Thursday, August 8, 2019

धर्मांधांच्या छद्मी प्रश्नांना उत्तरे...

खालील प्रश्न नेहमीच अंनिस चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारले जातात, म्हणून आम्ही एक सार्वत्रिक उत्तर तयार केले आहे. ते चर्चेसाठी सादर करीत आहे... -जेट जगदीश. (^j^)

1. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती समाजप्रबोधन करु शकत नाही का ?

उत्तर : अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीचे समाजप्रबोधन हे 'देवाधर्माच्या भीतीने तुम्ही नितीने वागा म्हणजे तुम्हाला मृत्यू नंतर स्वर्ग मिळेल', अशाप्रकारचे असते.संतांची भूमिका जरी समाजप्रबोधनाची असली तरी ते जातीच्या चौकटी भेदू शकले नाहीत. भक्तिमार्गाचा आधार घेऊन परलोकातीळ मोक्षाचा आनंद इहलोकापेक्षा मोठा आहे, हे सांगून भारतीय जनमानस दैववादी बनवले. कर्मकांड आणि छाछुगिरीवरील टिका सोडल्यास समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यास त्यांचा फार उपयोग झाला नाही. एवंच एका संकुचित मर्यादेपर्यंत हा उपदेश चांगलाच असतो, पण तो भीतीपोटी विचार मारतो. परिणामी माणूस नवीन काही करायला धजावत नाही. आणि समाज स्थितीशील बनतो. त्याचमुळे आपण सतत मागास राहिलो आहोत. त्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी प्रश्न विचारायला आणि नवनवीन आव्हाने स्वीकारायला तयार करणारे समाजप्रबोधन समाजाला नक्कीच प्रगतीपथावर नेते. कारण प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या धडपडीतून नवनवीन शोध लागतात. जसे शोध 10व्या शातकापर्यंत शूल्ब, चरक, सुश्रुत, आर्यभट, कणाद, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांनी लावले, तसे त्यांच्या नंतर प्रश्न न पडण्याची आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', ही वृत्ती वाढीला लागल्यामुळे ती वैज्ञानिक परंपरा खंडित झाली. म्हणूनच अध्यात्माची कास सोडून वैज्ञानिक विचारांची कास धरायला हवी.

2. डोळस श्रध्दा असणे योग्य की अयोग्य?

उत्तर : 'डोळस श्रद्धा' हा भोंगळ शब्द प्रयोग आहे. कारण श्रद्धा कधीही तपासता येत नाही, तसेच श्रध्देच्या चिकित्सेलाही मज्जाव असतो.म्हणून श्रद्धेय माणूस बदलाला सतत विरोध करत असतो. पण विश्वास मात्र तापासाता येतो... त्याची चिकित्सा करता येते. त्यामुळे बदल अपेक्षित असतो. श्रद्घा आणि वैज्ञानिक सत्य तथा गृहीते यांतील भेद पुढीलप्रमाणे आहेत...
(a) वैज्ञानिक सत्य हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. तर श्रद्धा मात्र कुठलीही शंका न घेता आहे तसेच स्वीकारण्याचा आग्रह धरते.
(b) वैज्ञानिक सत्य किंवा ज्याविषयी ते सत्य आहे, तो विषय आदरणीय किंवा पूज्य नसून ते वास्तव असते. याउलट जेव्हा सत्याचा किंवा अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो केवळ बौद्घिक स्वीकार नसून, त्यात व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारा भावनिक आणि इच्छाशक्तीचा भागही असतो. ती निष्ठा असते.
(c) श्रद्घेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. तर वैज्ञानिक सत्याचा स्वीकार मात्र पुरावे आणि तर्क यातून तावून-सुलाखून निघाल्यावरच केला जातो.
(d) श्रद्घेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात. तर विज्ञानात ह्या भावनांना स्थान नसते. कारण ते फक्त सत्याचा स्वीकार करते. विज्ञान हे तटस्थ असते, म्हणून त्याला दुधारी शस्त्र म्हणतात. ते वापरणाऱ्या माणसाच्या भावनाच त्याचा वापर विधायक वा विघातक गोष्टींसाठी करतात. म्हणून दोष विज्ञानात नाही तर माणसातच आहे.
तेव्हा 'डोळस श्रद्धा' हा शब्द 'विश्वास' या अर्थी वापरत असाल तर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण डोळस श्रद्धा असे काही नसतेच.

3. ज्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्ती आहेत, त्यांच्यावर केरळसारख्या रांज्यात जे हल्ले होत आहेत, त्याच्यावर इतर प्रसंगी हल्लाबोल करणारे पुरोगामी आता एकदम अबोल आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा नाही आहे का ?

उत्तर : या देशांतील. उजव्या आणि डाव्यांच्या असहिष्णुतेची उदाहरणे कमी नाहीत. जसे परिवारातील अतिरेक्यांकडून सध्या गोवंश हत्याबंदीपासून नैतिकता लादण्यापर्यंत जो काही आचरटपणा सुरू आहे तो त्यांना बंद करावा लागेल. तसेच डाव्यांतील अनेकांनाही हे राजकीय हत्यासत्र थांबवावे लागेल. वैयक्तिक आयुष्यात ही मंडळी विचाराने आणि आचाराने आधुनिक आणि अहिंसकही असतात. परंतु पक्ष म्हणून ते उभे राहिले की त्यांच्यातील कर्मठपणा जागा होतो आणि केरळात जे काही घडते ते घडू लागते. याचा अर्थ इतकाच की हे टाळावयाचे असेल तर उभय बाजूंना आपल्या विचारधारेत सहिष्णुतेस स्थान द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणाने - मग तो डाव्यांचा असो वा उजव्यांचा - कोणाचेच भले होत नाही. सोव्हिएत रशिया आणि हिटलरकालीन जर्मनी ही याची जिवंत उदाहरणे. हे या मंडळींना कळत नाही असे नाही. परंतु त्यांची पंचाईत ही की ही अंध पोथीनिष्ठा त्यांनी सोडली तर या दोन्हीही पक्षांचे चेहरेच हरवतील. गोमाता, धर्म आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद वगळता भाजप हा काँग्रेससारखाच दिसेल आणि भांडवलशाहीचा विरोध सोडल्यास डावे हे समाजवाद्यांसारखे दिसतील. ही खरी या दोघांची अडचण आहे. अतिरेकी पोथीनिष्ठेचा शेवट हा नेहमीच पिंजऱ्यातच होत असतो.(संदर्भ :लोकसत्ता अग्रलेख, 08/08/2017)

4. कोणत्याही धर्माचा कट्टरवाद वाईटच, पण भिन्न विचारसरणी असलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमुहाबद्दल काही विचारवंत किंवा पुरोगामी यांचे विचार अंत्यत टोकदार आहेत, त्यांच्या या वर्तनुकीला "वैचारिक कट्टरवाद" म्हणता येईल का ?

उत्तर : धार्मिक कट्टरतावाद आणि धारदार शब्दात केलेला वैचारिकवाद या दोन भिन्न गोष्टी आहेत. कारण धार्मिक कट्टरतेत विचारांतील मुद्यांपेक्षा शारीरिक गुद्यांवर भर असतो. तर वैचारिक विवादात शब्द जरी धारदार असले तरी समोरच्याला चर्चा करण्यास उद्युक्त करण्यात रस असतो. पण कट्टर धार्मिक तो आपल्यावर झालेला हल्ला आहे असे समजून प्रामाणिक चिकित्सा करण्यापेक्षा विवादातील आपल्याला सोईचे मुद्दे घेऊन आपणच कसे बरोबर आहोत असा अट्टाहासाने सांगत असतो. आणि 'मी म्हणेन तेच ऐकले पाहिजे नाहीतर गोळ्या घालून संपवून टाकीन' अशी भाषा धार्मिक कट्टर लोकांची असते. त्याउलट भारतात वैचारीक प्रतिवाद कारणाऱ्यांनी कधीही खुनाची खुनशी भाषा सोडाच पण साधी धमकीही दिलेली नाही. एवंच ही तुलना अयोग्य आहे.

5. सर्वधर्मसमभाव जोपासणे आणि जातीयता नष्ट करणे यासाठी आपण लढत आहात.( आ. दाभोलकरांच्या मते जात मानने ही सुध्दा अंधश्रध्दा आहे.) असे असतांना प्रवृत्तींवर टिका करण्याऐवजी संपुर्ण ब्राम्हण समाजालाच टिकेचा धनी बनविले जात असते, सर हे योग्य आहे का ? अशी संपुर्ण जातीबद्दल किंवा समाजाबद्दल गरळ ओकणारे जातीयवादी नाहीत का ?

उत्तर : सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, 'ब्राम्हण' ही जात आहे तर 'ब्राम्हण्य' हा गुणधर्म आहे... वृत्ती आहे. इतरांना तुच्छ आणि कमी प्रतीचे लेखणे व स्वत:ला श्रेष्ठ व उच्च समजणे ही ब्राम्हण्याची लक्षणे आहेत. धूर्तपणा, फसविण्याची कला, गर्विष्ठपणा ही आणखी काही लक्षणे आहेत. अहंगंड जोपासणे व वाढवीत रहाणे हे ब्राम्हण्यच आहे. ब्राम्हण्य दीर्घद्वेशी असते. खोटे बोलणे, रेटून बोलणे एकाच वेळा वेगवेगळे बोलणे ही आणखी काही वैशिष्टे सांगता येतील. जात जन्माने मिळते. ब्राम्हणांत कांही चांगले असते. व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा लाभ मिळतो. समाज घटक म्हणून ब्राम्हण्य हानिकारक असते. ब्राम्हणांत ब्राम्हण्य जपणारे थोडे असतील परंतु ब्राम्हण्य नसलेले सुध्दा काही असतात. तसेच ब्राम्हणेतरातही काही ब्राम्हण्य धारण कलेले असतात. ब्राम्हण्य हे मुलतः व मुख्यत ब्राम्हण जातीनेच जन्माला घातले व वाढविले, परंतु अलिकडे इतर जातींतही ते वाढत आहे. ब्राम्हणातले ब्राम्हण्य तर वाईट आहे. अब्राम्हणांतले ब्राम्हण्य सुद्धा वाईटच असते व आहे. अनेकदा ब्राम्हणेतारांतील (जातीने ब्राम्हण नसलेला) ब्राम्हण्य सामाजिकदृष्ट्या जास्त हानिकारक असते. सर्वात जास्त पुरोगामी सुद्धा ब्राम्हण जातीतच आहेत. ज्याअर्थी अमुक एक व्यक्ती जन्माने ब्राम्हण आहे. त्याअर्थी तो प्रतिगामी आहे आणि ज्याअर्थी अमुक एक म्हणजे मराठा किंवा दलित किंवा ओबीसी आहे. त्याअर्थी तो पुरोगामी आहे. ही दोन्ही प्रमेये चूक आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनाच टार्गेट केले जाते, असा विचार आपलाच सामाजिक अभ्यास कमी असल्याचे दाखवतो.

6. हिंदू धर्मावद्दल अंत्यत घृणास्पद बोलणारे आणि शिवराळ भाषा वापरणार्यांना धर्मांध म्हणू नये का ? [विवेकाने चिकित्सक बुध्दीने मांडणी करणाऱ्यांची भाषा कधीच शिवराळ नसते.]

उत्तर : जे खरेच शिवराळ भाषा वापरतात ते छद्म पुरोगामी असले पाहिजेत. पण प्रबोधनकार ठाकरे, आगरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर यांनी तर हिन्दु धर्माविषयी अत्यंत जहाल शब्दात टीका केली आहे. प्रबोधनकारांनी शंकराला हिंदूचा 'गंजड देव' म्हणजे गांजा पिणारा असे म्हटले आहे. संदर्भासाठी त्याची 'हिंदू धर्माचा ऱ्हास' आणि 'देवाचा धर्म व धर्माची देवळे...' ही पुस्तके वाचा. आगरकारांचे 'सुधारक'पत्रांचे 3 खंड शासनाने प्रसिद्ध केले आहेत ते वाचा. आणि सावरकरांची 'क्षकीरणे' व 'विज्ञाननिष्ठ निबंध' वाचा. हे वाचल्यावर जहाल, धारदार शब्द  आणि शिवराळ भाषा या शब्दांतील फरक कळेल. ह्यावरून लक्षात येईल की, धर्मावर टीका करणे म्हणजे चुकीच्या विचारसरणीला प्रश्न विचारून धर्माची चिकित्सा करणे होय. हीच चिकित्सा माणसाला आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करते. त्यातूनच धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा घडण्यास सुरुवात होते. तेव्हा चिकित्सेला घाबरून ते बोलणे म्हणजे धर्माचा द्वेष करणे वा धर्मावर केलेला हल्ला आहे असे समजणे, हेच समाजाला नुकसानकारक ठरणारे आहे.