अलीकडे भारत हे धर्म् राष्ट्र व्हावं म्हणून काही सनातनी विचारांची मंडळी चळवळ उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दिसून येतं. या विषारी विषयाचा प्रसार व्हावा म्हणून खास दैनिकं/साप्ताहिकं निघत आहेत. गोव्यामधील एक वृत्तपत्र तर सातत्याने या संदर्भात आग ओतत असतं. आपला देश चटकन भावनेच्या आहारी जाणारा म्हणून ओळखला जातो. भाकरीच्या लढ्यापेक्षा देवा धर्माची उठाठेव करणं, त्याच्यासाठी आकंडतांडव करणं हे आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतं. बहुसंख्य लोकांच्या या वृत्तीमुळे सनातन्यांना सर्वसामन्यांच्या टाळूवरचं लोणी खाणं अगदी सोपं जातं.
धर्मावर राष्ट्र उभारणं म्हणजे भारताची घटना मोडीत काढणं की जी जगामध्ये एक उत्कृष्ट घटना म्हणून समजली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगाच्या पाठीवर कुठेही धर्माच्या आधारावर राष्ट्र प्रगती करू शकलेलं नाही. मध्यपूर्वेत ज्या देशांनी तसा प्रयत्न केला त्या देशात केवळ वांशिक दंगलींच माजल्या. आपल्या देशात तर अनेक धर्म आहेत. आजही त्यांच्यात छोट्या मोठ्या कुरबुरी चालूच असतात. धर्माधिष्टीत राष्ट्र करण्याने आपण फक्त वांशिक दंगली ओढवून घेऊ, दुसरं काही नाही. एकेकाळी हिंदू राष्ट्र म्हणून समजलं जाणार्या ‘नेपाळ’ या हिंदू राष्ट्राची अवस्था आज काय झालीय ते पाहण्यासारखं आहे. त्यांनी आपली चूक आता सुधारली आहे. त्यांनी निधर्मी राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित केलं आहे. आपलं राष्ट्र सामर्थ्यवान करायचं असेल तर स्वा. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘विज्ञान हाच राष्ट्राचा धर्म असला पाहिजे कारण विज्ञानच राष्ट्राला सर्वदृष्ट्या समर्थ करतं, याउलट धर्म, अध्यात्म राष्ट्राला दुबळं करतं. परिणामी ते राष्ट्र दुसर्या राष्ट्राचं गुलाम होतं. जसा आपला अध्यात्मवादी देश इंग्लंडचा गुलाम झाला तसा…’
धार्मिक राष्ट्र झाल्यास काय घडू शकेल?
पुन्हा चातुर्वर्णाची स्थापना होईल. ब्राह्मण मुखातून अन् शूद्र पायातून निर्माण झाले यावर श्रद्धा ठेवावी लागेल.
ब्राह्मण वर्गाशिवाय कोणालाही शाळा कॉलेजात जाता येणार नाही.
इतरांनी चुकून विद्याभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाबकाने फोडून काढलं जाईल.
जातीबाहेर विवाह केल्यास त्याला वाळीत टाकलं जाईल.
विधवा स्त्रीस नवर्याच्या चितेवर स्वतःला जिवंत जाळून घ्यावं लागेल.
ब्राह्मणाच्या लग्न मंडपात अथवा मिरवणुकीत अब्राम्हण व्यक्ती सामील झाल्यास तिला जोतिबा फुल्यांप्रमाणे अपमानकरित्या बाहेर काढलं जाईल.
फक्त ब्राह्मण व्यक्ती राज्यकर्ती होऊ शकेल. इतरांनी प्रयत्न केल्यास त्यांना शिवाजी राजाप्रमाणे शूद्र ठरवून बहिष्कृत केलं जाईल.
वेदातील ज्ञान सर्वश्रेष्ठ समजलं जाईल की जे आधुनिक काळात अत्यंत हास्यास्पद अन् काहीसे अश्लीलही आहे. त्यातील ऋचा, श्लोक पाठ्यपुस्तकात लावले जातील.
विद्यापीठातून ज्योतिष, वास्तूशास्त्र, यज्ञविधी, जारणतारण मंत्र, जप जाप्य, नामस्मरण, अनुष्टान, लघुरूद्र, महारूद्र, गूढ विद्या, शनिमहात्म्य, गुरू चरित्र असल्या भंगार अन् टाकाऊ गोष्टी शिकवल्या जातील आणि त्यासाठी खास माजी मंत्री मुरली मनोहर जोशी यांची नेमणूक केली जाईल.
सर्व पूजाअर्चा, धार्मिक विधी फक्त ब्राह्मणाकरवीच करून घेता येईल. इतरांनी तसा प्रयत्न केल्यास त्याला उकळल्या तेलात टाकलं जाईल.
कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा ब्राह्मणाला शक्यतो केली जाणार नाही. तोच गुन्हा अब्राह्मणांनी केल्यास त्याला देहांत शासनही होऊ शकेल.
आत्मा प्रेतात्मा, भूतयोनी, जादूटोणा, शकुन अपशकुन, पत्रिका कुंडली, मुहूर्त, ग्रहशांती, गंडे दोरे, ताईत, रुद्राक्ष, दृष्ट लागणं, नरबळी, गुप्तधन असल्या सगळ्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवावा लागेल. जे ठेवणार नाहीत त्यांना धर्मद्रोही समजून भर चौकात फटक्याची शिक्षा केली जाईल.
गावागावात देवळं मंदिरं बांधली जातील. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी अशी नवीन
तीर्थस्थानं बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल.
तीर्थस्थानं बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल.
रस्त्यारस्त्यावर सर्व धार्मिक उत्सव साजरे केले जातील. सर्व धार्मिक सण सार्वजनिक केले जातील. हिंदुंचं पाहून इतर धर्मिय मशिदीवर, चर्चेवर भोंगे लावून, रस्त्यात वाजत गाजत मिरवणुका काढून ध्वनी प्रदूषणात भर घालतील.
श्रृती, स्मृतीत सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना वागावं लागेल. कसलंही स्वातंत्र्य असणार नाही. पुरुष जे म्हणतील त्याला मम म्हणावं लागेल. स्त्री ही मुक्तीच्या, मोक्षाच्या मार्गातील धोंड आहे यावर विश्वास ठेवावा लागेल.
अध्यात्माऐवजी जे विज्ञानाची महती गातील त्यांना नास्तिक ठरवून शिक्षा होईल.
गल्लीबोळातल्या बुवा, बापू, महाराज, बाबा, स्वामी यांना जगद्गुरू, धर्माचार्य, धर्मसम्राट अशा पदव्या दिल्या जातील.
दैवीशक्ती, चमत्कार, सिद्धी या विषयी शंका घेणार्यांना तुरुंगात टाकलं जाईल.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि पृथ्वी शेषाच्या फण्यावर उभी आहे असं मानावं लागेल.
डॉ. अब्दुल कलाम, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्ती त्या कितीही कर्तृत्ववान असल्या तरी त्या हिंदू धर्मीय नसल्याने त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान अशा उच्च स्थानावर बसता येणार नाही.
देवालयाच्या आधी शौचालयं बांधली पाहिजे असं वक्तव्य करणार्या राज्यकर्त्यांची निर्भत्सना केली जाईल.
जो धर्माची चिकित्सा व्हावी, धर्मात सुधारणा व्हावी, अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात असं म्हणेल त्याला भर रस्त्यात शासन केलं जाईल.
विज्ञानाच्या जोरावर राष्ट्र सामर्थ्यवान न करता, परंपरा आणि अध्यात्म यांचा स्वीकार करून विज्ञानाच्या साहाय्याने प्रबळ झालेल्या राष्ट्राची हसत हसत गुलामगिरी स्वीकारली जाईल.
चंद्रसेन टिळेकर.
No comments:
Post a Comment