालक आणि मुलांमध्ये तणाव निर्माण होतो.
३) मातृभाषेतील वर्तमानपत्रे, पुस्तके, कथा, कादंबऱ्या, बालनाट्ये, नाटके, बालसाहित्य, चित्रपट इत्यादी अनेक गोष्टी मुलांना कांटाळवाण्या वाटू लागतात. त्यात त्यांना रस वाटत नाही. पर्यायाने बाल रंगभूमीलाही नाटके मिळत नाहीत... त्यात काम करणारी मुले मिळत नाहीत.
४) 'ना घर का ना घाट का' अशी बऱ्याच मुलांची अवस्था होतांना दिसून येते. ना धड इंग्लिश येत ना मातृभाषा! येते ती 'मिग्लिश'!!
५) पैशाचा अपव्यय तर प्रचंड होतो. खास करून माध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, गरीब वर्ग तर पूर्णपणे भरडला जातो. CBSE /ICSE च्या नावाखाली तर वारेमाप फी आणि देणग्या घेतल्या जातात. त्या पैशाचा विनियोग शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यापेक्षा दिखावेगीरीवर अधिक केला जातो. संस्था चालकांच्या तुंबड्या भरल्या जातात. म्हणजे शाळा काढणे हा फक्त व्यवसाय झाला आहे. पालक मात्र पोटाला चिमटे घेऊन आयुष्यातील मौजमजा कमी करून मुलांना या शाळांमध्ये पाठवण्याची धडपड करतात. पण पदरात काहीच पडत नाही याची जाणीव काही वर्षांनी होऊ लागते.

अशा अनेक बाबी आहेत. सर्व मराठी ,गुजराती, हिंदी शाळांमध्ये शिशुवर्गापासून इंग्लिश हा एक विषय शिकविला जातो. हल्ली बऱ्याच घरांमध्ये संगणक / मोबाईल फोन /केबल असते. अनेक इंग्लिश वाहिन्या असतात. त्यामुळे इंग्लिशचा बाऊ करण्याची गरज उरलेली नाही. तसेच मातृभाषा जर पक्की असेल तर मूल कालांतराने कोणतीही परकीभाषा थोड्याशा प्रयत्नाने सहज शिकू शकतो.

वरील मुद्द्यांचा विचार करता काही तुरळक अपवाद सोडले तर बाकी सर्व घरांमध्ये इंग्लिश माध्यमाचा हा संघर्ष सुरु असतो. खरेतर लहान मुलांना काय सोपे जाते याचा विचार झाला पाहिजे.ही काही आपल्या अस्मितेची लढाई नव्हे वा आपल्या हारजीतीचाही प्रश्न नव्हे. प्रश्न आहे तो कोवळ्या वयात मुलांवर इंग्लिश माध्यमाचे ओझे लादायचे का ? यावर आपण गंभीरपणे विचार करणार आहोत का नाही ?

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

सुशिक्षित आहेत तरी कोठे? 🤔 - जेट जगदीश.

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण! उच्चपदवीधर चांगले शिक्षित असूनही ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळून येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्वतावादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. 

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनून जाते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो व म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकुणातच अंधारयुगातच जगत आहे असे म्हनावे लागते. कारण आम्ही सोईचा इतिहास बनवायला लागलो आणि धर्माच्या चिकित्सा थांबवत नेल्या आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज तेसावरकर वा बाबासाहेब आंबेडकर यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे झाले आहे. चिकित्सा म्हणजे द्वेष असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणाऱ्या आणि टीकाकारांवर झुंडीने सरळ हल्ले चढवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यात घट्ट अडकलेले आहेत, आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्त्या मात्र त्याच आहेत.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला "पाखंडी" ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडून गेले आहे... पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्म आणि राजकारण वेगळे करून धर्मलंडांना (साक्षर अंधभक्तांसाठी टीप : शब्दकोशात या शब्दाचा अर्थ धर्ममार्तंड असा दिला आहे) प्रसंगी छळ सोसूनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले... विकसित झाले, आणि आपण मात्र अजूनही आपली जीवनातून राजकारणावर धर्माचा अंकुश ठेवल्यामुळे मागासच राहिलो आहोत. विचार तर कराल?