Saturday, February 20, 2021

मराठी मानसिकता उद्योगी केव्हा होईल?

मराठी मानसिकता उद्योगी केव्हा होईल? 


–जगदीश काबरे.


⬛ बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रॉप आऊट. Microsoft ची स्थापना.

⬛ लेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago) मधून ड्रॉप आऊट. Oracle ची स्थापना.

⬛ स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कॉलेज ( Reed College Portlad ) मधून ड्रॉप आऊट. Apple ची स्थापना.

⬛ मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रॉप आऊट. Facebook ची स्थापना.

⬛ जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

⬛ सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

वरील लोकांमधे एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत. त्यातील कांही जणांकडे डिग्र्या आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केलेले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिध्दीच्या झोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे! आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते आहे. हे कसे शक्य झाले? शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसे जमले?

मराठी समाजात पहिल्या पासूनच शिक्षणाला महत्व आहे. शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस नेहमीच आघाडीवर राहिला आहे. ही खरे तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्र्या मिळविणे आणि डिग्र्यांची सर्टीफिकीटे ( Certificates) गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असावे असे वाटू लागले आहे. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मिळणाऱ्या डिग्र्यांना नको एवढे महत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्र्या तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्र्या तो कमी हुशार असे समीकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी समाज अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्र्यांची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.

एखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे १० वी किंवा १२ वी चे Certificate नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवीत. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कोणतेही Certificates असल्याचे अजूनपर्यंत तरी आढळून आलेले नाही. पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा हे ग्रंथ गेली शेकडो वर्षे, पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत. अजूनही हे ग्रंथ मराठीतील 'बेस्ट सेलर' या कॅटेगिरीत (Category) मोडतात. हे कशाचे प्रतिक आहे?

फक्त इयत्ता ४थी पर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमान पत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) जगातला मोठा, नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हेन्री फोर्ड (Henry Ford) नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनू शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटर कंपनी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल (Automobile) कंपनी आहे. साईचीरो होंडा (Soichiro Honda) हा जपानमधील एका गॅरेज मधे काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला. त्याने स्थापन केलेली होंडा मोटर कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे.

इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांत या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनियरिंगची कोणतीही डिग्री, डिप्लोमा किंवा कोणतेही Certificate नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टीफिकेट नाही म्हणून एडिसन शेवट पर्यंत वृत्तपत्र विक्रेता राहिला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते आणि नोकरी करून निवृत्त झाले असते.

भारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या धीरूभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घातला. तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट शिवाय!

चंद्रकांत किर्लोस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, डिग्री मिळाली म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही कांही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरवात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.

शिक्षणाच्या क्षेत्रांत मागे पडलेल्या वरील लोकांनी अपरंपार धन संपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली. त्यातील कित्येक जण तर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कोठल्याही तऱ्हेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. आर्थिक परिस्थिती पण कधीच धडधाकट नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले? त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून?त्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणून? का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून? याचे कारण म्हणजे या सर्वांनी 'कॅश'( Cash ) म्हणजे धन कमविण्यासाठी 'कॅश' ( KASH ) या मंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

या ठिकाणी ' धन ' म्हणजे फक्त पैसा अडका समजू नये. धनामध्ये पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, गौरव, मान सम्मान, समाजात आदरणीय स्थान, चांगले मित्र - सहकारी - शिक्षक - विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश होतो. धनाची किंमत फक्त पैशाने होत नसते.

तर हा ' कॅश ' ( KASH ) मंत्र काय आहे ते आता बघुया...
K - Knowledge - ज्ञान
A - Ability - क्षमता
S - Skill - कौशल्य
H - Habits - सवयी

K - Knowledge - ज्ञान :–
वरील सर्व जण, ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहोत त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ज्ञान अनेक मार्गांनी मिळविता येते. शाळा कॉलेजमधील शिक्षण हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग झाला. त्याशिवाय प्रशिक्षण ( Training ), वाचन, संशोधन, प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन, गाठी-भेटी, चर्चा, विचार-विनिमय, विचारांची देवाण घेवाण, प्रवास, प्रदर्शने, सेमिनार्स, कॉन्फरन्स या मार्गांनी पण ज्ञान मिळविता येते. आपले ज्ञान अत्याधुनिक (Most Modern) आणि अद्ययावत ( Up to date ) असावे याची ते सतत काळजी घेत गेले. आपल्या क्षेत्रांत काय घडामोडी चालू आहेत, कोणते नवीन संशोधन होत आहे, कोणते नवीन ट्रेंड्स निर्माण होत आहेत यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. कारण शेवटी ज्ञान हेच खरे भांडवल आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते .

A - Ability - क्षमता :–
आपल्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या क्षमतेबद्दल त्यांनी त्यांच्या मनात अविश्वासाची भावना कधीच येवू दिली नाही. ज्या क्षेत्रांत आपण कमी पडत आहोत त्या क्षेत्रांत इतरांची मदत घेण्यामध्ये त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आपली क्षमता सतत कशी वाढत राहील या कडे त्यांनी लक्ष दिले. आपल्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आहेत. आपली उत्पादने इतरांपेक्षा जास्त चांगली आहेत. आपल्या आयडियाज इंतारांपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याबद्दल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आपल्या बरोबर आपले सहकारी, संघटना, कंपन्या, कर्मचारी यांची क्षमता कशी वाढविता येईल या विषयी ते सतत प्रयत्नशील राहिले.

S - Skill - कौशल्य :–
आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची जी प्रक्रिया असते त्याला कौशल्य म्हणतात. आपल्याकडे जर ज्ञान असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर त्या ज्ञानाला फारसे महत्व उरत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा या साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. यासाठी त्यांनी अनेक निरनिराळे प्रयोग केले. अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक नवीन कौशल्ये प्राप्त केली आणि विकसित केली. कोठलेही नवीन कौशल्य आत्मसात करायचे म्हणजे त्यासाठी भरपूर कष्ट लागतात, मेहेनत लागते. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही याची ते काळजी घेत गेले. 'Practice makes the man perfect' या म्हणीप्रमाणे ते सतत आपल्या कौशल्याचा उपयोग करीत गेले. आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या कौशल्यात सतत वाढ कशी होत राहील याची काळजी ते घेत गेले.

H - Habits - सवयी :–
आपल्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सवयी त्यांनी स्वीकारल्या. तसेच आवश्यकतेनुसार या सवयींमध्ये बदल करण्याची लवचिकता त्यांनी दाखवली. यामध्ये त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. कित्येक वेळा त्यांना सर्वसाधारण कुटुंबाला मिळणाऱ्या साध्या-साध्या सुखांचा त्याग करावा लागला. पण या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधी तक्रार केली नाही.

शिक्षणाला किती महत्व द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या डिग्रीला किती महत्व द्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अर्थ शिक्षणाची कास सोडावी असा होत नाही. कारण शिक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट ला महत्व हे असतेच. पण जर शिक्षण माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान देऊन केवळ 'पुस्तक पंडित' बनवत असेल. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून 'परीक्षार्थी' होण्याची प्रेरणा देत असेल. ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग करता येत नसेल. जे माणसाचे 'व्यवहारज्ञान' न वाढविता माणसाला जास्त 'अव्यवहारी' बनवत असेल. केवळ नोकरीचे माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची प्रेरणा देणारे असेल. आणि ज्यामुळे प्रतिष्ठेचा खोटा तोरा निर्माण होत असेल. तर अशा शिक्षणासाठी आयुष्याची किती वर्षे आणि पैसा खर्च करायचा याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. एखादी डिग्री मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले असे समजू नये. तसेच डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे पण समजू नये. कारण शिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते .तसेच शिक्षण नाही किंवा पूर्ण झाले नाही म्हणून मागे पडू ही भावना पण मनातून काढून टाकायला हवी.

हल्लीचे मराठी तरुण/तरुणी पुष्कळ Talented आहेत . अनेकांनी शिक्षण क्षेत्रांत उत्तम यश मिळवले आहे. पण अजूनही बरेच जण नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकले आहेत. मायक्रोसोफ्टच्या बिल गेट्ससारखे न होता बिल गेट्सच्या मायक्रोसोफ्टमध्ये नोकरी करण्याची स्वप्ने बघत आहेत, किंवा धन्यता मानत आहेत. आणि त्यांचे पालक पण याचा अभिमान बाळगत आहेत. आज भारताची वेगाने जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती चालू आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण/तरुणींनी या संधीचा फायदा करून घेतला नाही तर त्यांच्यासारखे कर्म दरिद्री तेच ठरतील. आपल्या शिक्षणाला 'कॅश' ( KASH) मंत्राची जोड देऊन मराठी तरुण/तरुणींनी बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग सारखे व्हायचा प्रयत्न का करू नये?

Thursday, February 18, 2021

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

सुशिक्षित आहेत तरी कोठे? - जगदीश काबरे.

आज एकविसाव्या शतकात येवुनही आम्ही मात्र मध्ययुगातच अडकून पडलो. आमची मानसिकता अधुनिक बनलीच नाही. त्यामुळे आजही आमची मदार पुरातन काळातील खऱ्याखोट्या गौरवांवर असते अथवा पाश्चात्यांनी शोधलेल्या उत्तरांवर असते. आम्ही आमची विचार करण्याची समग्र पद्धत बदलू शकेल असा एखाद-दुसरा अपवाद केला तर विचारवंत/तत्वज्ञ पैदा केला नाही. कारण मुळात तशी मानसिकताच आम्ही जोपासली नाही व ज्यांनी जोपासली त्यांचे पंख जातीय पिंजऱ्यात बंदिस्त करुन छाटून टाकले. राजकारण्यांना हे अधिक सोयीचे होते. विखंडित प्रजा हे अनिर्बंध राज्य करण्यास मुक्तद्वार देत असते. त्यामुळे विचारी समाज त्यांना नकोच असतो. किंबहुना त्याचेच प्रतिबिंब आपली शिक्षण पद्धत बनवण्यात पडलेले आहे असे दिसते.

मानवी मेंदू हा विचार करण्यासाठी, नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी आणि पुर्ण सामर्थ्याने अभिव्यक्ती करण्यासाठी असतो. तेवढी नैसर्गिक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीत असतेच. प्रश्न असतो तिच्या विकसनासाठी योग्य मार्ग देण्याचा. दिशा देण्याचा. त्यात आम्ही क्रमश: कमी पडत गेल्याने आज साक्षरांची मोठी फौज निर्माण झालीय. पण सुशिक्षितांच्या अभावामुळे असहिष्णुता जोमाने फोफावत चालली आहे. एखाद्या जातीय संघटनेची खोट्या इतिहासाने भरलेली व म्हणुनच उथळ विचारांची चार पुस्तके वाचून "क्रांतीकारक" बनण्याची स्वप्ने पाहणारी तरुणांची पिढी बनते ती यामुळेच. भडक भाषा, विशिष्ट जातीसमुहाला सातत्याने शिवीगाळ केल्याने समाज बदलत नसतो याचे भान तथाकथित विचारवंतांनी व त्यांच्या अनुयायांनीही गमावले असेल तर याचा अर्थ हाच निघतो कि आमची तरुण पिढी घडवण्यात समाज अपयशी ठरला आहे. घडवले जात असतील तर जाती-धर्मांच्या पारंपारिक बेड्यांत अडकवून घेणारे गुलाम!

मनुष्यक्रांती हे समाजाचे ध्येय बनायला हवे. मनुष्यक्रांती ही माणसाला प्रगल्भ नागरिक बनवण्यासाठी व्हायला हवी. ती समाजालाच करावी लागेल. पण त्यासाठी आधी काहींनी तरी गुलामीच्या बेड्यांना तोडावे लागेल. मोकळेपणे चिकित्सा करायला आणि स्वीकारायला शिकावे आणि शिकवावे लागेल. प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि उत्तरेही शोधावी लागतील. प्रज्ञावादाचा आश्रय घेतल्याखेरीज असे घडणे असंभाव्य आहे. आम्ही असे करु शकत नसू तर पुढील पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत याचेही भान असायला हवे. खोटा इतिहास कोणाच्याही कामाला येत नाही... खोटा धर्मही नाही मग खोटी जात काय कामाला येणार, हा प्रश्न आम्हीच आम्हाला विचारायला हवा.

अर्धवट वैचारिकता ही सर्वात अधिक हिंसक असते. असहिष्णू आणि म्हणूनच असंयमी आणि उथळ असते. मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातूनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे. या दुभंगपणातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनाच कंबर कसावी लागेल...

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे... वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण! अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळून येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म वर्चस्ववादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता, उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. 

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विविकासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनावी लागते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकूणातच अंधारयुगातच जगत आहे, असे म्हणावे लागते. कारण आम्ही क्रमश: इतिहासाचा अभ्यास आणि धर्मचिकित्सा थांबवत नेले आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे. चिकित्सा म्हणजे टीका करण्यासाठीच असते, असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातींत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत, हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणाऱ्या आणि टीकाकारांवर झुंड बनवित सरळ हल्ले चढवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यांत घट्ट अडकलेले आहेत आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्ती मात्र तीच आहे.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्चशिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला पाखंडी, द्वेषी ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडून गेले आहे...पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्मलंडांना प्रसंगी छळ सोसूनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणून ते बऱ्यापैकी आधुनिकही बनले. तेव्हा आपण आधुनिक बनायचे की नाही हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा आपले मन भूतकाळात आणि शरीर मात्र वर्तमान काळात अशी त्रिशंकू अवस्था अटळ आहे.

Tuesday, February 9, 2021

आयुष्य म्हणजे...

आयुष्य म्हणजे... –जगदीश काबरे.

आयुष्य म्हणजे नुसतं जगणं नव्हे, ते तर बायलॉजिकल मॉडेल सगळय़ांचं सारखंच असतं अणि हे वैद्यकशास्त्रालाही मान्य आहे; पण मानवी जीवन म्हणजे माणसामधला प्राण्याचा अंश कमीत कमी होऊन माणसाचा अंश जास्तीत जास्त होणे. हे मॉडेल ज्याचं त्यानंच बनवायचं आहे. नक्कलच करायची असेल तर शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फुले, सुधारकाग्रणी आगरकर, आंबेडकर ते अब्दुल कलाम यांच्यासारखी इतर किती तरी आणि आपल्या आवडीची ‘मॉडेल्स’ अभ्यासायला हरकत नाही. जीवनाचं समग्र मॉडेल बनवायचं तर शरीर- मन- बुद्धी- संस्कार (मूल्य) यांचा एकत्रित व समतोल विचार करावा लागतो, कारण ते एकमेकांना पूरक व एकमेकांवर परिणाम करणारे आहेत. याची सुरुवात मूल्यांपासून होते. ती मूल्ये बुद्धीने तपासून घेतलेली हवीत व मनाला आवडलेली असतील, तर लय- सूर- ताल- शब्द यांनी जसं संगीत बनतं तसंच जीवनाचं गीत होऊ शकतं. त्यात कुठेही ताण किंवा काळजीला वाव नसतो. यालाच इंटीग्रेटेड पर्सनॅलिटी म्हटलं जातं.

अभिजनांचं अनुकरण करण्यात सामान्यजनांना धन्यता वाटते. अनादि अनंत काळापासून हे चालत आलेलं. आणि यापुढेही निरंतर चालत राहणारं. मानवी प्रगतीचंच हे लक्षण. परंतु बऱ्याचदा होतं काय, की हे अनुकरण आंधळं असतं. आपण नेमकं कशाचं, कुणाचं आणि का अनुकरण करतो आहोत, याची किमान आपल्यापुरती तरी स्पष्टता असायला हवी ना! हे जे अनुकरण आपण करतो आहोत, ते मानसिक, भावनिक, सामाजिक आणि व्यावहारिकदृष्टय़ा आपल्याला झेपणारं आहे का? ते पचवण्याची कुवत आणि क्षमता आपल्यात आहे का? त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल, ती चुकवायला आपण तयार आहोत का?. हे आणि असे प्रश्न सहसा विचारात घेतले जात नाहीत. ‘महाजनो येन गत: स: पंथा:’ या उक्तीनुसार केवळ  इतरेजन- ‘जनांचा प्रवाहो’ एखाद्या मार्गाने जातो आहे ना, मग त्याच मार्गानं आपणही जायचं, एवढंच त्यांना माहीत असतं.

आज माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे आधुनिकता तुम्हाला स्वीकारायची असो-नसो, ती आपसूक तुम्हाला कवेत घेतेच. सो कॉल्ड आधुनिकतेच्या अट्टहासापायी आपलं मूळ रूप झाकण्याचा, त्याला वरवरचा मुलामा देण्याचा प्रयत्नही माणसाकडून होताना दिसतो. त्यातून अर्धवट ‘मॉडर्न’ माणसांची फौज निर्माण होते. केवळ शहरांतच नव्हे, तर खेडय़ापाडय़ांतसुद्धा हेच चित्र दिसतं. या सो कॉल्ड मॉडर्न होण्याच्या धडपडीत भेलकांडलेली माणसं अत्र तत्र सर्वत्र पाहायला मिळतात. या मॉडर्न होण्याच्या भानगडीत माणसांना अनेक दिव्यांतून जावं लागतं. त्यापायी होणारी त्यांची मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक  तसंच मूल्यात्मक फरफट दयनीय असते. परंतु त्याची त्यांना जाणीव नसते. किंवा असलीच, तरी फार धूसर असते.

माणसाने जीवनातले निर्णय बुद्धिमूल्यांशी विचार करून घ्यायला हवेत, पण ग्यानबाची मेख इथेच आहे. आपण बुद्धीचा वापर करतो, असं म्हणतो; पण वास्तवात बऱ्याच वेळा मनाकडून म्हणजेच भावनात्मक निर्णय घेतले जातात.आपले बरेचसे निर्णय आपण वस्तुनिष्ठतेच्या किंवा विवेकाच्या आधारावर न घेता ज्या गोष्टी आपल्या मनाला चटकन आठवतात त्यावर आधारित असतात. आपण स्वत:ला परखडपणे प्रश्न करण्याऐवजी आपल्या नेहमीच्या आठवणीतलं ‘ज्ञान’ वापरून निर्णय घेतो.सोशल मीडियावर चालणारी वाक् युद्धं ही याची उत्तम उदाहरणं आहेत. एखाद्या पोस्ट वरील आपल्या प्रतिक्रिया ह्या बरेचदा आपण किती चतूर आहोत हे दाखवणाऱ्या असतात... मग त्या विचाराचा भलेही पोस्टशी संबंध का नसेना.आपला त्वरित घेतलेला निर्णय हा समोरच्यावर मात करण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेतून घेतलेला असतो. त्यामुळे विचारावर चर्चा न होता तो वाद हारजीतीचा मुद्दा बनतो, आणि विचारात अस्मितेबरोबरच अभिनिवेशाचा सूर डोकावू लागतो.म्हणून आपल्या मनावर भावनेपेक्षा बुद्धीचा ताबा असायला हवा, म्हणजे आपण विवेकाने प्रतिवाद करायला शिकतो. तेच खऱ्या सुजाण माणसाचे लक्षण असते. 

Tuesday, February 2, 2021

समाजकार्य करणाऱ्या मंदिरांना विरोध का?


सामाजिक काम करणाऱ्या मंदिरांना विरोध का? - जेट जगदीश.

'काही मंदीरे सामाजिक ऊपक्रम राबवितात. इस्पितळे चालवितात. तरीही मंदीरांना विरोध  का करता?' धार्मिकांचा हा प्रश्न वरवर पाहता संयुक्तिक आणि सडेतोड वाटतो. पण अशा सकृतदर्शनी योग्य वाटणाऱ्या विचार करण्याच्या सवयीमुळेच आपल्या समाजाचे मोठेच नुकसान झाले आहे. जरा खोलवर विचार केल्यास वरील प्रश्नाचा फोलपणा दिसून येईल.

मुळात मंदिरे (मग ती कुठल्याही धर्माची असोत) ही अंधश्रद्धा, पराभूत वृत्ती आणि शोषण व्यवस्था वाढवण्याची ठिकाणे आहेत. सर्वसामान्य माणसांना मरण (म्हणून आपल्या देशात सृष्टीचा लय करणाऱ्या शंकराची देवळे जास्त आहेत तर उत्पत्तीचा देव ब्रम्हाची देवळे मात्र अपवादात्मकच आहेत.) आणि भविष्याची अनाकलनियता यांची भीती असल्यामुळे ते कशाचा तरी आधार शोधत असतात... मग त्यांना तो बुडत्या श्रध्देचाही चालतो... तो आधार त्यांना परमेश्वर नावाच्या संकल्पनेत सापडतो. कारण एकदा का त्याच्यावर आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांची जबाबदारी टाकली की आपण काहीही... अक्षरश: काहीही करायला मोकळे होतो. म्हणजे असे की, एखादे दुष्कृत्य (पाप) करा आणि नंतर सोन्याचांदीच्या वस्तूंचे दान देऊन देवाला प्रसन्न करून प्रायश्चित्त घ्या; की मग पुन्हा दुसरे दुष्कृत्य करायला मोकळे! अशाप्रकारे माणूस दुष्कृत्य करायला निर्ढावतो आणि दांभिकही बनत जातो. 'गंगेत डुबकी मारून पाप धुणे'ही संकल्पना अशाच मानसिकतेतून आली आहे. ही झाली *अंधश्रद्धा*!

तरीही प्रश्न उरतोच की, मंदिरात  जरी मोठ्याप्रमाणात (बरेचदा काळ्या पैशाची) धन निर्माण होत असेल आणि त्यातून समाजकार्य उभे राहत असेल, तर त्यात वाईट काय? एका उदाहरणाने यातील फोलपणा स्पष्ट करता येईल.

समजा एका दरोडेखोराची टोळी आहे. त्याने एकदा एका धनधान्याने समृद्ध असलेल्या गावात दरोडा टाकला. अनेकांच्या कत्तली करून त्यांची धनसंपत्ती लुटली, आणि पसार झाला. गावात अवकळा पसरली. सगळे म्हणाले, 'आमचं नशीबच फूटकं त्याला कोण काय करणार? मागच्या जन्मी आम्ही काहीतरी पाप केले असणार म्हणून देवानेच आम्हाला शिक्षा केली.' ही विचारसरणी पूर्ण *पराभूत वृत्ती* दर्शवते. खरंतर, त्या गावात जर संरक्षणाची सुव्यवस्था असती तर दरोडेखोराच्या टोळीशी दोन हात करता आले असते, आणि लुटीपासून बचाव करता आला असता. पण नशिबावर आणि देवावर हवाला ठेवून जगण्याची आळशी वृत्ती वाढीला लागल्यामुळे येथे प्रयत्नवाद संपुष्टात आला होता.

आता काही काळानंतर तोच दरोडेखोर लोकांच्या धार्मिक भाबडेपणाचा फायदा घेऊन प्रायश्चित्ताचे नाटक करतो, आणि त्या गावात एक मोठे मंदिर बांधतो. त्याच्या देखभालीसाठी गावातीलच एक त्याला अंकित असणारा ब्राह्मण पुजारी नेमतो.(मंदिराची मालकी मात्र स्वतःकडेच ठेवतो. मंदिराचा ट्रस्ट करत नाही.) लोकही त्याची दुष्कृत्ये विसरून त्याचा उदोउदो करू लागतात. (कुणाला दुष्कृत्ये करणारा being human वाला सलमान खान आठवला तर तो योगायोग समजावा.) नवसाला पावणारा देव म्हणून त्या मंदिराची भरभराट होऊ लागते. (लालबागचा राजा आठवला तर तोही योगायोग समजावा.) मंदिरात भरपूर धन जमा होते. त्यातून त्या मंदिराचा मालक की जो दरोडेखोर ( इतर ठिकाणी तस्करही असू शकतो.) आहे, तो गावात आधी एक शाळा बांधतो आणि मग एक रुग्णालय. पण तुमच्या एका लक्षात येतंय का की, शाळा आणि रुग्णालय बांधण्यासाठी त्याने त्याच्या कष्टाचा एक पै सुद्धा वापरलेला नाही. उलट मूळ संपत्ती त्याने त्या गावातीलच लोकांच्या कत्तली करून लुटून नेलेली होती. म्हणजे शेकडो लोकांच्या रक्ताने माखलेल्या संपत्तीतून देऊळ बांधले आणि मग देवळाला मिळालेल्या दानातून शाळा आणि रुग्णालय... म्हणतात ना 'आयजीच्या जीवावर बायजी उदार'. *वाल्या कोळ्याचा जरी वाल्मिकी ऋषी झाला तरी त्याची बायका-मुले त्याच्या पापात वाटेकरी झाले नाहीत. हा दाखला लक्षात घेता रामायणाला धर्मग्रंथ मानणाऱ्या धार्मिकांनो, मग आता मला सांगा.. शेकडो लोकांच्या अत्याचारातून मिळालेल्या पैशातून केलेले हे समाज कार्य उचित आहे का? जर असेल तर तुम्हीही त्याच्या पापाचे वाटेकरी व्हाल. आहे कबूल?*

बाबाबुवा, गुंड प्रवृत्तीचे राजकारणी यांचे सामाजिक कार्यही याच प्रकारचे असते. हे सगळे लोक देवाधर्माच्या नावाखाली सामान्य जनात भेद आणि द्वेष निर्माण करतात. 'फोडा आणि झोडा' ही चाल खेळून आपल्या सर्वांचे *शोषण* करून स्वतः सत्तेच्या मस्तीत आणि धनसंपत्तीत ऐषारामी जीवन जगत असतात. म्हणून मुळावरच घाव घालायला हवा... देव आणि त्याची मंदिरे नष्ट करायला हवीत. देवाधर्माच्या भीतीने सद्वर्तनी होण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाला स्मरून सद्वर्तनी होणे हे केव्हाही चांगले नाही का? आपल्या करणीची जबाबदारी देवावर टाकण्यापेक्षा आपणच आत्मपरीक्षण करून आपली करणी सुधारणे हे केव्हाही चांगलेच नाही का? *म्हणून माणसात अंधश्रद्धा जोपासणाऱ्या, पराभूत वृत्ती वाढवणाऱ्या आणि शोषण करणाऱ्या मूठभर धूर्त लोकांच्या हातचे बाहुले बनवणाऱ्या मंदिर संस्थेला आमचा विरोध आहे.*