Saturday, February 1, 2020

हिम्मत असेल तर त्यांना सांगा...

हिंदुधर्माबद्दल काही लिहिलं की, बऱ्याचवेळा धर्मांधांची एक कमेंट हजेरी लावून जातेच... ती म्हणजे, "हिंम्मत असेल तर इतर धर्माबद्दल लिहून दाखवा ना!" त्याबद्दल सयुक्तिक उत्तर ... (^m^) (^j^) (मनोगते)

अनेक कडव्या धर्माभिमानी लोकांचा प्रश्न असतो. आम्ही धार्मिक गोष्टी करायला लागलो की, तुम्हाला पुरोगामित्वाचा उमाळा येत असतो. मुस्लिम धर्मात स्त्रिया बुरख्यात असणे, त्यांना मशिदीत माजारपर्यंत जायला मज्जाव असणे, तीन तलाकची पद्धत, खतना करणे या सगळ्यांबद्दल अनेक पुरोगाम्यांनी अनेक वेळेला चिकित्सा आणि टीकाही केल्या आहेत. पण तुम्ही त्या वाचत नाही हा तुमचाच रंगांधळेपणा आहे. 

मुसलमान लोकांच्या अजानबद्दल कधी बोलाल की नाही असे आव्हानात्मक बोलून मुसलमान स्पीकर लावून अजान लावतात म्हणून ढणढणाटी उत्सव आणि फटाके यांच्या निमित्ताने मी माझी प्रकृती धोक्यात घालावी असा होत नाही. आमच्या मते तेही चुकीचेच आहे, पण प्रश्न करणाऱ्यांना एकच सवाल विचारावासा वाटतो, *"मुसलमान एक गोष्ट करतात म्हणून तुम्हीही करणार काय? मुसलमान इतका अनुकरणीय  कधीपासून झाला तुम्हाला ?"*  लोकांच्या चुका दाखवून आपल्या चुकांचे समर्थन करणे यालाच दुटप्पीपणा म्हणतात.'त्यांनी शेण खाल्ले म्हणून आम्हीही शेण खातो', असे म्हणण्यासारखे झाले हे!

मग इतर धर्मियांनी कसंही वर्तन केलं तरी मान्य करावं का? अजिबात नाही! एक पुरोगामी म्हणून इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चनांतील आणि इतर धर्मातील असंख्य अनिष्ठ रुढींना आमचा ठाम विरोध आहेच. कुरुंदकर, हमीद दलवाई, अनिल अवचट, डॉ. श्रीराम लागू, श्याम मानव तसेच नरेंद्र दाभोलकर यासारख्या अनेक समाजवादी पुरोगाम्यांनी तो अनेकदा मांडलेलाच आहे. अंनिसने अनेक आंदोलने ही मुस्लिम बाबाबुवांच्या विरोधात केलेली आहेत. त्याच प्रमाणे जावेद अख्तर अनेकदा जाहीररीत्या आपण नास्तिक आहोत आणि इस्लाम वाईट आहे, हे मांडत असतात. म्हणून काही ढोंगी लोकांमुळे तुम्ही पुरोगामित्व बदनाम करू शकत नाही, की हिंदू धर्माच्या उन्नतीचा प्रयत्न थांबवू शकत नाही.

तेव्हा "आम्हाला काय सांगता, इतर धर्मियांना सांगा ना!" असा टाहो फोडणाऱ्यानी आणि फॉरवर्ड करणाऱ्यानी एकदा स्वतःच्या निष्ठा आणि हेतू तपासले पाहिजेत. हिंदूंचा विकास व्हावा, हिंदूधर्मीयांची प्रगती व्हावी असं ज्यांना वाटत नाही, त्यांनी खुशाल असल्या अस्मिता जोपासण्यात धन्यता मानावी. त्यांनी दगड मारून ना हिंदू स्त्रिया शिकायच्या थांबल्या की हिंदू विधवांचे पुनर्विवाह अडले नाहीत. तेव्हा उत्कर्षासाठी पुरोगामित्व हे अटळ आहे! शेवटी 'परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे.' हे आमची गीता सांगतेच. नाही का?

म्हणून दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने बदलावं मग आम्ही बदलू, यासारखा दुसरा अविवेकी आग्रह नाही. असं जेव्हा एखाद्या व्यक्ती वा समूहाच्या बाबतीत आपल्याला वाटतं, तेव्हा स्वतःच्या मनाशी थोडासा गृहपाठ करून बघावा. त्या व्यक्ती वा समूहाच्या नेमक्या कुठल्या वागण्यात बदल घडावा असं आपल्याला वाटतंय त्याची एक यादी करावी. ती यादी तपासून बघावी. हे लक्षात येईल की इतके सगळे बदल त्या व्यक्ती वा समूहाने 'आपल्याला' बरं वाटावं म्हणून करायचे आहेत! मुळात ती व्यक्ती अशी का आहे, त्याचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नसतो. त्या व्यक्तीचं पूर्वसंचित (आनुवंशिकता, जडणघडण, स्वभाव वगैरे) त्याला जबाबदार असतं. त्या व्यक्तीला दोष देणं, तिने आपल्या अट्टाहासाप्रमाणे बदलावं अशी स्वतःची अवास्तव अपेक्षा तिच्यावर लादत राहणं हे खूप सोपं आहे. त्या अपेक्षा शेवटी आपल्या आहेत, त्या कुठून येताहेत त्यांचा शोध त्यांच्या मुळाशी जाऊन आपणच घेऊ शकतो हे कळणं महत्त्वाचं. अर्थात ही प्रक्रिया कठीण असली तरी ती आपल्या हिताची असते. म्हणूनच तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहे,'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणांसी!' 

मी वाढलो हिंदू धर्मात. लहानपणापासून टिव्ही, पुस्तकं या सगळ्यात हिंदु धर्माबद्दल, त्यातल्या गोष्टींबद्दल कळत गेल्या. एखाद्याचं व्यंगचित्र बनवायचं असेल तर मुळात ती व्यक्ती आधी आपण पाहिलेली असावी लागते. तसंच हिंदु धर्म आजुबाजूला असल्यामुळे त्यातल्या त्रुटी, चुकीच्या गोष्टी (ज्या मला वाटतात) त्या प्रश्न पडल्यामुळे कळत गेल्या. एवढ्या बारकाव्याने आम्हाला दुसऱ्या धर्माबद्दल जराही माहिती नाही. त्यांच्या गोष्टीबद्दल वा कसल्याही धार्मिक सवयींबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. 'नमाज', 'त्यांनी चार बायका करणं' आणि 'चर्चमधलं कॅन्डल लावणं' येवढीच आम्हाला माहिती असते. 

शिवाय भारतात सुमारे 80% हिंदूच आहेत. आपल्या लोकांचा विकास व्हावा असं जर आपल्याला वाटलं तर ते स्वाभाविकच नाही का? जगाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की, रूढी-परंपरांच्या... धर्मान्धतेच्या मागे लागून मध्ययुगातील स्पेनपासून ते आजच्या अफगाणिस्तानपर्यंत सर्वानी स्वतःचे अतोनात नुकसानच केलेलं आहे! ते टाळण्यासाठी समाजातील माणसांना विचारी करणे आवश्यक ठरते. म्हणून समाजसुधारणेसाठी जीवाचे रान करणारे पुरोगामी हेच खरे हिंदुधर्म सुधारक आहेत, आणि परंपरावादी मात्र हिंदुद्वेष्टेच! हाच निष्कर्ष भक्तांच्या कर्मकांडीपणावरून निघतो! कारण ते रूढी, परंपरा, कर्मकांड, पूजाअर्चा यालाच धर्म समजून चालले आहेत.

या कुपमंडुक वृत्तीमुळे ते पुरोगाम्यांना तुच्छ लेखून म्हणतात, 'आमच्या धर्माचा अपमान केलाय ना, मग आता दुसऱ्या धर्माचाही अपमान करा'. असे आव्हान देत असतात. ही कुठली वृत्ती आहे? मला लागलंय तर दुसऱ्यालाही लागायला हवं? यातून तुमच्या 'पवित्र' भावना जागृत होतात काय? हिंदू धर्मात असं सांगितलंय का? आणि अंधभक्त तरी धर्म व्यवस्थित पाळतात काय? खरंतर धर्म पाळणारे बव्हंशी दांभिकच असतात. पण आपण दांभिक आहोत, हे न कळण्याइतपत तरी माणसाने मुर्ख नसावं!

कल्पना करा, आपल्याला आजार झालेला आहे. तर आपण त्यावर कडू औषधं घेतो. गरज पडली तर शरीराची चिरफाड करून व्याधीवर उपाय करतो. 'तो शेजारी बघा, मधुमेह असून कित्ती साखर खातो, बिनधास्त! आणि मी काय म्हणून पथ्य पाळू?'  हा युक्तिवाद आपण सुरू केला तर नुकसान आपलंच होतं. नाही का? तसंच माझ्या धर्मात काही दोष असतील तर त्यावर बोलून, टीका आणि चिकित्सा करून आपल्या धर्माची उन्नती होईल का शेजारच्या दोषांकडे बोटं दाखवून? पण या चिकित्सेला उत्तरे देता येत नाहीत म्हणून 'तुम्ही आमच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करणारे हिंदुद्वेषी आहात' असे म्हणून आपण आपल्यालाच मागास ठेवण्यात काय हशिल आहे?

हां, आता रुढीच्या नावाखाली स्त्रियांना सापत्न वागुणक देणं अगर सणाच्या नावाखाली पर्यावरणाला हानीकारक वर्तन ठेवणं किंवा मग बाबाबुवांच्या नादी लागून पैसे उधळणं हा आपल्याला दोष वाटतच नसेल तर गोष्ट वेगळी. समोर खड्डा आहे हे दाखवण्याचे काम सजग विचारी माणसे करत असतात. त्या खड्ड्याला टाळायचे की, त्यात पडायचे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते.  

म्हणून आमचा राग कुठल्याही एका धर्मावर नाही, तर त्या त्या धर्मातील दांभिकतेवर आणि शोषणावर आम्ही प्रहार करून धार्मिक सुधारणा घडवून आणू इच्छितो. काय समजलेत?

No comments: