नाते टिकवूया : (^m^)(^j^)(मनोगते)
नाती हा दोन अक्षरी शब्द, पण तो जपण्यासाठी माणसाला किती आटापिटा करावा लागतो. किती वर्षे खेळतात पती-पत्नी संसाराचा सारीपाट! तरी पण दोघांचेही हिशोब नात्यासंबंधी वेगवेगळेच असतात माणसांचं आयुष्य कमी पडत, नाती जपताना जीवन हे भूमितीप्रमाणे स्वतःची चाकोरी मोजत मापत चाललेलं असतं, त्यातील अगणित समस्या सोडवता सोडवता इष्ट मित्रांच्या नातेवाईकांच्या सहवासात प्रेम, वात्सल्याच्या रेषेवरून चालत राहातात माणसं ! पण काटकोन, त्रिकोणाच्या अंशाची बेरीज मात्र सापडत नाही.
कारण माणसाला अनेक समस्यांनी घेरलेले असते कोण त्या व्यक्तीशी कसे वागायचं! कसं बोलायचं! हे त्या व्यक्तींच्या नातेसंबंधावरून, प्रसंगावरून ठरून जाते. प्रसंग, वेळ, क्षण, माणसाला अनेक माणुसकीचे धडे शिकवत असतात.
मन हे प्रत्येक गोष्टीतील शंकाकुशंकानी एकमेकांच्याजवळ जायला धजत नाही. ती व्यक्ती एकमेकांना नावे ठेवीत नात्यापासून दूर दूर पळू लागते. मनातील रागाचे वादळ शांत न होता अनेक शंका कुशंकाच्या जाळ्यात भडकलेले मन, अधिकच रौद्र रूप धारण करीत, मैत्रीच्या नात्याच्या धाग्याला तुटण्यापर्यंतचा ताण देत राहातात, मग ते केव्हा तुटेल सांगता येत नाही.
लांब राहुनही काही नाती टिकविता येतात, आपण प्रेमाच्या आधारावर जग सुद्धा जिंकू शकतो. जिवाची पर्वा न करता, एकमेकांना दिलेली प्रेमाची साथ, ती नाती घट्ट करतात. नाहीतर माणूस सैतानासारखा वागू लागला तर माणूसकीला पारखा होतो आणि जवळच्या नात्याची धूळधाण उडवून टाकतो. हे आपण रोज वर्तमानत्रातील बातम्यातून वाचत असतो. पण ठोस पाऊल (त्याविरुद्ध) उचलत नाही.
सध्याच्या वातावरणात मनाला भावणारे सध्याचे बालमनाचे चित्रच निराशाजनक आढळून येत आहे. त्याची अनेक कारणेही आहेत. समाज हा पैश्याच्या मागे धावत आहे. विभक्त कुटुंबातील मुलं एकाकी वाटत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या समस्या वेगवगळ्या पण मुले व मुलांची मानसिकता एकच आहे. ही प्रत्येक कुटुंब निरनिराळ्या स्वभाव गुणांच्या, बुध्दिमत्तेच्या, संस्काराच्या पाया घातलेल्या खांबावर उभी आहेत. प्रत्येक व्यक्तीच व्यक्तीमत्त्व वेगवगळे घडत असते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये नात्यामधील प्रेमाचा एक महसूल रेशीम धागा न तुटण्याचा प्रयत्न सर्वानी केला पाहिजे. त्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवावयास हवा. जन्मापासूनच माणसाला नाती चिकटलेली असतात. ती निभावून नेण्यासाठी प्रेमाचं नात मनापासून निभवाव लागत. ते आनंदान स्वीकारले तर सगळ्यानाच आनंद मिळतो. वेळीच सुसंवाद झाला तर नात्यामधील दुरावा नाहीसा होतो. अश्या काही गोष्टी मनात घर करून बसतात अन् मग नको त्या विचारानी मन कोळयाच्या जाळ्यासारखं त्या नको अशा विचारात गुरफटून बसते
म्हणून नात्याचा अर्थ कळण्यासाठी प्रथम सगळ्यांचा विश्वास संपादन करता आला पाहिजे. विश्वासावर सगळ जग चालते, माणसाचा जन्म एकदाच मिळतो. नातीही एकदाच मिळतात. ती निभावून कशी न्यायची, हे ज्याचे त्यानं ठरवले पाहिजे. आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. आपल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडू नका. चांगल्या वाईट गोष्टी माणुसच निर्माण करतो. आपण जरी आपले रक्त दुसऱ्याला दिले, तरी त्याचे व आपले रक्ताचे नाते होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक नात्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. नात्याचीच माणसं संकटकाळी उपयोग पडतात.
जीवनात आपण अनेक सुंदर कल्पना साकारत असतो. त्यातील महत्त्वाची कल्पना नाते संबंध. नाते संबंध निर्माण करण्याचा व जोडण्यामध्ये अनेक उद्देश आहेत. जीवन सुखद व्हावं. आरामशीर असावं, सुंदर असावं. जीवन शांतपणे जगता यावं, आनंदी असावं असे अनेक हेतू त्यामागे आहेत. अशी नाती बनविताना पहिले तुमचं तुमच्याशी असलेले संबंध स्पष्ट असणं गरजेच. स्वतः स्वतःला ओळखलं पाहिजे. असे आपण जेव्हा करू त्यावेळी आपणास नात्यांमध्ये सुंदरता आणि सौंदर्य भरलेलं दिसेल, आणि तुमच्यात बदल घडेल. तुमच्या वागण्यात, जीवनात, अहंपणाला जागा उरणार नाही. नाती बिघण्याचं कारण म्हणजे आपल्यात असलेला अहंकार, गर्विष्टपणा! म्हणून अहंकाराला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका. मग बघा जीवन किती सुंदर आहे.