Wednesday, July 24, 2019

ज्योतिषांचे थोतांड

ज्योतिषातील अवैज्ञानिक विचारांना वैज्ञानिक मुलामा देणाऱ्या धर्मअंधांची पोलखोल - जेट जगदीश.

1) ग्रहताऱ्यांचा माणसावर होणारा परिणाम होतो का ?
उत्तर : चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून मणासावरही ग्रहांचा परिणाम होतो. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वास्तुमानाशी निगडीत असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का ? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते.त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रहाताऱयांपेक्षा बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाऐवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय ?

2) डॉक्टरांचे निदानही चुकते मग ज्योतिषांचे चुकले तर हाकाटी का करता?
उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे वैद्यक शास्त्र ज्या वैज्ञानिक बैठकीवर तयार झाले आहे, तसे ज्योतिषाचे आहे काय ? नाही. म्हणून निखळ विज्ञान आणि छद्मविज्ञान यांची सरमिसळ करून हा मुद्दा मांडून ज्योतिषाचे समर्थक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. डॉक्टरांचे निदान चुकले म्हणजे वैद्यकाची बैठक चुकली आहे असे म्हणण्यात समर्थकांचा अभ्यास नसल्याचे दाखवतो.

3) ज्योतिषात नऊ ग्रह आहेत, म्हणजे ते विज्ञान नाही का ?
उत्तर : ज्योतिषात जे नवग्रह सांगितले आहेत ते सगळेच मुळात ग्रह नाहीत हे शाळेतला कोणताही मुलगा सांगू शकतो. रवी म्हणजे सूर्य हा तारा आहे, तर राहू-केतू हे सूर्य आणि चंद्राच्या परिभ्रमण कक्षेचे छेदनबिंदू  आहेत. त्यांना संपातबिंदू असे म्हणतात, आणि चंद्र हा तर पृथ्वीचा उपग्रह आहे. तेव्हा अशा चुकीच्या पायावर उभी राहिलेली ज्योतिषाची इमारत तकलादूच असणार, हे निश्चित.

5) ज्योतिष्यात काय सांगावे, काय सांगू नये याचे नियम आहेत.
उत्तर : खरेतर ज्या विषयात छुपेपणा असतो तो विषय भंपकच असला पाहिजे. कारण जिथे चोरटेपणा येतो तिथे बदमाशी नक्की होते. विज्ञानात मात्र कुठेही असा छुपेपणा नसतो. जगाच्या पाठीवर ते सर्वत्र सारखे असते आणि सर्वाना सारखाच निष्कर्ष देते. तेव्हा ही तुलना व्यर्थ आहे.

6) ज्योतिषाला थोतांड का म्हणायचे ?
उत्तर : ज्योतिष हे लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेणारे थोतांडच आहे. मागदर्शक तर नक्कीच नाही. फार तर त्याला अंदाज वा भाकीत म्हणता येईल, पण म्हणून का त्यावर माणसाने अवलंबून राहावे ?  म्हणूनच मी म्हणतो, जे ज्योतिषावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. परिणामी ते आपले जीवन ज्योतिषाच्या हवाली करून आयुष्यभर गटांगळ्या खात असतात.

7) ज्योतिषाला विज्ञान का म्हणायचं नाही ?
उत्तर : ज्योतिषात विज्ञान आणि गणिताची सरमिसळ करून ते शास्त्र आहे असे लोकांना भासवले जाते. आकाशातले ग्रहतारे वैज्ञानिक नियमाने बद्ध आहेत. ते खरेतर खगोलशास्त्रात येते. त्याचा ज्योतिषाशी काहीही संबंध नाही. ग्रहताऱ्यांचे भासमान आकार म्हणजे राशी. ग्रहताऱ्यांना कुठलाही स्वभाव नसतो की, ते काही फळ देत नसतात; पण ज्योतिषात मात्र राशींना स्वभाव बहाल केले आहेत आणि म्हणून राशिफलही आहे. याचा अर्थ भासमान आकाराला ही भावनिक वैशिष्ठ्ये चिकटवून ते ग्रहताऱ्यांचे गणित म्हणून सांगणे हा तर भंपकपणा झाला.

8)विज्ञान अपुरे नाही का ?
विज्ञानाने कधीच अंतिम सत्य गावसल्याचा दावा केलेला नाही. म्हणूनच विज्ञान प्रत्यही बदलत असते आणि नव्याचा शोध घेत असते. तसे नवे ज्ञान ज्योतिषात मात्र काही निर्माण होत नाही. ते आपले 2/3 हजार वर्षांपूर्वी जसे आहे तिथेच अडकून पडले आहे. भृगूसंहितेतील ज्ञान हेच अंतिम सत्य आजही समजले जाते. म्हणजेच डबक्यातील पाणी जसे दूषित होते, तसेच हे ज्योतिषही दूषित झालेले आहे. तेव्हा त्यापासून सुज्ञ लोकांनी लांबच राहिलेले बरे.

विज्ञानात असतो तसा कार्यकारणभाव ज्योतिषात असेल तर तो सिद्ध करायला काय हरकत आहे ? म्हणून ज्योतिषाची निखळ वैज्ञानिक बैठक सिद्ध करावी त्यासाठी अंनिसने आव्हान प्रक्रिया तयार केली आहे. आणि अंनिसने 21 लाखाचे बक्षीसही ठेवले आहे. ते आव्हान स्वीकारून घ्यायला गेली 25 वर्षे कुणीही ज्योतिषी पुढे आला नाही. हे कशाचे लक्षण आहे ?

एवंच ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे! ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन त्या नुसत्या निषेधार्हच नाहीत तर त्या व्यक्तिला, समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करणाऱ्या असतात. त्यांची सारासार विचारशक्ती मारतात. त्यामुळे वरकरणी ही कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा असली तरी व्यापक प्रमाणात समाजाला घातक ठरणारी आहे.

No comments: