Monday, October 21, 2019

मातृभाषेतून शिक्षण आहे प्रगल्भ पालकाचे लक्षण

एका शिक्षकाचे भाषाविषयाचे आकलन
- जेट जगदीश.

मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता? तेव्हा त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच असतं. मुलांच्या आईवडीलांची मनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते, हे याचे कारण आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकरी' हेच असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढा धसका का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते. मी ज्ञानासाठी शिकतो.ज्ञान विचार करायला शिकविते. स्वतःच्या निर्णयांची बरीवाईट जबाबदारी घेण्याचे भान मला शिक्षणामुळे येते. परिणामी 'मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा आत्मविश्वास त्यामुळे वाढतो, म्हणून शिकतो असे उत्तर कोणीही देत नाही.

पण `नोकरी आणि भाकरी' मिळविणे एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळेच मिळते हा लोकांचा गैरसमज आहे. आणि तरीही तो त्यांनी पसरविलेला आहे. भारतातील हे 'इंडियन' लोक धन्य होत! याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल.

समाजातील `महाजन' ज्या वाटेने जातात, ते बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर अशी धारणा होते. म्हणून मग बहूजन समाज व ऐपत नसणारेही त्याच वाटेने जातात. डॉक्टर, वकील, व्यापारी, आणि कामगार या सर्वांनाच वाटते की, इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी मिळवून देणारी ती गुरूकिल्ली आहे. यावरून आपण आजही मनसिक गुलामगिरीत अडकलो आहोत, हेसिद्ध होते. म्हणूनच इंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही असे म्हटले तर ते चूक ठरू नये. आणि याला जबाबदार मराठी मातृभाषेला कमी लेखल्यामुळे मराठी माणसाने मराठी भाषा शिक्षणाची न करण्याचा करंटेपणाच आहे.🤒

मी इंग्रजी भाषेविरूध्द नाही. पण शिक्षक म्हणून मला असे वाटते की, मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती चांगली वाढते. मातृभाषेतून विषय चांगला समजल्यामुळे पाया पक्का होतो. इंगजी माध्यमातून शिकतांना आधी मुले मातृभाषेतून विचार करतात आणि मग इंग्रजीतून. त्यामुळे भारतीय मुलांच्या मेंदूवर अतिरीक्त ताण येतो. आणि अभ्यास फक्त गुणांसाठी केला जातो. हा माझा अनुभव आहे. कारण मी गेली कित्येक वर्षे इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतो आहे. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.मी मातृभाषेचा वृथा अभिमान बाळगणारा नाही; तर मुलांच्या दीर्घकालीन घडण्याचा त्या मागे विचार आहे.

आणि दुसरे म्हणजे परकी कोणतीही भाषा नंतर स्वप्रयत्नाने आत्मसात करता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिकायला हवे असे नाही.हा माझा स्वानुभव आहे. कारण मी मुळचा मराठी माध्यमातील असूनही गेली 35 वर्ष मात्र मी कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवतो आहे. मला कुठेही भाषेची अडचण आली नाही. मुळात मातृभाषा पक्की असेल तर मग इतर कुठलीही भाषा शिकणे अवघड नसते. ती आपल्या मेंदूची क्षमता आहे. कारण आकलनशक्तीचा पाया पक्का झलेला असतो.

आपण दूरदृष्टीने विचार न केल्यामुळेच आज मुलांची वैचारीक क्षमता कमी झालेली दिसते. परिणामस्वरूप त्यांना read between lines समजत नाही. शब्दाचा फक्त कोशातील अर्थ कळतो, पण शब्दामागील भावना कळत नाहीत. पदवी घेतल्यानेच चांगली नोकरी मिळते हाही एक भ्रमच आहे. ज्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे, नवनव्या कल्पना अंमलात आणायची धमक आहे, अपयशातून यशाकडे जाण्याचे जीद्द आहे, अशा लोकांना sky is the limit असते. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. लहानपणीच असे विचार मुलांमध्ये निर्माण केले तर तो फक्त परिक्षार्थी न होता खरा विद्यार्थी होईल. त्यासाठी लागणारी आकलनशक्ती, विश्लेषक विचार करण्याची कुवत मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे वाढू शकते. म्हणून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे.

शिक्षण हे फक्त नोकरी साठी म्हणून न घेता ज्ञानासाठी घेतले तर माणसाच्या बुध्दीची झेप त्याला जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळवून जगण्यास समर्थ करील. म्हणूनच विचार करायला शिकणे जितके मातृभाषेतून सहजसाध्य होईल तितके इंग्रजी माध्यमातून नाही. आपण मुलांना फक्त साक्षर बनवायचे की सुशिक्षीत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याच मनाशी प्रामाणिकपणे देऊन आणि र्‍हस्व दृष्टी टाकून आपण सगळे दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.

No comments: