Monday, December 16, 2019

पालकत्व आणि संस्कार

पालकत्व आणि संस्कार :- जेट जगदीश.

मी माझ्या नातवावर (वय वर्षे 2 नंतर आजतागायत) आणि  *त्याच्यावर संस्कार करण्याचा सिहाचा वाटा आहे त्या त्याच्या आईने* अनेक प्रयोग करून लहानपणीच स्वतःची जबाबदारी घेण्याचा संस्कार कसा रुजवला त्याची कहाणी... 

1) आमच्या घरात कधीही भिंती पेन्सिलीने रंगल्या नाहीत. तेही त्याला 'असे करू नको' हे न सांगता. कारण त्याच्या हातात पहिल्यांदा जेव्हा पेन्सिल दिसली तेव्हा घरात एक नियम केला होता की, ज्याला कुणाला त्याच्या हातात पेन्सिल दिसेल त्याने ताबडतोब कागद घेऊन त्याचा हात धरायचा आणि 'पेन्सिलीने कागदावर लिहायचे', असे बोलून ती त्यांच्याच हाताने कागदावर गिरवायचे. असे सतत 8 ते 10 वेळा केल्यावर त्या 2 वर्षाच्या मुलाच्या मेंदूत कागद आणि पेन्सिल हा संबंध प्रस्थापित व्हायचा. मग जेव्हा जेव्हा त्याच्या हातात पेन्सिल आली की तो कागद मागायचा. 

2) त्याला आईने दिवसातील ठराविक वेळ इंग्रजी कार्टून पहायची सवय लावली. आज *युट्युबवर अनेक वैज्ञानिक कार्टून्स उपलब्ध आहेत.*  त्यामुळे त्याला इंग्रजी भाषा सहजपणे समजण्यास मदतच झाली. परिणाम त्याला आज सूर्यमाला, डायनासोरचे प्रकार, वनस्पतींचे तसेच फुलपाखरांचे जीवनचक्र, सगळ्याप्रकारचे प्रदूषण, इत्यादी विषयी बऱ्यापैकी माहिती झालीय. आणि तो विचारही बऱ्यापैकी इंग्रजीतूनच करतो.

3) सध्या तो बंगलोरला रहात असल्यामुळे जरी त्याला तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले तरी घरात मात्र त्याच्याशी आवर्जून मातृभाषेतूनच संवाद साधला जातो. घरात चुकूनही *'मिग्लिश'* (मराठी + इंग्लिश) भाषा वापरली जात नाही. घरात कोणतीही एकच भाषा शुद्ध स्वरूपात बोलली जाते. त्यामुळे त्याचे दोन्ही भाषेचे आकलन चांगले होत आहे. परिणामी तो ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेतही विचार करायला शिकला आहे.

4) त्याला सुरवातीला गोष्टीची पुस्तके नियमितपणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी वाचून दाखवण्याचा किंवा गोष्टी सांगण्याचा परिपाठ ठेवला. कळले नाही तिथे त्याला लगेच *'म्हणजे' वा 'का'* ते विचारायची सूचना देऊन ठेवली होती. आजही तो नवी मुंबईला रहाणाऱ्या आजीला (आम्ही नवी मुंबईत रहातो.) दर शनिवारी रात्री बंगलोरहून फोन करतो आणि तिच्याकडून फोनवर गोष्ट ऐकतो.

5) तो 5 वर्षाचा झाल्यावर सचित्र पुस्तके देऊन त्यालाच त्यावरून गोष्ट तयार करायला सांगितले. तो त्याच्या मगदुराप्रमाणे गोष्ट तयार करायलाही शिकला आणि तिचे तात्पर्यही सांगू लागला. मग वाचायला यायला लागल्यावर त्याला अनेक पुस्तके आणून दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या 6व्या वर्षांपासून (आज तो 8 वर्षाचा आहे.) त्याला महिन्यातून एकदा पुस्तकांच्या दुकानात नेऊन हवी ती पुस्तके निवडायची मुभाही दिली. आमच्याकडे वाशीत लहान मुलांची छान छान पुस्तके किलोच्या भावाने देणारे दुकान आहे. तो इथे आला की, तिथून तो हवी तेवढी पुस्तके घेऊन येतो, आणि वाचतोही. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायची सवय लागली आहे.

6) त्याच्या आईने अभ्यासाची वेळही त्याच्या सोईप्रमाणे त्याने ठरवली आहे. आणि *विशेष म्हणजे तो आईला सांगतो की, 'अभ्यासात मला मदत करू नको. मला काही अडचण आलीच तर मी तुला विचारीन.'* अशाप्रकारे स्वअभ्यासाची त्याला सवय लागली आहे.

7) त्याच्या खेळाच्यावेळाही त्यानेच ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे तो स्वतःच खेळाची वेळ झाली की खेळायला जातो आणि वेळ संपली की आपणहून घरी येतो. त्याला क्वचितच बोलवावे लागते; पण हाक मारल्याबरोबर 'अजून थोडावेळ' असे न म्हणता सरळ घरी येतो.

8) एकटा बाहेर वावरतांना त्याने सजगपणे जगाकडे बघावे म्हणून त्याला चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, मुलगा आणि मुलगी यांच्या जनानेंद्रियांबाद्दल त्याला कळेल अशा भाषेत वैज्ञानिक माहिती दिल्यामुळे तो स्पर्श ओळखायला शिकला आहे.

9) मोबाईलवर तो क्वचितच असतो. मोबाईलवर गुगलिंग करतांना त्याला जर अचानक स्त्री-पुरुषांच्या सलगीचे फोटो दिसले तरी तो त्याकडे विचित्र नजरेने पहात नाही. कारण तो लहान असल्यापासून त्याने आईवडिलांना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतांना किंवा हातात हात घेऊन चालतांना पाहिले आहे. तसेच ते तिघे बरेचदा जेवतांना आपसात एकमेकांना घास भरवून आनंदाने जेवत असतात. त्याच बरोबर त्याला समजेल अशा भाषेत नुकतेच लैंगिक शिक्षणाविषयी माहिती गप्पांच्या ओघात त्याचे आईवडील देत असतात. त्यामुळे सेक्सचा टॅब्यु त्याच्या मनात निर्माण होणार नाही, हे पाहिले जाते.

10) *मी नेहमी म्हणतो की, 'आईवडील होणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी पालक होणे ही जबाबदारीची क्रिया आहे. म्हणून जोपर्यंत लग्नानंतर नवरा-बायको पालक होण्यास समर्थ होत नाहीत तोपर्यंत त्यांनी मुलांना जन्म देऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.* 

11) तो हट्टी होऊ नये म्हणून काय केले तो किस्सा सांगण्यासारखा आहे... साधारणपणे तो दीड वर्षांचा होता तेव्हा एकदा संध्याकाळी आम्हा सगळ्यांना बाजारात जायचे होते, पण त्याला घरातच नवीनच आणलेल्या खेळण्याशी खेळायचे होते. त्याला एकटे ठेवून जण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे बरोबर घेऊन जाणे भाग होते. आणि तो तर येण्यास नकार देत होता. आम्ही ऐकत नाही म्हटल्यावर त्याने भोकांड पसरले आणि मोठमोठ्याने रडून आकांत मांडला. तो न येण्याचा पहिल्यांदाच असा हट्ट करत होता, तो त्याचवेळेस मोडणे आवश्यक होते. म्हणून मी त्याच्या आईला आणि बाकीच्यांनाही सांगितले की, कुणीही त्याच्या रडण्यामुळे पाघळू नका. थोडे कठोर वाटेल, पण त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करा. 

नंतर तो जवळजवळ अर्धा तास रडत होता. आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवत गप्पा मारत होतो. त्याने रडे थांबवून तो मुसमुसु लागल्यावर मी त्याला जवळ घेतले, आणि प्रेमाने तुला आता आमच्या बरोबर येणे कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. तसेच परत आल्यावर तू ह्या खेळण्याशी हवा तेवढा खेळू शकतोच ना? असे विचारल्यावर आपला हट्ट चालत नाही हे समजून तो यायला तयार झाला. 

या प्रसंगानंतर घरात एक नियम केला की, मुल हट्टी व्हायचे नसेल तर ज्या कुणी त्याला रागावले असेल वा नकार दिला असेल त्यानेच त्याचे रडणे थांबल्यावर जवळ बोलवायचे आणि आपण का रागावलो, का नकार दिला हे समजावून सांगायचे. म्हणजे त्याच्या मनात रागावणाऱ्या व्यक्तीविषयी किल्मिश रहाणार नाही. दरम्यान दुसऱ्या कुणीच मध्येच त्याचा हट्ट पुरवायचा म्हणून पाघळून त्याच्या मनासारखे करायचे नाही. परिणाम असा झाला की त्याने त्यानंतर हट्ट करणे सोडून दिले.

12) मानसशास्त्रानुसार पहिल्या 6 वर्षापर्यंत मेंदूची ग्राहकक्षमता प्रचंड असते. त्यामुळे या काळात तुम्ही मुलांना जे शिकवाल ते मेंदू ग्रहण करत असतो. आणि त्याचा परिणाम पुढे आयुष्यभर टिकतो. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले तर ते मूल पौगंडावस्थेत आणि पुढच्या आयुष्यातही भरकरण्याचा संभव नगण्य असतो. 

म्हणून मुलांच्या लहानपणापासूनच म्हणजे अगदी वयवर्षं 1 पासूनच त्यांच्याशी योग्यप्रकारे सातत्याने संवाद ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांच्याशी कधीही बोबडे बोल बोलू नयेत वा आपल्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा त्यांच्याकडून पुऱ्या करून घेण्याचा अट्टाहास करू नये. त्याच्यात नकार पचवण्याचीही सकारात्मकता रुजवणे महत्वाचे आहे. तसेच कोणतेही देवधर्मविषयक कर्मकांड त्यांच्यावर लादू नयेत. सज्ञान झाल्यावर त्याचे त्यालाच अभ्यास करून वाचनाने देवधर्मविषयक विचार ठरवू देणे हे व्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून नाही का? तेव्हा आपले मूल एक सजग नागरिक होण्यासाठी पालकांनी ही काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत, असे मला वाटते. तुम्हाला?  हे सगळे सजग पालकत्वामुळे घडू शकते. त्यांना जबाबदारीची जाणीव दिल्याचा संस्कार केल्यामुळेच त्यांना जमतंय असं नाही वाटत?

No comments: