Monday, December 16, 2019
पालकत्व आणि संस्कार
Tuesday, December 3, 2019
ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिकता
📖 *ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)* 📖(^m^) (^j^) (मनोगते)
सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीने 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.विज्ञान युगाचा अभिमान धरणार्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.
_ही सगळी विधाने दिशाभूल करणारी असून त्यातून अंधभक्तांचे अर्धवट ज्ञानच दिसते. सर्वात पहिली गोष्ट कुठल्याही ओव्याचें संदर्भ क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे त्या ओव्यांबद्दल साशंकतेला वाव राहातो. दुसरे म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला हवा तसा तोडून मोडून लावलेला दिसतो._
म्हणून खाली अंधभक्तांनी दिलेली मूळ ओवी आणि त्याचा त्यांनी लावलेला अर्थ देऊन नंतर त्याचे आम्ही योग्य स्पष्टीकरण देत आहोत.
1) "उदय-अस्ताचे प्रमाणे,
जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे,कर्मींचि असता".
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध ठरत नाही काय? हे स्पष्टीकरण चुकीचे आहे.
*योग्य स्पष्टीकरण : पृथ्वी गोल असण्याबद्दलचे अंदाज आणि सूर्याभोवती फिरत असल्याबद्दलचे अंदाज आठव्या शतकातले आहेत. तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती असा निष्कर्ष काढून आर्यभटाने ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगून, ग्रहणे का होतात याचे स्पष्टीकरण दिले आहे.*
2) "पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा,
तरी हा भूगोलचि काखे सुवावा,
तैसा विस्तारू माझा पाहावा,तरी जाणावे माते"
भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
*योग्य स्पष्टीकरण : परमाणु म्हणजे सर्वात छोटा कण असे कणाद ऋषीनी ज्ञानेश्वरांच्या कित्येक शतके आधीच सांगून ठेवले आहे.*
3) "तया उदकाचेनि आवेशे,
प्रगटले तेज लखलखीत दिसे,
मग तया विजेमाजी असे,सलील कायी?".
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.परंतु माऊली 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.पण
*योग्य स्पष्टीकरण : वीज हा शब्द आकाशातील विजेला आधीपासून होता .तेव्हा वीजेच्या स्वरूपाबद्दल ज्ञान नव्हते. जेव्हा वीजेचा शोध लागला तेव्हा आधीचाच शब्द उपयोगात आणला. जसे उडत्या वाहनाची कल्पना विमान नावाने केली होती आणि प्रत्यक्षात जेव्हा उडत्या वाहनाचा शोध लागला तेव्हा त्याला विमान म्हटले गेले.*
4) "मी सूर्याचेनि वेषे,तपे तै हे शोषे,
पाठी इंद्र होवोनि वर्षे,मग पुढती भरे".
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.
*योग्य स्पष्टीकरण : खरेतर पावसाच्या निर्मिती विषयक माहिती ज्ञानेश्वरांच्या आधीही ऋषीना माहीत होते.*
5) "ना तरी भौमा नाम मंगळ,
रोहिणीते म्हणती जळ,
तैसा सुखप्रवाद बरळ, विषयांचा"
किंवा "जिये मंगळाचिये अंकुरी,
सवेचि अमंगळाची पडे पारी"
किंवा "ग्रहांमध्ये इंगळ,
तयाते म्हणति मंगळ".
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:"परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे"
किंवा स्वाती नक्षत्र: "स्वातीचेनि पाणिये, होती जरी मोतिये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभति तिये".
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला आहेत.
*योग्य स्पष्टीकरण : डोळ्यांना दिसणाऱ्या ग्राहगोलांची माहिती वेदकाळापासून ज्ञात आहे. वराहमिहीर, भास्कराचार्य,आर्यभटांनी आदी ऋषीनीही ग्रह, तारे आणि नक्षत्रांबद्दल ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगितले आहे.*
6) "जेथ हे संसारचित्र उमटे,
तो मनरूप पटु फाटे,
जैसे सरोवर आटे,
मग प्रतिमा नाही".
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.
*योग्य स्पष्टीकरण : हा व्यवहारात दिसणाऱ्या घटनेला ओढून ताणून वैज्ञानिक रूप देण्याचा अट्टाहास आहे. जसे इंग्लंडमधील शहर बर्मिंगहॅम हा ब्राम्हणधाम या नावाचा अपभ्रंश आणि आपल्याकडे जसे ञ्यंबकेश्वर , महाबळेश्वर आहेत , यातील ईश्वर नावाचा अपभ्रंश शायर असा करुन इंग्लंडच्या विविध शहरांची नावे ठेवलेली लिसेस्टशायर , लंकेशायर इ.यातील लंकेशायर हे लंकेश्वर म्हणजे रामायणातील लंकेच्या नावावरुन आहे. किती हास्यास्पद आहे ते!तसेच ह्या ओवीचा हास्यास्पद अर्थ काढला आहे.*
या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी असलेली अंधभक्तीच दिसून येते, आणि विचारातील अवैज्ञानिकताही ध्यानात येते. *एवंच जे आधीच ऋषीमुनींना माहीत होते आणि तेच खरे पुरातन भारतीय शास्त्रज्ञ होते.तेव्हा त्यांचे ज्ञान पुढे न नेता नुसते गोडवे गाण्यात काय हशील आहे ?*
ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत नवीन काहीच सांगितले नाही. जे ज्ञान आधीच अवगत होते, तेच फक्त काव्यात लिहिले. तेव्हा आंधभक्तांनो, अंधभक्तीतून बाहेर पडा, आणि पूर्वजांचे नुसतेच गोडवे गाण्याच्या ऐवजी प्रयत्नवादी व्हा, आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करा म्हणजे तुमची खरी प्रगती होईल.
Monday, December 2, 2019
भारतात धर्मांध खूप माजले आहेत
Monday, October 21, 2019
मातृभाषेतून शिक्षण आहे प्रगल्भ पालकाचे लक्षण
एका शिक्षकाचे भाषाविषयाचे आकलन
- जेट जगदीश.
मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता? तेव्हा त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच असतं. मुलांच्या आईवडीलांची मनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते, हे याचे कारण आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकरी' हेच असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढा धसका का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते. मी ज्ञानासाठी शिकतो.ज्ञान विचार करायला शिकविते. स्वतःच्या निर्णयांची बरीवाईट जबाबदारी घेण्याचे भान मला शिक्षणामुळे येते. परिणामी 'मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा आत्मविश्वास त्यामुळे वाढतो, म्हणून शिकतो असे उत्तर कोणीही देत नाही.
पण `नोकरी आणि भाकरी' मिळविणे एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळेच मिळते हा लोकांचा गैरसमज आहे. आणि तरीही तो त्यांनी पसरविलेला आहे. भारतातील हे 'इंडियन' लोक धन्य होत! याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल.
समाजातील `महाजन' ज्या वाटेने जातात, ते बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर अशी धारणा होते. म्हणून मग बहूजन समाज व ऐपत नसणारेही त्याच वाटेने जातात. डॉक्टर, वकील, व्यापारी, आणि कामगार या सर्वांनाच वाटते की, इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी मिळवून देणारी ती गुरूकिल्ली आहे. यावरून आपण आजही मनसिक गुलामगिरीत अडकलो आहोत, हेसिद्ध होते. म्हणूनच इंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही असे म्हटले तर ते चूक ठरू नये. आणि याला जबाबदार मराठी मातृभाषेला कमी लेखल्यामुळे मराठी माणसाने मराठी भाषा शिक्षणाची न करण्याचा करंटेपणाच आहे.🤒
मी इंग्रजी भाषेविरूध्द नाही. पण शिक्षक म्हणून मला असे वाटते की, मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती चांगली वाढते. मातृभाषेतून विषय चांगला समजल्यामुळे पाया पक्का होतो. इंगजी माध्यमातून शिकतांना आधी मुले मातृभाषेतून विचार करतात आणि मग इंग्रजीतून. त्यामुळे भारतीय मुलांच्या मेंदूवर अतिरीक्त ताण येतो. आणि अभ्यास फक्त गुणांसाठी केला जातो. हा माझा अनुभव आहे. कारण मी गेली कित्येक वर्षे इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतो आहे. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.मी मातृभाषेचा वृथा अभिमान बाळगणारा नाही; तर मुलांच्या दीर्घकालीन घडण्याचा त्या मागे विचार आहे.
आणि दुसरे म्हणजे परकी कोणतीही भाषा नंतर स्वप्रयत्नाने आत्मसात करता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिकायला हवे असे नाही.हा माझा स्वानुभव आहे. कारण मी मुळचा मराठी माध्यमातील असूनही गेली 35 वर्ष मात्र मी कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवतो आहे. मला कुठेही भाषेची अडचण आली नाही. मुळात मातृभाषा पक्की असेल तर मग इतर कुठलीही भाषा शिकणे अवघड नसते. ती आपल्या मेंदूची क्षमता आहे. कारण आकलनशक्तीचा पाया पक्का झलेला असतो.
आपण दूरदृष्टीने विचार न केल्यामुळेच आज मुलांची वैचारीक क्षमता कमी झालेली दिसते. परिणामस्वरूप त्यांना read between lines समजत नाही. शब्दाचा फक्त कोशातील अर्थ कळतो, पण शब्दामागील भावना कळत नाहीत. पदवी घेतल्यानेच चांगली नोकरी मिळते हाही एक भ्रमच आहे. ज्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे, नवनव्या कल्पना अंमलात आणायची धमक आहे, अपयशातून यशाकडे जाण्याचे जीद्द आहे, अशा लोकांना sky is the limit असते. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. लहानपणीच असे विचार मुलांमध्ये निर्माण केले तर तो फक्त परिक्षार्थी न होता खरा विद्यार्थी होईल. त्यासाठी लागणारी आकलनशक्ती, विश्लेषक विचार करण्याची कुवत मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे वाढू शकते. म्हणून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे.
शिक्षण हे फक्त नोकरी साठी म्हणून न घेता ज्ञानासाठी घेतले तर माणसाच्या बुध्दीची झेप त्याला जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळवून जगण्यास समर्थ करील. म्हणूनच विचार करायला शिकणे जितके मातृभाषेतून सहजसाध्य होईल तितके इंग्रजी माध्यमातून नाही. आपण मुलांना फक्त साक्षर बनवायचे की सुशिक्षीत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याच मनाशी प्रामाणिकपणे देऊन आणि र्हस्व दृष्टी टाकून आपण सगळे दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.
Thursday, August 8, 2019
धर्मांधांच्या छद्मी प्रश्नांना उत्तरे...
खालील प्रश्न नेहमीच अंनिस चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारले जातात, म्हणून आम्ही एक सार्वत्रिक उत्तर तयार केले आहे. ते चर्चेसाठी सादर करीत आहे... -जेट जगदीश. (^j^)
1. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती समाजप्रबोधन करु शकत नाही का ?
उत्तर : अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीचे समाजप्रबोधन हे 'देवाधर्माच्या भीतीने तुम्ही नितीने वागा म्हणजे तुम्हाला मृत्यू नंतर स्वर्ग मिळेल', अशाप्रकारचे असते.संतांची भूमिका जरी समाजप्रबोधनाची असली तरी ते जातीच्या चौकटी भेदू शकले नाहीत. भक्तिमार्गाचा आधार घेऊन परलोकातीळ मोक्षाचा आनंद इहलोकापेक्षा मोठा आहे, हे सांगून भारतीय जनमानस दैववादी बनवले. कर्मकांड आणि छाछुगिरीवरील टिका सोडल्यास समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यास त्यांचा फार उपयोग झाला नाही. एवंच एका संकुचित मर्यादेपर्यंत हा उपदेश चांगलाच असतो, पण तो भीतीपोटी विचार मारतो. परिणामी माणूस नवीन काही करायला धजावत नाही. आणि समाज स्थितीशील बनतो. त्याचमुळे आपण सतत मागास राहिलो आहोत. त्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी प्रश्न विचारायला आणि नवनवीन आव्हाने स्वीकारायला तयार करणारे समाजप्रबोधन समाजाला नक्कीच प्रगतीपथावर नेते. कारण प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या धडपडीतून नवनवीन शोध लागतात. जसे शोध 10व्या शातकापर्यंत शूल्ब, चरक, सुश्रुत, आर्यभट, कणाद, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांनी लावले, तसे त्यांच्या नंतर प्रश्न न पडण्याची आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', ही वृत्ती वाढीला लागल्यामुळे ती वैज्ञानिक परंपरा खंडित झाली. म्हणूनच अध्यात्माची कास सोडून वैज्ञानिक विचारांची कास धरायला हवी.
2. डोळस श्रध्दा असणे योग्य की अयोग्य?
उत्तर : 'डोळस श्रद्धा' हा भोंगळ शब्द प्रयोग आहे. कारण श्रद्धा कधीही तपासता येत नाही, तसेच श्रध्देच्या चिकित्सेलाही मज्जाव असतो.म्हणून श्रद्धेय माणूस बदलाला सतत विरोध करत असतो. पण विश्वास मात्र तापासाता येतो... त्याची चिकित्सा करता येते. त्यामुळे बदल अपेक्षित असतो. श्रद्घा आणि वैज्ञानिक सत्य तथा गृहीते यांतील भेद पुढीलप्रमाणे आहेत...
(a) वैज्ञानिक सत्य हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. तर श्रद्धा मात्र कुठलीही शंका न घेता आहे तसेच स्वीकारण्याचा आग्रह धरते.
(b) वैज्ञानिक सत्य किंवा ज्याविषयी ते सत्य आहे, तो विषय आदरणीय किंवा पूज्य नसून ते वास्तव असते. याउलट जेव्हा सत्याचा किंवा अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो केवळ बौद्घिक स्वीकार नसून, त्यात व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारा भावनिक आणि इच्छाशक्तीचा भागही असतो. ती निष्ठा असते.
(c) श्रद्घेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. तर वैज्ञानिक सत्याचा स्वीकार मात्र पुरावे आणि तर्क यातून तावून-सुलाखून निघाल्यावरच केला जातो.
(d) श्रद्घेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात. तर विज्ञानात ह्या भावनांना स्थान नसते. कारण ते फक्त सत्याचा स्वीकार करते. विज्ञान हे तटस्थ असते, म्हणून त्याला दुधारी शस्त्र म्हणतात. ते वापरणाऱ्या माणसाच्या भावनाच त्याचा वापर विधायक वा विघातक गोष्टींसाठी करतात. म्हणून दोष विज्ञानात नाही तर माणसातच आहे.
तेव्हा 'डोळस श्रद्धा' हा शब्द 'विश्वास' या अर्थी वापरत असाल तर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण डोळस श्रद्धा असे काही नसतेच.
3. ज्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्ती आहेत, त्यांच्यावर केरळसारख्या रांज्यात जे हल्ले होत आहेत, त्याच्यावर इतर प्रसंगी हल्लाबोल करणारे पुरोगामी आता एकदम अबोल आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा नाही आहे का ?
उत्तर : या देशांतील. उजव्या आणि डाव्यांच्या असहिष्णुतेची उदाहरणे कमी नाहीत. जसे परिवारातील अतिरेक्यांकडून सध्या गोवंश हत्याबंदीपासून नैतिकता लादण्यापर्यंत जो काही आचरटपणा सुरू आहे तो त्यांना बंद करावा लागेल. तसेच डाव्यांतील अनेकांनाही हे राजकीय हत्यासत्र थांबवावे लागेल. वैयक्तिक आयुष्यात ही मंडळी विचाराने आणि आचाराने आधुनिक आणि अहिंसकही असतात. परंतु पक्ष म्हणून ते उभे राहिले की त्यांच्यातील कर्मठपणा जागा होतो आणि केरळात जे काही घडते ते घडू लागते. याचा अर्थ इतकाच की हे टाळावयाचे असेल तर उभय बाजूंना आपल्या विचारधारेत सहिष्णुतेस स्थान द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणाने - मग तो डाव्यांचा असो वा उजव्यांचा - कोणाचेच भले होत नाही. सोव्हिएत रशिया आणि हिटलरकालीन जर्मनी ही याची जिवंत उदाहरणे. हे या मंडळींना कळत नाही असे नाही. परंतु त्यांची पंचाईत ही की ही अंध पोथीनिष्ठा त्यांनी सोडली तर या दोन्हीही पक्षांचे चेहरेच हरवतील. गोमाता, धर्म आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद वगळता भाजप हा काँग्रेससारखाच दिसेल आणि भांडवलशाहीचा विरोध सोडल्यास डावे हे समाजवाद्यांसारखे दिसतील. ही खरी या दोघांची अडचण आहे. अतिरेकी पोथीनिष्ठेचा शेवट हा नेहमीच पिंजऱ्यातच होत असतो.(संदर्भ :लोकसत्ता अग्रलेख, 08/08/2017)
4. कोणत्याही धर्माचा कट्टरवाद वाईटच, पण भिन्न विचारसरणी असलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमुहाबद्दल काही विचारवंत किंवा पुरोगामी यांचे विचार अंत्यत टोकदार आहेत, त्यांच्या या वर्तनुकीला "वैचारिक कट्टरवाद" म्हणता येईल का ?
उत्तर : धार्मिक कट्टरतावाद आणि धारदार शब्दात केलेला वैचारिकवाद या दोन भिन्न गोष्टी आहेत. कारण धार्मिक कट्टरतेत विचारांतील मुद्यांपेक्षा शारीरिक गुद्यांवर भर असतो. तर वैचारिक विवादात शब्द जरी धारदार असले तरी समोरच्याला चर्चा करण्यास उद्युक्त करण्यात रस असतो. पण कट्टर धार्मिक तो आपल्यावर झालेला हल्ला आहे असे समजून प्रामाणिक चिकित्सा करण्यापेक्षा विवादातील आपल्याला सोईचे मुद्दे घेऊन आपणच कसे बरोबर आहोत असा अट्टाहासाने सांगत असतो. आणि 'मी म्हणेन तेच ऐकले पाहिजे नाहीतर गोळ्या घालून संपवून टाकीन' अशी भाषा धार्मिक कट्टर लोकांची असते. त्याउलट भारतात वैचारीक प्रतिवाद कारणाऱ्यांनी कधीही खुनाची खुनशी भाषा सोडाच पण साधी धमकीही दिलेली नाही. एवंच ही तुलना अयोग्य आहे.
5. सर्वधर्मसमभाव जोपासणे आणि जातीयता नष्ट करणे यासाठी आपण लढत आहात.( आ. दाभोलकरांच्या मते जात मानने ही सुध्दा अंधश्रध्दा आहे.) असे असतांना प्रवृत्तींवर टिका करण्याऐवजी संपुर्ण ब्राम्हण समाजालाच टिकेचा धनी बनविले जात असते, सर हे योग्य आहे का ? अशी संपुर्ण जातीबद्दल किंवा समाजाबद्दल गरळ ओकणारे जातीयवादी नाहीत का ?
उत्तर : सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, 'ब्राम्हण' ही जात आहे तर 'ब्राम्हण्य' हा गुणधर्म आहे... वृत्ती आहे. इतरांना तुच्छ आणि कमी प्रतीचे लेखणे व स्वत:ला श्रेष्ठ व उच्च समजणे ही ब्राम्हण्याची लक्षणे आहेत. धूर्तपणा, फसविण्याची कला, गर्विष्ठपणा ही आणखी काही लक्षणे आहेत. अहंगंड जोपासणे व वाढवीत रहाणे हे ब्राम्हण्यच आहे. ब्राम्हण्य दीर्घद्वेशी असते. खोटे बोलणे, रेटून बोलणे एकाच वेळा वेगवेगळे बोलणे ही आणखी काही वैशिष्टे सांगता येतील. जात जन्माने मिळते. ब्राम्हणांत कांही चांगले असते. व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा लाभ मिळतो. समाज घटक म्हणून ब्राम्हण्य हानिकारक असते. ब्राम्हणांत ब्राम्हण्य जपणारे थोडे असतील परंतु ब्राम्हण्य नसलेले सुध्दा काही असतात. तसेच ब्राम्हणेतरातही काही ब्राम्हण्य धारण कलेले असतात. ब्राम्हण्य हे मुलतः व मुख्यत ब्राम्हण जातीनेच जन्माला घातले व वाढविले, परंतु अलिकडे इतर जातींतही ते वाढत आहे. ब्राम्हणातले ब्राम्हण्य तर वाईट आहे. अब्राम्हणांतले ब्राम्हण्य सुद्धा वाईटच असते व आहे. अनेकदा ब्राम्हणेतारांतील (जातीने ब्राम्हण नसलेला) ब्राम्हण्य सामाजिकदृष्ट्या जास्त हानिकारक असते. सर्वात जास्त पुरोगामी सुद्धा ब्राम्हण जातीतच आहेत. ज्याअर्थी अमुक एक व्यक्ती जन्माने ब्राम्हण आहे. त्याअर्थी तो प्रतिगामी आहे आणि ज्याअर्थी अमुक एक म्हणजे मराठा किंवा दलित किंवा ओबीसी आहे. त्याअर्थी तो पुरोगामी आहे. ही दोन्ही प्रमेये चूक आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनाच टार्गेट केले जाते, असा विचार आपलाच सामाजिक अभ्यास कमी असल्याचे दाखवतो.
6. हिंदू धर्मावद्दल अंत्यत घृणास्पद बोलणारे आणि शिवराळ भाषा वापरणार्यांना धर्मांध म्हणू नये का ? [विवेकाने चिकित्सक बुध्दीने मांडणी करणाऱ्यांची भाषा कधीच शिवराळ नसते.]
उत्तर : जे खरेच शिवराळ भाषा वापरतात ते छद्म पुरोगामी असले पाहिजेत. पण प्रबोधनकार ठाकरे, आगरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर यांनी तर हिन्दु धर्माविषयी अत्यंत जहाल शब्दात टीका केली आहे. प्रबोधनकारांनी शंकराला हिंदूचा 'गंजड देव' म्हणजे गांजा पिणारा असे म्हटले आहे. संदर्भासाठी त्याची 'हिंदू धर्माचा ऱ्हास' आणि 'देवाचा धर्म व धर्माची देवळे...' ही पुस्तके वाचा. आगरकारांचे 'सुधारक'पत्रांचे 3 खंड शासनाने प्रसिद्ध केले आहेत ते वाचा. आणि सावरकरांची 'क्षकीरणे' व 'विज्ञाननिष्ठ निबंध' वाचा. हे वाचल्यावर जहाल, धारदार शब्द आणि शिवराळ भाषा या शब्दांतील फरक कळेल. ह्यावरून लक्षात येईल की, धर्मावर टीका करणे म्हणजे चुकीच्या विचारसरणीला प्रश्न विचारून धर्माची चिकित्सा करणे होय. हीच चिकित्सा माणसाला आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करते. त्यातूनच धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा घडण्यास सुरुवात होते. तेव्हा चिकित्सेला घाबरून ते बोलणे म्हणजे धर्माचा द्वेष करणे वा धर्मावर केलेला हल्ला आहे असे समजणे, हेच समाजाला नुकसानकारक ठरणारे आहे.
Wednesday, July 24, 2019
ज्योतिषांचे थोतांड
ज्योतिषातील अवैज्ञानिक विचारांना वैज्ञानिक मुलामा देणाऱ्या धर्मअंधांची पोलखोल - जेट जगदीश.
1) ग्रहताऱ्यांचा माणसावर होणारा परिणाम होतो का ?
उत्तर : चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून मणासावरही ग्रहांचा परिणाम होतो. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वास्तुमानाशी निगडीत असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का ? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते.त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रहाताऱयांपेक्षा बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाऐवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय ?
2) डॉक्टरांचे निदानही चुकते मग ज्योतिषांचे चुकले तर हाकाटी का करता?
उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे वैद्यक शास्त्र ज्या वैज्ञानिक बैठकीवर तयार झाले आहे, तसे ज्योतिषाचे आहे काय ? नाही. म्हणून निखळ विज्ञान आणि छद्मविज्ञान यांची सरमिसळ करून हा मुद्दा मांडून ज्योतिषाचे समर्थक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. डॉक्टरांचे निदान चुकले म्हणजे वैद्यकाची बैठक चुकली आहे असे म्हणण्यात समर्थकांचा अभ्यास नसल्याचे दाखवतो.
3) ज्योतिषात नऊ ग्रह आहेत, म्हणजे ते विज्ञान नाही का ?
उत्तर : ज्योतिषात जे नवग्रह सांगितले आहेत ते सगळेच मुळात ग्रह नाहीत हे शाळेतला कोणताही मुलगा सांगू शकतो. रवी म्हणजे सूर्य हा तारा आहे, तर राहू-केतू हे सूर्य आणि चंद्राच्या परिभ्रमण कक्षेचे छेदनबिंदू आहेत. त्यांना संपातबिंदू असे म्हणतात, आणि चंद्र हा तर पृथ्वीचा उपग्रह आहे. तेव्हा अशा चुकीच्या पायावर उभी राहिलेली ज्योतिषाची इमारत तकलादूच असणार, हे निश्चित.
5) ज्योतिष्यात काय सांगावे, काय सांगू नये याचे नियम आहेत.
उत्तर : खरेतर ज्या विषयात छुपेपणा असतो तो विषय भंपकच असला पाहिजे. कारण जिथे चोरटेपणा येतो तिथे बदमाशी नक्की होते. विज्ञानात मात्र कुठेही असा छुपेपणा नसतो. जगाच्या पाठीवर ते सर्वत्र सारखे असते आणि सर्वाना सारखाच निष्कर्ष देते. तेव्हा ही तुलना व्यर्थ आहे.
6) ज्योतिषाला थोतांड का म्हणायचे ?
उत्तर : ज्योतिष हे लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेणारे थोतांडच आहे. मागदर्शक तर नक्कीच नाही. फार तर त्याला अंदाज वा भाकीत म्हणता येईल, पण म्हणून का त्यावर माणसाने अवलंबून राहावे ? म्हणूनच मी म्हणतो, जे ज्योतिषावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. परिणामी ते आपले जीवन ज्योतिषाच्या हवाली करून आयुष्यभर गटांगळ्या खात असतात.
7) ज्योतिषाला विज्ञान का म्हणायचं नाही ?
उत्तर : ज्योतिषात विज्ञान आणि गणिताची सरमिसळ करून ते शास्त्र आहे असे लोकांना भासवले जाते. आकाशातले ग्रहतारे वैज्ञानिक नियमाने बद्ध आहेत. ते खरेतर खगोलशास्त्रात येते. त्याचा ज्योतिषाशी काहीही संबंध नाही. ग्रहताऱ्यांचे भासमान आकार म्हणजे राशी. ग्रहताऱ्यांना कुठलाही स्वभाव नसतो की, ते काही फळ देत नसतात; पण ज्योतिषात मात्र राशींना स्वभाव बहाल केले आहेत आणि म्हणून राशिफलही आहे. याचा अर्थ भासमान आकाराला ही भावनिक वैशिष्ठ्ये चिकटवून ते ग्रहताऱ्यांचे गणित म्हणून सांगणे हा तर भंपकपणा झाला.
8)विज्ञान अपुरे नाही का ?
विज्ञानाने कधीच अंतिम सत्य गावसल्याचा दावा केलेला नाही. म्हणूनच विज्ञान प्रत्यही बदलत असते आणि नव्याचा शोध घेत असते. तसे नवे ज्ञान ज्योतिषात मात्र काही निर्माण होत नाही. ते आपले 2/3 हजार वर्षांपूर्वी जसे आहे तिथेच अडकून पडले आहे. भृगूसंहितेतील ज्ञान हेच अंतिम सत्य आजही समजले जाते. म्हणजेच डबक्यातील पाणी जसे दूषित होते, तसेच हे ज्योतिषही दूषित झालेले आहे. तेव्हा त्यापासून सुज्ञ लोकांनी लांबच राहिलेले बरे.
विज्ञानात असतो तसा कार्यकारणभाव ज्योतिषात असेल तर तो सिद्ध करायला काय हरकत आहे ? म्हणून ज्योतिषाची निखळ वैज्ञानिक बैठक सिद्ध करावी त्यासाठी अंनिसने आव्हान प्रक्रिया तयार केली आहे. आणि अंनिसने 21 लाखाचे बक्षीसही ठेवले आहे. ते आव्हान स्वीकारून घ्यायला गेली 25 वर्षे कुणीही ज्योतिषी पुढे आला नाही. हे कशाचे लक्षण आहे ?
एवंच ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे! ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन त्या नुसत्या निषेधार्हच नाहीत तर त्या व्यक्तिला, समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करणाऱ्या असतात. त्यांची सारासार विचारशक्ती मारतात. त्यामुळे वरकरणी ही कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा असली तरी व्यापक प्रमाणात समाजाला घातक ठरणारी आहे.