Wednesday, December 31, 2014

सुज्ञ माणूस वाईटातूनही चांगले शोधायचा प्रयत्न करतो.

शहाणा माणूस न पटणार्या विचारांवर टीका करतांना त्या विषयाचे पुस्तक उपलब्ध करून संदर्भ  शोधायला लागेल. न की विद्वानांच्या अकलेची दिवाळखोरी काढून उध्दटपणा दाखवेल.विचारवंत सुधारक अर्थातच authentic संदर्भ तपासून पाहील्याशिवाय त्यांचे विचार मांडायला ते धर्माधांसारखे उथळ नक्कीच नव्हते.
दुसरे असे की, धर्ममार्तंडाच्या लेखी सगळेच संदर्भ चुकीचे असतील तर ते कशाच्या आधारे पुर्वजांचे गोडवे गातात? की त्यांचे संदर्भ तेवढे खरे आणि विद्वानांचे खोंटे?
एखाद्याचा संदर्भ आपण जेव्हा देतो तेव्हा तो हवेतला असू नये एवढी खबरदारी शहाणा माणूस घेतो.मी जेव्हा संदर्भ देतो, तेव्हा ती पुस्तके माझ्याकडे उपलब्ध असतात. कारण मला हवेत बोलायची सवय नाही. आणि पुर्वजांचा वृथा अभिमानही नाही.
आपल्या मेंदूची कवाडे सुधारक नेहमी उघडी ठेवतात, आपले विचारच फक्त खरे आहेत आणि तेच स्विकारायाला हवेत अशी विचारांची सक्तीही ते करत नाहीत. तरीही धर्मांधळे सुधारकांना शिव्या घालतात,तुच्छ लेखतात आणि त्यांचा दाभोळकर करण्याचा धाक घालतात. किती दांभिक आहोत आपण!
थोरामोठ्यांचे विचार मांडणे हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. पण वाचणारे आपल्या कुवतीच्या नजरेतून वाचतात.आणि त्यातून आपल्या सोईचे तत्वज्ञान तयार करतात. कारण तेच त्यांना सुखावह वाटते. पण त्यामुळे होते काय की,अशी माणसे आपल्या मनाची कवाडे बंद करून आपल्यातच मश्गुल रहाण्यात आनंद मानायला लागतात.
आज समाजात अशाच आत्मकेंद्री माणसांची वाढ झाल्यामुळे एकूण पारिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे. म्हणून माणसाचे वागणे मूल्यरहीत आणि मूल्यविवेक नष्ट करणारे होत आहे. अशी माणसे आपल्याला पटते तेच खरे असा अट्टाहास धरतात. त्यामुळे त्यांच्या लेखी समाजधुरीणांनी नविन विचारांचे केलेले मंथनही कुचकामीच ठरते.
कावीळ झालेल्यांना सगळं जगच जसं पिवळं दिसतं, त्याचप्रमाणे इतर धर्मांचा तिरस्कार करणार्यांना कुणी चांगले सांगितले तरी ते द्वेशाचेच फुत्कार टाकतात. द्वेशाने हिंसेला खतपाणी मिळते. म्हणून जगाला प्रेम अर्पावे, हे लक्षात घेऊन सुज्ञ माणूस वाईटातूनही चांगले शोधायचा प्रयत्न करतो.

No comments: