Monday, December 16, 2019

पालकत्व आणि संस्कार

पालकत्व आणि संस्कार :- जेट जगदीश.

मी माझ्या नातवावर (वय वर्षे 2 नंतर आजतागायत) आणि  *त्याच्यावर संस्कार करण्याचा सिहाचा वाटा आहे त्या त्याच्या आईने* अनेक प्रयोग करून लहानपणीच स्वतःची जबाबदारी घेण्याचा संस्कार कसा रुजवला त्याची कहाणी... 

1) आमच्या घरात कधीही भिंती पेन्सिलीने रंगल्या नाहीत. तेही त्याला 'असे करू नको' हे न सांगता. कारण त्याच्या हातात पहिल्यांदा जेव्हा पेन्सिल दिसली तेव्हा घरात एक नियम केला होता की, ज्याला कुणाला त्याच्या हातात पेन्सिल दिसेल त्याने ताबडतोब कागद घेऊन त्याचा हात धरायचा आणि 'पेन्सिलीने कागदावर लिहायचे', असे बोलून ती त्यांच्याच हाताने कागदावर गिरवायचे. असे सतत 8 ते 10 वेळा केल्यावर त्या 2 वर्षाच्या मुलाच्या मेंदूत कागद आणि पेन्सिल हा संबंध प्रस्थापित व्हायचा. मग जेव्हा जेव्हा त्याच्या हातात पेन्सिल आली की तो कागद मागायचा. 

2) त्याला आईने दिवसातील ठराविक वेळ इंग्रजी कार्टून पहायची सवय लावली. आज *युट्युबवर अनेक वैज्ञानिक कार्टून्स उपलब्ध आहेत.*  त्यामुळे त्याला इंग्रजी भाषा सहजपणे समजण्यास मदतच झाली. परिणाम त्याला आज सूर्यमाला, डायनासोरचे प्रकार, वनस्पतींचे तसेच फुलपाखरांचे जीवनचक्र, सगळ्याप्रकारचे प्रदूषण, इत्यादी विषयी बऱ्यापैकी माहिती झालीय. आणि तो विचारही बऱ्यापैकी इंग्रजीतूनच करतो.

3) सध्या तो बंगलोरला रहात असल्यामुळे जरी त्याला तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले तरी घरात मात्र त्याच्याशी आवर्जून मातृभाषेतूनच संवाद साधला जातो. घरात चुकूनही *'मिग्लिश'* (मराठी + इंग्लिश) भाषा वापरली जात नाही. घरात कोणतीही एकच भाषा शुद्ध स्वरूपात बोलली जाते. त्यामुळे त्याचे दोन्ही भाषेचे आकलन चांगले होत आहे. परिणामी तो ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेतही विचार करायला शिकला आहे.

4) त्याला सुरवातीला गोष्टीची पुस्तके नियमितपणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी वाचून दाखवण्याचा किंवा गोष्टी सांगण्याचा परिपाठ ठेवला. कळले नाही तिथे त्याला लगेच *'म्हणजे' वा 'का'* ते विचारायची सूचना देऊन ठेवली होती. आजही तो नवी मुंबईला रहाणाऱ्या आजीला (आम्ही नवी मुंबईत रहातो.) दर शनिवारी रात्री बंगलोरहून फोन करतो आणि तिच्याकडून फोनवर गोष्ट ऐकतो.

5) तो 5 वर्षाचा झाल्यावर सचित्र पुस्तके देऊन त्यालाच त्यावरून गोष्ट तयार करायला सांगितले. तो त्याच्या मगदुराप्रमाणे गोष्ट तयार करायलाही शिकला आणि तिचे तात्पर्यही सांगू लागला. मग वाचायला यायला लागल्यावर त्याला अनेक पुस्तके आणून दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या 6व्या वर्षांपासून (आज तो 8 वर्षाचा आहे.) त्याला महिन्यातून एकदा पुस्तकांच्या दुकानात नेऊन हवी ती पुस्तके निवडायची मुभाही दिली. आमच्याकडे वाशीत लहान मुलांची छान छान पुस्तके किलोच्या भावाने देणारे दुकान आहे. तो इथे आला की, तिथून तो हवी तेवढी पुस्तके घेऊन येतो, आणि वाचतोही. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायची सवय लागली आहे.

6) त्याच्या आईने अभ्यासाची वेळही त्याच्या सोईप्रमाणे त्याने ठरवली आहे. आणि *विशेष म्हणजे तो आईला सांगतो की, 'अभ्यासात मला मदत करू नको. मला काही अडचण आलीच तर मी तुला विचारीन.'* अशाप्रकारे स्वअभ्यासाची त्याला सवय लागली आहे.

7) त्याच्या खेळाच्यावेळाही त्यानेच ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे तो स्वतःच खेळाची वेळ झाली की खेळायला जातो आणि वेळ संपली की आपणहून घरी येतो. त्याला क्वचितच बोलवावे लागते; पण हाक मारल्याबरोबर 'अजून थोडावेळ' असे न म्हणता सरळ घरी येतो.

8) एकटा बाहेर वावरतांना त्याने सजगपणे जगाकडे बघावे म्हणून त्याला चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, मुलगा आणि मुलगी यांच्या जनानेंद्रियांबाद्दल त्याला कळेल अशा भाषेत वैज्ञानिक माहिती दिल्यामुळे तो स्पर्श ओळखायला शिकला आहे.

9) मोबाईलवर तो क्वचितच असतो. मोबाईलवर गुगलिंग करतांना त्याला जर अचानक स्त्री-पुरुषांच्या सलगीचे फोटो दिसले तरी तो त्याकडे विचित्र नजरेने पहात नाही. कारण तो लहान असल्यापासून त्याने आईवडिलांना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतांना किंवा हातात हात घेऊन चालतांना पाहिले आहे. तसेच ते तिघे बरेचदा जेवतांना आपसात एकमेकांना घास भरवून आनंदाने जेवत असतात. त्याच बरोबर त्याला समजेल अशा भाषेत नुकतेच लैंगिक शिक्षणाविषयी माहिती गप्पांच्या ओघात त्याचे आईवडील देत असतात. त्यामुळे सेक्सचा टॅब्यु त्याच्या मनात निर्माण होणार नाही, हे पाहिले जाते.

10) *मी नेहमी म्हणतो की, 'आईवडील होणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी पालक होणे ही जबाबदारीची क्रिया आहे. म्हणून जोपर्यंत लग्नानंतर नवरा-बायको पालक होण्यास समर्थ होत नाहीत तोपर्यंत त्यांनी मुलांना जन्म देऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.* 

11) तो हट्टी होऊ नये म्हणून काय केले तो किस्सा सांगण्यासारखा आहे... साधारणपणे तो दीड वर्षांचा होता तेव्हा एकदा संध्याकाळी आम्हा सगळ्यांना बाजारात जायचे होते, पण त्याला घरातच नवीनच आणलेल्या खेळण्याशी खेळायचे होते. त्याला एकटे ठेवून जण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे बरोबर घेऊन जाणे भाग होते. आणि तो तर येण्यास नकार देत होता. आम्ही ऐकत नाही म्हटल्यावर त्याने भोकांड पसरले आणि मोठमोठ्याने रडून आकांत मांडला. तो न येण्याचा पहिल्यांदाच असा हट्ट करत होता, तो त्याचवेळेस मोडणे आवश्यक होते. म्हणून मी त्याच्या आईला आणि बाकीच्यांनाही सांगितले की, कुणीही त्याच्या रडण्यामुळे पाघळू नका. थोडे कठोर वाटेल, पण त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करा. 

नंतर तो जवळजवळ अर्धा तास रडत होता. आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवत गप्पा मारत होतो. त्याने रडे थांबवून तो मुसमुसु लागल्यावर मी त्याला जवळ घेतले, आणि प्रेमाने तुला आता आमच्या बरोबर येणे कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. तसेच परत आल्यावर तू ह्या खेळण्याशी हवा तेवढा खेळू शकतोच ना? असे विचारल्यावर आपला हट्ट चालत नाही हे समजून तो यायला तयार झाला. 

या प्रसंगानंतर घरात एक नियम केला की, मुल हट्टी व्हायचे नसेल तर ज्या कुणी त्याला रागावले असेल वा नकार दिला असेल त्यानेच त्याचे रडणे थांबल्यावर जवळ बोलवायचे आणि आपण का रागावलो, का नकार दिला हे समजावून सांगायचे. म्हणजे त्याच्या मनात रागावणाऱ्या व्यक्तीविषयी किल्मिश रहाणार नाही. दरम्यान दुसऱ्या कुणीच मध्येच त्याचा हट्ट पुरवायचा म्हणून पाघळून त्याच्या मनासारखे करायचे नाही. परिणाम असा झाला की त्याने त्यानंतर हट्ट करणे सोडून दिले.

12) मानसशास्त्रानुसार पहिल्या 6 वर्षापर्यंत मेंदूची ग्राहकक्षमता प्रचंड असते. त्यामुळे या काळात तुम्ही मुलांना जे शिकवाल ते मेंदू ग्रहण करत असतो. आणि त्याचा परिणाम पुढे आयुष्यभर टिकतो. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले तर ते मूल पौगंडावस्थेत आणि पुढच्या आयुष्यातही भरकरण्याचा संभव नगण्य असतो. 

म्हणून मुलांच्या लहानपणापासूनच म्हणजे अगदी वयवर्षं 1 पासूनच त्यांच्याशी योग्यप्रकारे सातत्याने संवाद ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांच्याशी कधीही बोबडे बोल बोलू नयेत वा आपल्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा त्यांच्याकडून पुऱ्या करून घेण्याचा अट्टाहास करू नये. त्याच्यात नकार पचवण्याचीही सकारात्मकता रुजवणे महत्वाचे आहे. तसेच कोणतेही देवधर्मविषयक कर्मकांड त्यांच्यावर लादू नयेत. सज्ञान झाल्यावर त्याचे त्यालाच अभ्यास करून वाचनाने देवधर्मविषयक विचार ठरवू देणे हे व्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून नाही का? तेव्हा आपले मूल एक सजग नागरिक होण्यासाठी पालकांनी ही काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत, असे मला वाटते. तुम्हाला?  हे सगळे सजग पालकत्वामुळे घडू शकते. त्यांना जबाबदारीची जाणीव दिल्याचा संस्कार केल्यामुळेच त्यांना जमतंय असं नाही वाटत?

Tuesday, December 3, 2019

ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिकता


📖 *ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)* 📖(^m^) (^j^) (मनोगते)

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीने 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.विज्ञान युगाचा अभिमान धरणार्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.
_ही सगळी विधाने दिशाभूल करणारी असून त्यातून अंधभक्तांचे अर्धवट ज्ञानच दिसते. सर्वात पहिली गोष्ट कुठल्याही ओव्याचें संदर्भ क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे त्या ओव्यांबद्दल साशंकतेला वाव राहातो. दुसरे म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला हवा तसा तोडून मोडून लावलेला दिसतो._
म्हणून खाली अंधभक्तांनी दिलेली मूळ ओवी आणि त्याचा त्यांनी लावलेला अर्थ देऊन नंतर त्याचे आम्ही योग्य स्पष्टीकरण  देत आहोत.

1) "उदय-अस्ताचे प्रमाणे,
जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे,कर्मींचि असता".
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध ठरत नाही काय? हे स्पष्टीकरण चुकीचे आहे.
*योग्य स्पष्टीकरण : पृथ्वी गोल असण्याबद्दलचे अंदाज आणि सूर्याभोवती फिरत असल्याबद्दलचे अंदाज आठव्या शतकातले आहेत. तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती असा निष्कर्ष काढून आर्यभटाने ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगून, ग्रहणे का होतात याचे स्पष्टीकरण दिले आहे.*

2) "पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा,
       तरी हा भूगोलचि काखे सुवावा,
तैसा विस्तारू माझा पाहावा,तरी जाणावे माते"
   भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
*योग्य स्पष्टीकरण : परमाणु म्हणजे सर्वात छोटा कण असे कणाद ऋषीनी ज्ञानेश्वरांच्या कित्येक शतके आधीच सांगून ठेवले आहे.*

3) "तया उदकाचेनि आवेशे,
प्रगटले तेज लखलखीत दिसे,
मग तया विजेमाजी असे,सलील कायी?".
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.परंतु माऊली 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.पण
*योग्य स्पष्टीकरण : वीज हा शब्द आकाशातील विजेला आधीपासून होता .तेव्हा वीजेच्या स्वरूपाबद्दल ज्ञान नव्हते. जेव्हा वीजेचा शोध लागला तेव्हा आधीचाच शब्द उपयोगात आणला. जसे उडत्या वाहनाची कल्पना विमान नावाने केली होती आणि प्रत्यक्षात जेव्हा उडत्या वाहनाचा शोध लागला तेव्हा त्याला विमान म्हटले गेले.*

4) "मी सूर्याचेनि वेषे,तपे तै हे शोषे,
     पाठी इंद्र होवोनि वर्षे,मग पुढती भरे".
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.
*योग्य स्पष्टीकरण : खरेतर पावसाच्या निर्मिती विषयक माहिती ज्ञानेश्वरांच्या आधीही ऋषीना माहीत होते.*

5) "ना तरी भौमा नाम मंगळ,
रोहिणीते म्हणती जळ,
तैसा सुखप्रवाद बरळ, विषयांचा"
किंवा "जिये मंगळाचिये अंकुरी,
सवेचि अमंगळाची पडे पारी"
किंवा "ग्रहांमध्ये इंगळ,
तयाते म्हणति मंगळ".
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:"परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे"
किंवा स्वाती नक्षत्र: "स्वातीचेनि पाणिये, होती जरी मोतिये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभति तिये".
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला आहेत.
*योग्य स्पष्टीकरण : डोळ्यांना दिसणाऱ्या ग्राहगोलांची माहिती वेदकाळापासून ज्ञात आहे. वराहमिहीर, भास्कराचार्य,आर्यभटांनी आदी ऋषीनीही ग्रह, तारे आणि नक्षत्रांबद्दल ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगितले आहे.*

6) "जेथ हे संसारचित्र उमटे,
तो मनरूप पटु फाटे,
जैसे सरोवर आटे,
मग प्रतिमा नाही".
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.
*योग्य स्पष्टीकरण : हा व्यवहारात दिसणाऱ्या घटनेला ओढून ताणून वैज्ञानिक रूप देण्याचा अट्टाहास आहे. जसे इंग्लंडमधील शहर बर्मिंगहॅम हा ब्राम्हणधाम या नावाचा अपभ्रंश आणि आपल्याकडे जसे ञ्यंबकेश्वर , महाबळेश्वर आहेत , यातील ईश्वर नावाचा अपभ्रंश शायर असा करुन इंग्लंडच्या विविध शहरांची नावे ठेवलेली लिसेस्टशायर , लंकेशायर इ.यातील लंकेशायर हे लंकेश्वर म्हणजे रामायणातील लंकेच्या नावावरुन आहे. किती हास्यास्पद आहे ते!तसेच ह्या ओवीचा हास्यास्पद अर्थ काढला आहे.*

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी असलेली अंधभक्तीच दिसून येते, आणि विचारातील अवैज्ञानिकताही ध्यानात येते. *एवंच जे आधीच ऋषीमुनींना माहीत होते आणि तेच खरे पुरातन भारतीय शास्त्रज्ञ होते.तेव्हा त्यांचे ज्ञान पुढे न नेता नुसते गोडवे गाण्यात काय हशील आहे ?*

ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत नवीन काहीच सांगितले नाही. जे ज्ञान आधीच अवगत होते, तेच फक्त काव्यात लिहिले. तेव्हा आंधभक्तांनो, अंधभक्तीतून बाहेर पडा, आणि पूर्वजांचे नुसतेच गोडवे गाण्याच्या ऐवजी प्रयत्नवादी व्हा, आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करा म्हणजे तुमची खरी प्रगती होईल.

Monday, December 2, 2019

भारतात धर्मांध खूप माजले आहेत

मशिदी खाली सडायला देव इतका का दुबळा आहे ?
जग निर्माण करणारे भीक का मागत आहे ?
याचे उत्तर न शोधता नुसताच कल्ला करीत आहे
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

वारी आणि हज चे जाऊ द्या, इथे कष्टकरी कष्ट करून उपाशी झोपत आहे 
आणि कुंभमेळ्यात गांजा ओढणार्‍याला दोन हजार पेन्शन मिळत आहे
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

फक्त गाईचाचा उदो उदो, इतरांचा स्पर्श घाण आहे 
गाईच्या प्रेमापाई माणसाची सुऱ्या खाली मान आहे
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत* 

बाळुमामाची मेंढरं अंधश्रद्धा पसरवत चालली आहे
कित्येक जत्रांमध्ये, देवळात 
पशुबली प्रथा चालू आहे 
मात्र बकरी ईदलाच मेंढीचा 
ढोंगी कळवळा येतो आहे 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

यांनी आजपर्यंत चार पत्नीवाला मुस्लिम पाहिलेलाच नसतो 
पण खोट काढण्यापाई मुस्लिम स्त्रियांचा कळवळा जागृत झालेला असतो
दुसर्‍यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवीत आहेत
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

रजस्वलांना अपवित्र मानणे 
हीच एक विकृती आहे 
त्यासाठी महिला मशिदबंदीचा 
ते निर्लज्ज सहारा घेत आहेत 
अंगभर कपड्यांचा हट्ट वाले 
काळ्या बुरख्यात अडकत आहेत 
*कारण आपल्या भारतात* 
*धर्मांध खूप माजत आहेत* 
 
फटाके वाजवणे ही परंपरा 
समजणे हेच लज्जास्पद आहे 
दीड टक्के लोक डिसेंबरात 
आसमान झगमगवतात 
असे खोटे दावे करणे 
हाच यांचा धंदा आहे 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत* 

पुस्तके वाचणारा नक्षली
अशी यांची व्याख्या आहे 
शस्त्रास्त्रे बाळगणारा मात्र 
यांचा मोठा देशभक्त आहे 
निष्पापांचे बळी घेणे 
हा यांचा छंद आहे 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत* 

आपल्याच अस्पृश्य भगिनींची
अब्रू नियमित लुटत आहेत 
राजस्थानातले बालविवाह
ढेकरा देत पचवत आहेत 
बुरख्या आडच्या अम्मांसाठी 
खोटे कढ काढत आहेत 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

मानवतेला काळिमा अशी 
यांची जाती प्रथा आहे 
या अमानुषतेला कंटाळून 
लोक धर्म त्यागत आहेत 
विशिष्ट नटांच्या नावाने 
सतत बोटे मोडत आहेत 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

छत्रपती राजे रयतेचे 
सर्व जाती धर्मियांचे 
मृत शत्रूलाही त्यांनी 
सन्मानच दिला आहे 
त्यांचे नाव वापरून
हे बदनामी करत आहेत 
*कारण आपल्या भारतात* 
*धर्मांध खूप माजत आहेत* 

बौद्ध लेण्यातील मूर्ति फोडून
मंदिरच आहे ते सांगणारे
मशि‍दीवर आपला अधिकार 
खोटेपणाने सांगत आहेत 
राम कृष्ण आदि देवांना 
मतांसाठी वापरत आहेत 
*कारण आपल्या भारतात* 
*धर्मांध खूप माजत आहेत*

उरुस काय, शिवजयंती काय,सगळीकडेच उन्माद आहे 
खरा धर्म, न खरा शिवाजी शोधायला इथे कोणाला वेळ आहे
प्रत्येक जण आपल्या परीने सोयीचे अर्थ लावीत आहेत 
*कारण आपल्या भारतात*
*धर्मांध खूप माजत आहेत*

*चला उत्तर देऊया - टीम*