Tuesday, April 13, 2021

गुढीपाडव्याचा भौगोलिक परामर्श

गुढीपाडव्याचा भौगोलिक परामर्श✍️JK

सातवाहनांनी शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून *सालाहन संवत्सर* सुरू केले. यालाच आजच्या रूढ भाषेत *शालिवाहन शक* ही नवीन कालगणना तत्कालीन मराठी मुलखात सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. असे असले तरी भारतात अजूनही दोन शक वापरले जातात. एक आहे *विक्रमसंवत शक* व दुसरा *शालिवाहन शक.* विक्रम संवत शकाचा पहिला दिवस *कार्तिक प्रतिपदा* तर शालिवाहन शकाचा पहिला दिवस असतो, *चैत्र शुद्ध प्रतिपदा* त्यामुळे जे समूह शालिवाहन शक पाहतात ते चैत्राचा पहिला दिवस नववर्ष म्हणून साजरा करतात. तर विक्रम संवत दिवाळीच्या पाडव्या पासून सुरु होते; आणि शालिवाहन शक चैत्र पाडव्याला सुरु होते.

भारतात सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर वापरले जाते. याशिवाय भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, भारतीय राष्ट्रीय पंचांग नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी भारत सरकारने प्रख्यात शास्त्रज्ञ मेघनाथ सहा यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले भारतीय राष्ट्रीय पंचांग वापरण्यास सुरुवात केली. पण प्रत्यक्षात त्याला  भारतीय जनतेची साथ न मिळाल्याने हे कॅलेंडर आता सरकारी पत्रांवर किंवा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तिथींच्या जोडीने लिहिण्यापलीकडे वापरले जात नाही. आकाशवाणीवर मात्र या तारखांची उद्घोषणा केली जाते.

*महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड आणि तेलंगण* या राज्यांमध्ये शक संवत्सर आणि चांद्र पंचांग वापरले जाते. चैत्रापासून म्हणजेच गुढीपाडव्यादिनी या राज्यांमधील नववर्षाचा आरंभ होतो. *गुजराथमध्ये* नववर्ष दिवाळी पाडव्यापासून म्हणजे विक्रम संवत्सराच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. मात्र यातील महिन्यांची नावे शालिवाहन संवत्सराप्रमाणेच असतात. *उत्तर भारतात शालिवाहनांची सत्ता कधीच नव्हती, म्हणून तिथे गुढीपाडवा साजरा होत नाही. तसेच रामायणातील घटनेशी याचा संबंध नसल्याने अयोध्येतही गुढीपाडवा साजरा केला जात नाही.*

साधारणतः मार्च/एप्रिल महिन्यात नवीन वर्ष सुरवात होणे हा प्रकार जगात अनेक संस्कृती आणि राष्ट्रांमध्ये फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असे दिसून येते. ग्रेगरीयन कॅलेंडर येण्यापूर्वी युरोपात २५ मार्च हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जात असे. जिथे जिथे मार्च/एप्रिल महिन्यात नवीन वर्ष दिन साजरा केला जातो अशी खूप सारी राष्ट्रे/संस्कृती आहेत. त्यांची संपूर्ण यादीच या लिंक मध्ये आहे...
https://en.wikipedia.org/wiki/New_Year
मार्च मध्ये इक्विनॉक्स (Equinox) असतो. म्हणजे या दिवशी मध्यान्हीचा सूर्य हा बरोबर विषुववृत्तावर असतो. वरील यादी मधील अनेक नवीन वर्षे ही गोष्ट लक्षात घेऊन झालेली आहेत.

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनी वनीं राहूं, म्हणा त्यातें।" असे उदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

भारतातील विविध प्रांतात नव वर्ष खालील प्रमाणे सुरू होते... त्यांची नावेही वेगवेगळी आहेत...
१) महाराष्ट्र - ११ किंवा १२ एप्रिल - गुढी पाडवा
२) बंगाल - १३ किंवा १४ एप्रिल (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते. - नोब वर्ष
३) तामिळनाडू- १४ एप्रिल - पुंथंडु
४) आंध्र प्रदेश - १४ एप्रिल - उगादी
५) आसाम - १५ एप्रिल - बिहू
६) केरळ - १३-१४ एप्रिल - विशु
७) पंजाबी वर्षारंभ - १३ किंवा १४ एप्रिल (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) असते. - बैशाखी
८) नवरेह हा काश्मीरमधील हिंदू पंडितांचा नववर्ष सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा होतो. पाडव्याला नवरेह म्हटले जाते. वसंताचे स्वागत करणारा दिवस म्हणूनही हा सण ओळखला जातो.

थोडक्यात काय तर पाडव्याचा संबंध पृथ्वीच्या भूगोलाशी आणि खगोलाशी आहे. पण भारतीयांना जिथे तिथे प्रत्येक सणाचा संबंध धार्मिकतेशी लावण्याची खोड असल्यामुळे त्याच्याविषयी खऱ्या-खोट्या कहाण्या, अख्यायिका, दंतकथा जोडून पाडव्याचा अस्मिता सुखावणारा सांस्कृतिक सण केला गेला आहे. पण सजग विचारी माणसे मात्र या दिवसाचे भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय कारण लक्षात घेऊन हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण समजण्याएवढेच त्याला महत्त्व देतात.

No comments: