Friday, March 29, 2019

सजीव-निर्जीव : रासायनिक संबंध

सजीव-निर्जीव : रासायनिक संबंध -  जेट जगदीश (^j^)

आपले शरीर मूलद्रव्यांच्या सहाय्याने किमान 20 प्रकारच्या अमिनो आम्लानी बनलेले आहे. हृदय बंद पडले की शरीरातील चेतना नष्ट होते, आणि शरीर विघटित व्हायला लागते. म्हणजे पुन्हा मूलद्रव्यात रुपान्तरीत होते. जेव्हा योग्य प्रकारे मूलद्रव्यांची जोडणी होते आणि नवीन संयुगे तयार होतात तेव्हा नवीन जीव निर्माण होतो. असे हे चक्र अव्याहत सुरू असते. त्यामुळे आत्माचे उर्जारूपी अविनाशित्व ही केवळ कवी कल्पनाच ठरते.

ऊर्जा म्हणजे कार्य करण्याचे शक्ती, आणि चेतना म्हणजे निर्जीव रासायनिक अभिक्रियांमुळे एकपेशीय जीवाची सुरुवात होणे होय. ही निर्मिती RNA - DNA च्या रासायनिक साखळीतून होते. रासायनिक उर्जेमुळेच या रासायनिक अभिक्रिया घडतात. त्याचा परिणाम चेतना निर्माण होते. (शास्त्रज्ञानी कृत्रिम जीव प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे तंत्र 20व्या शतकातच हस्तगत केले आहे. तसेच ही चेतना कशी निर्माण होते यावरील संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्याचे उत्तर लवकरच शास्त्रज्ञाना सापडेल.)

शालेय अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक रसायनाच्या अभिक्रियेतून नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होण्याच्या क्रियेला रासायनिक अभिक्रिया असे  म्हणतात. उदा. हैडोजन आणि ऑक्सिजन  ही मूलद्रव्ये 2:1 या प्रमाणात एकत्र आली की पाणी तयार होते. या पाण्याचे गुणधर्म मूळ मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात. हैड्रोजन ज्वालाग्राही आहे तर ऑक्सजन ज्वलनास मदत करतो, पण पाणी मात्र यांच्या विरोधी आग विझवण्याचे काम करते . अशा प्रकारे रासायानीक अभिक्रीयेतून नवीन पदार्थ तयार होतात. त्याच पद्धतीने विविध अमिनो आम्लांच्या विशिष्ठ रासायनिक अभिक्रियांमुळे नवीन गुणधर्माचा जीव निर्माण होतो. ह्याला ऊर्जेचे रूपांतरण म्हणत नाहीत.

रासायनिक अभिक्रिया म्हणजेच रासायनातील अणूंची वेगळ्या पद्धतीने नवीन रचना तयार होणे. आणि अणूमधील बंधांची मोडतोड होऊन नवीन बंध तयार होण्यासाठी उष्णता वा विद्युत ऊर्जा कारणीभूत ठरतात. त्यामुळे मूळ घटकात रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो.

शास्त्रीयदृष्ट्या शक्ती आणि ऊर्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरीरात अन्न सेवनामुळे ऊर्जा साठवली जाते. त्या ऊर्जेमुळे आपण कार्य करू शकतो. जसे पवन ऊर्जेमुळे चाक फिरवले जाते, आणि तिचे रूपांतर यांत्रिक कार्य करण्यात होते. पण व्यवहारात आपण बरेचदा शास्त्रीय शब्द चुकीच्या पद्धतीने वापरत असतो, ऊर्जा म्हणजे शक्ती म्हणणे हे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. वरील विवेचनातून लक्षात येईल की प्राणशक्ती ही ऊर्जा नाही. कारण शक्ती आणि ऊर्जा या दोन वेगवेगळ्या अर्थाच्या संज्ञा आहेत.

प्राणशक्ती म्हणजे आत्मा ही माणसाच्या अमरत्वासाठी रचली गेलेली एक कल्पना असून ते वास्तव नाही. मानवाच्या भावना अपरिपक्व अवस्थेत असतांना, आप्त-स्वकीयांचे होणारे मृत्यू त्याला सैरभैर करून सोडत. तसेच त्याला स्वतःच्या शरीराच्या मृत्यूची पण काळजी लागून राहत असे. ह्या अटळ व दारुण वास्तवावर उपाय म्हणून अमर आत्मा कल्पिला गेला.   

अगणित दुष्कृत्ये केली आणि लाखो लोकांचे शिव्याशाप खाल्ले तरी औरंगजेब लवकर मेला नाही आणि वेदांतील मृत्युंजय मंत्राचा एक कोटी जप पूर्ण करूनही तरुण माधवराव पेशव्यांचा मृत्यू (क्षयरोगावर औषध नसल्याने) टळला नाही. हे असं कसं? मग परमेश्वर काय करतो? ह्या प्रश्नांमधून परमेश्वराची सुटका करून स्वतःच्या मनाचे समाधान करण्यासाठी पुनर्जन्माची निर्मिती झाली. त्यामुळे मग औरंगजेबाला पुढच्या जन्मी त्याच्या पापांची फळ भोगावी लागतील असं म्हणता येऊ लागलं. तसंच माधवरावांना मागच्या जन्मी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून ह्या जन्मी लवकर मृत्यु आला असं सांगायची पण सोय झाली.

या जीवनातील अगणित अन्याय, अपार दुःख, अत्याचार यांचे समर्थन किंवा स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे सर्वच माणसांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे भोगण्यासाठी, मृत्यूनंतर दुसरे महत्वपूर्ण जीवन असणे आवश्यक होते. त्यासाठी मृत्यूने मरत नाही असे काहीतरी शरीरात असणे आवश्यक होते. म्हणून आत्मा ही कल्पना निर्माण झाली.  *वास्तवात असं काही नसतं हे आधुनीक शास्त्रांनी सिद्ध झालं आहे.*

भौतिक नियम हे जड वस्तूंसाठी निसर्गनिर्मित स्वयंभू आहेत. ते कुणीही बनवलेले नाहीत. त्या निसर्गनिर्मित नियमांचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे विज्ञान होय.

कोणत्याही सजीवात जन्म आणि मृत्यू ही निसर्गातील भौतिक नियमानुसार घडणारी घटना आहे. म्हणूनच निर्जीव वस्तूंना ना जन्म आहे ना मृत्यू. कारण सजीव प्रथिनांपासून पेशींनी तयार होतो. आणि कोणत्याही चलनवलन करणाऱ्या जीवाला त्या प्रथिनांपासून ऊर्जा मिळते. त्यामुळे झीजही सुरू होते. म्हणून प्रत्येक सजीवाच्या जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म झालेला असतो. हे सत्य आपण स्वीकारणे गरजेचे आहे. मग आत्मा, पुनर्जन्म, नशीब, प्राक्तन, मागच्या जन्मीचे भोग याविषयी प्रश्न पडणार नाहीत. कारण माणसाचं मन हे हृदयात नसून मेंदूत असते. मेंदूतील न्यूरॉन्सची जोडणी म्हणजेच मन होय. यामुळेच माणूस विचार करत असतो.

हे सत्य स्वीकारलेली माणसे जीवन आहे तसे त्याचा आनंदाने स्वीकार करून मृत्यूचे भय न बाळगता जगायला शिकतात. कारण मृत्यू ही सुद्धा एक नैसर्गिक घटनाच आहे; हे त्यांनी स्वीकारलेले असल्यामुळे त्याचा ते बाऊ करत नाहीत. म्हणून मी म्हणतो, 'जीवनाआधी शून्य... जीवनानंतरही शून्यच...'

Wednesday, March 27, 2019

आपण दुःखी का होतो. -जगदीश काबरे.(^j^)

जीवन आनंदी,सुखी,समाधानी असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. या बाबतीत स्वत:ची आशी काही मतं असतात आणि ती पूर्णत: योग्यच आहेत असं समजूनच आपण चालत असतो. मग आपल्या जीवनात जेव्हा आपल्या अपेक्षेनुसार घडामोडी घडतात तेव्हा आपण खुश होतो. खरा प्रश्न असा आहे की, हां बाहेरून मिळणारा आनंद, जो कधी एखाद्या वस्तू कडून मिळतो किवा एखाद्या व्यक्तीकडून, तो आनंद स्थायी स्वरुपाताला असतो का? तो कधी आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो का?

आपल्या शरीराला थोड़ासाही त्रास झालेला आपल्याला चालत नाही. अगदी आरामात रहाणेच आपण पसंत करतो. मात्र मनाच्या बाबतीत नेमकी ही जागरूकता दाखवायला विसरतो. सर्वांसाठी आपण वेळ काढतो,पण स्वत:साठी थोडातरी वेळ आपण काढतो का? एक क्षणभर तरी थांबून पाहीलय का की आपण स्वत:आनंदी आहोत का?

आनंद ही अशी भावना आहे जिला केवळ स्वत:च जाणू शकतो. आपण आनंदापासून दुरावातो तेव्हा आपण आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल दुसर्याच्या हातात देतो.कुणी आपल्या बरोबर कसा वागातोय याचा कुठे ना कुठे संबंध लावून आपण असं समीकरण बनवतो की, माझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा आनंदी असतील तेव्हाच मलाही आनंद मिळेल. याचाच दुसरा अर्थ असा की, माझ्या आजूबाजूचे लोक जर दू:खी असतील तर मी आनंदी कसा राहू शकेन?

आपण दु:खी होतो कारण आपलं इतरांनी आपलं कौतुक करावं, मला यश मिळावं, त्याने मी आनंदी होईन हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. म्हणून कुणीही कौतुक केलं नाही तर  आपल्याला यश मिळालं तरी आनंद नाही होत. इतकं आपण आपल्या आनंदाला मर्यादित करून ठेवलं आहे.

भीती, चिंता, काळजी... या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्‍वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना कण्ट्रोलमध्ये कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं नाही झालं आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच.

१) आपण जर सतत कशाची ना कशाची चिंता करत राहिलो तर समोर असणार्‍या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्याचं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत.

२) सातत्यानं मनात चिंतेचे विचार राहिले तर त्याचा मनावर/शरीरावर ताण निर्माण होतो. छातीत धडधड होणे, तोंडाला कोरड पडणे. हातपाय थंडगार पडणे अशी विविध शारीरिक लक्षणं त्यातून निर्माण होतात. मुळात भीती का वाटते तर आपल्या मनानं आता आपल्याला कोणत्यातरी महाभयंकर आव्हानाला तोंड द्यायचं आहे, असा संदेश दिलेला असतो. उदाहरणार्थ, '. ती नाही म्हणाली तर!' म्हणजे काय तर आपलं नाकारलं जाणं, नापास होणं, आपलं मूल्यमापन होणं यासारख्या गोष्टींची भीती मनात घर करून बसते. या सर्व गोष्टी म्हणजे त्या क्षणाला आपल्याला अगदी संपवून टाकणार्‍या, खाऊन टाकण्याच्या गोष्टी वाटतात. 'काही खरं नाही.. असं झालं तर, मला सहनच होणार नाही,' असं मनातून वाटत असतं. मनानं या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारल्यानं त्याला सामोरं जायला आपण सतत स्वत:ला तयार करतो. त्यातूनच बरीच शारीरिक लक्षणं निर्माण होतात. आपण सतत कसल्या ना कसल्या चिंतेत राहिलो तर नंतर त्यातून अनेक मनोशारीरिक आजार उद्भवतात.

३) बर्‍याचदा सतत चिंता करत रहाण्याच्या स्वभावानं आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो आपल्या मनात सतत 'असं होईल का?' 'तसं होईल का?' 'असं झालं तर काय..?' 'तसं झालं तर काय?'' असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक 'कल्पना' करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो.

भीतीतून बाहेर पडायचं कसं?

१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्‍याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.

२) 'राईचा पर्वत बनवणं' ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.

३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांच आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते.

भीतीचं भूत मानेवर बसलंच तर? रिलॅक्स! परीक्षा चालू असताना किंवा महत्त्वाची एखादी गोष्ट करताना मध्येच भीती वाटू लागली किंवा एकाएकी भीतीच्या भुतानं धरलंच तर? काही गोष्ट चटकन करून पाहा. भीती पळू शकेल.
१) दीर्घ श्‍वसन करा. शरीर रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा.
२) 'विनाकारण' भीती निर्माण करणार्‍या विचारांना महत्त्व देऊ नका.
३) त्यापेक्षा आपल्याला धीर देतील असे विचार करा.
४) स्वत:वरचा विश्‍वास उडून देऊ नका.
५) भीती माझ्या विचारांनी तयार होतेय, माझ्याचमुळे तयार होते ही जाणीव मनाला करून द्या.
६) भीतीची भीती कमी करा. बर्‍याच जणांच्या मनात मला भीती वाटेल याचीच भीती निर्माण झालेली असते.
७) जास्तीत जास्त काय होईल? जे होईल ते होईल. असा विचार करून प्रसंगाला सामोरं जा. तसं केलं तर जमतं असं तुमच्या लक्षात येईल.
८) आपल्याला वाटणार्‍या भीतीचं सर्मथन करू नका!
९) भीती निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वत:च्या क्षमतांविषयी मनात असणारी साशंकता. ती साशंकता कमी करणे, आत्मविश्‍वास वाढवणे, स्वत:वर विश्‍वास ठेवणं हा महत्त्वाचा उपाय.
१०) जगण्यात कोणतीही गोष्टी शाश्‍वत नसते. त्यामुळे बदलांचा स्वीकार करा.
११) मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्‍वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा.
स्वत:ला नेहमी सांगत रहा की, 'I CAN DO IT' 'YES, I CAN DO IT.'