Tuesday, February 9, 2021

आयुष्य म्हणजे...

आयुष्य म्हणजे... –जगदीश काबरे.

आयुष्य म्हणजे नुसतं जगणं नव्हे, ते तर बायलॉजिकल मॉडेल सगळय़ांचं सारखंच असतं अणि हे वैद्यकशास्त्रालाही मान्य आहे; पण मानवी जीवन म्हणजे माणसामधला प्राण्याचा अंश कमीत कमी होऊन माणसाचा अंश जास्तीत जास्त होणे. हे मॉडेल ज्याचं त्यानंच बनवायचं आहे. नक्कलच करायची असेल तर शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फुले, सुधारकाग्रणी आगरकर, आंबेडकर ते अब्दुल कलाम यांच्यासारखी इतर किती तरी आणि आपल्या आवडीची ‘मॉडेल्स’ अभ्यासायला हरकत नाही. जीवनाचं समग्र मॉडेल बनवायचं तर शरीर- मन- बुद्धी- संस्कार (मूल्य) यांचा एकत्रित व समतोल विचार करावा लागतो, कारण ते एकमेकांना पूरक व एकमेकांवर परिणाम करणारे आहेत. याची सुरुवात मूल्यांपासून होते. ती मूल्ये बुद्धीने तपासून घेतलेली हवीत व मनाला आवडलेली असतील, तर लय- सूर- ताल- शब्द यांनी जसं संगीत बनतं तसंच जीवनाचं गीत होऊ शकतं. त्यात कुठेही ताण किंवा काळजीला वाव नसतो. यालाच इंटीग्रेटेड पर्सनॅलिटी म्हटलं जातं.

अभिजनांचं अनुकरण करण्यात सामान्यजनांना धन्यता वाटते. अनादि अनंत काळापासून हे चालत आलेलं. आणि यापुढेही निरंतर चालत राहणारं. मानवी प्रगतीचंच हे लक्षण. परंतु बऱ्याचदा होतं काय, की हे अनुकरण आंधळं असतं. आपण नेमकं कशाचं, कुणाचं आणि का अनुकरण करतो आहोत, याची किमान आपल्यापुरती तरी स्पष्टता असायला हवी ना! हे जे अनुकरण आपण करतो आहोत, ते मानसिक, भावनिक, सामाजिक आणि व्यावहारिकदृष्टय़ा आपल्याला झेपणारं आहे का? ते पचवण्याची कुवत आणि क्षमता आपल्यात आहे का? त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल, ती चुकवायला आपण तयार आहोत का?. हे आणि असे प्रश्न सहसा विचारात घेतले जात नाहीत. ‘महाजनो येन गत: स: पंथा:’ या उक्तीनुसार केवळ  इतरेजन- ‘जनांचा प्रवाहो’ एखाद्या मार्गाने जातो आहे ना, मग त्याच मार्गानं आपणही जायचं, एवढंच त्यांना माहीत असतं.

आज माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे आधुनिकता तुम्हाला स्वीकारायची असो-नसो, ती आपसूक तुम्हाला कवेत घेतेच. सो कॉल्ड आधुनिकतेच्या अट्टहासापायी आपलं मूळ रूप झाकण्याचा, त्याला वरवरचा मुलामा देण्याचा प्रयत्नही माणसाकडून होताना दिसतो. त्यातून अर्धवट ‘मॉडर्न’ माणसांची फौज निर्माण होते. केवळ शहरांतच नव्हे, तर खेडय़ापाडय़ांतसुद्धा हेच चित्र दिसतं. या सो कॉल्ड मॉडर्न होण्याच्या धडपडीत भेलकांडलेली माणसं अत्र तत्र सर्वत्र पाहायला मिळतात. या मॉडर्न होण्याच्या भानगडीत माणसांना अनेक दिव्यांतून जावं लागतं. त्यापायी होणारी त्यांची मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक  तसंच मूल्यात्मक फरफट दयनीय असते. परंतु त्याची त्यांना जाणीव नसते. किंवा असलीच, तरी फार धूसर असते.

माणसाने जीवनातले निर्णय बुद्धिमूल्यांशी विचार करून घ्यायला हवेत, पण ग्यानबाची मेख इथेच आहे. आपण बुद्धीचा वापर करतो, असं म्हणतो; पण वास्तवात बऱ्याच वेळा मनाकडून म्हणजेच भावनात्मक निर्णय घेतले जातात.आपले बरेचसे निर्णय आपण वस्तुनिष्ठतेच्या किंवा विवेकाच्या आधारावर न घेता ज्या गोष्टी आपल्या मनाला चटकन आठवतात त्यावर आधारित असतात. आपण स्वत:ला परखडपणे प्रश्न करण्याऐवजी आपल्या नेहमीच्या आठवणीतलं ‘ज्ञान’ वापरून निर्णय घेतो.सोशल मीडियावर चालणारी वाक् युद्धं ही याची उत्तम उदाहरणं आहेत. एखाद्या पोस्ट वरील आपल्या प्रतिक्रिया ह्या बरेचदा आपण किती चतूर आहोत हे दाखवणाऱ्या असतात... मग त्या विचाराचा भलेही पोस्टशी संबंध का नसेना.आपला त्वरित घेतलेला निर्णय हा समोरच्यावर मात करण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेतून घेतलेला असतो. त्यामुळे विचारावर चर्चा न होता तो वाद हारजीतीचा मुद्दा बनतो, आणि विचारात अस्मितेबरोबरच अभिनिवेशाचा सूर डोकावू लागतो.म्हणून आपल्या मनावर भावनेपेक्षा बुद्धीचा ताबा असायला हवा, म्हणजे आपण विवेकाने प्रतिवाद करायला शिकतो. तेच खऱ्या सुजाण माणसाचे लक्षण असते. 

No comments: