Wednesday, December 31, 2014

बुध्दीवाद म्हणजे विवेक

देव-धर्म यांच्याशिवाय माणूस केवळच जगू शकतो असं नाही तर तो अधिकच अर्थपूर्ण पद्धतीनं जगू शकतो. देवविषयक वा परलोकविषयक कल्पनांनी माणसाला कुंडीत बसवलं आहे. त्याच्या संपूर्ण माणूसपणाच्या वाटा त्याच्यासाठी बंद केल्या आहेत. या कल्पनांनी मोहल्ल्या-मोहल्ल्यात भांडणाचे कारखाने काढले ते वेगळेच. या सर्व कल्पनांनी माणसाला जगणंही कठीण केलं आणि स्वतःला निर्माण करण्याचं जे सुख असतं, मानवी प्रतिष्ठेच्या सामग्य्राशी बोलण्यात, त्या सामग्य्राचा सूर्य व्यक्तिमत्त्वात स्थापन करण्यात जे अनिर्वचनीय सुख असतं, त्या सुखाशीही माणसाची गाठ पडू दिली नाही. या सर्व कल्पनांनी साकल्याच्या सागराला पोचण्याआधीच माणसाची नदी मध्येच आटवली.
या कल्पनांनी माणसाला परावलंबी केलं. दुबळं केलं. आणि असं परावलंबन हेच मानवी जीवनाचं सत्य आहे, या खोट्या समजुतीच्या तुरुंगात त्याला कायम कोंडलं. या परावलंबनानं त्याला पुनःपुन्हा उगवण्यासाठी क्षितिजंच ठेवली नाहीत. या क्षितिजविहीनतेनं माणसाला झाडाप्रमाणं सतत तोडलं. या सर्वच कल्पनांनी माणसाला पोपट केलं आणि पिंचऱ्यात डांबलं. या कल्पना सांगतील वा शिकवितील तेव्हढंच माणसानं बोलावं. माणसानं स्वतःचा विचार करू नये. स्वतःच्या अस्तित्व तत्त्वाच्या रचनेचा, पुनर्रचनेचा विचार माणसानं करू नये. स्वतःच्या निखळ मनुष्यमयतेच्या मांडणीचा, फेरमांडणीचा विचार माणसानं करू नये. माणसानं त्याला मारणाऱ्या आणि शोषकांना जगवणाऱ्या कल्पनांना जगवण्याचा विचार तेवढा करावा. माणसानं आणि सज्जन गरिबानं स्वतःच्या उभारणीचा विचार करू नये. त्यानं शोषण जगवावं. अविचार जगवावेत. त्याला लोळवणाऱ्या, त्याला तुडवणाऱ्या वा त्याला मोडीत काढणाऱ्या सर्व गोष्टी त्यानं जगवाव्यात यासाठी वर्चस्वमनस्कांनी अध्यात्माचा, परलोकाचा चकवा निर्माण केला. या गोष्टी त्याला माणूस म्हणून जीवनातून उठवणाऱ्या किंवा जीवनाच्या परिघाबाहेर ढकलणाऱ्या अशा गोष्टी आहेत. परलोकाच्या कल्पनेनं इहलोकाच्या अस्तित्वाला याप्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न धुमाकूळ घालत राहिला, काही प्रमाणात त्याला यशही मिळत राहिलं, पण त्याला संपूर्ण वा निरपवाद यश कधीच मिळालं नाही. त्याला कारण आहे, जगभरचं इहवादी चिंतन.
धर्मांमध्ये खूप भेद असले आणि त्या भेदांचा परिणाम म्हणून अनंत प्रकारच्या मारामाऱ्या असल्या आणि त्यामुळं प्रत्येकच धर्म दुसऱ्या धर्माला शत्रू मानत असला तरी या सर्वच धर्मांमध्ये एक साम्य मात्र असतंच. माणसाच्या जगण्याचा संकोच करण्याच्या बाबतीत त्यांच्यात समभाव असतो. माणसाच्या अमर्याद माणूसपणाचे छोटे-छोटे तुकडे करण्याच्या संदर्भात, माणसांना छोट्या-छोट्या चौकटींमध्ये डांबण्यात आणि त्या चौकटींचा अहंकार पढवण्यात या धर्मांमध्ये समभाव असतो. माणसाचं माणूसपण पुसून त्याला धर्माची काटेरी अस्मिता देण्याच्या संदर्भात मात्र धर्मांमध्ये समभाव असतो. हा धर्मांमधला समभाव माणसांमध्ये जवळजवळ अभेद्य असा विषमभाव निर्माण करतो आणि इमानेइतबारे त्याचं पोषण करतो.
स्वर्ग, परलोक, पूर्वजन्म-पुनर्जन्म, देव, दैववाद या सर्वच गोष्टी काल्पनिक आहेत, पण या काल्पनिक गोष्टी सरंजामशाहीच्या, भांडवलशाहीच्या वा अशा कोणत्याही नावानं वावरणाऱ्या शोषणशाहीच्या पूर्ण हिताच्या असतात. या गोष्टींच्या आधारानंच सर्व शोषणशाह्या गरिबांना गुलाम करीत असतात. आणि वरील सर्वच गोष्टींच्या मदतीनं ते शोषणाचे परमनंट परवाने मिळवीत असतात. इहवाद या सर्व शोषणशाह्या उद्‌ध्वस्त करू इच्छितो याचं कारण या शोषणशाह्या गरिबांचं शोषण करतात. या शोषणशाह्या गरिबांच्या लक्षात येणार नाही या पद्धतीनं  हे शोषण करतात आणि स्वर्ग, परलोक, पूर्व-पुनर्जन्म, देवदैववाद ही या पद्धतीची कलमे-उपकलमे असतात. या शोषणशाह्या म्हणजे त्यांच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, ती वर्चस्वमनस्क माणसंच हे शोषण करतात, पण नाव मात्र देव-दैववादाचं पुढं करतात. ते फक्त देव-दैववादाचा त्यांच्या फायद्यासाठी आणि भाबड्या गरिब मंडळींना बिनदिक्कत लुटण्यासाठी धडधडीत उपयोग करून घेत आहेत हे देवाला वा दैवाला कळतच नाही. याचं कारण देव वा दैव कुठं अस्तित्वातच नाही हे आहे. देव-दैव, परलोक या सर्वच गोष्टी आपल्याला लुटण्याची साधनं आहेत हे सर्वच या सज्जन गरिबांना कळावं असं इहवादाला वाटतं.
इहजीवनातले प्रश्‍न आपल्यामुळेच निर्माण होतात. ते प्रश्‍न परलोकाच्या नादानं सुटणार नाहीत. ईश्‍वराच्या शोधानं सुटणार नाहीत. या सर्व कल्पना आहेत आणि त्या माणसाच्याच दुबळेपणानं, आळशी वृत्तीनं आणि त्याच्या आयतेपणाच्या लालसेनं निर्माण केलेल्या आहेत. या कल्पनांनी मग माणसालाच दुबळं, विकृत आणि आळशी केलं. आपल्यावरची जबाबदारी एखाद्या कल्पनेवरती ढकलण्याची तरतूद माणसानं केली, पण या तरतुदीनं त्याच्या साहसाभोवती कुंपणं निर्माण केली. माणसांमध्ये स्वतःला अपूर्णांक करण्याची स्पर्धा लागली. एवढे अनर्थ स्वतःचा विचार स्वतःच करण्याची जबाबदारी टाळल्याच्या चुकीमुळे झाले. माणूस स्वतः लुळा झाला आणि त्यानं ईश्‍वर समर्थ केला. त्यानं दैवाला शक्ती दिली आणि स्वतः शक्तिहीन झाला. आणि या संदर्भांनी निर्माण केलेल्या भांडणांनी माणूस स्वतःलाच पारखा झाला. मग एक सुंदर स्वतंत्रता एक अंकितता झाली. एका प्रवाहाचं आटलेपणात रूपांतर झालं. एक अशरणता शरणागत झाली. एका साहसाचा भुसा झाला. एक बौद्धिक गर्जना मुकी झाली. माणूस नावाचं एक साहस पांगळं झालं.
जात, धर्म, परलोक आणि त्यांच्याशी संबंधित सर्वच अंधश्रद्धा बुद्धिवादाला मान्यच नसतात. बुद्धिवाद म्हणजे विवेक किंवा विवेकदृष्टी. या विवेकदृष्टीला कधीही चुकीची गोष्ट बरोबर वाटणार नाही. ही दृष्टी दुर्गंधीला सुगंध म्हणणार नाही. आणि तिला विघातकता कधीही विधायकता वाटणार नाही. अन्याय कधी न्याय वाटणार नाही, ही दृष्टी पारतंत्र्याला स्वातंत्र्य मानणार नाही. द्वेषाला करुणा आणि शोषणाला समाजवाद मानणार नाही.
विज्ञाननिष्ठ होणं वा बुद्धिवादी होणं म्हणजे इहवादी होणंच असतं. विज्ञाननिष्ठा हे इहवादाचंच मार्गदर्शक तत्त्व असतं. खरं म्हणजे विज्ञाननिष्ठेची प्रक्रिया ही बुद्धिवादाचीच प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा परिपाक इहवादात झालेला आहे. धर्म वा ईश्‍वर या गोष्टी सत्ताधारी वर्गांची बाजू घेऊन सामान्यांची मती सपाट करतात. समाजात निराशा, पुरुषवर्चस्वाची व्यवस्था, एखाद्या भांडवलशाहीच्या वा सरंजामशाहीच्या वर्चस्वाची व्यवस्था आकाशातून पावसासारखी पडत नाही. भोगवाद, बलात्कारी वृत्ती, भ्रष्टाचारी वृत्ती, शोषकवृत्ती वा अंधश्रद्धा या गोष्टी विकृत आणि हिंस्र समाजरचनेतूनच जन्माला येतात. त्या वरून पडणाऱ्या उल्का नसतात. वर्चस्वाच्या तृष्णेतून उफाळून येणारे हे आगीचे प्रवाहच समाजाला जाळत समाजभर पसरतात. तेव्हा या अनीतीचा प्रादुर्भाव समाजात ईश्‍वर, धर्म या सर्व गोष्टी असताना कसा होतो? हे सर्व अनीतीचे खेळ असतात आणि या खेळांना परलोकाचे हवाले मान्य करून नीती म्हणा एवढीच ईश्‍वरवाद्यांची वा अध्यात्मवाद्यांची भूमिका असते.

मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मासंबंधी अनेक गैरसमज

उत्क्रांतिवादाचे द्वेष्टे

सनातनी मनाचे लोक मूलत: उत्क्रांतिवादाचे द्वेष्टे असतात. क्रमाक्रमाने ज्ञान वाढते आहे, माणूस अधिकाधिक परिपूर्ण होत आहे, त्याची उत्पादकता वाढत आहे हेच त्यांच्या सनातनी मनाला मान्य नसते. त्यांच्या दृष्टीने भूतकाळात कुठेतरी समाजाची परिपूर्ण अवस्था असते. संपूर्ण ज्ञान-विज्ञान पूर्वीच कधीतरी परिपूर्ण झाले असून त्यात आता काहीच भर पडू शकत नाही असे त्यांना उगीचच वाटत असते. आधुनिक विज्ञानाचे सर्व शोध आमच्या प्राचीन ऋषी-मुनींना ज्ञात होते, पाश्चात्यांनी आमची शास्त्रे चोरली व स्वत:ची प्रगती करून घेतली असे सांगताना त्यांना अभिमान व समाधान वाटत असते. एकेक जुनी कल्पना घेऊन ती आधुनिक विज्ञानाने बरोबर असल्याचे सांगावयाचे हा सुधारणाविरोधी सनातनी मनाचा आवडता छंद आहे. त्यापैकीच एक वर्णव्यवस्थेला वैज्ञानिक पाठींबा [सैद्धांतिक निर्दोषत्व] दाखवण्याचा प्रयत्न असतो. -नरहर कुरुंदकर

सामजस्य हवे.

विचारांचा अभाव असणारी व्यक्ती स्वत:पेक्षा इतरांना अधिक मनस्ताप देत असते.विनाकारण आक्रमक होत असते.क्षुल्लक गोष्टीँवरून चिडचिड करत असते.अशी व्यक्ती नेहमीच उपद्रवी असते,असं नव्हे.ते तीच्या मानसिकतेवर,प्राथमिक स्वभावावर अवलंबून असते. ती व्यक्ती वस्तुस्थितीचा कसलाच विचार न करता रागात मनचं बोलून जाते.अशा वेळी त्या व्यक्तीचं मन घटनेला नाण्याची दुसरी बाजू देखिल असते हे सफशेल विसरून जाते.ती व्यक्ती समोर दिसणार्या घटनेचा अर्थ थोडंसुद्धा खोलात जाऊन शोधायचा प्रयत्न करत नाही.'आँखो देखा हाल'च त्यांच्यालेखी परमसत्य असते. त्यामुळे जास्त खोलात डोकावून विचार करायचा नाही असा एकंदरीत ग्रह त्यांनी करून घेतलेला असतो.
अशा व्यक्तींच्या मुळ स्वभावात सामंजस्य असल्यास तीची योग्य प्रकारे समजूत काढून वस्तुस्थितीची जाणिव करून दिल्यास तीला आपली चूक कळते.हळवा स्वभाव असेल तर ओशाळते देखिल.मात्र मूळ स्वभावतच आक्रस्ताळपणा,कोडगेपणा असेल तर कशीही समजूत काढली तरी देखिल अशी व्यक्ती तिचाच तुरा नाचवत असते.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला विनाकारण मनस्ताप ओढावून घ्यावा लागतो.
यावर उपाय काय असं म्हणालात तर अशा गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होणार नाही इतके आपले मन सामंजस्यात बुडवून ठेवणे हाच आहे.

अभ्यास करण्याची, विषय समजून घेण्याची पध्दत

प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची, विषय समजून घेण्याची पध्दत आणि क्षमता वेगवेगळी असते. काहीजण नियमित अभ्यास करतात. काहीजण परीक्षा जवळ आल्या की जागे होतात. तर काहीजण पालकांनी रागे भरले की नाईलाजाने अभ्यासाला बसतात.पण पालक आणि मुलांचा संवाद वाढला तर त्याचा चांगला परीणाम त्यांच्या सवयीवर आणि अभ्यासावरही होतो हे निश्चीत.
परीक्षेचा ताण हा सर्वात चिंतेचा विषय मानला जातो. खरं तर मुलांना परिक्षेचा ताण येण्यामागची कारणं वेगवेगळी असतात. अभ्यास येत नसतो, अभ्यास झालेला नसतो, आत्मविश्वास नसतो, परिणामांची भीती असते. हे टाळण्यासाठी समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायला हवा.अशावेळी पालकांनी मुलांना कोरडे उपदेश करण्याऐवजी त्यांना स्पर्धेला व अपयाशाला सामोरे जाण्यास शिकवायला हवे.कोणत्याही परिस्थितीत पालक आपल्या पाठीशी आहेत हा आधार मुलांना यशाच्या शिखराकडे नेण्यास पुरेसा असतो.
मुलांनीही आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार क्षेत्र निवडावं. पण कुठल्याही क्षेत्रात शॉर्टकटने यश मिळत नाही, हे मात्र लक्षात असू द्यावं. यश संपादन करण्यासाठी कठोर कष्ट करावेच लागतात. अभ्यास करतांना टी.व्ही., मोबाईल, सोशल नेटवर्कींग साईट्स सारखे व्यत्यय कटाक्षाने दूर ठेवायला हवेत. अन्यथा एकाग्र चित्ताने अभ्यास करता येणं कठीण.
यशाची आस असणे स्वाभाविक असले तरी आयुष्य कधीही सरळसोट नसते. त्यात अनेक खाचखळगे असतात. कधीकधी ठेच लागून आपण पडतो. ते होणारच. मात्र पडल्यानंतर किती लवकर आपण उठून त्यातून स्वत:ला सावरून पुन्हा उभे रहातो, त्यावर यश अवलंबून असते. भूतकाळात काय झाले, भविष्यात काय होणार याचा विचार करण्यात आपले वर्तमान वाया घालवू नका. करण कोणतेही चांगले काम करण्यासाठी आज आणि आतासाराखा चांगला मुहूर्त असूच शकत नाही.

सुज्ञ माणूस वाईटातूनही चांगले शोधायचा प्रयत्न करतो.

शहाणा माणूस न पटणार्या विचारांवर टीका करतांना त्या विषयाचे पुस्तक उपलब्ध करून संदर्भ  शोधायला लागेल. न की विद्वानांच्या अकलेची दिवाळखोरी काढून उध्दटपणा दाखवेल.विचारवंत सुधारक अर्थातच authentic संदर्भ तपासून पाहील्याशिवाय त्यांचे विचार मांडायला ते धर्माधांसारखे उथळ नक्कीच नव्हते.
दुसरे असे की, धर्ममार्तंडाच्या लेखी सगळेच संदर्भ चुकीचे असतील तर ते कशाच्या आधारे पुर्वजांचे गोडवे गातात? की त्यांचे संदर्भ तेवढे खरे आणि विद्वानांचे खोंटे?
एखाद्याचा संदर्भ आपण जेव्हा देतो तेव्हा तो हवेतला असू नये एवढी खबरदारी शहाणा माणूस घेतो.मी जेव्हा संदर्भ देतो, तेव्हा ती पुस्तके माझ्याकडे उपलब्ध असतात. कारण मला हवेत बोलायची सवय नाही. आणि पुर्वजांचा वृथा अभिमानही नाही.
आपल्या मेंदूची कवाडे सुधारक नेहमी उघडी ठेवतात, आपले विचारच फक्त खरे आहेत आणि तेच स्विकारायाला हवेत अशी विचारांची सक्तीही ते करत नाहीत. तरीही धर्मांधळे सुधारकांना शिव्या घालतात,तुच्छ लेखतात आणि त्यांचा दाभोळकर करण्याचा धाक घालतात. किती दांभिक आहोत आपण!
थोरामोठ्यांचे विचार मांडणे हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. पण वाचणारे आपल्या कुवतीच्या नजरेतून वाचतात.आणि त्यातून आपल्या सोईचे तत्वज्ञान तयार करतात. कारण तेच त्यांना सुखावह वाटते. पण त्यामुळे होते काय की,अशी माणसे आपल्या मनाची कवाडे बंद करून आपल्यातच मश्गुल रहाण्यात आनंद मानायला लागतात.
आज समाजात अशाच आत्मकेंद्री माणसांची वाढ झाल्यामुळे एकूण पारिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे. म्हणून माणसाचे वागणे मूल्यरहीत आणि मूल्यविवेक नष्ट करणारे होत आहे. अशी माणसे आपल्याला पटते तेच खरे असा अट्टाहास धरतात. त्यामुळे त्यांच्या लेखी समाजधुरीणांनी नविन विचारांचे केलेले मंथनही कुचकामीच ठरते.
कावीळ झालेल्यांना सगळं जगच जसं पिवळं दिसतं, त्याचप्रमाणे इतर धर्मांचा तिरस्कार करणार्यांना कुणी चांगले सांगितले तरी ते द्वेशाचेच फुत्कार टाकतात. द्वेशाने हिंसेला खतपाणी मिळते. म्हणून जगाला प्रेम अर्पावे, हे लक्षात घेऊन सुज्ञ माणूस वाईटातूनही चांगले शोधायचा प्रयत्न करतो.

मुलांच्या क्षमता समजून घ्या.

स्वप्ने पहाण्यात गैर काहीच नाही. उलट मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्याचा प्रयत्न करणे हेच प्रगतीचे लक्षण आहे. मात्र घरांमध्ये अनेकदा होत काय की,आई-वडील त्यांची स्वप्ने मुलांवर लादू पहातात.पालकांना मुलांनी जे व्हावे असे वाटते, तेच मुलांनी व्हावे यासाठी ते प्रयत्न करतात... आग्रह धरतात. आणि एकप्रकारे आपल्या अपेक्षा मुलांवर लादू पहातात; मग त्या मुलांची क्षमता असो वा नसो. त्यातूनच आठवी पासूनच त्यांच्यामागे करीयाराचा घोशा लावतात.
परीणामी हल्लीचे पालक मुलांच्या अभ्यासाबाबत फारच संवेदनाशील असतात.अगदी चाचणी परीक्षेत एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तरी ते अस्वस्थ होतात. आशा पालकांना मला इतकंच सांगावसं वाटतं की, चाचणी परीक्षा या शेअर बाजारातील बाजारभावाप्रमाणे असतात. त्यात वर-खाली, कमी-जास्त होतंच असतं. त्याचा फार बाऊ करण्याची गरज नसते.एखाद्या परीक्षेत कमी गुण पडल्याने काही आभाळ फाटत नाही. एखादे गणित,एखादे प्रमेय त्याला आज कळले नसेल तर उद्या समजेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही मुलांना जन्म  दिला आहे; गुणपत्रिकेला नव्हे. सध्या बहुतेक घरांमध्ये आढळणार्या एकुलत्या एक आपत्याचे तर नको तेवढे लाड केले जातात.ही दोन्हीही टोके मुलांच्या पुढील आयुष्यासाठी घातक ठरतात.
तेव्हा पालकांनी घरातील हुकूमशाही वृत्ती सोडून मुलांच्या क्षमता समजून घेण्याचा प्रयत्न करावा.