Wednesday, January 28, 2015

सर्व धर्मातील...धर्मगुरूंना जाहीर अव्हान !



धर्मगुरूंनो ,
धर्म ही मानवाची गरज आहे. हे मान्य आहे.परंतु सर्वांना धर्म मान्य असेलच असे नाही. हे तुम्ही का स्वीकारत नाही ? तुम्हाला तुमचा धर्म मान्य आहे. परंतु इतरांनी त्यांचा धर्म पाळणं तुम्हाला मान्य नाही.तुमचा धर्म त्यांनी नाकारलेला तुम्हाला मान्य नाही.त्यांना तुम्ही मान्य नाही आणि तुम्हाला ते.

इतर धर्मीय जे खाऊ इच्छितात ते तुम्हाला मान्य नाही.तुम्हाला जे मान्य आहे ते, ते खात नाहीत.सर्व बाबतीत सर्व धर्म एकमेकाच्या विरोधात आहेत.खाद्य संस्कृती, परंपरा, संस्कार, पेहराव,  रितीरिवाज,  अंत्यविधी,  रंगसंगती,  दाढी मिशा, या बाबत सर्व धर्मिय धर्मगुरू आणि अनुयायांचं एकमत आहे.काही विरोधात आहेत पण ते बहुमतात नाहीत.

पण एका बाबतीत सर्व धर्म, धार्मिक माणसे आणि धर्मगुरू एकमतात आहेत. ते म्हणजे महिलांना हक्क नाकारणे.ज्या महिलांना तुम्ही हक्क नाकारलेत ना त्याच महिलांनी धर्म व्रतवैकल्ये करून पोसला व जोपासलाही.

तुम्ही भिक्षांदेही करत दारोदार भटकत होता तेंव्हा चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण तुम्हाला तीनेच दिले,  देत आहे आणि धार्मिक राहिली तर पुढेही देतच राहिल.तुमची सेवा सुध्दा तीनेच केलेली आहे.तुमचे चोचले सुद्धा तीनेच पुरवलेले आहेत.

तुमची सर्व प्रकारची " भूक " तीनेच तृप्त केली.
गाभाऱ्यात देवाच्या (?) साक्षीने जे काय चाळे तुम्ही तिच्या बरोबर केलेत ना,  ते सुध्दा तीने " गुप्त " ठेवले.आई होण्यासाठी काही महिलांचा आक्रोश तीने तुमच्या मार्फत देवासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.पण तुम्ही तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला.

तीने सर्वकाही केले तुमच्या साठी.तुम्हाला नऊ महिने गर्भात सांभाळलं,  बाळांतपणाच्या वेदना सहन केल्या.जन्म सुद्धा दिला.संगोपन केलं.  संस्कार केले. वाढवलं.  हाताने जेवू घातलं.स्वतः उपाशी पोटी राहून तुम्हाला भरपेट जेवण दिलं.आणि तुम्ही मोठे झालात !

मोठे झाल्यावर धर्मग्रंथ नावाच्या पुस्तकात वाचलं की,स्त्री नरकाचं द्वार आहे.स्त्री पापाचं मूळ आहे.आणि तुम्ही ते सहज स्विकारलं.
तुमची आई तुमच्या डोळ्यांसमोर कधीच आली नाही का हो? तुमची आई नरकाचं द्वार आहे. हा तुमचा अनुभव आहे का हो? तुमची आई पापाचं मूळ असल्याचा शोध तुम्ही कधी घेतला का हो ?

तुमचा अनुभव,  अनुभूती नसतानाही तुम्ही जी गरळ धर्माच्या नावाखाली ओकली. तिचा परिणाम तुम्ही पाहिला का हो? धर्म स्थळांच्या बाहेर ज्या स्त्रिया भिक मागत बसलेल्या आहेत ना, त्यांची मुलं धार्मिकच आहेत.घरात स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार केले जात आहेत ना, ते करणारे सर्व धार्मिकच आहेत.बलात्कार तर साधुसंतांनी जेवढे केलेत तेवढे रस्त्यावर सुद्धा झालेले नाहीत.त्यांची बोंब आणि पोलिस दप्तरी नोंद नाही.एवढंच.पण धर्म ग्रंथात काही ठिकाणी अशी नोंद केलेली आढळते.

स्त्रीया तुमचा धिक्कार करायला तयार नाहीत. कारण त्यांना आपण गुलाम आहोत, दासी झालो आहोत हेच कळत नाहीय.पण आम्ही तुमचा धिक्कार करतो.स्त्रीयांच्या अत्याचाराचे मूळ स्त्रोत असणारे आणि माणसांना माणसांपासून  तोडणारे धर्म, धर्म गुरु आणि धर्म ग्रंथ आम्ही शत प्रतिशत नाकारतो. आणि तुमच्या विरोधात जनमत तयार करून तुम्हाला नजीकच्या भविष्यातच वठणीवर आणू असा आम्हाला विश्वास आहे.
तेव्हा सावधान!

No comments: