Wednesday, January 22, 2020

स्त्रीविषयी चुकीचे केले जाणारे संस्कार, वाढवतात बलात्कार...

स्त्रीविषयी चुकीचे केले जाणारे संस्कार, वाढवतात बलात्कार... (^m^) (^j^) (मनोगते)

विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो. पण जे भुकेलेले असतात, ते अन्नावर तुटून पडताना आपण पाहतो. मात्र इथे आपण त्यांची उपासमार समजून घेतो. माणसांनी अन्नावर तुटून पडणे वाईट दिसते म्हणून त्यांची ती भूक, अन्न मिळू न देता दमन करण्याचा विचार कधी कुठे होत नाही. उलट त्यांना अन्न मिळण्याची सहज सोय करण्याचा प्रयत्न होतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे. तरीसुद्धा ती सहजपणे भागविण्यात समाज अडथळे उभारतो. विवाहाचं वय वाढून सुद्धा विवाहपूर्व लैंगिक शमन हे अनैतिक ठरवतो. तेव्हा उपासमारीची स्थिती निर्माण होऊन ती भूकवासना अनावर होते. त्यातून मग मिळेल त्या मार्गाने स्त्री-पुरुषांनी शरीरसंबंधाचा प्रयत्न करणे, चोरून वेश्यागमन करणे, ब्ल्यू फिल्म्स पाहणे, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, लैंगिक रॅगिंग, लहान मुलांचे लैंगिक शोषण म्हणजेच एकप्रकारे 'तुटून पडणे' ही सेक्सक्रिया सर्वत्र, म्हणजे चित्रपटांतून, कुटुंबातून, मैत्रीमधून, सामाजिक गुन्ह्य़ांतून आणि अगदी वैवाहिक संबंधातूनही दिसते. पण गंमत म्हणजे या गुन्ह्य़ांमागील खऱ्या कारणांना बगल देऊन स्त्रिया अंगप्रदर्शन करतात, म्हणून पुरुष गुन्हे करतात, असा दिशाभूल करणारा युक्तिवाद नेहमी केला जातो. आपल्याला वरवर विचार करण्याची सवय लावली गेल्याने असे युक्तिवाद अगदी चटकन पटतात.

जगभरात विवाहसंस्था सर्वत्र असली तरी प्रत्येक संस्कृतीत सेक्सबाबत असणारा दृष्टिकोन हा त्या त्या देशातील गुन्ह्य़ाचे प्रमाण ठरवतो. सेक्स दृष्टिकोन जितका उदार, जितका निकोप तितकी ती संस्कृती नवनव्या तंत्रज्ञानास सहजपणे सामावून घेत असते. आपण जेव्हा पाश्चिमात्य चित्रपटातील सेक्सप्रदर्शन जसेच्या तसे उचलले, तेव्हा त्या समाजात फ्री सेक्स रूढ आहे आणि आपल्याकडे ती कल्पनाही सहन होत नाही. उलट भुकेल्या माणसास जेवणाचे ताट दाखवून ते काढून घेतल्याप्रमाणे सेक्सविषयीचा हा खेळ खेळून भारतीय मानसिकतेचा छळ करण्यासाठी या कल्पना प्रसारमाध्यमांकडून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे आपला समाज झपाटय़ाने विकृतीकडे चालला आहे. भारतीय मुली ज्या पाश्चात्त्य देशात शिक्षण वा नोकरी करीत आहेत, त्यांच्यावर बलात्कार वा तत्सम लैंगिक हल्ले झाल्याच्या बातम्या आपण ऐकत नाही. मात्र भारतात आलेल्या परदेशी स्त्रियांवर बलात्कार होत असतात आणि बलात्कार करून त्यांची हत्याही होत असते. स्त्री-पुरुषांची आपल्या समाजात कोंडून घातलेली लैंगिक इच्छा आणि त्यातून पुरुषांची स्त्रीबाबत तयार झालेली भोगवादाची मानसिकता त्याचे हे वरील परिणाम म्हणावे लागतात.

कुटुंबामध्ये पती-पत्नीने एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाने चुंबन घेणे हे आपल्या संस्कृतीत मुलांच्यादेखत 'वाईट संस्कार' समजले जातात. पण आश्चर्य म्हणजे मुलांसमोर पत्नीचा पाणउतारा करणे, तिला मुलांदेखत मारणे हे मात्र वाईट संस्कारात येत नाही! एका तीन वर्षांच्या मुलाचे वडील त्याच्या आईला हातात मिळेल ते फेकून मारताना पाहून हा मुलगा घाबरून रडत असे. पण नंतर तेच ते पाहून आई ही मारण्यासाठी असते, असा त्याचा समज झाला आणि आईने त्याला काही शिस्त लावायचा प्रयत्न केला की तो आपली खेळणी तिच्यावर फेकून तो मारू लागला. स्त्रीविषयीची सन्मानाची भावना अशी पायरी पायरीने खाली उतरवली जाते. ज्यातून पुढे समाज स्त्री-भ्रूणहत्या करायला मागेपुढे पाहत नाही.

विवाह हा नैसर्गिक मुक्त शरीरसंबंध काबूत ठेवण्याचा एक संस्कार असला, तरी मेंदूच्या कार्यपद्धती बदलण्यास तो असमर्थ ठरतो. भारतासारख्या देशात विवाहप्रथा अनिवार्य म्हणून ठामपणे पाय रोवून असूनसुद्धा लैंगिक गुन्हे आणि हिंसा-हत्येचे अन्य गुन्हे यांचे प्रमाण सतत वाढत चाललेले आपण पाहतो. यामागे अनेक कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, मानसिक आणि विषमतेची कारणे आहेतच. पण त्याचबरोबर गेली अनेक शतके आपण लैंगिकतेबाबत बाळगत असलेला सदोष, चुकीचा दृष्टिकोन, हे एक महत्त्वाचे कारण आपण लक्षात घेतलेलं नाही. आणि स्त्रीला पुरुषाचे मन रिझवणारी एक उपभोग्य वस्तू समजण्याचा संस्कार हे दुसरे महत्वाचे कारण आहे.
#########################

No comments: