प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची, विषय समजून घेण्याची पध्दत
आणि क्षमता वेगवेगळी असते. काहीजण नियमित अभ्यास करतात. काहीजण परीक्षा जवळ
आल्या की जागे होतात. तर काहीजण पालकांनी रागे भरले की नाईलाजाने
अभ्यासाला बसतात.पण पालक आणि मुलांचा संवाद वाढला तर त्याचा चांगला परीणाम
त्यांच्या सवयीवर आणि अभ्यासावरही होतो हे निश्चीत.
परीक्षेचा ताण हा सर्वात चिंतेचा विषय मानला जातो. खरं तर
मुलांना परिक्षेचा ताण येण्यामागची कारणं वेगवेगळी असतात. अभ्यास येत नसतो,
अभ्यास झालेला नसतो, आत्मविश्वास नसतो, परिणामांची भीती असते. हे
टाळण्यासाठी समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायला हवा.अशावेळी
पालकांनी मुलांना कोरडे उपदेश करण्याऐवजी त्यांना स्पर्धेला व अपयाशाला
सामोरे जाण्यास शिकवायला हवे.कोणत्याही परिस्थितीत पालक आपल्या पाठीशी आहेत
हा आधार मुलांना यशाच्या शिखराकडे नेण्यास पुरेसा असतो.
मुलांनीही आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार क्षेत्र निवडावं.
पण कुठल्याही क्षेत्रात शॉर्टकटने यश मिळत नाही, हे मात्र लक्षात असू
द्यावं. यश संपादन करण्यासाठी कठोर कष्ट करावेच लागतात. अभ्यास करतांना
टी.व्ही., मोबाईल, सोशल नेटवर्कींग साईट्स सारखे व्यत्यय कटाक्षाने दूर
ठेवायला हवेत. अन्यथा एकाग्र चित्ताने अभ्यास करता येणं कठीण.
यशाची आस असणे स्वाभाविक असले तरी आयुष्य कधीही सरळसोट नसते.
त्यात अनेक खाचखळगे असतात. कधीकधी ठेच लागून आपण पडतो. ते होणारच. मात्र
पडल्यानंतर किती लवकर आपण उठून त्यातून स्वत:ला सावरून पुन्हा उभे रहातो,
त्यावर यश अवलंबून असते. भूतकाळात काय झाले, भविष्यात काय होणार याचा विचार
करण्यात आपले वर्तमान वाया घालवू नका. करण कोणतेही चांगले काम करण्यासाठी
आज आणि आतासाराखा चांगला मुहूर्त असूच शकत नाही.
No comments:
Post a Comment