Thursday, February 18, 2021

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

सुशिक्षित आहेत तरी कोठे? - जगदीश काबरे.

आज एकविसाव्या शतकात येवुनही आम्ही मात्र मध्ययुगातच अडकून पडलो. आमची मानसिकता अधुनिक बनलीच नाही. त्यामुळे आजही आमची मदार पुरातन काळातील खऱ्याखोट्या गौरवांवर असते अथवा पाश्चात्यांनी शोधलेल्या उत्तरांवर असते. आम्ही आमची विचार करण्याची समग्र पद्धत बदलू शकेल असा एखाद-दुसरा अपवाद केला तर विचारवंत/तत्वज्ञ पैदा केला नाही. कारण मुळात तशी मानसिकताच आम्ही जोपासली नाही व ज्यांनी जोपासली त्यांचे पंख जातीय पिंजऱ्यात बंदिस्त करुन छाटून टाकले. राजकारण्यांना हे अधिक सोयीचे होते. विखंडित प्रजा हे अनिर्बंध राज्य करण्यास मुक्तद्वार देत असते. त्यामुळे विचारी समाज त्यांना नकोच असतो. किंबहुना त्याचेच प्रतिबिंब आपली शिक्षण पद्धत बनवण्यात पडलेले आहे असे दिसते.

मानवी मेंदू हा विचार करण्यासाठी, नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी आणि पुर्ण सामर्थ्याने अभिव्यक्ती करण्यासाठी असतो. तेवढी नैसर्गिक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीत असतेच. प्रश्न असतो तिच्या विकसनासाठी योग्य मार्ग देण्याचा. दिशा देण्याचा. त्यात आम्ही क्रमश: कमी पडत गेल्याने आज साक्षरांची मोठी फौज निर्माण झालीय. पण सुशिक्षितांच्या अभावामुळे असहिष्णुता जोमाने फोफावत चालली आहे. एखाद्या जातीय संघटनेची खोट्या इतिहासाने भरलेली व म्हणुनच उथळ विचारांची चार पुस्तके वाचून "क्रांतीकारक" बनण्याची स्वप्ने पाहणारी तरुणांची पिढी बनते ती यामुळेच. भडक भाषा, विशिष्ट जातीसमुहाला सातत्याने शिवीगाळ केल्याने समाज बदलत नसतो याचे भान तथाकथित विचारवंतांनी व त्यांच्या अनुयायांनीही गमावले असेल तर याचा अर्थ हाच निघतो कि आमची तरुण पिढी घडवण्यात समाज अपयशी ठरला आहे. घडवले जात असतील तर जाती-धर्मांच्या पारंपारिक बेड्यांत अडकवून घेणारे गुलाम!

मनुष्यक्रांती हे समाजाचे ध्येय बनायला हवे. मनुष्यक्रांती ही माणसाला प्रगल्भ नागरिक बनवण्यासाठी व्हायला हवी. ती समाजालाच करावी लागेल. पण त्यासाठी आधी काहींनी तरी गुलामीच्या बेड्यांना तोडावे लागेल. मोकळेपणे चिकित्सा करायला आणि स्वीकारायला शिकावे आणि शिकवावे लागेल. प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि उत्तरेही शोधावी लागतील. प्रज्ञावादाचा आश्रय घेतल्याखेरीज असे घडणे असंभाव्य आहे. आम्ही असे करु शकत नसू तर पुढील पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत याचेही भान असायला हवे. खोटा इतिहास कोणाच्याही कामाला येत नाही... खोटा धर्मही नाही मग खोटी जात काय कामाला येणार, हा प्रश्न आम्हीच आम्हाला विचारायला हवा.

अर्धवट वैचारिकता ही सर्वात अधिक हिंसक असते. असहिष्णू आणि म्हणूनच असंयमी आणि उथळ असते. मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातूनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे. या दुभंगपणातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनाच कंबर कसावी लागेल...

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे... वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण! अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळून येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म वर्चस्ववादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता, उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. 

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विविकासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनावी लागते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकूणातच अंधारयुगातच जगत आहे, असे म्हणावे लागते. कारण आम्ही क्रमश: इतिहासाचा अभ्यास आणि धर्मचिकित्सा थांबवत नेले आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे. चिकित्सा म्हणजे टीका करण्यासाठीच असते, असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातींत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत, हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणाऱ्या आणि टीकाकारांवर झुंड बनवित सरळ हल्ले चढवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यांत घट्ट अडकलेले आहेत आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्ती मात्र तीच आहे.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्चशिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला पाखंडी, द्वेषी ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडून गेले आहे...पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्मलंडांना प्रसंगी छळ सोसूनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणून ते बऱ्यापैकी आधुनिकही बनले. तेव्हा आपण आधुनिक बनायचे की नाही हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा आपले मन भूतकाळात आणि शरीर मात्र वर्तमान काळात अशी त्रिशंकू अवस्था अटळ आहे.

No comments: