What's app विद्यापीठात अज्ञानमूलक फॉरवर्डेड पोस्टची वानवा नाही.आज अशीच एक वरकरणी छान वाटणारी पोस्ट (पण प्रत्यक्षात बिनडोक, विद्वेष- विखार ठासून भरलेली) पाहण्यात आली. मी वेळ असल्याने त्याचा प्रतिवाद खालीलप्रमाणे केला. आपण यात भर सुचवू शकता किंवा मुद्देसूद प्रतिवाद केल्यास स्वागत आहे. मूळ पोस्ट लांबलचक असल्याने फक्त सुरुवात आणि मनोरंजक भाग तेवढाच येथे दिला आहे.
मूळ पोस्ट:
Do you know?
हे केमिकल कंपोजीशन👈 मुलांना रेग्युलर द्या.
गूळ+खोबरे = बुद्धीवर्धक (म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
गूळ+शेंगदाणे = शक्तिवर्धक (म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
तिळ+गूळ = केल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न + झिंक + सेलेनियम (हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,
यातले सेलेनियम - केन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत )
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातात,
कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिल?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा 50 शत्रूंशी एकटा लढायचा,
कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वीचे पंडित एवढे हुशार होते, एक से एक होऊन गेले महान पंडित, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?
मुळात आपल्याला इतिहासच अश्या पद्धतीने शिकवला जातो की इंग्रज आले म्हणून आपण तारले गेलो, आपण खूप गरीब होतो, अंधश्रद्धा होती वगैरे, पण इंग्रज तेव्हा आले जेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येकाच्या घरात सोने भरलेले पाहिले, जे आपण व्यापार करून कमवत होतो,
जर भारत श्रीमंत नसता तर ही आक्रमणे झालीच नसती ना.. गरिबांच्या देशावर कशाला कोण वर्षानुवर्षे राज्य करेल... सोने भरभरून जहाजे गेली ब्रिटिशांकडे, जेव्हा आपल्याकडे हे सर्व होते तेव्हा ब्रिटन मध्ये भूकमारी होती... हे कधीच आपल्याला सांगितले जात नाही, हे जर सांगितले तर जातीवाद आपोआप संपेल ना...मग तोडा आणि राज्य करा हे होऊच शकणार नाही...
तर, आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या 18-19 वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी... कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा....
आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर...
आपण हजारो वर्षांपासूनच सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही...
देशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा, आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूपच हुशार आणि ऍडव्हान्स होते...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️◾
प्रतिवाद... (^m^)(^j^)(मनोगते)
या लेखात सत्य आणि असत्य यांची सरमिसळ बेमालूम केल्याने काही वैचारिक गोंधळ आढळतात.
गूळ -खोबरे -शेंगदाणे यांचे औषधी गुणधर्म वादातीत असले तरी त्याचा संबंध ब्रिटिश राजवटीची यथाशक्य निर्भत्सना करून भारतीय संस्कृतीची अवाजवी भलावण करण्याशी जोडलाय, तो बादरायण संबंध आहे.
भारतीय संस्कृतीची थोरवी निश्चित आहे.
एकदा अमेरिकन राजदूत ताजमहाल पाहायला आले जेव्हा त्यांना गाईडने माहिती दिली की ताजमहाल सतराव्या शतकात बांधला गेला, तेव्हा ते थक्क झाले कारण ते म्हणाले की आमचे अमेरिकन पूर्वज तेव्हा लाकडी ओंडक्याच्या घरात राहत होते. आज अमेरिका कुठे आहे पहा! आजच्या पुन्हा नव्याने लिहिल्या जाणाऱ्या इतिहासानुसार ताजमहाल हा मुघल बादशहा शहाजहानने बांधला पण मुघल हे परकीय आक्रमक होते त्यामुळे आपण 'भारतीयांनी बांधला आहे' असं श्रेय घेऊ शकणार नाही कदाचित! असो. येत्या 15 ऑगस्टला खाल्ली जाणारी जिलबी हीदेखील इराणमधून आलीयं बर का! आज उपवासात म्हणून वापरत असलेले साबुदाणा, बटाटा आणि मिरचीही हे पदार्थ तर पोर्तुगीज आहेत.
रामायण महाभारतात विमाने आणि क्षेपणास्त्रे यांचे उल्लेख आढळतात. तर मग पुढे बाराव्या शतकात दिवाळीचे साधे रॉकेट तरी तयार का होत नाही? याचं साधं कारण म्हणजे त्या निव्वळ कवी कल्पना होत्या.
साधं आहे की आधी चाकाचा शोध... मग विमानाचा शोध... आधी बिनतारी यंत्रणा, मग मोबाईल....विमानाचा शोध लागायला किती अत्याधुनिक यंत्रणा लागत असणार.... एकदम शून्यातून विमान अस्तित्वात येऊ शकणार नाही. त्याच्या आधी कितीतरी आवश्यक शोध मालिका अस्तित्वात असावी लागते.
*गणितातील शून्याचा शोध असेल, रसायनशास्त्रातील विलेपन प्रक्रिया असेल आयुर्वेदाची संपूर्ण परंपरा ,धातुकाम स्थापत्यशास्त्र, जहाजबांधणी, कापड निर्मिती, खाद्यसंस्कृती अशा विविध क्षेत्रात आपले पूर्वज अग्रेसर होते, परंतु त्याचबरोबर मध्ययुगात या तेव्हाच्या प्रगत ज्ञानाचा लोप झाला, जातीव्यवस्था- अस्पृश्यता, चाकोरीबद्ध- साचेबद्ध विचारसरणी, नवीन ज्ञानाचा परिपोष न होणे परंपरा-रूढी यांना अवास्तव महत्त्व, भाऊबंदकी, स्त्रियांना दुय्यम लेखणे वगैरे अनिष्ट प्रथा रुजल्या. भारतीय संस्कृतीतील ज्ञानपिपासा मागे पडली.*
आयुर्वेद विशिष्ट मर्यादेत यशस्वी असला तरी भारत स्वतंत्र होतानाही पुरुषांचे सरासरी आयुष्य फक्त सत्तेचाळीस वर्षे होते, जे आता सुमारे 70 आहे. शिवाजी महाराज गुडघेदुखीने पन्नाशीत गेले, लोकमान्य टिळक मधुमेहाने सत्तरीच्या आतच गेले... अशी अनेक उदाहरणे सांगता येतील... प्लेग वगैरे रोगांच्या साथीत तेव्हा लोकसंख्या कमी असतानाही आजच्या कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होत होते. बालमृत्यू, बाळंतपणातील स्त्रियांचे मृत्यू याचे प्रमाण प्रचंड होते जे आधुनिक विज्ञानाने कमी केले आहे. भारतीयांना ग्रहतारे माहित होते परंतु ग्रहण आणि धूमकेतू विषयी अंधश्रद्धा तेव्हा होत्या, आजही आहेत. शिक्षण व्यवस्था तर फारच बुरसटलेली होती. बारा बलुतेदार किंवा व्यावसायिक शिक्षण या नावाखाली उरलेले शिक्षण हे प्रामुख्याने धार्मिक अंगाने होते आणि ती तथाकथित उच्चवर्णीयांची मिरासदारी होती.
ब्रिटिशांनी लूट केली हे सत्यच आहे. भारतावर उपकार करण्यासाठी ते आलेच नव्हते तरीही सुरुवात काळात येथील अनेक स्थानिक संस्थानिकांना (तेव्हा भारत असा देशच नव्हता हे आपल्याला माहिती आहे - शेकडो छोटी छोटी संस्थाने होती, त्यांच्यात सतत लढाया होत असत) ब्रिटिश म्हणजे परमेश्वराने पाठवलेले प्रेषित आहेत, असे वाटायचे आणि त्याबद्दल त्यांची कृतज्ञ भावना होती.
ब्रिटिशांनी (लॉर्ड मेकॉले) भले त्यांना कारकून हवेत म्हणून शिक्षण व्यवस्था सुरू केली परंतु त्यामुळे राजा राम मोहन रॉय, दादासाहेब नवरोजी, महात्मा फुले (अगदी गांधीजीही )यांना नवे पाश्चात्य विचार-फ्रेंच राज्यक्रांती (त्यातील समता,बंधुता, स्वातंत्र्य) ही विश्व मानवतेची तत्त्वे समजली. लोकशाही मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला चालना मिळाली.
जहाज बांधणी माहीत असली तरी परदेश गमनाला बंदी होती. समुद्र संचार केल्याबद्दल टिळकांना प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. टिळकांना तर ब्रिटिशांकडे चहा बिस्किटे खाल्ली म्हणूनही प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. इतिहासात हे पंचहौद प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे.
अगदी आजही आपले (अगदी सर्वसामान्य माणसाचेही) भौतिक जीवन सुखकर करणारे मोटर-मोबाईल-इलेक्ट्रीक दिवा-संगणक वगैरे बहुतांश शोध पाश्चात्यांनी लावले आहेत. इंग्रजी राजवट नसलेल्या जपान-चीन यांनीही चांगली प्रगती केली. त्यामुळे ब्रिटिशांचे आभार मानायचे नसले तरी आपल्या कपाळकरंटेपणाचा दोष त्यांना देता कामा नये. आपल्या इतिहासाचा अभिमान हवाच; पण आपण अंधभक्तही असता कामा नये. इतिहासाची कठोर चिकित्सा झाली तरच भविष्यकाल उज्ज्वल राहील. अभिमान हवा पण अभिनिवेश नको.