गुरुचरित्र : पतिव्रता स्त्री की गुलाम?
– जगदीश काबरे.
गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये असा अलिखित दंडक आहे. याचे कारण गुरुचरित्रातील एकतिसावा अध्याय वाचल्यावर लक्षात येते. या अध्यायात पतिव्रता स्त्रीने कसे वागावे, काय खावे, काय ल्यावे यासंबंधी विवेचन केलेले आहे. त्यावरून असे लक्षात येते की, पोथ्या पुराणे लिहिणाऱ्या ब्राह्मणांनी आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना कसे गुलाम बनवलेले आहे... नवर्याच्या पायाची दासी समजले आहे आणि तिलाच पतिव्रता असे गौरवून तिच्या डोक्यात ही गुलामी धार्मिक अंगाने भरलेली आहे. दुर्दैव असे आहे की, आजची शिक्षित स्त्रीही त्याच गुलामीच्या बंधनात अडकून पोथ्या पुराणे शिरोधाहार्य मानत आहे.
या 31 व्या अध्यायातील
46 व्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की, जी स्त्री नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषाचा विचार करेल तर त्या स्त्रीला पुढच्या जन्मी उलूक योनी म्हणजे घुबडाचा जन्म मिळेल. तर 86 व्या याच कारणासाठी श्लोकात ती पुढच्या जन्मी वटवाघुळाचा जन्म घेईल आणि स्वतःची विष्ठा खात झाडावर लोंबत राहील.
62 व्या श्लोकात जी स्त्री सासू, सासरे, नणंद, भावजय, दिर अशा भरल्या घरातून वेगळे होण्याचा विचार करते ती पुढच्या जन्मी श्वान योनी म्हणजे कुत्री होते तर 83 व्या श्लोकात याच कारणासाठी ती ऋक्ष योनी म्हणजे अस्वल होऊन आरण्यात भटकेल, असे म्हटले आहे.
66 व्या श्लोकात पती जरी नपुसक असला तरी त्यालाच देवासमान मानावे असाही उपदेश केला आहे.
76 व्या श्लोकात म्हटले आहे की, जर स्त्री नवऱ्याला उलटून बोलेल तर ती पुढच्या जन्मी कुत्र्यासारखी कोल्हा होऊन भुंकत राहील.
84 व्या श्लोकात पुरुष रागावल्यावर जर स्त्री त्याला 'मर' असे म्हणत रागावली तर ती पुढच्या जन्मी वाघीण होईल.
87 व्या श्लोकात म्हटले आहे की, जर स्त्रीने पतीला उलट उत्तरे दिली तर ती पुढच्या जन्मी मुकी होईल.
88 व्या श्लोकात म्हटले आहे, पतीने जरी दुसरी स्त्री केली तर तीच्याशी वैर धरणारी पहिली पत्नी सात जन्म दुःख भोगेल.
इतर काही श्लोकांत पतिव्रता स्त्रीने पतीच्या सतत आज्ञेत राहावे आणि परपुरुषाकडे नजर उचलूनही पाहू नये असाही दंडक घालून दिला आहे. पति आपल्याशी कितीही निष्ठुरपणे वागला तरीही त्याचा राग धरू नये त्याच्या चरणाचे तीर्थ घ्यावे. प्रातःसमयी उठल्याबरोबर पतीच्या चरणांवर डोके ठेवून त्याचा आशीर्वाद घ्यावा, अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत.
एकूण काय तर स्त्रियांनी आपले मन मारून पतीला फक्त संतोषात ठेवावे. यावरून ही पोथ्या पुराणे स्त्रियांना एक उपभोग्य वस्तू समजतात. पुरुषाने कसेही उंडारले तरी चालेल; पण स्त्रीयांनी मात्र चार भिंतीतच पतीला परमेश्वर समजून जगावे – भले तो दारुडा, मारकुटा, नपुसक वा सवती आणणारा का असेना! अशा हिंदु धर्माचा ज्यांना गर्व आहे ते किती नीच वृत्तीचे आहेत हेच यावरून सिद्ध होत नाही काय 🤦JK
संदर्भाचे श्लोक खालील प्रमाणे...
पतिव्रतेचें आचरण । सांगे गुरु विस्तारोन । पुरुष जेवितां प्रसाद जाण । मुख्य भोजन स्त्रियेसी॥३२॥
आणिक सेवा ऐशी करणें । पुरुष देखोनि उभें राहणें । आज्ञेविण बैसों नेणे । अवज्ञा न करणें पतीची ॥३३॥
दिवस अखंड सेवा करणे अतिथि येतां पूजा करणें । पतिनिरोपावीण न जाणें ।
दानधर्म न करावा ॥३४॥
पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि । शयनकाळी सर्व रात्रीं । सेवा करावी भक्तींसी ॥३५॥
पति निद्रिस्त झाल्यावरी । आपण शयन कीजे नारी । चोळी तानवडे ठेवावीं दुरी । तेणें पुरुषशरीर स्पर्शू नये ॥३६॥
स्पर्शे चोळी पुरुषासी । हानि होत आयुष्यासी। घेऊं नये नांव त्यासी । पति-आयुष्य उणें होय ॥३७॥
जागृत न होतां पति ऐका । पुढें उठीजे सती देखा । करणें सडासंमार्जन निका । करणें निर्मळ मंगलप्रद ॥३८॥
स्नान करूनि त्वरित । पूजूनि घ्यावें पतितीर्थ। चरणी मस्तक ठेवोनि यथार्थ । शिवासमान भावावें ॥३९॥
असतां ग्रामीं गृहीं पुरुष । सर्व शृंगार करणें हर्ष । ग्रामा गेलिया पुरुष । शृंगार आपण करुं नये ॥४०॥
पति निष्ठुर बोले जरी । आपण कोप कदा न करी । क्षमा म्हणोनी चरण धरी । राग न धरी मनांत ॥४१॥
पति येतां बाहेरुनी । सामोरी जाय तेक्षणी । सकळ कामें त्यजूनि । संमुख जाय पतिव्रता ॥४२॥
बहिर्द्वारीं जाणें जरी । पाहूं नये नरनारीं । सवेंचि परतावें लवकरी। आपुले गुही असावें ॥४५॥
जरी पाहे बहिद्वारीं । उलूकयोनी जन्मे नारी । याच प्रकारे निर्धारी। पातिव्रत्य लोपामुद्रेचें ॥४६॥
पुरुषाचें उच्छिष्ट भोजन । मनोभावें करणें आपण । नसतां पुरुष ग्रामीं जाण । घ्यावा अतिथिधेनुप्रसाद ॥५०॥
पुरुष संतोषी असता जरी । दुश्चित नसावी त्याची नारी । पुरुष दुश्चित असता जरी । आपण संतोषी असो नये ॥५४॥
रजस्वला झालिया देखा । बोलो नये मौन्य निका । नायकावे वेद ऐका । मुख पुरुषा दाखवू नये ॥५५॥
ऐसे चारी दिवसांवरी । आचरावे तिये नारी । सुस्नात होता ते अवसरी । पुरुषमुख अवलोकिजे ॥५६॥
पुरुषआयुष्यवर्धनार्थ । हळदीकुंकुम लाविजे ख्यात । सेंदूर काजळ कंठसूत्र । फणी माथा असावी ॥५८॥
तांबूल घ्यावे सुवासिनी । असावी तिचे माथा वेणी । करी कंकणे तोडर चरणी । पुरुषासमीप येणेपरी ॥५९॥
न करी इष्टत्व शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । जैनस्त्रीद्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥
पुरुषनिंदक स्त्रियेसी । न बोलावे तियेसी । बोलता दोष घडे तिसी । पतिव्रतालक्षण ॥६१॥
सासू श्वशुर नणंद वहिनी । दीरभावाते त्यजुनी । राहता वेगळेपणी । श्वानजन्म पावती ॥६२॥
अंग धुवो नये नग्नपणे । उखळमुसळावरी न बैसणे । पाई विवरल्यावीण जाणे । फिरू नये पतिव्रते ॥६३॥
पतीसवे विवाद । करिता पावे महाखेद । पतिअंतःकरणी उद्वेग । आपण कदा करू नये ॥६५॥
जरी असे अभाग्य पुरुष । नपुसक जरी असे देख । असे व्याधिष्ठ अविवेक । तरी देवासमान मानावा ॥६६॥
तैसा पुरुष असेल जरी । तोचि मानावा हरि । त्याचे बोलणे रहाटे तरी । परमेश्वरा प्रिय होय ॥६७॥
पतीचे मनी जी आवडी । तैसीच ल्यावी लेणी लुगडी । पति दुश्चित्त असता घडी । आपण श्रृंगार करू नये ॥६८॥
जितुके मिळाले पतीसी । संतुष्ट असावे मानसी । समर्थ पाहोनि कांक्षेसी । पतिनिंदा करू नये ॥७१॥
तीर्थयात्रे जाती लोक । म्हणूनि न गावे कौतुक । पुरुषाचे पादोदक। तेचि तीर्थ मानावे ॥७२॥
भागीरथीसमान देख । पतिचरणतीर्थ अधिक । पतिसेवा करणे मुख । त्रयमूर्ति संतुष्टती ॥७३॥
व्रत करणे असेल मनी । ते पुरुषा करावे पुसोनि । आत्मबुद्धी करिता कोणी । पति-आयुष्य उणे होय ॥७४॥
आणिक जाय नरकाप्रती । पति घेवोनि सांगाती । ऐसे बोलती वेदश्रुति । बृहस्पति सांगतसे ॥७५॥
पतीस क्रोधे उत्तर देती । श्वानयोनी जन्म पावती । जंबुक होवोनि भुंकती । ग्रामासन्निध येऊन ॥७६॥
नित्य नेम करणे नारी । पुरुष-उच्छिष्ट भोजन करी । पाद प्रक्षालोनि तीर्थधारी । घेवोनि तीर्थ जेवावे ॥७७॥
पति प्रत्यक्ष शंकर । काम्य होती मनोहर । पावे ती वैकुंठपुर । पतिसहित स्वर्गभुवना ॥७८॥
आपुला पुरुष दुर्बल किती । समर्थाची न करावी स्तुति । पति असता अनाचाररीती । आपण निंदा करू नये ॥८०॥
कैसा तरी आपुला पति । आपण करावी त्याची स्तुति । तोचि म्हणावा लक्ष्मीपति । एकभावे करोनिया ॥८१॥
सासूश्वशुर पुरुषांपुढे । नेटे बोलो नये गाढे । हासो नये त्यांपुढे । पति-आयुष्य उणे होय ॥८२॥
सासूश्वशुर त्यजून आपण । वेगळे असू म्हणे कवण । ऋक्षयोनी जन्मोन । अरण्यात हिंडेल ॥८३॥
पुरुष कोपे मारी जरी । मनी म्हणे हा मरो नारी । जन्म पावेल योनी व्याघ्री । महाघोर अरण्यात ॥८४॥
पर पुरुषाते नयनी पाहे । उपजता वरडोळी होय । पुरुषा वंचूनि विशेष खाय । ग्रामसूकर होय ती ॥८५॥
तोही जन्मी सोडोनि । उपजे वाघुळाचे योनी। आपुली विष्ठा आपण भक्षुनी । वृक्षावरी लोंबतसे ॥८६॥
पतिसंमुख निष्ठुर वचनी । उत्तर देती कोपोनि । उपजे मुकी होऊनि । सप्तजन्म दरिद्री ॥८७॥
पुरुष दुजी पत्नी करी । तिसी आपण वैर धरी। सप्त जन्मांवरी । दुर्भाग्यता होय अवधारा ॥८८॥
पुरुषावरी दुसरिया । दृष्टि ज्या करिती आवडिया । पतिता घरी जन्म पावोनिया । दुःखे सदा दारिद्र्य भोगिती ॥८९॥
No comments:
Post a Comment