आत्मकथन – जेट जगदीश
विवेकवादी आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, शाहू, लोकहितवादी, महर्षी कर्वे, विज्ञाननिष्ठ सावरकर, आंबेडकर, रावसाहेब कसबे, इतिहासाचार्य वि का राजवाडे, धर्मानंद कोसंबी इत्यादी सुधारकवादी विद्वानांच्या पुस्तकांचे वाचन केल्यामुळे मी माझ्या वयाच्या 26व्या वर्षापासून निधर्मी नास्तिक झालेलो आहे.
मी रूढीवादी घरात जन्माला आल्यामुळे लहानपणापासून शालेय वयापर्यंत देवभोळा होतो. घरातील सगळे कुळाचार आणि कर्मकांड करत होतो. इयत्ता आठवीत आल्यानंतर मला वाचनाची आवड लागली आणि मी मिळेल ते पुस्तक वाचू लागलो. त्यामुळे मी विचार करू लागलो... मला देवधर्म, कर्मकांड, सामाजिक रूढी, चालीरितींबद्दल प्रश्न पडायला लागले. पण त्या प्रश्नांची उत्तरे मला माझ्या घरातून किंवा घरी पूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींकडून मिळत नव्हती. अकरावीत असतांना एकदा आगरकरांचे पुस्तक माझ्या हाती लागले. त्यातून माझ्या काही शंकांचे निरसन झाले. म्हणून समाज सुधारकांच्या पुस्तकांचे वाचन करायचा सपाटा लावला. परिणामी माझी नास्तिक होण्याची प्रक्रिया विसाव्या वर्षी सुरू झाली आणि सव्विसाव्या वर्षी पूर्ण झाली. अर्थात ही प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. कारण लहानपणापासून देवाधर्माचे संस्कार पालकांनी मानत घट्ट रुजूवले होते. ते उखडून टाकणे आणि देवाची भीती घालवणे सुरुवातीला कठीण होऊन बसले होते. पण जसजशी पुस्तके वाचत गेलो तसतशी माझी देवाबद्दलची भीती नाहीशी होत गेली... मी निर्भय होत गेलो आणि माझा नास्तिकतेचा प्रवास पूर्ण झाला. 'ग्रंथ हेच खरे गुरू' म्हणतात ते काही खोटे नाही, याची मला प्रचिती आली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत ठेवून जगत आल्यामुळे मला वयाच्या 70व्या वर्षापर्यंत आजतागायत कधी देवाची किंवा धर्माची गरज लागली नाही.
माझ्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी देवाला कधी आठवावेसे वाटले नाही की त्याला शरण जावेसेही वाटले नाही. धार्मिक कर्मकांड करून परिस्थिती सुधारेल असे तर कधीच वाटले नाही. कारण मी संपूर्ण विचारांती नास्तिक झालोय आणि निधर्मीही.
त्याउलट आस्तिकांना आस्तिक होण्यासाठी कुठलेही डोके लावावे लागत नाही. कारण ते वाडवडील सांगतील त्या गोष्टी निमुटपणे करण्यात धन्यता मानणारे असतात. कुळाचार पाळणे आणि धार्मिक कर्मकांड करणे याला कुठल्याही प्रकारचे डोके लागत नाही; तर फक्त मेंढरू वृत्ती पुरेशी असते.
ज्यांचा आत्मविश्वास जागृत होतो, ते आपल्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवतात आणि आपल्या स्वतःच्या विवेकबुद्धीच्या जबाबदारीवर जगायला शिकतात. त्यांना कधीही देवाधर्माची गरज लागत नाही. कारण नीतिमत्तेने जगणे हा त्यांचा अंगभूत गुणधर्म होतो.
पण ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी असते अशा लोकांनाच देवाधर्माची गरज लागते. कारण त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर जगण्याची धमक नसते. ते देवाधर्माच्या भीतीमुळे नीतिमत्तेने जगत असतात. म्हणून बव्हंशी आस्तिक लोक हे otherwise gentleman म्हणजे पकडेपर्यंत साव असतात; पण मुळात मनातून ते चोरच असतात. बऱ्याच आस्तिकांच्या 'ओठात एक आणि पोटात भलतेच' असा दांभिकपणा भरलेला असतो.
प्रामाणिकपणा हा प्रत्येकाचा अंगभूत गुणधर्म असायला हवा, पण तो आता फक्त दिखाऊ गुणधर्म झालेला आहे. उलट आज प्रामाणिक माणसाला बावळट समजले जाते. आपला तोंडाने 'सत्यमेव जयते'चा जप चालू असतो. पण वागणुकीत मात्र कायम असत्यमेव जयते असते. जी माणसे कायद्याच्या किंवा देवाधर्माच्या भीतीने तथाकथित सज्जन आणि पापभिरू असतात ती माणसे मनातून कधीच प्रामाणिक नसतात.🤦
नीट डोळे उघडे ठेवून पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की, आस्तिक मोठ्या प्रमाणात खोटेपणाने वागणारे असतात. कारण गंगेत डुबकी मारून सर्व पापे धुतली जातात, अशा भाकड कथांवर त्यांचा विश्वास असतो. ते फक्त नजरेनेच नाही तर शारीरीकही जेवढे बलात्कार करतात तेवढे नास्तिक करत नाहीत. जेलमध्ये आस्तिकांचीच संख्या जास्त असते. तरीही आस्तिक म्हणत असतात, देवाधर्मामुळे नीतिमत्ता राहिलेली आहे. असे म्हणणे यासारखा मोठा विनोद नाही.
...आणि म्हणे जातीपातीत अडकलेली माणसाला श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवत माणूस म्हणून न ओळखणारी, बहुजनांना अज्ञानी ठेवत, अंधश्रद्ध बनवत त्यांच्यावर अत्याचार करणारी आमची संस्कृती उच्च आहे!😠
No comments:
Post a Comment