Friday, March 29, 2019

सजीव-निर्जीव : रासायनिक संबंध

सजीव-निर्जीव : रासायनिक संबंध -  जेट जगदीश (^j^)

आपले शरीर मूलद्रव्यांच्या सहाय्याने किमान 20 प्रकारच्या अमिनो आम्लानी बनलेले आहे. हृदय बंद पडले की शरीरातील चेतना नष्ट होते, आणि शरीर विघटित व्हायला लागते. म्हणजे पुन्हा मूलद्रव्यात रुपान्तरीत होते. जेव्हा योग्य प्रकारे मूलद्रव्यांची जोडणी होते आणि नवीन संयुगे तयार होतात तेव्हा नवीन जीव निर्माण होतो. असे हे चक्र अव्याहत सुरू असते. त्यामुळे आत्माचे उर्जारूपी अविनाशित्व ही केवळ कवी कल्पनाच ठरते.

ऊर्जा म्हणजे कार्य करण्याचे शक्ती, आणि चेतना म्हणजे निर्जीव रासायनिक अभिक्रियांमुळे एकपेशीय जीवाची सुरुवात होणे होय. ही निर्मिती RNA - DNA च्या रासायनिक साखळीतून होते. रासायनिक उर्जेमुळेच या रासायनिक अभिक्रिया घडतात. त्याचा परिणाम चेतना निर्माण होते. (शास्त्रज्ञानी कृत्रिम जीव प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे तंत्र 20व्या शतकातच हस्तगत केले आहे. तसेच ही चेतना कशी निर्माण होते यावरील संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्याचे उत्तर लवकरच शास्त्रज्ञाना सापडेल.)

शालेय अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक रसायनाच्या अभिक्रियेतून नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होण्याच्या क्रियेला रासायनिक अभिक्रिया असे  म्हणतात. उदा. हैडोजन आणि ऑक्सिजन  ही मूलद्रव्ये 2:1 या प्रमाणात एकत्र आली की पाणी तयार होते. या पाण्याचे गुणधर्म मूळ मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात. हैड्रोजन ज्वालाग्राही आहे तर ऑक्सजन ज्वलनास मदत करतो, पण पाणी मात्र यांच्या विरोधी आग विझवण्याचे काम करते . अशा प्रकारे रासायानीक अभिक्रीयेतून नवीन पदार्थ तयार होतात. त्याच पद्धतीने विविध अमिनो आम्लांच्या विशिष्ठ रासायनिक अभिक्रियांमुळे नवीन गुणधर्माचा जीव निर्माण होतो. ह्याला ऊर्जेचे रूपांतरण म्हणत नाहीत.

रासायनिक अभिक्रिया म्हणजेच रासायनातील अणूंची वेगळ्या पद्धतीने नवीन रचना तयार होणे. आणि अणूमधील बंधांची मोडतोड होऊन नवीन बंध तयार होण्यासाठी उष्णता वा विद्युत ऊर्जा कारणीभूत ठरतात. त्यामुळे मूळ घटकात रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो.

शास्त्रीयदृष्ट्या शक्ती आणि ऊर्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरीरात अन्न सेवनामुळे ऊर्जा साठवली जाते. त्या ऊर्जेमुळे आपण कार्य करू शकतो. जसे पवन ऊर्जेमुळे चाक फिरवले जाते, आणि तिचे रूपांतर यांत्रिक कार्य करण्यात होते. पण व्यवहारात आपण बरेचदा शास्त्रीय शब्द चुकीच्या पद्धतीने वापरत असतो, ऊर्जा म्हणजे शक्ती म्हणणे हे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. वरील विवेचनातून लक्षात येईल की प्राणशक्ती ही ऊर्जा नाही. कारण शक्ती आणि ऊर्जा या दोन वेगवेगळ्या अर्थाच्या संज्ञा आहेत.

प्राणशक्ती म्हणजे आत्मा ही माणसाच्या अमरत्वासाठी रचली गेलेली एक कल्पना असून ते वास्तव नाही. मानवाच्या भावना अपरिपक्व अवस्थेत असतांना, आप्त-स्वकीयांचे होणारे मृत्यू त्याला सैरभैर करून सोडत. तसेच त्याला स्वतःच्या शरीराच्या मृत्यूची पण काळजी लागून राहत असे. ह्या अटळ व दारुण वास्तवावर उपाय म्हणून अमर आत्मा कल्पिला गेला.   

अगणित दुष्कृत्ये केली आणि लाखो लोकांचे शिव्याशाप खाल्ले तरी औरंगजेब लवकर मेला नाही आणि वेदांतील मृत्युंजय मंत्राचा एक कोटी जप पूर्ण करूनही तरुण माधवराव पेशव्यांचा मृत्यू (क्षयरोगावर औषध नसल्याने) टळला नाही. हे असं कसं? मग परमेश्वर काय करतो? ह्या प्रश्नांमधून परमेश्वराची सुटका करून स्वतःच्या मनाचे समाधान करण्यासाठी पुनर्जन्माची निर्मिती झाली. त्यामुळे मग औरंगजेबाला पुढच्या जन्मी त्याच्या पापांची फळ भोगावी लागतील असं म्हणता येऊ लागलं. तसंच माधवरावांना मागच्या जन्मी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून ह्या जन्मी लवकर मृत्यु आला असं सांगायची पण सोय झाली.

या जीवनातील अगणित अन्याय, अपार दुःख, अत्याचार यांचे समर्थन किंवा स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे सर्वच माणसांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे भोगण्यासाठी, मृत्यूनंतर दुसरे महत्वपूर्ण जीवन असणे आवश्यक होते. त्यासाठी मृत्यूने मरत नाही असे काहीतरी शरीरात असणे आवश्यक होते. म्हणून आत्मा ही कल्पना निर्माण झाली.  *वास्तवात असं काही नसतं हे आधुनीक शास्त्रांनी सिद्ध झालं आहे.*

भौतिक नियम हे जड वस्तूंसाठी निसर्गनिर्मित स्वयंभू आहेत. ते कुणीही बनवलेले नाहीत. त्या निसर्गनिर्मित नियमांचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे विज्ञान होय.

कोणत्याही सजीवात जन्म आणि मृत्यू ही निसर्गातील भौतिक नियमानुसार घडणारी घटना आहे. म्हणूनच निर्जीव वस्तूंना ना जन्म आहे ना मृत्यू. कारण सजीव प्रथिनांपासून पेशींनी तयार होतो. आणि कोणत्याही चलनवलन करणाऱ्या जीवाला त्या प्रथिनांपासून ऊर्जा मिळते. त्यामुळे झीजही सुरू होते. म्हणून प्रत्येक सजीवाच्या जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म झालेला असतो. हे सत्य आपण स्वीकारणे गरजेचे आहे. मग आत्मा, पुनर्जन्म, नशीब, प्राक्तन, मागच्या जन्मीचे भोग याविषयी प्रश्न पडणार नाहीत. कारण माणसाचं मन हे हृदयात नसून मेंदूत असते. मेंदूतील न्यूरॉन्सची जोडणी म्हणजेच मन होय. यामुळेच माणूस विचार करत असतो.

हे सत्य स्वीकारलेली माणसे जीवन आहे तसे त्याचा आनंदाने स्वीकार करून मृत्यूचे भय न बाळगता जगायला शिकतात. कारण मृत्यू ही सुद्धा एक नैसर्गिक घटनाच आहे; हे त्यांनी स्वीकारलेले असल्यामुळे त्याचा ते बाऊ करत नाहीत. म्हणून मी म्हणतो, 'जीवनाआधी शून्य... जीवनानंतरही शून्यच...'

No comments: